कर्जदाराचे पतगुणांकन करणारी एक अभिकर्ता (एजन्सी). भारतामध्ये १९९१ नंतरच्या अभूतपूर्व आर्थिक व वित्तीय सुधारणांच्या पार्श्वभूमीवर १९९७ पासून बँकांनी कर्ज वाटपासाठी जेव्हा सर्वसामान्य ग्राहकांकडे लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली, तेव्हा अशा कर्जदारांची सर्व माहिती एकत्रित रीत्या त्यांना मिळणे अत्यंत गरजेचे वाटू लागले. भारतातील बँकांकडे कर्जाची मागणी वाढू लागली. अशा परिस्थितीत भारतात ग्राहकांच्या पतविषयक माहिती देणाऱ्या अभिकर्ता कार्यालयाची (क्रेडिट ब्यूरोची) आवश्यकता वाटू लागली. त्यातूनच स्टेट बँक ऑफ इंडिया, एच. डी. एफ. सी. (हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन), ड्यून अँड ब्रँडस्ट्रीट आणि ट्रान्स युनियन यांच्या पुढाकारातून ‘सिबील’ची स्थापना करण्यात आली.
सिबीलशिवाय एक्सपेरीयन आणि क्रिक हायमार्क या आणखी दोन पतगुणांकन करणाऱ्या अभिकर्ता आहेत. या सर्व अभिकर्त्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेची मान्यता प्राप्त झालेली आहे. हे अभिकर्ता भारतातील बँका व इतर वित्तीय संस्थांना कर्जदार ग्राहकाचा पत अहवाल सादर करण्याची सेवा पुरवितात.
भारतातील बँका आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या कारणांसाठी कर्जे वाटप करतात. अशा वेगवेगळ्या ग्राहकांनी वेगवेगळ्या कारणांसाठी अथवा कोणत्याही प्रकारचे घेतलेल्या कर्जाची किंवा त्यांनी केलेल्या कर्जांची परतफेड, क्रेडिट कार्डचे त्यांचे व्यवहार यांची सर्व माहिती सिबील जमा करून ठेवते. सिबील फक्त कर्जविषयक माहिती संकलित करते. त्यांच्याकडील माहितीचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होणार नाही, याची ते काळजी घेतात. सिबील ग्राहकाची कर्जविषयक माहिती फक्त त्यांच्या सदस्यालाच देते. त्याच प्रमाणे सिबीलकडे नोंद असलेल्या ग्राहकालाही (कर्जदारास) त्याच्या पतगुणांविषयीची माहिती मिळविता येते. त्यासाठी सिबीलच्या संकेतस्थळावर गेल्यास कर्जदाराने त्यांचा पॅन क्रमांक, पत्त्याचा पुरावा व विशिष्ट रक्कम भरल्यास त्याच्या पतगुणांकाची माहिती त्याला सहज रीत्या मिळते. या माहितीच्या आधारे कर्जदार ग्राहक त्याची स्वत:ची पतगुणवत्ता जाणून घेऊ शकतो.
कर्जदार ग्राहकांचे पतगुणांकन : सिबील कर्जदाराचे पतगुणांकन करण्यासाठी ३०० ते ९०० अंकामध्ये निर्देश करते, तर इक्विफॅक्स ही दुसरी पतगुणांकन करणारी अभिकर्ता कर्जदार पतगुणांकन करण्यासाठी १ ते ९९९ अंकांमध्ये निर्देशन करते. सिबील कर्जदार व्यक्तीच्या मागील ६ महिन्यांच्या ऐतिहासिक वित्तीय माहितीच्या आधारावर गुणांचे मोजमाप करते.
पतगुणांकनाची श्रेणी रचना : सिबीलच्या पतगुणांकनाची श्रेणी ३०० ते ९०० अंकांच्या दरम्यान विविध टप्प्यांमध्ये विभागली आहे. यातील ३०० गुण सर्वांत कमी, तर ९०० गुण सर्वोत्तम मानले जातात.
- जर एखाद्या व्यक्तीचे गुण ०-१ असतील, तर त्या व्यक्तीच्या क्रेडिट कार्डची अथवा कर्जाची कोणतीही माहिती अथवा इतिहास नाही असे सूचित होते.
- जर एखाद्या व्यक्तीचे पतगुणांकन ३५० ते ५५० या श्रेणीत असेल, तर हे पतगुणांकन कर्जवाटपासाठी धोक्याची घंटा असल्याचे सूचित करते. याचा अर्थ व्यक्ती थकबाकीदार आहे किंवा तिने कर्जाची अथवा क्रेडिट कार्डच्या देयकाची नियमित परतफेड केली नाही, असे निर्देशित होते.
- जर एखाद्या व्यक्तीचे पतगुणांकन ५५१ ते ६५० या श्रेणीत असेल, तर सदर श्रेणीतील गुणांकन कर्जवाटपासाठी स्वीकृत आहे, असे निर्देशित करते. याचा अर्थ व्यक्ती देयकाची परतफेड बऱ्यापैकी करते व नवीन कर्ज वाटपास कर्ज पात्र होऊ शकते.
- जर एखाद्या व्यक्तीचे पतगुणांकन ६५१ ते ७५० या श्रेणीत असेल, तर या श्रेणीतील गुणांकन प्राप्त करणारी व्यक्ती कर्ज वाटपासाठी योग्य आहे, असे सूचित होते. व्यक्तीला कर्ज अथवा क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी अडचणी येणार नाहीत. व्यक्ती सिबीलच्या सर्वोत्तम गुणश्रेणीत प्रवेश करू शकते.
- जर एखाद्या व्यक्तीचे पतगुणांकन ७५१ ते ९०० या श्रेणीत असेल, तर या श्रेणीतील व्यक्तीचे गुण सर्वोत्तम मानले जातात. व्यक्ती कर्जाची परतफेड करण्यात काटेकोर (शिस्तबद्ध) असल्याचे निर्देशित होते.
पतगुणांवर सकारात्मक परिणाम : व्यक्तीच्या सिबील पतगुणांवर परिणाम करणाऱ्या काही सकारात्मक बाबी आहेत.
- कर्जाच्या समान मासिक हप्त्यांची (इ. एम. आय.) वेळेवर परतफेड.
- क्रेडिट कार्डच्या देयकाचा नियमित भरणा.
- प्रत्येक वेळी क्रेडिट कार्डच्या कमीत कमी देय रकमेचा भरणा करण्याऐवजी पूर्ण देयक रकमेचा भरणा.
- अतिरिक्त पतलाभ टाळणे.
- मान्य करण्यात आलेल्या पतमर्यादेचा योग्य उपयोग इत्यादी.
पतगुणांवर नकारात्मक परिणाम : व्यक्तीच्या सिबील पतगुणांकनावर विपरित परिणाम करणाऱ्या काही बाबी आहेत.
- बँक व इतर संस्थांकडून अनेक पत अहवालांची चौकशी.
- धनादेश न वाटणे.
- अनियमितपणे कर्ज परतफेड.
- क्रेडिट कार्ड देयकाची थकबाकी अथवा विलंबाने भरणा किंवा सातत्याने आंशिक भरणा.
- अनेक व्यक्तिगत कर्जे (असुरक्षित/विनातारण कर्जे).
- अनेक विनातारण कर्जांचे अर्ज नाकारले जाणे.
- जामीनदार म्हणून व्यक्ती नादर होणे इत्यादी.
सिबीलची सेवा प्राप्त करण्यासाठी सिबीलच्या सदस्यांची संख्या अर्थात वित्तसंस्था व बँकांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. राष्ट्रीयकृत बँका व व्यापारी बँकांबरोबरच आता सहकारी बँकासुद्धा सिबीलच्या सदस्य होऊ लागल्या आहेत. सिबील कंपनीने महाराष्ट्रातील प्रमुख चार सहकारी बँकांच्या संघटनांबरोबर सहकार्य केले आहेत. उदा., पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन इत्यादी. त्याच बरोबर पैसाबाजार डॉट कॉम, क्रेडिट मंत्री, बजाज फिनसेर्व इत्यादी खाजगी कंपन्यांद्वारेही संकेतस्थळावर सिबील पतगुणांकन तपासता येते. त्यामुळे सिबीलच्या कार्याचा विस्तार सतत वाढत आहे.
समीक्षक : ज. फा. पाटील