लोकसंख्याशास्त्र या विषयात लोकसंख्येचा अनुभवाधिष्ठित, संख्याशास्त्रीय आणि गणितीय पद्धतीने अभ्यास केला जातो. ही एक ज्ञानाची स्वतंत्र शाखा मानली जाते. Demography हा मूळ ग्रीक शब्द असून यातील Demos म्हणजे लोक आणि Graphy म्हणजे माहिती लिहणे होय. काही तज्ज्ञांच्या मते, लोकसंख्याशास्त्र ही संज्ञा जॉन ग्रँट यांनी इ. स. १६६२ मध्ये नॅचरल अँड पॉलिटिकल ऑब्झर्व्हेशन मेड अपोन द बील्स ऑफ एन मॉर्टिलिटी या निबंधात वापरली आणि लोकसंख्या विश्लेषणाची तंत्र अशी त्याची व्याख्या केली. तसेच फ्रेंच तज्ज्ञ अचीले गॉयलार्ड यांनी इ. स. १८५५ मध्ये लोकसंख्याशास्त्र ही संज्ञा वापरली होती. लोकसंख्याशास्त्र या विषयात लोकसंख्येचा अभ्यास गुणात्मक आणि संख्यात्मक पद्धतीने केला जातो.
व्याख्या : डोनाल्ड बोग यांच्या मते, मानवी समूहांचा आकार, त्याची रचना आणि अवकाशिक विभाजन यांत आणि त्यांतील होणाऱ्या बदलांवर जनन, मृत्यूदर, विवाह, स्थलांतर आणि सामाजिक गतिशीलता या पाच प्रक्रियांद्वारा जे परिणाम होतात, त्याचा गणित व सांख्यिकीय अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लोकसंख्याशास्त्र होय.
अशिले गुईलार्ड यांच्या मते, लोकसंख्याशास्त्र हे लोकसंख्येची सामान्य गती आणि भोतिक, सामाजिक, तसेच बौद्धिक दृष्टिक्षेपांचे गणितीय ज्ञान आहे.
स्टेनफोर्ड यांच्या मते, मानवी समूहांच्या सांख्यिकीय माहितीचा अतिशय तांत्रिक व प्रकर्षाने गणिती पद्धतीचा अभ्यास म्हणजे लोकसंख्याशास्त्र होय. यामध्ये विशेषत: जन्म, मृत्यू व स्थलांतर, तसेच लोकसंख्येच्या रचनेतील बदल ज्यामुळे कळतात अशा वयोगट, लिंग व वैवाहिक दर्जा या वैशिष्ट्यांचासुद्धा समावेश होतो.
वॉरन थॉम्पसन यांच्या मते, लोकसंख्येत होणारे बदल, (१) ते कसे घडून येतात व लोककल्याणाच्या दृष्टीने त्याचे परिणाम, (२) जगात कोठे कोठे लोकवस्ती आहे, तिचे अवकाशिक विभाजनात व निरनिराळ्या गटांमधील विभाजनात काय काय बदल होतात? आणि (३) लोकसंख्येच्या विविध गटातील वौशिष्ट्ये यांचा अभ्यास लोकसंख्याशास्त्रात केला जातो.
लोकसंख्याशास्त्र या संकल्पनेच्या विविध व्याख्यांमध्ये व्यक्तीच्या वर्तनाचा नव्हे, तर मानवी समूहांचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये प्रामुख्याने मानवी समूहांचे आकारमान, मानवी समूहांची रचना, वैशिष्ट्ये, विकास, जन्मदर, मृत्यूदर, लिंग व वैवाहिक दर्जा, स्थलांतर इत्यादी घटकांचा परस्पर संबंध व व्यवस्थाबद्ध अर्थात शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो.
