फिशर, एडमंड हेन्री : (६ एप्रिल १९२० – २७ ऑगस्ट २०२१) एडमंड हेन्री फिशर यांचा जन्म चीनच्या शांघाय आंतरराष्ट्रीय वसाहतीत झाला. फिशर यांच्या वडलांनी ल इकोले म्युनिसिपाले फ्रान्केस ही शांघायमधील शाळा सुरू केली होती. त्याच शाळेत फिशर यांचे प्राथमिक शिक्षण झाले.

वयाच्या सातव्या वर्षी फिशर यांना ला चाताईजेनेरे येथील स्विस बोर्डिंग स्कूलमध्ये शिकायला पाठवण्यात आले. स्कीइंग आणि गिर्यारोहणाची त्यांना या शाळेत आवड उत्पन्न झाली. हायस्कूलमध्ये असताना त्यांना जिनिव्हा कॉन्झर्व्हेटरी ऑफ म्युझिकमध्ये घालण्यात आले. पियानो वादनात त्यांना व्यवसाय करायचा होता.

फ्रेंच रसायनवैज्ञानिक आणि सूक्ष्मजीववैज्ञानिक लुई पाश्चर यांच्या संशोधनामुळे प्रभावित होऊन फिशर यांना सूक्ष्मजीव वैज्ञानिक व्हायचे होते. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात त्यांना जिनिव्हा युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळाला. तेथे त्यांनी कार्बनीरसायन विज्ञान आणि जीवविज्ञानाचा अभ्यास केला. कर्ट हेन्रिच मेयर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्बन रसायनविज्ञानात त्यांनी पीएच्.डी. मिळवली. त्यांच्या मार्गदर्शकांनी बहुशर्करा आणि विकरे यांच्या निर्मिती आणि विघटन यावर संशोधन केलेले होते. फिशर यांनी अल्फा अमायलेझ विकरावर संशोधन केले. पीएच्.डी. नंतर पुढील संशोधनासाठी त्यांना कॅल्टेकमध्ये जायचे होते. पण वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत सिअ‍ॅटल येथे त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यानी सिअ‍ॅटल येथे स्थायिक होण्याचे ठरवले.

सिअ‍ॅटलमध्ये आल्यावर पहिल्या सहा महिन्यात त्यांचे सहकारी एडविन जी. क्रेब्ज या जैवरसायन वैज्ञानिकाशी त्यांची ओळख झाली. आकुंचन होण्यासाठी स्नायूंना ऊर्जा कशी मिळते याचे उत्तर शोधण्याचे त्यांचे प्रयत्न चालू होते. फिशर त्यांना या कामात मदत करीत होते. ग्लायकोजेन फॉस्फोरिलेझ या विकराच्या शोधाबद्दल गर्टी कोरी आणि कार्ल फर्डिनांड कोरी पति-पत्नीला १९४७ साली नोबेल पुरस्कार मिळाला होता. क्रेब्ज यांनी हे विकर स्नायूमध्ये तर फिशर यांनी या विकराचा शोध बटाट्यात लावला होता. त्यांना लवकरच कळून चुकले की स्नायूमध्ये या विकराबरोबर आणखी रासायनिक क्रियेची आवश्यकता आहे. बटाट्यामधील रासायनिक क्रिया अतिरिक्त रासायनिक क्रियेशिवाय होते. क्रेब्ज आणि फिशर यांनी संप्रेरके आणि कॅल्शियममुळे विकर क्रियाशील होते असे शोधून काढले. यासाठी परिवर्तनशील प्रथिन फॉस्फोरिलिकरण क्रियेत फॉस्फेट रेणू समाविष्ट करणे आणि त्यातून बाहेर काढणे अशा दोन्हीसाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे या क्रियेस परिवर्तनशील फोस्फोरिलीकरण (reversible phosphorylation) म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे तर परिवर्तनशील प्रथिन – प्रोटीन कायनेझ, एटीपीतील फॉस्फेट वेगळा करते त्यामुळे एटीपीचे एडीपी मध्ये रूपांतर होते. या प्रथिनाच्या आकारामुळे ग्लायकोजेनचे ग्लूकोजमध्ये रूपांतर होते. हे ग्लूकोज स्नायुच्या ऊर्जेची आवश्यकता पूर्ण करते. फॉस्फेटेझ विकरामुळे (प्रथिन) फॉस्फेट वेगळे केले म्हणजे प्रथिन पूर्ववत होते. ही क्रिया अनेक चयापचय प्रक्रियेमध्ये घडून येते.

प्रथम फॉस्फोरिलिकरणाचा नेमका उपयोग समजला नव्हता. दोन पेशींच्या संपर्कातील ही मूलभूत क्रिया आहे. फोस्फोरिलीकरण पेशीची वाढ,विभाजन, पेशीतील फरक आणि पेशी मृत्यू कधी व कसे होणार याचे नियंत्रण करते. फोस्फोरिलिकरण क्रियेतील बदल कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकार समजण्यास महत्त्वाचा ठरला आहे. यावर अवलंबून फिशर आणि क्रेब्ज यांच्या संशोधनावरून पुढे नवी उपचार पद्धत आणि औषधे बनवलेली आहेत. परिवर्तनशील प्रथिन फॉस्फोरिलिकरण शोधाबद्दल एडमंड फिशर आणि एडविन जी. क्रेब्ज यांना १९९२ साली शरीरक्रिया विज्ञान आणि वैद्यक विभागातील नोबेल पुरस्कार मिळाला. पेशीतील जीवरासायनिक क्रियेमधील परिवर्तनीय प्रथिन फॉस्फोरिलिकरण याचे स्थान यावर त्यांनी आयुष्यभर संशोधन केले.

त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त त्यांना रॉयल सोसायटीचे परदेशी सभासद, स्विस केमिकल सोसायटीकडून वेर्नर पुरस्कार, लेडरले मेडिकल फॅकल्टी अवार्ड, युनिव्हर्सिटी ऑफ जिनिव्हातर्फे प्रिक्स ज्युबर्ट पुरस्कार, इंडियाना युनिव्हर्सिटीतर्फे सिनियर पस्सानो अवार्ड, फ्रान्स आणि स्विट्झर्लंडमधील विद्यापीठांच्या मानद डॉक्टरेट आणि सात वर्षे वर्ल्ड कल्चरल कौन्सिलचे मानद अध्यक्ष असे पुरस्कार त्यांना लाभले.

१०१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : किशोर कुलकर्णी