आलापना हा तत्कालीन परिस्थितीमध्ये ऐनवेळी पण काहीसे गुणगुणल्याप्रमाणे सादर केला जाणारा एक गानप्रकार आहे. ज्याद्वारे सादर केल्या जाणाऱ्या रागाचा स्थायीभाव आणि त्या रागाची प्रमुख स्वरलक्षणे व्यक्त केली जातात. एक चांगली व सृजनशील आलापना ही श्रोत्यांच्या भावकल्पनेमध्ये त्या रागाचे जणुकाही एक रंगीत चित्र निर्माण करू शकते. स्वरेल आलापनेमुळे प्रत्येक रागाची मुख्य संगीततत्त्वे आणि त्याचा संगीतार्थ श्रोत्यांच्या कल्पनाशक्तीमध्ये हळूहळू स्पष्ट वा दृगोच्चर होतो, असे म्हणतात.

‘आ’, ‘ए’, ‘ई’, ‘ओह’, ‘ता’, ‘दा’, ‘री’, ‘ना’ आणि ‘नौ’ यांसारखी मुळाक्षरे आलापनेमध्ये विशेषकरून वापरतात; परंतु या सांगीतिक वापरातील मुळाक्षरांना विवक्षित असा अर्थ नसतो. रागाची मांडणी करण्याच्या हेतूने यांपैकी कोणतेही मुळाक्षर स्वैच्छिकपणे निवडले जात नाही; तथापि, ठराविक व्यंजने आणि स्वरालाप वेगवेगळ्या सप्तकामध्ये चपखल बसवण्याच्या उद्देशाने यामधील काही अक्षरे उपयोगी ठरतात.

आलापना म्हणताना तालाच्या आवर्तनाची साथ नसते. गायक आलापनेची सुरुवात मंद्रसप्तकामध्ये (ज्याला पाश्चिमात्य संगीतामध्ये Lower Octave असे म्हणतात) करतो. नंतर, तो मध्यसप्तकामध्ये (ज्याला पाश्चिमात्य संगीतामध्ये Middle Octave असे म्हणतात) रागाची अस्ताई सादर करतो. त्यापुढे जाऊन तो तारसप्तकामध्ये (ज्याला पाश्चिमात्य संगीतामध्ये Higher Octave म्हणतात) वेगवेगळ्या प्रकारच्या ताना घेत रागाचा अंतरा सादर करतो. या तानप्रचूर रागविस्ताराला संचारी असेही संबोधले जाते. तारसप्तकामध्ये काही काळ गायल्यानंतर गायक पुन्हा मध्यसप्तकामध्ये येऊन हळूहळू आलापनेची सांगता करतो. वास्तविक, याच पद्धतीने गायले पाहिजे असा नियम नाही; परंतु परंपरेनुसार याच पद्धतीने आलापना सादर केली जात आहे.

एक विशेष नोंद घेण्यासारखे असे आहे की, जरी कोणता विशिष्ट ताल नसला, तरी आलापनेच्या लयीनुसार तालाची मूळ लय पकडली जाते. सहसा आलापना धीम्या गतीने सुरू करतात आणि रागविस्तार करताना ती लय हळूहळू वाढवत नेली जाते आणि नंतर ती लय कमी करून आलापनेची सांगता करतात.

प्रत्येक गायक हा आपापल्या पद्धतीनुसार विवक्षित स्वरबंध पुन:पुन्हा गाऊन रागाचा विस्तार करतो आणि त्या रागातील स्वरालंकाराची सुबकपणे मांडणी करतो. कोणत्याही आलापनेचा दर्जा वा त्याची प्रत ठरवताना नवनवीन स्वरसमूहाच्या रचनेपेक्षा तो गायक रागाचे स्वरूप आणि त्याची सौंदर्यस्थळे त्याच्या स्वरमधुर गायकीने किती सहजतेने श्रोत्यांपर्यंत पोचवतो, याचा विचार प्रामुख्याने केला जातो.

मराठी भाषांतर : शुभेन्द्र मोर्डेकर