लोकसंख्याशास्त्रात लोकसंख्यावाढीच्या निर्धारक घटकांचा अभ्यास केला जातो. एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येची उत्क्रांती आणि तिचे वितरण यांचे वर्णन केले जाते. लोकसंख्येची प्रवृत्ती आणि इतर सामाजिक संघटनांशी असलेले तिचे संबंध यांची मीमांसा केली जाते. भविष्यकालीन लोकसंख्येची उत्क्रांती आणि तिचे संभाव्य परिणाम यांचे पूर्वानुमान केले जाते.
व्याप्ती व स्वरूप : सुधारित आकडेवारी, नवी तंत्रे आणि लोकसंख्या संक्रमणाचे काटेकोर मापन यांमुळे लोकसंख्याशास्त्राला शास्त्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. लोकसंख्येशी निगडित घटकांचा अभ्यास व त्याचे विश्लेषण यात पद्धतशीरपणे केले जाते. इतर शास्त्रांप्रमाणेच लोकसंख्याशास्त्राचेही स्वत:चे नियम किंवा सिद्धांत आहेत. उदा., पर्याप्त लोकसंख्येचा सिद्धांत, माल्थसचा लोकसंख्याविषयक सिद्धांत, लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत इत्यादी. लोकसंख्याशास्त्रात कर्त्याचे कारण-परिणाम यांच्यातील संबंध अभ्यासला जातो. लोकसंख्यावाढ, अन्नधान्य टंचाई, औद्योगिक केंद्राच्या ठिकाणी लोकसंख्येचे होणारे केंद्रीकरण व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या, उच्च जननदर, लोकसंख्यावाढ इत्यादी घटकांतील संबंधांचे विश्लेषण यात केले जाते. या शास्त्रात स्वयंसुधारणा करण्याची क्षमता आहे. बदललेल्या परिस्थितीत पुन्हा निरीक्षणे केली जातात व नव्याने प्रकाशात आलेल्या घटकांद्वारे प्रस्थापित निष्कर्षात सुधारणा केली जाते. यातील तत्त्वे व नियम सर्वव्यापी असतात.
लोकसंख्याशास्त्र हे वास्तववादी सास्त्र आहे; कारण यात वास्तववादी घटकांचा किंवा वस्तुस्थितीचा अभ्यास केला जातो. तसेच हे आदर्शवादी शास्त्रसुद्धा आहे. उच्च जननदर, उच्च मृत्यूदर, स्थलांतर इत्यादींशी निर्माण समस्यांचा अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी उपाय सूचविले जातात. तसेच जनन, मर्त्यता, लोकसंख्येतील वय संरचना, लिंग संरचना, प्रादेशिक रचना अथवा विभागणी, स्थलांतर आणि नागरीकरण, तसेच पर्यावरण या घटकांचा सविस्तर अभ्यास केला जातो. त्यातील कल आणि बदल यांनुसार लोकसंख्येवरील परिणाम आणि आर्थिक व सामाजिक परिणाम यांचा सविस्तर अभ्यास केला जातो.
आधुनिक लोकसंख्याशास्त्राचा अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल, गणित, जनुकशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि मानवशास्त्र यांच्याशी निकटचा संबंध आहे. त्यामुळे लोकसंख्याशास्त्राचे स्वरूप आंतरविद्याशाखीय आहे. लोकसंख्याशास्त्र आणि त्याचा इतर सामाजिकशास्त्रांशी असणारा परस्पर संबंध खालील प्रमाणे आहे.
