द्युनां, जीन हेन्री : (८ मे १८२८ – ३० ऑक्टोबर १९१०) जीन हेन्री द्युनां यांचा जन्म स्वित्झर्लंडमधील  जिनिव्हा येथे झाला. त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण होतानाच द्युनां यांनी आपली सामाजिक कामाची आवड ओळखली. जिनिव्हा सोसायटी फॉर आम्स गिव्हिंग या धार्मिक अधिष्ठान असणाऱ्या संघटनेसाठी काम करायला त्यांनी सुरुवात केली. समविचारी तरूण मंडळीना एकत्र करून कारागृहात जाऊन कैद्यांना भेटणे आणि अशाच प्रकारची अन्य सामाजिक कामे ते करू लागले. सामाजिक कामांच्या नादात अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्याने वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांना कॉलेज शिक्षण अर्धवट सोडावे लागले. अर्थनियोजन, विनिमय, कर्जपुरवठा करणाऱ्या एका कंपनीत उमेदवारी करून तेथेच ते नोकरी करू लागले.

व्यवसायानिमित्त द्युनां एकदा दौऱ्यावर गेले होते. तेव्हा त्यांनी इटालीतील सोलफेरीनोच्या युद्धात झालेला नरसंहार आणि त्याचे भयंकर  दुष्परिणाम पाहिले. केवळ काही तासांच्या अवधीत इटालीतील लोम्बार्डीजवळ सव्वा लाख ऑस्ट्रियन सैन्यापैकी चौदा हजार जवान कामी आले होते. शत्रूपक्षाचे पंधरा हजार फ्रेंच सैनिकही दगावले.  मेलेल्यांपेक्षा जास्त संख्या गंभीर जखमी झालेल्या, युद्धकैदी म्हणून पकडले गेलेल्या वा बेपत्ता झालेल्या सैनिकांची होती. मृत, घायाळ आणि तीव्र यातना भोगणारे लोक पाहून हेन्री द्युनां हळहळले आणि त्याना अशा पीडितांसाठी रेड क्रॉस संघटना स्थापन करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. गंभीर जखमा झालेल्या आणि युद्धभूमीवर कोणतीही मदत उपलब्ध नसणाऱ्या सैनिकांचे हाल पाहून द्युनां स्वतः त्यांच्या मदतीला पुढे आले. ते प्रामाणिकपणे मानवतेचे काम करत आहेत हे पाहून त्यांना स्थानिकांचे भरघोस सहाय्यही मिळाले. द्युनां यांनी तंबू उभारून तात्पुरती, कामचलाऊ रुग्णालये सुरू केली. युवती आणि महिलांना स्वयंसेवक म्हणून घेऊन द्युनां यांनी युद्धात जखमी झालेल्या आणि आजारी सैनिकांना आरोग्यसेवा पुरवली. आपण सारे बांधव आहोत असे घोषवाक्य वापरून फ्रेंच सरकारला, त्यांनी पकडलेल्या ऑस्ट्रियन डॉक्टर कैद्यांना मुक्त करायला उत्तेजन दिले.

जिनिव्हाला परतल्यावर त्यांनी स्वतः रणभूमीवर प्रत्यक्ष बघितलेल्या सैनिकांच्या निरीक्षणांवर, दु:खद अनुभवांवर आधारित मेमरीज ऑफ सोलफेरीनो नामक एक पुस्तक लिहून प्रकाशित केले. त्याच्या प्रती संपर्कातील राजकीय आणि युद्धशास्त्र क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींना दिल्या. युद्धग्रस्तांना नि:पक्षपणे मदत करणारी संस्था असावी या विचाराकडे त्यांचे मन वळवले. द्युनां यांनी काही लष्करप्रमुख व डॉक्टर यांची एक बैठक घेतली. पुढे १८६३ मध्येच त्यांना जिनिव्हा सोसायटी फॉर पब्लिक वेल्फेअरने इंटरनॅशनल कमिटी फॉर द रिलिफ ऑफ द वुन्डेड स्थापण्यास मदत केली. १८७५ मध्ये तीच संस्था आणखी व्यापक कार्यासाठी इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस नाव घेऊन कार्यान्वित झाली आणि नावारूपाला आली.

सन १८६४ साली युद्धात जखमी झालेल्या कोणत्याही राष्ट्राच्या सैनिकांना, मानवतेच्या दृष्टीकोनातून वैद्यकीय मदत पुरवण्याचा आंतरराष्ट्रीय जिनिव्हा युद्ध प्रस्ताव रूपातून प्रत्यक्ष रूपात आला. हेन्री द्युनां यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच हे घडले. कालांतराने थोडेफार बदल होत, अनेक प्रमुख देशांनी आंतरराष्ट्रीय जिनिव्हा युद्ध करार संमत केला. देश, धर्म, वंश, भाषा, राजकीय मते अशा कोणत्याही बाबींचा विचार न होता जखमी, आजारी सैनिकांना उपचार, शुश्रुषा मिळू लागली.

या सेवा संकल्पनेचा आणखी विस्तार होऊन पुढे वादळे, पूर, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी ही रेड क्रॉसची मदत मिळू लागली. द्युनां यांच्या प्रयत्नांमुळे जखमी सैनिकांप्रमाणेच रेड क्रॉसचे कार्यकर्ते, स्वयंसेवक यांना कोणत्याही लष्करी हल्ल्यापासून संरक्षण मिळाले. एवढेच नाही तर रेड क्रॉसच्या लोकांबरोबरची अन्न, औषधे, तंबू, कपडालत्ता अशी रेड क्रॉस हे लाल फुल्लीचे चिन्ह धारण करणारी सामग्रीही लष्करी हल्ल्यापासून संरक्षित राहतील असे द्युनां यांनी पाहिले.

द्युनां यांनी YMCA (यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन), या संस्थेची शाखा जिनिव्हात स्थापन केली.

सन १९०१ सालचे शांततेचे नोबेल पारितोषिक, फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ, फ्रेडरिक पॅसी यांच्या बरोबर द्युनां यांना विभागून देण्यात आले. नोबेल पारितोषिकातील स्वतःचा अर्धा वाटा ही तशी आकर्षक मोठी रक्कम होती. पण द्युनां यांनी त्यातील एक डॉलरही स्वतःसाठी वापरला नाही, पूर्ण निधी जनकल्याणासाठी खर्च केला. ते पूर्वीप्रमाणेच साधे जीवन जगत राहिले.

जर्मनीतील युनिव्हर्सिटी ऑफ हायडेलबर्गने द्युनां यांना मानद डॉक्टरेट दिली. पुढे भारतात रेड क्रॉस सोसायटीची स्थापना झाली. सध्या तिच्या सर्वदूर पसरलेल्या अकराशे शाखा भारतभर कार्यरत आहेत.

द्युनां हायडन, स्वित्झर्लंड येथे निधन पावले. दरवर्षी जगभर ८ मे हा त्यांचा जन्मदिवस रेड क्रॉस दिवस आणि त्यांच्या महान आणि निस्वार्थी सेवाकार्याची आठवण जागृत ठेवण्यासाठी पाळला जातो.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा