रॉबर्टसन, स्टुअर्ट ए. : (२८ फेब्रुवारी १९१८ – ४ नोव्हेंबर २००५) अमेरिकेतली सिएटलजवळच्या ग्रेज हार्बर कौंटीतील मॉन्टेसॅनो येथे स्टुअर्ट ए. रॉबर्टसन जन्मले. त्यांचे शालेय शिक्षण आईच्या मार्गदर्शनाखाली झाले. रॉबर्टसन यांनी वॉशिंग्टन विद्यापीठांत प्रवेश घेतला. इथले शैक्षणिक शुल्क भागविण्यासाठी त्यांनी दोन अंश-कालिक नोकऱ्या केल्या. उन्हाळ्याच्या सुट्टीतही ते एका कारखान्यात नोकरी करत. महाविद्यालयांत शिकताना गणित विभागाच्या सूचना फलकावर रॉबर्टसन यांनी विमागणितींच्या भरतीची जाहिरात पाहिली. या जाहिरातीत दिलेले विमागणितीचे वर्णन, कामाचे स्वरूप आणि संधींची उपलब्धता वगैरे वाचून आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने विमागणिती बनण्याचे आणि त्यासाठी ॲक्च्युअरीअल इन्स्टिट्यूटची प्रवेश-परीक्षा देण्याचे रॉबर्टसन यांनी ठरवले.

एकोणीस वय होताच रॉबर्टसन वॉशिंग्टनच्या स्पोकेन भागातील नॉर्थ-वेस्टर्न लाइफ इन्श्युरन्स कंपनीत विमागणिती-कारकून बनले. नंतर कर्तृत्त्वाच्या चढत्या कमानीवरून रॉबर्टसन या कंपनीच्या उपाध्यक्षपदी पोहोचले. विमागणित, आर्थिक जमाखर्च, विमा, भागधारक तसेच विमापत्रधारक यांच्याशी संपर्क इत्यादी विमा व्यवहाराच्या बहुविध पैलूंवर त्यांनी काम केले. पुढे रॉबर्टसन यांना कंपनीच्या सिएटलमधील कार्यालयात विमागणिती हे पद मिळाले.

नंतर रॉबर्टसन यांची भेट आयुर्विमा आणि आरोग्यविम्यांतील तज्ज्ञ, वेंडेल मिलिमन यांच्याशी झाली. मिलिमन यांनी सिएटलला पहिली विमागणिती-सल्ला संस्था मिलिमन कंपनी स्थापन केली होती. विमागणित विभाग नसणाऱ्या लहान राज्य सरकारी आणि स्वायत्त संस्थांसाठी मिलिमन सेवा देत. मिलिमन कंपनीत काम करताना रॉबर्टसन आठेक कंपन्यांचे काम हाताळत होते. पुढे सहा महिन्यांतच मिलिमन यांना न्यूयॉर्क कंपनी ऑफ लाईफ इन्शुरन्समध्ये आकर्षक वेतनासह उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. ती संधी स्वीकारत आपली कंपनी मिलिमननी पाच वर्षांच्या करारावर रॉबर्टसन यांच्या स्वाधीन केली. पाच वर्षांनी मिलिमन यांच्या प्रस्तावानुसार रॉबर्टसन यांनी मिलिमन यांना आणि टॉम ब्लिक्ने यांना कंपनीत भागिदारी दिली. याबरोबरच कंपनीचे नांव मिलिमन अँड रॉबर्टसन (मिरॉ) झाले. दोन वर्षातच कंपनी इनकॉर्पोरेटेड झाली.

पुढे वैद्यकीय तंत्रज्ञान वेगाने प्रगत झाले, पण त्यासोबत वैद्यकीयसेवा खर्चिक झाल्या. या खर्चाचा रुग्णांवरील बोजा कमी करण्यासाठी आस्थापनांनी आपल्या नोकरांसाठी अनेक आरोग्यसेवा योजना विकसित केल्या. त्यासाठी लागणाऱ्या संभाव्यतांचे प्रगणन करून देण्यासाठी वाढत्या विमाउद्योगाला विमागणितीसेवेची आवश्यकता असल्याचे पाहून मिरॉने आरोग्य आणि दुर्घटना यांबाबत विमासेवा सुरू केल्या.

कंपनी इनकॉर्पोरेटेड झाल्यावर पाच वर्षातच अमेरिकेतील अनेक राज्यांत नवीन कार्यालये उघडत मिरॉ मोठ्या कंपन्यांच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली. सोसायटी ऑफ ॲक्च्युअरीजच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सवर तीन वर्षे काम करत रॉबर्टसन यांनी सभाध्यक्ष, तज्ज्ञ चर्चासत्र-अध्यक्ष अशा अनेक भूमिका निभावल्या. सोसायटीतर्फे प्रकाशित झालेल्या द ॲक्च्युअरीज वार्तापत्रातील किंवा ट्रान्झॅक्शन्समधील लेख, अहवाल यातून त्यांची विमागणित आणि विमागणिती व्यवसायाशी असलेली दृढ बांधिलकी लक्षांत येते.

पुढे रॉबर्टसन मिरॉचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष झाले. ३० वर्षे विमागणिती म्हणून कार्यरत असणाऱ्या रॉबर्टसन यांच्या मार्गदर्शनाखाली, यथार्थ काळात मिरॉतर्फ दिल्या जाणाऱ्या विमासेवेची गुणवत्ता तपासण्यासाठी एक समशील समीक्षण प्रक्रिया (peer review process) स्वीकारण्यात आली.

रॉबर्टसन निवृत्त झाले तेव्हा राष्ट्रीय पातळीवरील विमागणिती सेवा देणाऱ्या मोठ्या कंपन्यांच्या क्रमवारीत मिरॉ सहावी होती आणि कामगार-लाभ योजना ही तिची विशेषता होती. आज कंपनीच्या जगभरातील ६६ कार्यालयांतून जवळपास ३,६०० व्यक्ती काम करतात.

रॉबर्टसन यांचे मिलिमन अँड रॉबर्टसन: रिफ्लेक्शन्स ऑन दि फर्स्ट फॉर्टी इअर्स हे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि पुढे त्याच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या.

रॉबर्टसन यांचे विमाव्यवसायातील यश आणि योगदान स्मरणात रहाण्यासाठी हॉल ऑफ फेममध्ये त्यांचे नांव दाखल करण्यात आले. रॉबर्टसन सोसायटी ऑफ ॲक्च्युअरिजचे अधिछात्र आणि अमेरिकन अकॅडमी ऑफ ॲक्च्युअरीजचे सदस्य होते.

मिलिमन इनकॉर्पोरेटेडने त्यांच्या स्मृत्यर्थ विशेष प्रज्ञा दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या नावे एक शिष्यवृत्ती निधी जाहीर केला.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर