सर्जनशील विनाश म्हणजे सातत्याची, विनाअडथळा असलेली वस्तू व प्रक्रियेच्या नवप्रवर्तनाची यंत्रणा. अशा यंत्रणेच्या व्यवहार प्रक्रियेतून जुनी उत्पादन व्यवस्था अथवा पद्धती नष्ट होऊन त्या जागी नवीन उत्पादन व्यवस्था अथवा पद्धती आकारास येते. म्हणजेच एखादी जुनी व्यवस्था मोडकळीस येऊन नष्ट होणे आणि त्या व्यवस्थेच्या जागी नवी व्यवस्था प्रस्थापित होणे हा सर्जनशील विनाश या संज्ञेतून व्यक्त होणारा अर्थ आहे. याला निर्मितीक्षम विनाश असेही म्हणतात. या पद्धतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नवप्रवर्तनांच्या आधारे एखादी गोष्ट करण्यासंबंधीची नवीन पद्धत तयार होऊन जुनी पद्धत नष्ट होते. उदा., शेतीउद्योगातील अनेक व्यवहार (नांगरणी, खुरपणी, मळणी इत्यादी.) मनुष्यबळाच्या आधारे न करता यंत्रोपकरणांच्या आधारे करणे इत्यादी. या ठिकाणी शेतीव्यवसायातील पारंपरिक उत्पादनपद्धती जाऊन आधुनिक पद्धतीचा विचार केला जातो.

बदल ही अपरिहार्य बाब असून तो विधायक किंवा विघातक असू शकतो. बदल हा गतीमान असून तो टाळता येत नाही. मनुष्य जीवन स्थितीजन्य नाही. या बदलामध्ये प्रगती आहे, विकास आहे. उत्पादन, उत्पादकता, उत्पादन भरीव रीत्या वाढण्याची प्रक्रिया आहे. अशा बदलास कोणी सर्जनशील विनाश म्हणत असेल, तर त्यामुळे आपली उत्सुकता वाढते. योझेफ शुंपेटर या ऑस्ट्रियन-अमेरिकन थोर अर्थशास्त्रज्ञांनी ही संज्ञा पहिल्यांदा आपल्या भांडवलवाद, समाजवाद आणि लोकशाही या ग्रंथात वापरली. सर्जनशील विनाश या संज्ञेत आशावादी आणि निराशावादी या दोन बाजू आहेत. शुंपेटर यांनी सर्जनशील विनाशाची संज्ञा आणि प्रक्रिया समजावून देताना रेल्वेरस्ता विस्तारीकरणासंबंधीचे एक प्रभावी उदाहरण देतात. त्यांच्या मते, इलिनॉईस सेंट्रल रेलरोड्सच्या विस्तारीकरणातून अधिकाधिक रेल्वेची निर्मिती झाली. त्यातून रेल्वेने वाहतूक होणाऱ्या संख्येत भर पडली. त्यामधून रेल्वेवाहतुकीमध्ये अधिक पुरक अशा संरचनात्मक सोयींमध्ये वाढ झाली. यामुळे रेल्वेवाहतुकीभोवतालची शहरे वाढली व विकसित होऊ लागली. एकाबाजूला ही सर्जनशीलता सिद्ध होत असताना कृषिविषयक आणि शेतलागवडीविषयक काही पद्धती समूळ नष्ट होत गेल्या. मिडवेस्ट भागात कृषिविषयक पद्धती टाकून देण्यात आल्या. वाहतुकीच्या बाबतीत नवीन आणि अधिक कार्यक्षम व्यवस्था उदयाला आल्यामुळे जुन्या जीवनपद्धतींचा विनाश झाला. शेतीव्यवसाय उपजीवीकेचे साधन न राहता, ते व्यापारी उद्दिष्टांचा प्रमुख स्रोत झाला. शेतीमधून केवळ स्वत:च्या उपभोगासाठी वस्तू तयार न करता, त्या बाजारात विकण्यासाठी तयार केल्या जाऊ लागल्या. शुंपेटर यांच्या या उदाहरणातून जसा नवनिर्मितीचा प्रत्यय येतो, तसाच या सर्जनशीलतेतून घडत गेलेल्या विनाशाची कल्पना येते.

