एराटॉस्थीनीझ (Eratosthenes) : (इ. स. पू. सु. २७६—१९४). ग्रीक गणिती, खगोलशास्त्रज्ञ व भूगोलज्ञ. त्यांचा जन्म लिबिया देशात सायरीनी (प्राचीन सायरेनेइकाची राजधानी – सध्याचे शहर) या गावी झाला. त्यांचे शिक्षण ॲलेक्झांड्रिया व अथेन्स येथे झाले. त्यांच्या समकालीन त्यांच्याइतका अष्टपैलू विद्वान कोणीही नव्हता, असे म्हटले जाते. ॲलेक्झांड्रियाचा राजा टॉलेमी यांनी इ. स. पु. सुमारे २५५ मध्ये एराटॉस्थीनीझ यांना आपल्या प्रचंड ग्रंथालयाचा प्रमुख नेमले. एराटॉस्थीनीझ यांनी विविध विषायांवर विपुल लिखाण केले. ग्रीक सुखांतिका व नाटके यांचे समीक्षण तसेच अनेक खंडकाव्ये व शोकगीते त्यांनी लिहिली होती. ग्रीक पुराणे व खगोलीय राशींचा संबंध जोडण्याचा प्रयत्‍न त्यांनी केला होतो. ट्रॉयच्या युद्धापासूनच्या ऐतिहासिक व वाङ्‍मयीन घडामोडींचा कालनिर्णय करताना त्यांनी लीप वर्ष लक्षात घेतले होते. प्‍लेटोवर त्यांनी लिहिलेले भाष्य अद्वितीय समजले जात होते. त्यांच्या जिऑग्राफिका या पुस्तकामुळेच भूगोल या विषयाला शास्त्र म्हणून महत्त्व आले. या पुस्तकाच्या तीन खंडांत त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या भूगोलज्ञांची माहिती देऊन गणितीय, प्राकृतिक, राजकीय तसेच मानवजातिशास्त्रविषयक भूगोलाचा शास्त्रीय पद्धतीने ऊहापोह केला होता. भूमिती, गणित, संगीताच्या मुळाशी असलेली गणितीय तत्त्वे इत्यादी अनेक विषयांवर त्यांनी लिहिले होते. एराटॉस्थीनीझ यांनी दोन या संख्येचे घनमूळ ठरविताना दोन दिलेल्या रेषांमधील मध्यम प्रमाणपाद काढण्यासाठी एक उपकरण शोधून काढले होते. तसेच अविभाज्य संख्या काढण्यासाठी त्यांनी एक सोपी पद्धती तयार केली होती. या पद्धतीला ‘एराटॉस्थीनीझची चाळणी’ (Sieve of Eratosthenes) म्हणतात.

खगोलशास्त्र दृष्ट्या त्यांचे कार्य सर्वांत मोठे होते. अयनदिनींचे सूर्याचे उन्नतांश मोजून त्यांनी क्रांतिवृत्त व खगोलीय विषुववृत्त यांमधील कोन जवळ जवळ बरोबर मोजून काढला होता. त्यांनी ६७५ नक्षत्रांची एक तारासारणी तयार केली होती; परंतु ती आता उपलब्ध नाही. त्यांचे सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी मोजलेला पृथ्वीचा परीघ. सध्याच्या आस्वानजवळील एका विहिरीत पाहता अयनदिनी (Solstice) तेथे मध्यान्हीचा सूर्य डोक्यावर असतो; परंतु ॲलेक्झांड्रियाला त्या वेळी तो डोक्यावर नसतो, असे त्यांना आढळले. म्हणून त्यांनी त्या दिवशी भर दुपारी ॲलेक्झांड्रिया येथील सूर्याचे खमध्य-अतंर मोजले व ॲलेक्झांड्रिया आणि आस्वानमधील जमिनीवरील अंतर मोजले. पृथ्वी गोल आहे असे गृहीत धरून या मोजमापावरून त्यांनी पृथ्वीचा परीघ ठरविला. त्यांनी काढलेल्या पृथ्वीच्या परिघात व अचूक परिघात फक्त एक टक्का चूक निघते; तथापि त्यांच्या मापनपद्धतीतील व उपकरणांतील ढोबळपणा लक्षात घेता, काही चूका परस्परछेदक ठरून त्याचे उत्तर बरेचसे बरोबर आले असावे, असे काहीजण मानतात. त्यांनी ॲलेक्झांड्रियाचे अक्षांश ३१० ३’ उ काढले होते. हल्ली ते ३१०  १२’ उ मानतात. त्यांनी जगाचा एक नकाशाही तयार केला होता.

एराटॉस्थीनीझ म्हातारपणी आंधळे झाले. आपल्या या आयुष्याला कंटाळून त्यांनी स्वत:ची उपासमार केली. त्यातच त्यांचे अलेक्झांड्रिया (ईजिप्त) येथे निधन झाले.

समीक्षक – अविनाश पंडित

प्रतिक्रिया व्यक्त करा