धातुशास्त्रातील ओतकाम करून तयार केलेल्या उपयुक्त भागांमध्ये बरेचदा वेगवेगळ्या प्रकारचे दोष येत असल्यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या यंत्रामध्ये वापरता येत नाहीत. त्यासाठी ते दोष का आले याची कारणे शोधणे आवश्यक असते.

इ. स. १९५० – १९६० या काळात जुन्या प्रकारचे सूक्ष्मरचनादर्शक वापरात होते, त्यानंतर सुधारित सूक्ष्मरचनादर्शक बाजारात आलेत. त्यांच्या किंमती विचारात घेतल्यास ओतीव भागांची किंमत वाढू शकते आणि व्यवहारात नामांकित कंपनी अशा प्रकारचे उद्योजक त्या ओतीव भागांना नाकारू शकतात. त्याच प्रकारे भारतातील ओतकाम भाग आंतरराष्ट्रीय कंपनींना विकू शकत नाही, पण जगातील प्रसिद्ध कंपनी भारताकडे चांगल्या दर्जाच्या ओतीव भागांसाठीच पाहत आहेत. सध्या चीनकडून ओतीव भाग घेतले जात आहेत, तरी आता भारताने चीनला मागे टाकून पुढे जाणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी नवीन माध्यमे वापरून ओतीव भागांचा दर्जा राखणे हाच प्रयत्न असला पाहिजे.

आकृती क्र. १. ओतीव भागात दोन्ही भाग एकसारखे नाहीत, त्यामुळे त्यात योग्य त्रिज्या दिली. तेथे आकुंचन दोष येऊ शकत नाही. अथवा तेथे गरम अवस्थेत तडे जात नाहीत.

ओतीव भागातील दोष शोधून काढण्याच्या पद्धती : १) दोष कोणता आहे ते ठरविणे, २) दोष कसा तयार होतो याचा अभ्यास करणे, ३) सूक्ष्मरचनादर्शक योग्य प्रकारे वापरणे, ४) सूक्ष्मदर्शकी पद्धतीचा वापर करणे, ५) धातूच्या लहान तुकड्याचे चांगले घासकाम करणे, ६) गुळगुळीत तुकड्यावर रासायनिक प्रक्रिया करणे, ७) त्यानंतर ओतकामाच्या पद्धतीमध्ये योग्य तो बदल करणे.

आ. २. ओतीव भागातील बाहेरच्या बाजूंवरील आकुंचनाचे काही प्रकार

ओतीव भागात नेहमी आढळणारे दोष : १) सर्व प्रकारचे आकुंचन दोष, २) धातूमधील मळी ओतीव भागात अडकून बसणे, ३) वाळूचे कण ओतीव भागात अडकून बसणे, ४) धातूमधील मळी व वाळूचे कण एकत्र ओतीव भागात येणे, ५) वाळूचे कण व आकुंचन एकत्र असणे, ६) ओतीव भागात बारीक किंवा मोठ्या पोकळ्या येणे, ७) ओतीव भाग थंड होताना त्यात तडे तयार होणे, ८) ओतीव भागावर धातूचा फुगीर भाग तयार होणे, ९) ओतकाम करताना धातू सर्वत्र न पोहचणे, १०) वाळूच्या कणांचे प्रसरण झाल्यामुळे ओतीव भागांवर दोष येणे.

धातूचे आकुंचन : हा दोष सर्व प्रकारच्या ओतकामामध्ये आढळून येतो. दोषांचे प्रकार पुढीलप्रमाणे : १) ओतीव भागातील बाहेरच्या बाजूवरील आकुंचन, २) ओतीव भागातील अंतर्गत अथवा बाहेरून न दिसणारे आकुंचन, ३) ओतीव भागातील कोपऱ्यातील आकुंचन, ४) ओतीव भागातील आकाराने बदलत्या बाजूंमुळे येणारे आकुंचन, ५) ओतीव भागातील मोठ्या आकाराने अवघड जागी असणे, ६) ओतीव भागातील गाभ्याजवळ येणारे आकुंचन, ७) ओतीव भागातील मध्यजागी लांबट आकुंचन येणे.

आ. ३. ओतीव भागातील अंतर्गत अथवा बाहेरून न दिसणारे आकुंचनाचे काही प्रकार.

आकृती १ मध्ये दाखविल्याप्रमाणे वाळूच्या साचात द्रव धातू ओतल्यानंतर धातू बाहेरच्या भागापासून थंड होऊ लागते. नंतर ती आत थंड होऊ लागते आणि मग धातूतील आकुंचन सुरू होते व ते भरून काढणे हे अतिशय महत्त्वाचे असते. अन्यथा ओतीव भागात आकुंचन दोष तयार होतो.

आ. २. ओतीव भागातील बाहेरच्या बाजूंवरील आकुंचनाचे काही प्रकार : ओतीव भागातील आकुंचन दोषाविषयी महत्त्वाची बाब म्हणजे फक्त आकुंचनातच स्फटिकरचना दिसते, इतर कोणत्याही दोषांत अशी स्फटीक रचना दिसत नाही. हेच आकुंचन दोषाचे उत्तम प्रकारे ओळखण्याचे साधन आहे.

आ. ३. ओतीव भागातील अंतर्गत अथवा बाहेरून दिसणारे आकुंचनाचे काही प्रकार : (अ) प्रत्यक्ष उदाहरणात दोष यांत्रिक क्रिया केल्यावर दिसतो, (आ). १) कोपऱ्यातील आकारातील तीन प्रकार, २) कोपऱ्यातील आकारामुळे येणारा गरम तडा, (इ) प्रत्यक्ष आकुंचन दोष, (ई) ओतीव भागातील अवघड जागी मोठ्या आकारामुळे आकुंचन दोष, (उ) ओतीव भागातील मध्यभागी येणारे लांबट आकुंचन.

 

समीक्षक : प्रवीण देशपांडे