गावात नैसर्गिक व तत्सम संकटांनी प्रवेश करू नये या धार्मिक भावनेपोटी गाववस्तीच्या शिवेवर मंत्रतंत्राच्या साहाय्याने रेषा काढून गाव बंद करणे म्हणजे गावबांधणी . ही प्रथा मुख्यतः कोलाम या आदिवासी जमातीत आढळते . कोलामी भाषेत या प्रथेला साती असे म्हणतात . ही प्रथा दरवर्षी गावाच्या सामूहिक सहभागातून उत्सव म्हणून पार पाडली जाते . हा उत्सव वैशाख महिन्याच्या आरंभापासून ते ज्येष्ठ् महिन्यातील पौणिमेपर्यंतच्या कालावधीत (साधारणत: एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान )केंव्हाही पार पाडला जातो. वस्तीला व वस्तीतील लोकांना कोणत्याही रोगराईचा त्रास होऊ नये, क्रूर प्राण्यांनी वस्तित शिरून त्रास देऊ नये, आणि बाहेरच्या भुताखेतांनी पछाडू नये यादृष्टीने हा गावबांधणीचा उत्स्व करण्यात येतो. गाव बांधून काढले की भुते खेते, रोगराई गावाच्या बाहेरच राहते, गावाच्या आत येत नाही, अशी या लोकांची ठाम समजूत आहे.नवीन वसलेल्या कोलामवस्तीत पहिली तीन वर्षे गावबांधणी होत नाही. मोरामदेवाची पूजा करून वस्ती वसवल्यावर तीन वर्षांनी त्या वस्तीत गावबांधणी साजरी होते.

हा उत्सव दोन दिवस चालतो. पहिल्या दिवशी सायंकाळी 4-5 वाजता गाव बांधून काढण्यापासून या उत्सवाला सुरुवात होते. वस्तीमधील देवीला शेंदूर लावून तिची पूजा करण्यात येते. यावेळी बकरा किंवा कोंबडे कापून ते कोलामांची मुख्य देवता देवीला अर्पण करतात. हा उत्सव देवीपुढेच प्रामुख्याने पार पडतो. ही देवी चावडीच्या पुढील अंगणात, वस्तीच्या मध्यवर्ती जागी असते . चावडी पुढील आगटीत अग्नी पेटवण्यात येतो, तो अग्नी रात्रभर धगधगत असतो. देवीची पूजा करुन झाल्यावर सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्याच्या थोडे अगोदर गाव बांधला जातो. गाव बांधून काढणे म्हणजे वस्तीभोवती रेषा काढून गाव बंद करून टाकते. ही बांधणी मंत्रतंत्राच्या साहाय्याने भगताकडून विधियुक्त् होत असते.
देवीची पूजा करून प्रथम सर्वजण वस्तीच्या ईशान्य् कोपऱ्यावर जातात. या कोपऱ्यास मुदलकोण असे म्हणतात. लाकडाचा उलटा नांगर रोवण्याची प्रकिया प्रथम या कोणावर होते. या कोणावरची कोलामांची देवता ‘पेट्टा दियाम’ या नावाने ओळखली जाते. या कोनापासून गाव बांधणे सुरु होते. ह्या कोनावर तीन दगडांमध्ये एक खुंटी गाडण्यात येते. या खुंटीच्या व दगडांच्या खाली एक कोंबडा किंवा कोंबडीचे पिलू पुरण्यात येते. या कोनांची व देवांची पूजा पुजाऱ्यामार्फत केली जाते. त्याच्याजवळ एक मोठा भाला असतो. त्या भाल्याने रेषा आखीत-आखीत तो पश्चिमेकडे वस्तीच्या काठाकाठाने चालत जातो. इतर सर्व कोलाम वस्तीच्या बाजूने, रस्त्याच्या आतील भागाने असतात. पुजाऱ्याबरोबर ते आतल्या बाजूने चालतात. आधीच कापलेल्या बकऱ्याच्या रक्ताने चौदा द्रोण भरलेले असतात. त्यातील सात वाकाला (बाहेरचे) व सात लोपाला (आतले) असतात. ते चौदा द्रोण चौदा माणसांजवळ प्रत्येकी एकेक याप्रमाणे देतात. त्यांपैकी सात माणसांना आतल्या बाजूने व सात जणांना रेषेच्या जवळून बाहेरच्या दिशेने चालावे लागते. दुसऱ्या एकाजवळ घोंगडी असते. घोंगडीच्या घडीत मीठ किंवा वाळू असते. आणखी एकाजवळ सूप व खुंट्या असतात. खुंट्या ठोकणारा प्रत्येक कोनावरच्या तीन दगडांमध्ये खुंटी ठोकून मजबूत करीत जातो. रक्ताचे द्रोण घेतलेले कोलाम रक्त् शिंपडत जातात. ‘बाहेरचे’ द्रोण घेतलेले बाहेर शिंपडतात व ‘आतले’ द्रोण घेतलेले आत शिंपडतात. मीठ वा वाळू घेतलेली व्यक्ती मीठ वा वाळू हातात धरून आखीव रेषेवर टाकीत जाते.
