निसर्गाने किंवा मानवाने निर्माण केलेल्या संकटाचा समाज किंवा पर्यावरणावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांवर शास्त्रीय दृष्ट्या योग्य उपाययोजना करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. मानव आणि आपत्ती यांचा संबंध अनादिकाळापासून असून त्यामुळेच मानवी जीवनात प्रचंड प्रमाणात स्थित्यंतरे घडून आलीत आणि भविष्यातही येतील. मानवाने निसर्गात केलेले हस्तक्षेप आणि त्यामुळे पर्यावरणात झालेला बिघाड यांमुळे मानवास अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. एकविसाव्या शतकात मानवाने लावलेले विविध शोध आणि मानवाचा आततायीपणा यांमुळे आपत्ती निर्माण होते.

व्याख्या : भारतीय राज्यघटनेनुसार, प्रत्येक व्यक्तीस आपल्या जिवीत आणि मालमत्ता सुरक्षित राखण्याचा अधिकार दिला आहे. त्याच बरोबर राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षितता राखणे हे प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेचे मूलभूत कर्तव्य असल्यामुळे साहजिकच आपत्ती निवारण्याची जबाबदारी सरकार आणि प्रत्येक नागरीकाची आहे.

आपत्ती व्यवस्थापन या संकल्पनेत नियोजन, जबाबदारीचे, जोखमीचे, कामगिरीचे, व्यवहारात्मक, वित्तीय, संदेशवहनाचे आणि माहितीचे व्यवस्थापन इत्यादींचा समावेश होतो.

आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ नुसार, सातत्यपूर्ण व एकात्मिक नियोजन प्रक्रिया, व्यवस्थित रचना, सहकार्य आणि आपत्तींच्या संभाव्य धोक्याला प्रतिबंध, आपत्तीतील धोक्यांची तीव्रता कमी करणे, क्षमता सबलीकरण, पूर्वतयारी, तत्पर प्रतिसाद, आपत्ती परिणामांची तीव्रता, व्यापकता पडताळून पाहणे, स्थलांतर, मदत व बचाव कार्य, पुनर्वसन व पुनर्रचना इत्यादी आवश्यक किंवा उपयुक्त उपायाची अंमलबजावणी म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय.

प्रकार : आपत्तीचे दोन प्रकार आहेत.

(१) नैसर्गिक आपत्ती : या आपत्तीमध्ये अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी, वादळे, दरड कोसळणे, हिमपात, मानवी अविचार, नैसर्गिक रोगराई, वणवे, ज्वालामुखी उद्रेक, उल्कापात, वीज कोसळणे, अवर्षण इत्यादींचा समावेश होतो.

(२) मानवनिर्मित आपत्ती : चेंगराचेंगरी, आग, घरगुती अपघात, वायुगळती, इमारत कोसळणे, रेल्वे अपघात, हवाई अपघात, जलवाहतूक अपघात, अनुभट्टीतील किरणोत्सर्ग, युद्ध, अतिरेकी कारवाया, पर्यावरण ऱ्हास, माहिती तंत्रज्ञानाशीसंबंधित गुन्हे इत्यादींचा समावेश होतो.

आपत्ती या महत्त्वपूर्ण समस्येची तीव्रता कमी करणे शक्य नसले, तरी शास्त्रीय ज्ञान वापरून उपलब्ध संसाधनांच्या साह्याने आपत्तीचे व्यवस्थापन करता येते. आपत्तीचे स्वरूप, क्षमता, ठिकाण, कालावधी, कारण, पूर्वकालीन क्षमता व विस्तार यांवर मनुष्यहानी, वित्तहानी, तसेच शेतीचे दैनंदिन व्यवहार आणि वातावरणावरील परिणाम अवलंबून असतो. उदा., महापूर, बॉम्ब स्फोट, भूकंप, रोगराई यांमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होते. आपत्तीचा संबंध विविध सामाजिक शास्त्रांशी येतो. त्यामुळेच संपूर्ण मानवी जीवनावर दूर्गामी परिणाम होतात. उदा., अर्थशास्त्र – बाजारव्यवस्था पूर्ववत व्हायला वेळ लागतो. समाजशास्त्र – सामाजिक व्यवहार किंवा कार्य पुढे ढकलावी लागतात. राज्यशास्त्र – त्या त्या भागातील संपूर्ण व्यवस्थेची गती कमी होते. अर्थव्यवस्थेवर होणारा वाईट परिणाम लक्षात घेऊन युनायटेड नेशन्सने १९९९ पासूनचे दशक नैसर्गिक आपत्तीदशक म्हणून जाहीर केले आहे.

