पुनरावृत्ती करता येण्यासारखी, सुसंगतपणे अध्ययन घटकांचे वर्णन करण्याची पद्धती म्हणजे, क्रमान्वित अध्ययन होय. कबुतराला अन्न मिळविण्यासाठी चोच मारण्याची सवय असते. अन्न असले किंवा नसले, तरी तो चोच मारतो; कारण तो विशिष्ट ठिकाणी चोच मारली की, अन्न मिळते, हे अभिसंधित प्रतिक्रियेतून तो शिकला. यातूनच क्रमान्वित अध्ययनाचा उदय झाला, असे बी. एफ. स्किनर यांनी प्रयोगाद्वारे मांडले. क्रमान्वित अध्ययन पद्धतीमुळे प्रत्येक विद्यार्थामध्ये मोजता येण्यासारखा बदल घडवून आणता येतो. ही संकल्पना स्किनर यांच्या ‘साधक अभिसंधान’ (ऑपरंट कंडिशनिंग) या वर्तनवादी उपपत्तीवर आधारलेली आहे. अध्ययनार्थीच्या उद्दीपकाला (चेतकाला) अपेक्षित प्रतिसाद शिकविला जातो. यात अध्ययनार्थीच्या ‘साधक प्रतिक्रिया’ अध्ययन प्रक्रियेतील महत्त्वाच्या प्रतिक्रिया ठरतात. साधक प्रतिक्रिया बिनचूक असेल, तर ती पुन्हा पुन्हा करावीशी वाटून शिकली जाते. ती चुकीची असेल, तर क्रियेचा लोप होतो. स्किनर यांनी अध्ययन प्रक्रियेचा मांडलेला नियम साधक प्रतिक्रिया घडून आल्यानंतर उद्दीपक प्रतिसाद देणार असेल, तर साधक प्रतिक्रिया व उद्दीपक या दोहोंतील संबंध अधिक दृढ होतो.

क्रमान्वित अध्ययन ही उपपत्ती शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. अध्ययन प्रक्रिया घडून येण्यासाठी अध्ययनाला उद्दिष्ट व प्रेरणा असली पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये दृढीकरणाच्या साहाय्याने अपेक्षित प्रतिसाद प्रस्थापित करून सुरुवातीच्या काळात त्याच्या लहान लहान कृतींचीही प्रशंसा केल्यास विद्यार्थाला अभ्यासात आवड व आत्मविश्वास निर्माण होतो. सरावामुळे अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढते. अध्ययन प्रक्रियेत आवश्यक ज्ञान व कौशल्यांचा सराव द्यावा. अध्ययनाला प्रेरणेची गरज असते. विद्यार्थाला नवीन ज्ञान व कौशल्य मिळविण्याची तीव्र इच्छा असेल, तरच तो अध्ययनाला प्रवृत होतो.

वैशिष्टे :

  • या संकल्पनेत आशयाचे छोटे छोटे टप्पे किंवा लहान लहान ज्ञानकणांत विभागणी करून चौकट निर्माण केली जाते.
  • चौकटीतील माहिती जास्तीत जास्त ३० शब्दांत दिली जाते, त्याखाली चौकटीत विधान/प्रश्न असतात.
  • विद्यार्थ्याने चौकट वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नावर तात्काळ कृतीयुक्त प्रतिसाद देणे अपेक्षित आहे, त्यामुळे विद्यार्थी क्रियाशील राहतो.
  • येथे प्रश्नाच्या अचूक उत्तरावर तात्काळ प्रत्याभरणाची सुविधा असते.
  • उत्तर बरोबर आल्यास विद्यार्थाला आनंद मिळतो आणी त्याला पुढील चौकटीतील आशय वाचून प्रश्न सोडविण्याची प्रेरणा मिळते इत्यादी.

प्रकार : क्रमान्वित अध्ययन चौकटीची एकूण चार प्रकारांमध्ये मांडणी केली जाते.

(१) परिचयात्मक चौकट : या चौकटीत विद्यार्थ्यांचे सुरुवातीचे वर्तन आणि अंतिम वर्तन यांच्या वर्तनाशी सांगड घातली जाते.