लोकसंख्याशास्त्र आणि अर्थशास्त्र : लोकसंख्याचा अभ्यास हे अर्थासास्त्रातील एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. अर्थशास्त्रात उत्पादक व उपभोक्ता या दोन्ही दृष्टीने लोकसंख्येची भूमिका महत्त्वाची असते. लोकसंख्या वृद्धी, लिंगनिहाय विभागणी, वयोमानानुसार रचना, राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न यांसारख्या आर्थिक चलांच्या अभ्यासाबाबत लोकसंख्या अभ्यास व अर्थशास्त्र हे आंतरसंबंधित असल्याचे दिसते. भविष्यातील एकूण लोकसंख्या व त्याची गुणवत्ता, आर्थिक संधी आणि आर्थिक संघटन यांवर अवलंबून असते. लोकसंख्या वृद्धीदर व अवलंबित्व गुणोत्तर हे लोकसंख्याविषयक घटक आर्थिक विकासावर परिणाम घडवून आणतात. विकसनशील देशांत आर्थिक विकासाचा वेग मंद असण्यास अतिरिक्त लोकसंख्या हा महत्त्वाचा घटक जबाबदार असतो. वाढत्या लोकसंख्येने निर्माण होणारी बेकारी, दारिद्र्य, अल्प दरडोई उत्पन्न, उपासमार इत्यादी प्रश्न सोडविण्यासाठी लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरतो.
लोकसंख्याशास्त्र आणि समाजशास्त्र : लोकसंख्येतील स्त्री-पुरुष घटकांचे विवाहाचे वय, वैवाहिक स्थिती, घटस्फोटाचे प्रमाण, विधवा विवाह यांबाबत समाजाचा दृष्टिकोण, स्त्रियांचे सामाजिक स्थान हे जननक्षमतेवर परिणाम करणारे सामाजिक घटक आहेत. या सर्व घटकांना सामाजिक आशय आसल्याने समाजशास्त्राच्या अभ्यासाठी लोकसंख्याशास्त्राचा उपयोग होतो.
लोकसंख्याशास्त्र आणि मानसशास्त्र : अल्पवयीन विवाह, मुलांसाठी आग्रह, संतती नियमनाच्या साधनांचा अपुरा वापर यांसारख्या घटकांचा अभ्यास करून लोकसंख्यावाढीच्या समस्येवर उपाय सूचविण्यासाठी या शास्त्राचा उपयोग होतो.
लोकसंख्याशास्त्र आणि भूगोल : जन्म, मृत्यू, स्थलांतर, प्रादेशिक असमतोल इत्यादी घटकांची चर्चा करताना लोकसंख्याशास्त्र आणि भूगोल एकमेकांना पुरक ठरतात.
लोकसंख्याशास्त्र आणि विधीशास्त्र : कायदे हे सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, अन्ननिर्मिती, वितरण आणि विक्री, औषधी द्रव्य व औषधी उत्पादन, चिकित्सालय, रुग्णालये, स्थलांतर, विवाह, जननक्षमता, बालदक्षता, शिक्षण आणि महिलांची भूमिका व त्यांचा दर्जा यांच्याशी संबंधित असल्यामुळे लोकसंख्याशास्त्र आणि कायदा यांच्यातील संबंध स्पष्ट होतो. गर्भपातास मान्यता, कुटुंबनियोजन, संतती नियमनाच्या साधनांचा वापर इत्यादींबाबत कायदे केल्याने लोकसंख्येचे योग्य व्यवस्थापन करता येते.
लोकसंख्याशास्त्र आणि पर्यावरण : कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्येवर तेथील पर्यावरणाचा प्रभाव पडतो. त्याच प्रमाणे पर्यावरणावरही त्या प्रदेशातील लोकसंख्येचा परिणाम होत असतो. कोणत्याही प्रदेशातील पर्यावरणाचा दर्जा तेथील लोकसंख्येच्या घनतेवर अवलंबून असतो. लोकसंख्येच पर्यावरणाशी असणारे गुणोत्तर अभ्यासणे पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
लोकसंख्याशास्त्र आणि राज्यशास्त्र : साधारणपणे धर्म, जात, शिक्षण, ग्रामीण-शहरी भागातील वास्तव्य, व्यवसायाचे स्वरूप इत्यादी घटक लोकांच्या मतदानविषयक वर्तणुकीवर प्रभाव पडतात. त्यामुळे राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना लोकसंख्या अभ्यासाची मदत होते.
अभ्यासाची आवश्यकता : एखाद्या देशाच्या विकासाचा विचार करता लोकसंख्या हा घटक विशेष महत्त्वाचा ठरतो; कारण अतिरिक्त लोकसंख्या किंवा न्यूनतम लोकसंख्या या दोन्ही प्रकारची परिस्थिती कोणत्याही राष्ट्राच्या हिताची नसते. त्याच प्रमाणे लोकसंख्येतील वयोगटानुसारची विभागणीसुद्धा महत्त्वाची असते; कारण त्यावरून लोकसंख्येतील उत्पादक व अनुत्पादक किंवा परावलंबी घटकांची स्थिती लक्षात येते. त्याच प्रमाणे लोकसंख्येतील लिंग संरचना, ग्रामीण व शहरी विभागणी यांद्वारे लोकसंख्येतील स्त्री-पुरुष प्रमाण समजते, नागरी व ग्रामीण विभागणीमुळे लोकसंख्येचे स्थलांतर आणि नागरी विकासावरील ताण यांची कल्पना येते. त्यामुळे लोकसंख्याशास्त्र या विषयाचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक व महत्त्वपूर्ण ठरते.
- लोकसंख्येचा आकारमान, त्यातील तत्कालीन व दीर्घकालीन बदल, जन्मदर व मृत्यूदराशी संबंधित पैलू, लोकसंख्येची संरचना आणि घनता, श्रमशक्ती, स्थलांतराबाबत नियोजन, सामाजिक व आर्थिक समस्या यांबाबतचा संख्यात्मक व गुणात्मक दृष्टिकोणाचा समावेश होतो. कुटुंब आणि विवाहासारख्या सामाजिक समस्यांचा लोकसंख्याविषयक पैलूंचा लोकसंख्याशास्त्रात अभ्यास केला जातो.
- लोकसंख्याशास्त्राची व्याप्ती सातत्याने वाढत असल्याने त्याचे महत्त्वही वाढत आहे. त्यामुळे लोकसंख्या समस्या जाणून घेण्यास मदत होते. विशेषत: जगातील अल्पविकसित देशांना याचा अधिक उपयोग होतो. तसेच विकसित व अविकसित देशांतील लोकसंख्या नियोजनाच्या दृष्टीनेही लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरतो.
- आरोग्य सोयींच्या नियोजनासाठी लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरतो.
- उच्च जननदरामुळे माता व बालक या दोहोंच्या आरोग्याची समस्या गंभीर बनते. विशेषत: विकसनशील देशांमध्ये सततच्या गरोदरपणामुळे विवाहित स्त्रियांबाबत पोषण निस्सारण घडून येते. उच्च जनन हे बालकांच्या अपुऱ्या वाढीशी निगडित आहे. लोकसंख्याशास्त्रात जनन आणि त्याच्याशी संबंधित समस्यांचा अभ्यास केला जात असल्याने देशातील आरोग्य नियोजनात त्याचा फार उपयोग होतो.
- अन्नधान्य पुरवठ्याच्या व्यवस्थेत देशातील एकूण लोकसंख्येला संख्यात्मक व गुणात्मक दृष्ट्या पुरेशा प्रमाणात अन्नधान्य पुरविणे अभिप्रेत असते. लोकसंख्यावाढीबरोबर अन्नधान्य पुरवठा वाढणे अनिवार्य असते. अन्नधान्य नियोजनाबाबत सरकार व आंतरराष्ट्रीय संस्था यांना लोकसंख्याशास्त्राचा उपयोग होतो. विकसनशील देशांत लोकसंख्या वेगान वाढते; पण रोजगारनिर्मिती त्याप्रमाणात होत नाही. त्यामुळे अवलंबित्व गुणोत्तर उच्च राहते. म्हणून रोजगार नियोजन काटेकोरपणे करावे लागते. हे नियोजन करताना लोकसंख्येच्या विविध पैलूंचा अभ्यास उपयुक्त ठरतो. रोजगार नियोजनातील स्थलांतर, अप्रवासी, उत्प्रवासी हे सर्व महत्त्वपूर्ण घटक लोकसंख्याशास्त्रात अभ्यासले जातात.
