बेस्ट, आल्फ्रेड मॅगिल्टन : (३१ ऑगस्ट १८७६ – ६ मे १९५८) क्लॅडवेल, न्यू जर्सी येथे जन्मलेल्या आल्फ्रेड मॅगिल्टन बेस्ट यांनी वयाच्या १५ व्या वर्षीच आपल्या विमा क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात न्यूयॉर्क येथील क्वीन विमाकंपनीत कनिष्ठ कारकून म्हणून केली. पुढील सहा वर्षात बेस्ट यांनी अनेक विमा कंपन्यांत काम करून विमा व्यवसायाशी निगडीत सर्व बाबींचे आकलन करून घेतले. विमा संस्थांच्या विश्वासार्हतेविषयी आवश्यक ती माहिती, तिचे स्रोत याविषयी जाणून घेतले. द स्पेक्टेटर नावाच्या विमा नियतकालिकांसाठी काम करत असतांना बेस्ट यांच्या लक्षात आले की, विमाकार विमाधारकांना विमापत्र देत असले तरी त्यांच्याकडे नुकसान भरून येईल इतके पुरेसे भांडवल असतेच असे नाही. हे सर्व विचारात घेऊन बेस्ट यांनी दोन भागीदारांसह स्वत:ची विमाकंपनी सुरू केली, परंतु ती १८ महिन्यांपुरतीच टिकली.

बेस्ट यांनी आपली कंपनी स्थापन केली, जी आता ए. एम. बेस्ट कंपनी म्हणून ओळखली जाते. विमादारांच्या आर्थिक ताळेबंदांचे विश्लेषण करून त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल दलाल व ग्राहक यांना मार्गदर्शन करणे हा या कंपनीचा उद्देश होता. वार्षिक मूल्यमापनाने सुरुवात करून बेस्ट यांनी लवकरच मासिक अहवालही द्यायला सुरुवात केली, तर आणखी दोन वर्षात रीतसर मानांकन द्यायला सुरुवात केली. १९०६ साली झालेल्या सॅन फ्रान्सिस्को येथील भूकंपात झालेल्या आगीच्या नुकसानीसाठी २००हून अधिक विमाधारकांवर झालेल्या परिणामाचे विश्लेषण करण्यासाठी बेस्ट यांच्या कंपनीने खूप मेहनत घेतली. त्याचा परिणाम म्हणून अहवालाच्या २,५०,००० प्रती खपून ए. एम. बेस्ट कंपनीचा चांगलाच बोलबाला झाला. १९०७ सालच्या आर्थिक मंदीत, जागतिक पहिले तसेच दुसरे महायुद्ध आणि १९२० चा सट्टा आणि १९२९ चा कोसळलेला भांडवली बाजार, या संपूर्ण काळात बेस्ट यांनी आपल्या कंपनीचे सक्षमपणे नेतृत्व केले. बेस्ट यांचा मृत्यू होईपर्यंत कंपनीची खूपच भरभराट झाली होती. बेस्ट यांच्या काळात सुरू झालेली कंपनीची प्रकाशने अद्यापही सुरू आहेत.

बेस्ट कंपनीने वापरलेली पट मानांकनाची पद्धत (Best’s Credit Rating Methodology; BCRM) ही एक समावेशक पद्धत आहे. यामध्ये ताळेबंद, कार्य निष्पादन, उद्योगांची पार्श्वरेखा, उपक्रमांच्या जोखीमीचे व्यवस्थापन या सर्व बाबी लक्षात घेऊन संख्यात्मक, तसेच गुणात्मक मूल्यमापन केले जाते. यासाठी प्रगत गणित तसेच संख्याशास्त्रातील प्रगत प्रारूपे उपयोगात आणली आहेत. त्यापैकी काही पुढील प्रमाणे:

  • Logistic regression and linear regression
  • Binning algorithm (i.e., monotone, equal frequency and equal width)
  • Cumulative Accuracy Profile (CAP)
  • Receiver Operating Characteristic (ROC)
  • Kolmogorov-Smirnov (K-S) statistic
  • Machine learning and predictive analytics

बेस्ट यांना विमा उद्योगासंबंधी आपले मत सांगण्यासाठी बरेचदा महासभा समिती तसेच न्यायालयात बोलावले जात असे. न्यूयॉर्क येथील औषध व रसायन क्लबचे ते सभासद होते. विमा सल्लागार संघाने बेस्ट यांना विमा-मानव म्हणून गौरविले. मृत्यूपश्चात प्रतिष्ठित इन्शुअरन्स हॉल ऑफ फेमच्या यादीत त्यांचे नाव विमा क्षेत्रात प्रभावी मार्गदर्शन, दूरदृष्टी आणि नवनिर्मिती यासाठी सामील करून घेण्यात आले.

बेस्ट यांच्या आयुष्याचा मागोवा घेणारी The A. M. Best Business Trilogy, ही तीन पुस्तिकांची मालिका असून त्यातले पहिले पुस्तक The Man हे आल्फ्रेड बेस्ट यांचे चरित्र आहे तर, दुसरे पुस्तक The CompanyA History of A. M. Best आणि तिसरे The IndustryA History of the Credit Rating Agencies, त्यांच्या व्यावसायिक कामाबद्दल सखोल माहिती देते.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर