झाडावर पडलेली वीज

वीज (विद्युत, तडित्) म्हणजे ढगांमध्ये चालू असलेल्या वादळासमवेत उत्सर्जित होणारी मोठी प्रकाशमान विद्युत शक्ती. क्षणिक उच्च विद्युत प्रवाहयुक्त व कित्येक किलोमीटर मार्ग असलेले विद्युत विसर्जन (साठलेले किंवा साठवून ठेवलेले विद्युत भार मोकळे होऊन जाणे) अशी विजेची आणखी एक व्याख्या करता येईल. वीज म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात असणारा प्रचंड भाराचा विद्युत प्रवाह होय. उच्चदाबाची वीज ज्या वेळी उत्सर्जित होते, तेव्हा ती जवळ जवळ १० कोटी वॅट प्रवाहित असू शकते आणि तिचे सर्वोच्च तापमान ३०,०००˚ से. किंवा त्याहीपेक्षा जास्त असू शकते. या प्रचंड उष्णतेमुळे विद्युत मार्गात सापडणाऱ्या धातूंच्या पदार्थांचीसुद्धा वाफ होऊन जाते. विद्युत मार्गातील ही उष्णता एकाएकी वाढत असल्यामुळे मार्गातील हवेचा दाबही स्फोटक तीव्रतेने वाढतो व त्यामुळे विद्युत गर्जना निर्माण होते.

ढगांमध्ये असलेले बर्फाचे कण वाढत जाऊन एकमेकांवर आदळतात आणि तुकडे-तुकडे होऊन बाजूला होतात. असे समजले जाते की, छोटे कण धनभारित होतात व मोठे कण ऋणभारित होतात. ढगांच्या आतील ऊर्ध्वगामी हवेचे झोत व अधोगामी गुरुत्वाकर्षण यांचा परिणाम ढगांतील बर्फाचे कण एकमेकांपासून दूर जाण्यात होतो. त्यामुळे ढगांचा वरील भाग धनभारित होतो व खालील भाग ऋणभारित होतो. ह्या भिन्न भारांमुळे प्रचंड विद्युत क्षमता ढगांच्या आतमध्ये आणि ढग व जमिनीतही निर्माण होते. ती विद्युत क्षमता कोट्यवधी व्होल्ट्सची असू शकते आणि सर्वांत शेवटी हवेतील विद्युत प्रतिरोध खंडित होतो व विजा चमकतात. वीज म्हणजे वादळी ढगांमध्ये होणारे धन व ऋण भागांतील विद्युत-उत्सर्जन. वातावरणात तीन प्रकारे उत्सर्जन होते. १. विद्युत-मेघांच्या आतल्या आत (Intra-Cloud)], २. एका विद्युत-मेघाचे दुसऱ्या विद्युत-मेघांशी (Inter-Cloud) आणि ३. विद्युत-मेघ आणि जमीन (Cloud-Ground). साधारणत: या तिसर्‍या प्रकाराला वीज कोसळणे अथवा वीज पडणे असे संबोधले जाते. हा प्रकार जीवितहानी व वित्तहानी करतो.

वीज पडल्याने होणारे परिणाम : जेव्हा तडिताघात होतो, तेव्हा तडित् मार्गावरील हवेच्या दाबात एकदम प्रचंड वाढ होते व त्यामुळे मेघगर्जना होते. हा हवेचा दाब वाढण्याची मुख्य कारणे म्हणजे प्रचंड विद्युत प्रवाहामुळे तडित् मार्गात निर्माण होणारी प्रखर उष्णता व त्यामुळे निर्माण होणारा प्रचंड दाब ही होत. या प्रचंड दाबामुळे आसमंतातील इमारतींच्या खिडक्यांची तावदाने फुटू शकतात. प्रत्यक्ष इमारतीवरच तडिताघात झाल्यास इमारतीला धक्का पोहोचतो. उंच इमारतीवर किंवा झाडावर तडिताघात होण्याचा संभव अधिक असतो. परिणामत: मनुष्यास व इतर प्राण्यांस मृत्यू येणे संभवनीय असते. उष्णकटिबंधीय प्रदेशात वीज पडण्याचे प्रमाण सरसरीने जास्त असून भारत हा उष्णकटिबंधीय प्रदेशात गणला जातो.

