वाइनबर्ग, स्टीव्हन : (३ मे  १९३३  – २३ जुलै २०२१) स्टीव्हन वाइनबर्ग हे एक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. पुढे ते कोपनहेगन येथील नील्स बोहर संस्थेत दाखल झाले आणि त्यांनी तेथे संशोधनाचे काम सुरू केले. तेथे एक वर्ष काम केल्यावर ते प्रिन्स्टन विद्यापीठात गेले आणि त्यांनी त्यांचे संशोधनाचे काम पुढे नेले. नंतर त्यांना या विद्यापीठाने पीएच्.डी. ही पदवी प्रदान केली. वाइनबर्ग यांनी किरणोत्सारी ऱ्हासात तीव्र आंतरक्रियांची भूमिका या विषयावर स्याम ट्रीमन यांच्या मार्गदर्शनाखाली आपला प्रबंध सादर केला होता.

त्यानंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ येथे पोस्ट डॉक्टरल संशोधक म्हणून काम केले. वाइनबर्ग यांची त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठ येथे अध्यापक म्हणून नियुक्ती झाली. सहा वर्षे ते या पदावर होते. या काळातील त्यांचे संशोधन कण भौतिकशास्त्र या विषयातील विविध उपशाखांमध्ये होते. उच्च ऊर्जा आणि पुंज क्षेत्र सिद्धांत, पायान (pion) विकिरण, अवरक्त फोटोन (photon) आणि पुंज सिद्धांत अशा निरनिराळ्या विषयांवर ते काम करीत होते. याच सुमारास वैश्विक सूक्ष्मतरंग पार्श्वप्रारणाचा शोध लागला होता. त्यामुळे वाइनबर्ग व्यापक सापेक्षता सिद्धांताकडे आकर्षिले गेले. ‘गुरुत्वाकर्षण आणि विश्वरचनाशास्त्र’ या शीर्षकाचे एक क्रमिक पुस्तकही त्यांनी या काळात लिहिले तसेच स्मिथसोनियन खगोलभौतिकीय वेधशाळेत ज्येष्ठ वैज्ञानिक म्हणूनही त्यांनी काम केले.  क्षेत्रीय पुंज सिद्धांतावर त्यांनी लिहिलेला ग्रंथ त्रिखंडात्मक असून १५०० पेक्षा अधिक पानांचा  आहे. या विषयावरचा हा प्रमाणभूत ग्रंथ मानला जातो.

त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ सोडले आणि ते हार्वर्ड विद्यापीठात व्याख्याते म्हणून रुजू झाले. त्यांनी एमआयटी या विख्यात संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणून ज्ञानदान केले. तेथे काम करत असतानाच त्यांनी विद्युतचुंबकीय बल आणि क्षीण बल यांच्या एकत्रीकरणाचे प्रारूप मांडले. ब्रिटीश वैज्ञानिक पीटर हिग्ज यांनी हिग्ज बोसॉनची कल्पना मांडली होती. या कल्पनेचा आधार हे प्रारूप मांडताना घेण्यात आला होता. त्यांनी या प्रारूपात, क्षीण आंतरक्रियांमुळे वस्तुमान असलेले कण निर्माण होतात असे प्रतिपादन केले होते. या कणांना त्यांनी डब्ल्यू आणि झेड बोसॉन असे संबोधले. या प्रारूपानुसार, जेव्हा दोन विद्युत-प्रभारहीन कण (उदा., न्यूट्रॉन) एकमेकांवर आदळतात तेव्हा विद्युतप्रभार नसलेला म्हणजे उदासीन असा प्रवाह निर्माण होतो. या घटनेत डब्ल्यू आणि झेड बोसॉन या कणांची देवाणघेवाण होते. विद्युतचुंबकीय आंतरक्रियांमध्ये फोटोन या कणाची देवघेव होते हे आधीपासून ज्ञात होतेच. आपल्या अभ्यासातून वाइनबर्ग यांनी असे मत मांडले की फोटोन आणि डब्ल्यू आणि झेड बोसॉन यांच्यामध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे. म्हणजे हे सर्व कण एकाच बलापासून तयार झाले असावेत. या प्रारूपाला ‘विद्युत-क्षीण एकात्मिक बलाचा सिद्धांत’ (Electroweak unification theory) असे म्हटले जाते. कमीअधिक अशाच स्वरूपाचे काम अब्दुस सलाम आणि ग्लाशोव यांनीही स्वतंत्रपणे केले होते.