चालत-चालत सर्व कोलाम वायव्य कोणावर येतात. ह्या कोनाला महादेव कोन असे नाव आहे. उलटा नांगर, तीन दगड, खुंटी व त्याखाली पुरावयाचा कोंबडा किंवा कोंबडीचे पिलू ह्या बाबी येथेही असतात. पूर्वीच्या कोनाप्रमाणेच ह्याही कोनाची पूजा होते व पूर्वीप्रमाणेच रक्त् शिंपीत, वाळू वा मीठ टाकीत व रेषा आखीत ते कोलाम दक्षिण दिशेकडे वस्तीच्या पश्चिमेकडून पुढे चालू लागतात. रेषा आखीत जाणारा पुजारी भाल्याच्या साहाय्याने गाव बंद करीत जातो. नैऋत्येकडील कोनास ‘मोराम कोन’ असे म्हणतात. या कोनावरील मोराम देवतेचे महात्म्य् फार आहे. वस्ती बसविताना या देवाची पूजा सर्वप्रथम केली जाते. गावबांधणी पूर्वीही त्याची पूजा पहिल्यांदा झालेली असते. गाव बांधताना पुजारी आणि कोलाम पुन्हा या कोनावर येत असल्यामुळे मोराम देवाला एकाच दिवशी दोनदा पूजालाभ होतो. या दुसऱ्या वेळी ‘मुदल’ व ‘महादेव’ या दोन कोनांवरील पूजेप्रमाणे येथेही पूजा होते. वस्तीच्या आग्नेय कोनावरही पूर्वीच्या तीन कोनांप्रमाणेच विधी केले जातात.
वस्तीच्या पूर्व बाजूच्या मध्यावर एक बैलगाडी जाण्याजोगी वाट ठेवून ही रेषा मुदलकोनाला भिडविण्यात येते. या रस्त्यावर दोन बाजूंना दान उल्टे नांगर चार कोनांप्रमाणेच बसविले जातात. असे एकूण सहा जागी सहा नांगर बसविण्यात येतात व चार कोनांवर तीन-तीन दगडांमध्ये एकेक खुंटी पक्की केली जाते. शेतकामातून जुने झालेले तुटके नांगर गावबांधणीच्या वेळी उपयोगाला येतात. सहा तुटके नांगर मिळाल्यास, कमी पडलेल्या कोनांवर नांगरासारखे लाकडी तुकडे बसवितात. संपूर्ण कोलाम वस्तीच्य् भोवताली रेषा आखून पूर्ण केल्यावर सर्व कोलाम जेथून निघाले त्या मुदलकोनावर येतात. पुजारी त्या कोनाच्या तीन दगडांवर उभा राहतो. बाजूला भगत असतो. बाकी सगळे कोलाम आतल्या बाजूस राहतात. माहूरची देवी कोलामांना सर्वाधीक पूज्य् आहे व तिलाच या दिवशी प्रामुख्याने आवाहन केले जाते. याशिवाय गावोगावच्या देवी, देवदेवता आल्या काय? असेही प्रश्न् विचारून त्यांची उत्तरे दिली जातात. अशा सर्व प्रश्नोत्तरांची पुरावृत्ती तीनतीन वेळा मुदलकोनावर करण्यात येते. नंतर चावडीपुढे देवीजवळ दोन वेळा तीच प्रश्नोत्तरे पुन्हा होतात.
ही प्रश्नोत्तरे संपतात न संपतात तोच डफ वाजविणारे कोलाम जोराने वाद्यध्वनी करतात. त्या आवाजासरशी भगतातच्या अंगात देव येतो व तो घुमू लागतो. त्या भरात भगत एकटाच चारही कोनांवर जाऊन देव पाहून येतो. बाकीचे कोलाम देवीजवळच थांबतात. भगत आणि त्याच्या बरोबरची एकदोन माणसे वस्तीच्या आत असलेले दगडांचे सारे देव जमा करून आणतात आणि देवीजवळ एकत्र करून ठेवतात. त्यानंतर देवीजवळच रात्रभर जागून नाचण्याचा कार्यक्रम आरंभ होतो. गाव बांधून झालेले असते. आता भुतेखेते, क्रूर प्राणी व रोगराई यांना आत येणे शक्य् नसते. त्या सीमांच्या आत कोलाम लोक आनंदाने अगदी बेहोश होऊन नाचतात.
गाव बांधून झाल्यावर कोणताही कोलाम त्या बांधणीच्या बाहेर गावबांधणीचा उत्सव संपेपर्यंत जाऊ शकत नाही. बाहेरच्या चुकल्या माकल्या कोलामाला आत येण्यासाठी पूर्वेची वाट असते. परंतु गावबांधणी च्या दिवशी कोणताच कोलाम वस्तीबाहेर नसतो. हा कोलामांचा धर्मविधी असल्यामुळे, हा विधी टाळणे म्हणजे धार्मिकतेला तडा जाणे, अशी भावना कोलामांमध्ये असते. गाव बांधून झाल्यावर त्या दिवशी, त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्या आखीव व रेषेच्या आत कोणीही बाहेरील माणूस (कोलामेतर) जाऊ शकत नाही. कोलामेतरांना ही रेषा ओलांडण्याची सक्त मनाई आहे, अशी ताकीदच जाहीर रीतीने ओरडून दिली जाते. त्यादिवशी कुणी इतरांनी आत येऊ नये आल्यस त्यांना आमच्या धर्मनियमांप्रमाणे शिक्षा होईल, असे ते स्पष्टपणे सांगतात. भगताच्या अंगातील देव उतरण्याची पहिली फेरी संपली की कोलाम लोक आळीपाळीने जेवण करण्यासाठी मोकळे होतात. भगताच्या अंगातील देव उतरण्याच्या पहिल्या फेरीला पहिला घट असे म्हणतात. रात्री 8-8.30 वाजेपर्यंत चावडीसमोरील देवीच्या अंगणात सर्व कोलाम स्त्री-पुरुष जमतात. पाहुणे, मुलेबाळे सगळे तेथे येतात. त्या रात्री देवीजवळ दंडार, गमतीजमती, नृत्ये, वाद्ये, गीते इत्यादी बाबींचा जल्लोष चालतो. वस्तीतील सगळ्यांनीच रात्रभर जागे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा असते. खऱ्या अर्थाने गावबांधणी हे जागरण ठरावे, हा त्यामागचा हेतू असतो. नृत्यासोबत कोलाम लोक गीते गातात.‘गावबांधणी’ च्या या उत्स्वातील गीतांमध्ये भगताची टिंगल उडविणारी विनोदी गीतेही असतात.पहाटे चारच्या सुमारास दुसरा ‘घट’ होतो, म्हणजे भगताच्या अंगात दुसऱ्यांदा देव येतो. त्यांनंतर वस्तीतील बहुतेक घरी भगत जातो. त्याच्या हातात साट (दोरीचा मोठा चाबूक) असतो. तो प्रत्येक घरी जाऊन हळद कुंकू आणतो. ‘भुताई दे, वाघाई दे’ असे काहीसे बडबडतो आणि हातावर सोट मारुन घेतो. त्याला सावरण्यासाठी इतर दोनचार कोलाम असतातच. प्रत्येक घरातून कोंबडा, कोंबडीचे पिलू, जे काय सापडेल ते गोळा करून भगत देवीजवळ आणून ठेवतो. त्याच्याजवळ एक लहान डफ असतो. देवदेवतांची नावे घेऊन डफावर थाप मारीत मारीत भगत पुढे चालतो.भगताच्या मदतीला एक नकली भगत असतो. त्याला घोट्टे सुपारी असे म्हणतात. तो घरोघरी जाऊन भाकरी जमविण्याचे काम करतो.
भाकरी जमविण्यासाठी नाचे कोलामसुद्धा फिरतात. सूर्यनारायण उगवू लागताच नृत्यापटूंची धुंदी उतरू लागते. स्त्रिया ह्या वेळेपर्यंत ताज्या भाकरी करुन ठेवतात. कोंबड्या बकऱ्यांच्या ढिगाजवळच भाकरींचा ढीग वाढत जातो. खरे म्हणजे या सणात भाकरींपेक्षा अंडी, बकरा, कोंबडा, कोंबडी, कोंबडीची पिले यांचाच मान अधिक असतो. म्हणूनच की काय, अपेक्षेपेक्षा अधिकच ह्या वस्तू आलेल्या असतात.त्याच वेळी तीर्थप्रसाद देण्याची वेगळी रीत कोलामात आढळते. नृत्ये चालू असताना सकाळी तव्यात बकऱ्याचे आतडे शिजविले जाते. त्याचे तुकडे करुन ते आणि सोबत थोडे पाणी जांभळीच्या पानातून भाकरी आणण्याच्या हातावर घट्या (पंचमंडळाचा एक सदस्य्) ठेवीत जातो. भाकरी ठेवून घेणे व तीर्थप्रसाद देणे हे काम त्यावेळी ‘घट्या’ चे असते.
