वर्ण किंवा वर्णम् हा एकमेवाद्वितीय आणि फक्त कर्नाटक संगीतामध्ये प्रचलित असणारा एक गानप्रकार आहे. हिंदुस्थानी संगीतामध्ये वर्णम् सदृश कोणताही प्रकार आढळत नाही. वर्णम् हा खुमासदार आणि नजाकतीने गुंफलेला एक असा संगीतप्रकार आहे, ज्यायोगे रागाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि स्वरसौंदर्यस्थळे श्रोत्यांसमोर उलगडणे सोपे होते. वर्णम् हे अतीव कुशलतेने घडवले जाणारे जणू एक सांगीतिक शिल्प आहे असे म्हटले जाते.

गायकाला वर्णम् मांडणी करताना तो सादर करत असलेल्या रागाचे सखोल ज्ञान असणे व वेगवेगळ्या लयकारीमध्ये त्या रागस्वरांचा संचार सुलभतेने कसा करतात, हे अवगत असणे अत्यंत जरूरी आहे. त्याचवेळी तालाचे संपूर्ण ज्ञान, किंबहुना तालावर हुकूमत असण्याबरोबरीनेच, गायकाचा सांगीतिक दृष्टीकोन मूलत: कलात्मक असणे गरजेचे असते.

साधारण अठराव्या शतकामध्ये सगळ्या मूळ रागांचे आणि त्याबरोबरीने इतर दुय्यम रागमालांचे वर्णम्, ते प्रचलित सगळ्या तालांच्या आवर्तनामध्ये चपखल बसतील, अशा पद्धतीने तयार करण्यात आले. कर्नाटक संगीतातील अनेक दिग्गजांनी हे वर्णम् तयार करताना भरीव योगदान दिलेले आहे. त्यांपैकी काही उल्लेखनीय संगीतसाधक म्हणजे पचिमिरियम आदियप्पय्य, सोंती वेंकटबुवय्या, श्यामशास्त्री, स्वाती तिरूनल, पत्त्नाम सुब्रमण्यम अय्यर, रामनाथ श्रीनिवास अय्यंगार आणि म्हैसूर वासुदेवाचार्य हे होत.

वर्णम् हे विशेषतः रागाचे सांगीतिक व्याकरण विषद करतात. वर्णम् प्रत्येक रागातील स्वरांचा संचार आकृतीबद्ध करतात. अमुक एखादा स्वर कोणत्या सप्तकामध्ये लावला गेला पाहिजे आणि गाताना त्या स्वरावर किती जोर द्यावा, याबरोबरच प्रत्येक स्वर हा रागाच्या मूळ संहितेनुसार गायला जातो आहे की नाही, हे नियमबद्ध करण्यासाठी वर्णम् वापरतात. म्हणूनच, कर्नाटक संगीतामध्ये याला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. प्रत्येक कलासाधकाने आणि अनुभवी कलाकारांनी देखील रागाच्या वर्णमालेचा सखोल अभ्यास करणे अतिशय गरजेचे असते. 

वर्णम् याची बांधणी दोन अंगांमध्ये केलेली असते. पूर्वांग, म्हणजे प्रथम विभागामध्ये पल्लवी, अनुपल्लवी आणि मुख्य स्वर सादर केले जातात आणि उत्तरांग, म्हणजे शेवटच्या विभागामध्ये चरण समाविष्ट असते. ज्यामध्ये चरणस्वर आणि चरणम् आलटून पालटून सादर करतात. सादरीकरणात या दोन्ही अंगांद्वारे रागाचे स्वरूप आणि त्याचा प्रत्येक पैलू सुस्पष्ट केला जातो.

बऱ्याच वेळा वर्णम् सादरीकरणावेळी साहित्यिक/वाङ्मयीन भाषा देखील वापरली जाते; परंतु त्यातील शब्दांना विशेष महत्त्व न देता, प्रस्तुत केला जाणारा वर्णम् याचा सांगीतिक अर्थबोध स्पष्ट करण्याकडे अधिक लक्ष पुरविले जाते. याचा केंद्रबिंदू हा केवळ सादर केला जाणारा राग, त्या रागाचे मुख्य स्वर, त्या रागस्वरांचे विविध आकृतीबंध वा तानप्रकार आणि त्याची लय व गती हाच असतो.

वर्णम् अतिशय काटेकोरपणे रचलेला असतो आणि त्याचे सादरीकरण वा मांडणी अत्यंत शिस्तबद्धतेने करताना रागाचा प्रथम स्वर, विविध गमके आणि रागाचा स्वरसंचार यांकडे विशेष लक्ष दिलेले असते.  

वर्णम् मुख्यत: तीन प्रकारे सांगितले जातात : दारूवर्णम्, पदवर्णम् आणि तानवर्णम्.

  • दारूवर्णम् हे मुक्तायी (म्हणजे आलापांसारखे विस्तार) स्वराशी निगडित विशेष प्रकारचे वर्ण असतात. ज्याद्वारे, रागाचे स्वराकार, त्यातील विविध जाती आणि शेवटी काही शब्दालंकार सादर केले जातात.
  • पदवर्णम् भरतनाट्यम् या नृत्यप्रकारात पदवर्णम् जास्तकरून वापरले जातात. ते सौम्य व धीम्या लयीत आणि वाङ्मयीन साहित्याचा पुरेपूर वापर करून सादर केले जातात.
  • तानवर्णम् याच्यामध्ये वाङ्मयीन साहित्याचा अजिबात वापर केला जात नाही आणि ते अत्यंत द्रुतगतीमध्ये सादर केले जातात. संगीत मैफलींमध्ये केल्या जाणाऱ्या सादरीकरणासाठी तानवर्णम् याला विशेष प्राधान्य दिले जाते. सादर करत असलेल्या रागाचे सौंदर्य खुलवताना गायक तानवर्णम् याच्याद्वारे विविध स्वररचना लीलया करतो आणि त्या रचनांचा आनंदही घेऊ अथवा देऊ शकतो. 

एकंदर गायनवादनांतील तयारी दाखवण्यास वर्णम् यामध्ये वाव असतो.

पहा : कर्नाटक संगीत; श्यामशास्त्री ; पल्लवी; अनुपल्लवी; चरण

                                       मराठी अनुवाद व समीक्षण : शुभेंद्र मोर्डेकर