नंतरच्या काळात वाइनबर्ग यांनी गुरुत्वाकर्षण, सुपरसिमीट्री, सुपर स्ट्रिंग्ज आणि विश्वरचनाशास्त्र या विषयातही काम केले. १९६७ नंतरच्या काळामध्ये मूलभूत कणांचे प्रमाणित प्रारूप मांडण्यात आले. यामध्ये वाइनबर्ग यांच्या विद्युत-क्षीण एकात्मिक बलाच्या  सिद्धांताची (Electroweak unification theory) सांगड तीव्र आंतरक्रियेशी घालण्यात आली होती. स्वत: वाइनबर्ग यांनी १९७३ मध्ये मूलभूत कणांचे प्रमाणित प्रारूप सुधारित स्वरूपात मांडले. त्यात हिग्ज-बोसॉन या कल्पनेचा समावेश नव्हता. दहा वर्षे त्यांनी हॉर्वर्ड विद्यापीठातील युजीन हिगीन्स प्राध्यापक हे मानाचे पद भूषवले. १९७९ साली त्यांना भौतिकशास्त्र या विषयाचे नोबेल पारितोषिक सलाम आणि ग्लाशाव या दोन वैज्ञानिकांबरोबर विभागून देण्यात आले. हे पारितोषिक ‘मूलभूत कणांमधील विद्युतचुंबकीय आणि क्षीण आंतरक्रियांचे एकत्रीकरण करण्याच्या सिद्धांत’ आणि ‘विद्युत -प्रभारहीन क्षीण प्रवाहासाठी’ देण्यात आले. अतिशय मूलभूत अशा वैज्ञानिक संशोधनाबरोबरच वाइनबर्ग यांनी विज्ञान प्रसार व्हावा यासाठी सर्वसामान्य लोकांसाठीही लेखन केले. त्या लेखनातून त्यांनी विज्ञानाचा इतिहास आणि तत्त्वज्ञानही सोप्या शब्दांत उलगडून दाखवले. त्यांनी द फर्स्ट थ्री मिनीट्स : ए मॉडर्न व्ह्यू ऑफ द ओरिजिन ऑफ द युनिव्हर्स या नावाचे पुस्तक प्रकाशित केले. त्यात त्यांनी महास्फोट सिद्धांत आणि विश्वाचे प्रसरण याबाबत विवेचन केले आहे. हे पुस्तक खूप गाजले. त्यांना विज्ञानाच्या इतिहासात खूप रस होता हे त्यांच्या २०१५ साली प्रसिद्ध झालेल्या टू एक्स्प्लेनद वर्ड : डिस्कव्हरी ऑफ मॉडर्न सायन्स या पुस्तकावरून दिसून येते. वाइनबर्ग कधीही निवृत्त झाले नाहीत. ते अखेरपर्यंत टेक्सास विद्यापीठात अध्यापन आणि लेखन करत होते. २०२० मध्ये त्यांनी फाउंडेशन ऑफ मॉडर्न फिजिक्स हे पुस्तक लिहिले. वाइनबर्ग नास्तिक होते. त्यांचा धर्म, देव या कल्पनांवर अजिबात विश्वास नव्हता.

नोबेल पुरस्काराशिवाय त्यांना पुढील पुरस्कार मिळाले: जगातील ११ नामवंत विद्यापीठांकडून मानद डॉक्टर ऑफ सायन्स ह्या पदव्या, अमेरिकन फिजिकल सोसायटीचे सन्माननीय सदस्यत्व,  रीचमायेर स्मृती पुरस्कार, गणितीय भौतिकशास्त्र या विषयासाठी डनी हेनमन पुरस्कार, फ्रॅंकलिन संस्थेचे इलियट क्रेसोन पदक, डब्लिन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजचा जेम्स जॉयस पुरस्कार, विज्ञान लेखनासाठीचा स्टील फौंडेशनचा पुरस्कार आणि लेविस थॉमस पारितोषिक, रॉयल सोसायटीचे सन्माननीय सदस्यत्व, विज्ञान क्षेत्रातील असामान्य यशासाठी अमेरिकन तत्त्वज्ञान संस्थेतर्फे दिले जाणारे बेन्जामिन फ्रॅंकलिन पदक, ब्रेकथ्रू पारितोषिक, राष्ट्रीय विज्ञान पदक, प्रिन्स्टन विद्यापीठाचे जेम्स मेडिसन पदक, जे. रोबर्ट ओपेनहायमर स्मृती पारितोषिक, अमेरिकन तत्वज्ञान संस्थेचे मानद सदस्यत्व, टेक्सास येथील तत्त्वज्ञान संस्थेचे अध्यक्षपद, अमेरिकन कला आणि विज्ञान प्रबोधिनीचे मानद सदस्य.

संदर्भ :

समीक्षक : सुधीर पानसे