(२) अध्ययन चौकट : या चौकटीत विद्यार्थ्यांनी नवीन ज्ञानाचे अध्ययन करणे अपेक्षित असते.

(३) सराव चौकट : अध्ययन चौकटीमध्ये जे नवीन ज्ञान/वर्तन प्राप्त केले आहे, त्याचे सराव करण्याचे मुख्य कार्य या चौकटीमध्ये केले जाते.

(४) तपासणी चौकट : या चौकटीत विद्यार्थी काय शिकला, यावर भर असते. ही चौकट विद्यार्थ्यांच्या अंतिम निष्पत्तीशी संबंधित असते.

क्रमान्वित अध्ययनात वैयक्तिक गतीला पूर्ण वाव दिलेला असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आपल्या गतीने व कुवतीप्रमाणे अध्ययन करू शकतो. विद्यार्थाने क्रमपाठ पूर्ण सोडविल्यानंतर त्याला आशय घटक चांगल्या प्रकारे समजला आहे किंवा नाही याचा पडताळा पाहण्यासाठी अंतिम कसोटी दिली जाते. या कसोटीतील शेकडा ९० प्रश्नांची उत्तरे शेकडा ९०% विद्यार्थांना बरोबर देता आल्यास तो क्रमपाठ योग्य आहे, असे मानले जाते.

क्रमान्वित पाठाचे प्रकार :

  • एकमार्गी (रेखात्मक) पाठ : या क्रमपाठात आशयाचे छोट्या छोट्या घटकांत तार्किक पद्धतीने विभाजन करून विद्यार्थ्यांच्या त्रुटी कमी होईपर्यंत त्यांची पुनरावृत्ती केली जाते. विद्यार्थ्यांकडून तात्काळ प्रतिसाद घेतला जातो. त्यानंतर अचूक उत्तराचे तात्काळ सादरीकरण केले जाते. प्रत्येक विद्यार्थी स्वत:च्या गतीने शिकू शकतो. एकमार्गी क्रमपाठात एका चौकटीत एकच कल्पना/चेतक मांडला जातो. यात विविध अध्ययन कृतींची साखळी असते. प्रत्येक शिकणाऱ्या व्यक्तीच्या कमीत कमी चुका व्हाव्यात आणि जास्तीत जास्त यश प्राप्ती व्हावी अशी अपेक्षा असते. ते आकृतीरूपाने दर्शविले आहे.
  • बहुमार्गी पाठ : बहुमार्गी कार्यक्रम किंवा क्रमपाठ चौकटीत एकमार्गी क्रमपाठापेक्षा जास्त माहिती देऊन बहुपर्यायी प्रश्न विचारलेला असतो. शिकणाऱ्याने अचूक पर्यायाची निवड केल्यास त्याला दुसऱ्या माहिती चौकटीकडे जाण्याची सूचना मिळते. विद्यार्थाने चुकीचा पर्याय निवडल्यास त्याला पुस्तकातील विशिष्ट पानाकडे किंवा इतर चौकटीकडे जाण्यास सांगितले जाते. त्यापानावर क्रमपाठ उत्तर चुकीचे कसे आहे, हे थोडक्यात सूचित करून त्याला पुन्हा एकदा पहिल्या समस्येचे योग्य उत्तर देण्याची सूचना मिळते. या प्रकारात बरोबर व चूक उत्तरांचे स्पष्टीकरण दिलेले असते.
  • अवरोही (मॅथेटिक) पाठ : अवरोही कार्यक्रमात ज्या कृतीमुळे शिकाऊ व्यक्ती अधिकाधिक प्रेरित होईल ती कृती प्रथम केली जाते. म्हणजेच गृहितकाकडून साध्याकडे जाण्याऐवजी साध्याकडून गृहितकाकडे जाण्याची उलटी कृती केली जाते. या कार्यक्रमात शेवटच्या कृतीपासून सुरुवात करून त्याच्या अलीकडे असलेल्या कृती क्रमाक्रमाने करीत अखेरीस पहिली कृती केली जाते. ज्यात प्रशिक्षण संक्रमण (ट्रान्सफर ऑफ ट्रेनिंग) महत्त्वाचे असते. अध्ययन कौशल्यांच्या अध्यापनात हे उपयुक्त ठरते.