भारतातील, विशेषत: महराष्ट्रातील खेड्यापाड्यांत राहणारे मुख्यत: शेतकरी, शेतमजूर वारा-वादळाची चिन्हे दिसली तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करून आहे त्या परिस्थितीत काम करतात. पण त्या परिस्थितीचा त्यांच्या जीवावर होणार्‍या परिणामाचा ते विचारही करत नाहीत. त्यामुळे आयत्या वेळी वादळात योग्य तो आसरा न मिळाल्याने ते जिवास मुकतात किंवा जखमी होतात. जनावरांना झाडाखाली बांधल्याने झाडावर वीज पडून जनावरेही दगावतात. जखमी व्यक्ती पुन्हा पुर्वीसारखा दिसणे शक्य नाही. कुटुंबाचे कधीही न भरणारे नुकसान होते. ज्याच्या अंगावर वीज पडली तो व्यक्ती जर घरातील कमावता व्यक्ती असल्यास त्याच्या कुटुंबावर खूप मोठी आपत्ती कोसळते. तसेच विमानावर तडिताघात झाल्यास उतारूंना त्याचा परिणाम जाणवत नाही; परंतु लखलखाटामुळे डोळे दीपून वैमानिकास काही दिसेनासे होणे शक्य असते. विमानातील विद्युत व चुंबकीय उपकरणांत बिघाड होणेही संभवनीय असते.

आकृती : महाराष्ट्रात क्षेत्रनिहाय वीज अंगावर पडून होणाऱ्या मृत्यूची टक्केवारी (२००४–२००९).

तडिताघाताच्या वेळी प्रचंड विद्युत प्रवाह निर्माण होतात. शिवाय विद्युत प्रवाहातील वाढ अत्यंत त्वरेने होत असल्यामुळे अतितीव्र चुंबकीय क्षेत्रे निर्माण होतात व त्यामुळे निर्माण होणारा दाब एवढा मोठा असतो की, त्याने विद्युत वाहक नळ्यांचा पुष्कळदा संपूर्ण चुराडा होतो. तडित् मार्ग जर लाकूड, दगडी भिंत इ. कुसंवाहकातून अगर अर्धसंवाहकातून गेला, तर त्यामुळे स्फोटक परिणाम होतात. ज्वालाग्राही पदार्थातून तडित् मार्ग गेल्यास आगी लागतात. त्याचप्रमाणे जंगले, इमारती, रासायनिक व खनिज तेलांचे कारखाने इत्यादींवर तडिताघात झाल्यास आगी लागण्याचा संभव असतो.

उपशमन : वीज कोसळल्यामुळे होणाऱ्या धोक्यांच्या बाबतीत शैक्षणिक संस्थांनी ग्रामीण भागात जनजागृती केल्यास लोक आपत्तीपूर्व तयारी योग्य प्रकारे करू शकतील. अशा परिस्थितीत कोणत्याही माणसाला जास्तीत जास्त सुरक्षित ठिकाणी आसरा मिळाला पाहिजे. लोकांनी मोकळ्या जागेत असताना शक्यतो लहान टेकडी, एकटेच झाड, झेंड्याचे खांब, प्रेक्षपण मनोरा (Tower) अशा जमीनीपासून फार उंच असलेल्या जागांचा आश्रय टाळावा. तडिताघातापासून सुरक्षित राहण्यासाठी कोणत्याही जागा पुर्णपणे सुरक्षित नसतात; मात्र तुलनेने बंदिस्त इमारती, चारचाकी वाहने बरीच सुरक्षित असतात. भारतात, विशेषत: महाराष्ट्रात वीज कोसळून होणारे सर्वाधिक मत्यू हे शेतात काम करणाऱ्या लोकांचे असून वीज पडून होणाऱ्या एकूण मृत्युपैकी ८६ टक्के मृत्यू शेतात काम करणाऱ्या व्यक्तींचे असतात.