सर्जनशील विनाशाच्या प्रक्रियेत पुनर्रचनेच्या अंगाचा विचार केला आहे. सर्जनशील विनाशाची ही प्रक्रिया अर्थव्यवस्थेच्या समग्र किंवा सकल आणि सूक्ष्म या दोनही पातळ्यांवर कार्यरत राहून सर्जनशील विनाशाचा परिणाम साधत असते. उदा., अर्थव्यवस्थेची दीर्घकालीन प्रगती अथवा आर्थिक विकास, अर्थव्यवस्थेतील व्यापारचक्रांमधील चढ-उतार, संस्थात्मक सुधारणांमधील रचनात्मक तडजोडी आणि उत्पादन घटक बाजारातील बदल या आर्थिक बाबींवर सर्जनशील विनाशाच्या प्रक्रियेमधून परिणाम साधला जातो. उत्पादन संस्थेच्या पातळीवर विचार करताना अस्तित्वात असलेल्या उत्पादन पद्धती व उत्तरोत्तर त्यात होत जाणारे बदल पुनर्रचना प्रक्रियेत सर्जनशील विनाशाचे काम करत राहतात. उत्पादन संस्थेच्या दृष्टीने घेतल्या जाणाऱ्या निर्णयाचे स्वरूप क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे असते. त्या निर्णयात धोरण आणि तंत्रज्ञान या बाबींमधून सर्जनशील विनाशाची प्रक्रिया पुढे जात राहते. या प्रक्रियेत केवळ व्यवस्थापकाच्या बुद्धीमत्तेचा विचार होत नाही, तर बदलत जाणाऱ्या व बदल अपेक्षित असणाऱ्या संस्थात्मक सुधारणांच्या परिणामांचाही विचार केला जातो. शुंपेटर यांच्या दृष्टिकोणातून सर्जनशील विनाश प्रक्रियेला गती देण्याचे काम संयोजक करतो. संयोजकाकडून आधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संघटनेच्या रचनेतून उत्पादनाची कार्यक्षमता वाढविली जाते. वाढत जाणाऱ्या कार्यक्षमतेतून उत्पादकतेत वाढ होते आणि वस्तूचा सरासरी खर्च कमी होतो. या प्रक्रियेतून केवळ संयोजकाचाच नफा वाढत नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पादन वाढून आर्थिक वृद्धीत वाढ होते. या प्रक्रियेत जुने उत्पादनतंत्र नष्ट होतात. नवीन उत्पादन तंत्रात संगणक, ॲलगॉरिक्षम प्रोग्रॅमिंग, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या अत्याधुनिक उत्पादनतंत्र पद्धतीचा उपयोग केला जातो.

सर्जनशील विनाश प्रक्रियेचा विकास व्यापारी चक्राच्या मंदी आणि पुनरुत्थानाच्या अवस्थांमधून होत राहतो. मंदीसारख्या अवस्थेत किती उत्पादन संस्थांचे दिवाळे निघते, तसेच पुनरुत्थानाच्या अवस्थेत किती उत्पादन घटकांच्या पुनर्वाटपातून पुनर्निर्मिती कोणत्या गतीने साधली जाते, या गोष्टींमधून सर्जनशील विनाशाची प्रक्रिया पुढे जात राहते. मंदीच्या काळात विनाशाची गती अधिक असते; मात्र पुनरुत्थानाच्या वेळी पुनर्रचना प्रक्रियेमधून सर्जनशीलता वाढीस लागते. सर्जनशील विनाशाची ही नेमकी प्रक्रिया समजण्यासाठी रोजगार नष्ट होणे आणि नवीन रोजगारांची निर्मिती होणे यांसारख्या समर्पक उदाहरणाचा आधार शुंपेटर यांनी दिला आहे. यासंदर्भात १९७२ ते १९९३ या कालावधीच्या आकडेवारीच्या आधारे केलेल्या अमेरिकेतील अभ्यासात कॅबलेरो व हॅमोर यांनी २००५ मध्ये मांडलेल्या निष्कर्षानुसार पुनरुत्थानाच्या काळात रोजगार संपुष्टात येण्याचा दर वाढतो; मात्र तो सरासरी पातळीच्या वर जात नाही. थोडक्यात, मंदीच्या काळात पुनर्निर्मितीचा वेग कमी होतो.