एगरूल कार्यक्रमाची मांडणी अगोदर उदाहरणे नंतर नियम म्हणजेच उद्गामी व अवगामी अशा पद्धतीने केलेली असते, तर रुलाएग कार्यक्रमाची मांडणी नियम व उदाहरणे अशी केलेली असते.

क्रमान्वित अध्यापनात शिक्षकाच्या मदतीशिवाय विद्यार्थी क्रमपाठाच्या साहाय्याने व स्वत:च्या प्रयत्नाने शिकतो. तो स्वयंअध्ययनाने शिकल्यामुळे अध्ययन दीर्घकाळ टिकते. चौकटीतील प्रश्नाला दिलेले उत्तर चूक की, बरोबर हे तात्काळ प्रत्याभरण मिळल्यामुळे अध्ययन प्रक्रियेतील उत्साह वाढतो आणि पुढील अध्ययनाला प्रेरणा मिळते. क्रमपाठातील घटकांची सुसूत्र मांडणी प्रश्नोत्तरांची क्रमवार मांडणी आणि तात्काळ पडताळा यांमुळे विद्यार्थ्यांना सुसंगत विचारांची सवय लागते. विविध कारणांमुळे विद्यार्थी शाळेत अनुपस्थित असल्यास क्रमपाठाच्या साहाय्याने घरच्या घरी अभ्यास भरून काढता येतो.

स्किनर यांनी वर्तनवादी दृष्टीकोनातून अध्ययन प्रक्रियेची मीमांसा केली. अध्य्ययनार्थीच्या साधक प्रतिक्रिया याच अध्ययन प्रक्रियेतील महत्त्वाच्या प्रतिक्रिया ठरतात. साधक प्रतिक्रिया अचूक असेल, तर तिचे दृढीकरण होऊन ती शिकली जाते. याउलट, ती चुकीची असेल, तर क्रियेचा लोप होतो. स्किनर यांच्या प्रयोगातील अध्ययनाची पार्श्वभूमी नैसर्गिक स्वरूपाची होती. त्यांच्या उपपत्तीवर आधारित क्रमान्वित अध्ययन संकल्पना उदयास आली. त्यातूनच अध्ययन प्रक्रियेचा ‘साधक प्रतिक्रिया घडून आल्यानंतर उद्दीपक बळावणार असेल, तर साधक प्रतिक्रिया व उद्दीपक या दोहोंतील संबंध अधिक दृढ होतो’, असा नियम तयार झाला. क्रमान्वित अध्ययन पद्धती ही वर्तनवादी आहे. यात आशयाचे आकलन आणि मर्मदृष्टीचा विचार केलेला नसतो.

क्रमान्वित अध्ययनात सूचना स्वयंस्पष्ट पद्धतीने मांडलेल्या असतात, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक भेदांवर नियंत्रण केले जाते, विद्यार्थ्यांनी केलेल्या आशयाबाबत त्यांना प्रबलीकरण दिले जाते, कृतिशील अध्ययन परिस्थिती पुरवली जाते, आशयाची व संरचनेची मांडणी तार्किक पद्धतीने केली जाते, कठीण संकल्पना परिणामकारक रीत्या शिकविल्या जातात.

क्रमान्वित अध्ययन पद्धतीमुळे प्रश्न विचारण्याच्या अचूकतेत वाढ होते, प्रश्न विचारण्यात नेमकेपणा येतो आणि विद्यार्थ्यांना अध्ययनाबाबत प्रत्याभरण दिले जाते; मात्र क्रमान्वित अध्ययन चाकोरीबद्ध असल्याने मुक्त विचार प्रक्रियेला चालना मिळत नाही.

संदर्भ :

  • कुलकर्णी, श. शं.; कामत, व. ब., शैक्षणिक तंत्रविज्ञान, मुंबई, १९९४.
  • जगताप, ह. ना., प्रगत शैक्षणिक तंत्रविज्ञान, पुणे, १९९४.
  • पारसनीस, न. रा., प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र, पुणे, २००९.

समीक्षक : अनंत जोशी