ढगांचा गडगडाट असताना मोकळ्या जागेत स्वसंरक्षणार्थ करावयाची आदर्श स्थिती

वीज ही गुराढोरांच्या जीवनासाठीही काळच ठरणारी असते. वादळी वारा, पाऊस सुरू असताना बहुधा गुरेढोरे झाडांखाली एकत्र गोळा होतात अथवा शेतकऱ्यांना असे वाटते की, आपले गुरे भिजून जाऊ नयेत. यासाठी त्यांना झाडाला बांधले जाते. वीज झाडावर पडल्यास झाडाखालील सर्व गुरे वीजेच्या झटक्यांमुळे बळी पडतात. ढगांचा गडगडाट आणि वादळाची शक्यता वाटताच गुरांना गोठ्यांमध्ये सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊन जीव वाचवता येते. विद्युत व दूरध्वनीच्या तारा भूमिगत केल्यामुळे वीज पडल्याने होणारे नुकसान खूपच कमी होण्यास मदत होते. खांबावरून जाणाऱ्या तारा ह्या विद्युत प्रवाहाबरोबर विजेलाही इमारतीपर्यंत वाहून नेतात. त्यामुळे विद्युत उपकरणांचे आणि इमारतींचेही नुकसान होते.

संरक्षणात्मक व प्रतिबंधात्मक उपाय : आकाशात ढगांचा गडगडाट चालू असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. शेतात काम करत असलेल्यांनी तत्काळ गोठा अन्यथा शेतघरात जाऊन स्वत:ला सुरक्षित करावे; झाडाखाली थांबू नये. जनावरे झाडाखाली बांधू नये; त्यांना गोठ्यातच बांधावे. झाडापासून त्याच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर उभे राहावे. जवळ कुठलीही धातूची वस्तू बाळगू नये. जसे., छत्री, चाबूक इत्यादी. शक्य असल्यास घरातील सर्व विद्युत उपकरणे बंद ठेवावेत; दारे, खिडक्याही बंद ठेवाव्यात. मोकळ्या मैदानात असल्यास खाली बसून दोन्ही गुडघ्यात मान घालून दोन्ही हात कानावर धरावेत.

विजेच्या झटक्याने मनुष्यास व इतर प्राण्यांस मृत्यू येणे संभवनीय असते; परंतु सौम्य स्वरूपाचा आघात झालेल्या व्यक्तीस कृत्रिम श्वासोच्छ्‌वासादी प्रथमोपचारांनी सावध करता येते. विजेचा झटका लागलेल्या व्यक्तीस स्पर्श करणे धोक्याचे आहे, असा जो समज आहे, तो चुकीचा आहे. झटक्यामुळे मनुष्य भाजला जातो व त्याला विजेचा धक्का बसतो आणि तो बेशुद्ध पडतो; परंतु त्याच्या अंगात विद्युत संचय होत नाही. शिवाय प्रचंड दाबामुळे तडिताघात झाल्यास इमारतीला धक्का पोहोचतो, म्हणून तडित् निवारक साधने वापरून अशा इमारतींचे संरक्षण करावे लागते.

केंद्र शासनाच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने वीजप्रवण भागात पूर्वसूचना देता यावी यासाठी ‘दामिनी’ नावाचे एक भ्रमणध्वनी उपयोजक (Mobile App) बनवले आहे.

संदर्भ :

  • Malan, D. J. Physics of Lightning, London, 1963.
  • Riehl, H. Tropical Meteorology, New York, 1954.
  • Uman, M. A.; Rakov, V. A. Lightning : Physics and Effects, New York, 2003.

समीक्षक : सतीश पाटील