आपत्ती व्यवस्थापनाची गरज : एखादी व्यक्ती शारीरिक, मानसिक व भौतिक दृष्ट्या कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी तयार असला, तर आकस्मात आलेल्या संकटांनी खचून न जाता तो उत्तम मनोबलाच्या आधारे आलेल्या आपत्तींना यशस्वीपण सामोरे जाऊ शकतो. आपत्तींना तोंड देण्यासाठी आपत्ती कशा व कोणत्या स्थितीत निर्माण होतात? होणाऱ्या नुकसानीची तीव्रता कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? यांची माहिती करून घेऊन आपत्तीपूर्व नियोजन काय करावे? प्रत्यक्ष आपत्तीत मानवी वर्तन कसे असावे? नंतरची जबाबदारी काय असावी इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेतल्यास आपत्तीला समर्थपणे सामोरे जाता येईल.

आपत्ती समस्यांची कारणमिमांसा : मानवी विकास आणि आपत्ती यांचा परस्पर संबंध आहे. आपत्तीमुळे परिसरांचा विध्वंस होतो. प्रगती जेवढी जास्त, तेवढी संकटांची तीव्रता जास्त असते. ही चिकित्सा आकृतीमध्ये दर्शविली आहे.

पर्यावरण, सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती, प्रशासकीय व व्यवस्थापकीय कार्य, वैद्यकीय क्षेत्र, उत्पादन व वितरण इत्यादी क्षेत्रांवर आपत्तीचा परिणाम जाणवतो.

भौगोलिक क्षेत्रानुसार आपत्तीचा विचार करता साधारणत: समुद्रकिनारा, नदी किनारपट्टी, धरणाजवळील क्षेत्रात पूर, महापूर, अतिवृष्टी, चक्रीवादळाचा धोका अधिक संभवतो; तर भरगच्च वस्ती, शाळा, पेट्रोलपंप अशा भागात आगीचा धोका आणि डोंगराळ भागात दरड खचणे असे प्रकार घडताना दिसतात. या आपत्तींची तीव्रता किती हे मोजण्याची काही साधनेही आहेत. उदा., भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलने, चक्रीवादळाची तीव्रता किमी. मधील ताशी वेगाने, बॉम्बस्फोट गतिमानतेनुसार सामान्यत: प्रतिसेकंदाला २ किमी. पासून ते ९ किमी. पर्यंतचा कालावधी विचारात घेतला जातो; तर रेल्वे व हवाई अपघातात एल-० पासून ते एल-३ पर्यंतचा विचार होताना दिसतो.

आपत्तीचे कार्य हे आपत्तीपूर्व, आपत्ती प्रतिबंधक व आपत्तीची तीव्रता कमी करणे या तीन टप्प्यांत चालते.

(१) आपत्तीपूर्व टप्पा : या टप्प्यात अंदाज, नियोजन आणि पुनरावृत्ती यांचा विचार होतो.

(२) आपत्ती प्रतिबंधक : या टप्प्यात बचाव व मदत कार्य यांचा विचार होतो.

(३) आपत्तीची तीव्रता कमी करणे : या टप्प्यात पूनर्वसन, पुन:निर्माण, सुधारणा इत्यादी घटक येतात.

आपत्ती काळात विविध शासकीय खात्यामधील समन्वय, शासकीय खाती व खाजगी संस्थांमधील किंवा स्वयंसेवी संस्थांमधील समन्वय, विविध शासकीय खात्यांमधील माहितीचे प्रसारण इत्यादी प्रशासकीय घटकांच्या भूमिका आणि प्रत्येक कामांची निश्चिती करण्यात आल्यामुळे प्रत्येक खाते हे आपल्यावर सोपविण्यात आलेले काम व्यवस्थितपणे पार पाडत असते. याशिवाय जागतिक स्तरावर काही संस्थाही आपत्ती व्यवस्थापनासाठी कार्यरत आहेत.

समीक्षक : ह. ना. जगताप