- अविकसित देशांमध्ये शिक्षणाबाबत सरकारची भूमिका निर्णायक असते. झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या शिक्षणाच्या सोयीचा योग्य विस्तार होणे आवश्यक असते. निरक्षरतेची बहुव्यापकता आणि शिक्षणाचे प्रमाण यांचे लोकसंख्याविषयक मूल्यमापन करत शिक्षण नियोजन करावे लागते. भविष्यकालीन शैक्षणिक गरजांबाबत पूर्वानुमान करतानासुद्धा लोकसंख्या वृद्धीच्या अंदाजाचा आधार घ्यावा लागतो.
महत्त्व : आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने लोकसंख्याशास्त्राला महत्त्व आहे.
- मानवाच्या अधिकाधिक गरजा भागविण्यासाठी दुर्मीळ साधनसंपत्तीचा कार्यक्षमतेने वापर करणे आवश्यक असते.
- देशातील लोकसंख्या हीसुद्धा एकप्रकारची साधनसंपत्ती असल्याने त्याबाबतही नियोजन करावे लागते. विशिष्ट प्रदेशांतील शिक्षणाच्या सोयी, आरोग्य सुविधा, वाहतूक व दळणवळण इत्यादींबाबत नियोजन करताना लोकसंख्याशास्त्र उपयुक्त ठरते.
- लोकसंख्येतील वाढीबरोबर गृहनिर्माणाची आवश्यकताही वाढत जाते. उत्पन्नातील वाढ, आर्थिक विकास, विभक्त कुटुंब व्यवस्थेची वाढती प्रवृत्ती इत्यादी कारणांमुळेही घरांची समस्या बिकट बनते. औद्योगिक केंद्राच्या परिसरात व शहरी भागांत घरांची टंचाई फारच जाणवते. यातून गलिच्छ वस्त्या, व झोपडपट्ट्यांची निर्मिती होते. जनन, मृत्यू, स्थलांतर, कुटुंब उभारणी इत्यादींबाबतचे अंदाज गृहनिर्माण नियोजनात उपयोगी पडतात.
- आर्थिक दृष्ट्याही लोकसंख्याशास्त्र उपयुक्त ठरतो. आर्थिक विकासाच्या दरापेक्षा लोकसंख्या वाढीचा दर अधिक असल्यास त्यातून बेकारी व दारिद्र्यासारख्या समस्या निर्माण होतात. जलदगतीने वाढणाऱ्या लोकसंख्येने आर्थिक विकासात निर्माण होणारे अडथळे व ते दूर करण्यासाठी करावी लागणारी उपाययोजना यांसाठीही लोकसंख्याशास्त्र महत्त्वाचे ठरते.
- लोकसंख्याशास्त्राला सामाजिक दृष्ट्याही महत्त्व आहे. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शैक्षणिक सोयी, आरोग्य, निवासव्यवस्था इत्यादी गरजांची कल्पना येते. वाढत्या लोकसंख्येने कायदा व सुव्यवस्थेबाबत कोणते प्रश्न निर्माण होतील आणि कोणते उपाय योजता येतील, हे ठरवताना लोकसंख्याशास्त्राचा उपयोग होतो.
संदर्भ :
- कुलकर्णी, सुमती; कानिटकर, तारा, लोकसंख्याशास्त्र, पुणे, १९७९.
- Chattopadhyay, A. K.; Saha, A. K., Demography Techniques and Analysis, New Delhi, 2012.
- Weinstem, Yay; Pillai, Vikram K., Demography The Science of Population, Maryland, 2016.
समीक्षक : अंजली राडकर