साधारणत: सकाळी 7-8 च्या दरम्यान गावबांधणी चा कार्यक्रम विशिष्टा विधि होऊन संपतो. कोलामांच्या नाईकाच्या घरून मातीचे पाच गोळे करुन आणतात. त्यानंतर आदल्या दिवशी देवीपुढे केलेला पानांचा मांडव उकलून टाकतात आणि देवीला घोंगड्याने झाकून ठेवतात. त्यावर मोठे टोपले उपडे ठेवतात. देवीची जागा बकरा कापावयाच्या वेळी आधीच उकरवाकर झालेली असते. त्या जागेला मातीच्या पाच गोळ्यांनी लिंपून काढतात. मांडवाची पाने गोळा करुन त्यांचे एक ओझे बांधतात. यावेही 7-8 वर्षांच्या पाच कुमारिका भगताजवळ येऊन हळदीकुंकवाने त्याला औक्षण करतात. यावेळी भगताच्या जोडीला आणखी चार मुले बसविली जातात. भगत व ती चार मुले अशा एकूण पाच जणांना त्या पाच बालिका त्यावेळी ओवाळतात. त्यानंतर कोलामांचा नाईक टोपल्यात पान, कोंबडीची मेलेली पिले व देवी व ठेवतो. ते ओझे डोक्यावर उचलतो. कोलाम स्त्रिपुरुष लोटे-घागरी भरुन पाणी आणतात. व त्या देवीवर आणि पानांच्या डहाळ्यांवर ओततात. थकलेला भगत जर यावेळी पेंगत असेल, तर त्याच्याही अंगावर ते पाणी ओततात. दोन्ही ठिकाणी सांडलेले पाणी सर्व कोलाम तीर्थ म्हणून प्राशन करतात. नंतर नाईक पुढे व इतर सर्व लोक त्याच्या मागे अशा थाटात वाजतगाजत देवी वस्तीबाहेर जायला निघते. निघण्यापूर्वी सर्वजण देवीच्या ठाण्याला प्रदक्षिणा घालतात.
गावबांधणी बाहेर जाण्यासाठी पूर्वद्वाराचा उपयोग करण्यात येतो. भगत येऊन या द्वारावर आडवा झोपतो. झोपलेल्या भगताच्या अंगावरून वस्तीतील सर्व कोलाम पुरुष बाहेर जातात. सर्वजण गेल्यावर भगत उठून त्यांच्यासोबत चालू लागतो. ही मिरवणूक बाहेर गेल्यावर गावबांधणीतून येणेजाणे सुरु होते .देवी घेऊन वाजतगाजत बाहेर गेलेला हा जत्था एकदोन फर्लांगाच्या अंतरावरील एका ठराविक जागी येतो. तेथै डोक्यावरील देवी उतविण्यात येत. डहाळ्या फेकण्यात येतात व नाचताना खेळण्यासाठी उपयोगात आणलेल्या लाकडी तलवारी मोडून टाकतात. नाचणारे आपल्या पायांतील घुंगरु तेथेच सोडतात. तेथे म्हसोबाची (किंवा त्याच्यासारख्या देवाची) पूजा करण्यात येते. भगताच्या अंगातला देव उतरावा म्हणून त्याच्या तोंडात अंडे घालतात.नंतर सर्व कोलाम पुन्हा वस्तीत येतात आणि चारही कोनांची एकदा पूजा करतात. पुरुष वस्तीबाहेर गेल्यावर बायका सोट ’ घेऊन एकमेंकींना मारतात आणि एकमेकींच्या अंगावर चिखल फेकतात. ‘गावबांधणीतील’ कार्यक्रमांची अशा रीतीने त्या नक्क्ल करतात.पुरुष परत येऊ लागताच त्या घरोघरी पळून जातात. ‘गावबांधणी’ संपल्यावर पाच दिवसांपर्यंत कोलामांनी तसेच इतरांनीही पादत्राणे घालून कोलामवस्तीत फिरू नये, असा नियम आहे. ‘गावबांधणी’ झाल्यावर नवीन मोसम सुरु होईपर्यंत त्या कोलाम वस्तीत लग्ने होत नाहीत. ‘गावबांधणी’ होण्यापूर्वी मोह खाऊ नये असाही संकेत आहे.

संदर्भ :

  • मांडवकर, भाऊ , आदिवासी,सेवा प्रकाशन, अमरावती, 1997.२.मांडवकर, भाऊ , कोलाम,सेवा प्रकाशन, अमरावती, 1966.

प्रतिक्रिया व्यक्त करा