सर्जनशील विनाशाच्या प्रक्रियेत ज्या काही संभाव्य व प्रत्यक्ष तडजोडी कराव्या लागतात, त्यात काही अडथळे अथवा अडचणी निर्माण होतात. श्रमाच्या बाजारातील व्यवहारांवरची नियंत्रणे, वित्तीय संस्था आणि वित्तीय बाजारातील अस्वीकार्हार्य गोष्टी, बँकिंग व्यवसायातील मोडकळीस येत चाललेल्या गोष्टी यांमधून सर्जनशील विनाश प्रक्रियेला खीळ बसते; मात्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिस्थितीतून सर्जनशील विनाश प्रक्रियेस गती मिळते. यामध्ये खुला व्यापार व्यवहारांमधून उत्पादकतेतील वाढ आणि अधिक कार्यक्षम रितीने होणारे उत्पादन घटकांचा पुनर्वाटप या दोहोंच्या आधारे सर्जनशील विनाश प्रक्रियेत प्रगतीच घडून येते. देशांतर्गत वस्तू बाजारातील नियंत्रणे कमी केल्यास सर्जनशील विनाश अधिक विधायक पद्धतीने पुढे नेता येतो.

रेलरोड्स ते विमानवाहतूक, तसेच पेन्स, पेपर, टाईपरायटर्स ते संगणक असा भांडवलशाही व्यवस्थेच्या विकासात नवप्रवर्तनांनी घडून येणारा विकास एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला जुन्या व्यवस्थेच्या विनाशाचे चित्र पुढे येते. आजच्या माहिती युगाच्या अवस्थेत सर्जनशील विनाशाचा हा टप्पा वर्ल्ड वाईड वेब (WWW) पर्यंत उभा आहे, हे सहजच लक्षात येते.

सर्जनशील विनाश या संज्ञेमागची सैद्धांतिक प्रक्रिया व तिचे मूळ प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ कार्ल मार्क्स यांच्या दास कॅपिटल या ग्रंथात दिसून येते. सर्जनशिल विनाश ही प्रक्रिया शुंपेटर यांच्या द थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट; बिझनेस सायकल्स आणि कॅपिटॅलिझम, सोशलॅझम अँड डेमॉक्रसी या तीन महत्त्वाच्या ग्रंथांतून उत्क्रांत केली आहे. आज दिसून येत असलेला भांडवलशाही व्यवस्थेचा विकास शुंपेटर यांच्या सर्जनशील विनाश या प्रक्रियेच्या वाटेनेच पुढे उत्क्रांत होताना दिसून येत आहे; मात्र भविष्यात भांडवलवादी व्यवस्थेचे रूप नोकरशाहीमध्ये परावर्तीत होऊन वैयक्तिक पातळीवरचे संयोजनाचे प्रयत्न हाणून पाडले जातील आणि नवप्रवर्तनाची प्रक्रिया दैनंदिन होऊन मध्यवर्ती व्यवस्थापनाच्या हातात केंद्रित होईल, असे काही तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.

संदर्भ :

  • American Economic Review, 94, 2004.
  • Bertrand, M.; Schoar, A.; Thesmar, D., Banking Deregulation and Industry Structure, London, 2004.
  • Schumpeter, J., Capitalism, Socialism and Democracy, New York, 1942

समीक्षक : विनायक देशपांडे