ब्रेल, लुई (४ जून, १८०९ ते ६ जानेवारी, १८५२) लुई ब्रेल यांचा जन्म फ्रान्समध्ये पॅरिस शहराच्या पूर्वेस असलेल्या कूप्व्रे या गावी झाला. लुईच्या वडिलांकडे चामड्याच्या व्यवसायाला लागणाऱ्या हत्यारांची एक पेटी होती. पेटीतील काही हत्यारे अणकुचीदार होती. वडलांनी पेटीतील हत्यारांना हात लावायचा नाही. अशी ताकीद दिली होती. तरी बाल लुईने एकदा ते ऐकले नाही. पेटीतील पुस्तक-बांधणीत टोचा वापरतात तसे मूठवाले, लांब दाभणासारखे एक हत्यार घेतले ते लुई यांच्या हातातून निसटले आणि उजव्या डोळ्यात शिरले. दुर्दैवाने नंतर झालेला जंतुसंसर्ग लुईच्या डाव्या डोळ्यातही पोहोचला. दुर्लक्ष झाल्याने आणखी काही महिन्यांनी तो डोळाही निकामी झाला. परिणामी लुई यांना पूर्ण अंधत्व आले. त्यावेळी लुई ब्रेल यांचे वय फक्त तीन वर्षे होते आणि एवढ्या कोवळ्या वयात ते दोन्ही डोळ्यांनी कायमचे अंध झाले होते.

दृष्टी गमावली असली तरी वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी शाळेत प्रवेश घेतला. संगीत क्षेत्रात, विशेषतः पियानो वादनात तर त्यांनी प्रगती केली. स्वतःच्या छोट्या गावात वा जवळपास अंधशाळा नव्हती. त्यामुळे लुई दोन वर्षे सामान्य मुलांच्या शाळेत शिकले. नंतर एका धर्मोपदेशकांनी शिष्यवृत्ती मिळवायला लुई यांना मदत केली. तिचा लाभ घेऊन लुई ब्रेल पॅरिस येथील नॅशनल स्कूल फॉर द ब्लाईंड या शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश घेऊ शकले. तेव्हा ते साधारण दहा वर्षांचे होते.

लुई शाळकरी विद्यार्थी असण्यापूर्वीच्या काळात हस्ताक्षरकला विषयाचे तज्ज्ञ फ्रेंच प्राध्यापक, व्हेलेंटीन हॉय यांनी अंध लोकाना वाचता यावे म्हणून एक नवी पद्धत शोधून काढली होती. डोळस लोकांसाठीच्या नेहमीच्या वापरातील रोमन लिपीतील फ्रेंच अक्षरे, जाड कागदावर दाबून, उठावदार करून दृष्टीहीन लोकाना ती बोटाच्या हलक्या स्पर्शाने वाचता यावीत असा हॉय यांनी प्रयत्न केला होता. सुधारित पद्धत आल्यावर उठावदार (एम्बॉस्ड) अक्षरांच्या मदतीने वाचणे लुप्तच झाले. विल्ल्यम मून यांनी शोधलेली उठावदार अक्षरांची एकमेव वाचन पद्धत, अजून वयस्कर यूरोपीय नागरिकांत प्रचलित आहे.

पुढील काळात चार्ल्स बार्बिय दे ला सेरे यांनी अंधांसाठीच्या वाचन पद्धतीत आणखी सुधारणा केल्या. चार्ल्स बार्बिय हे कॅप्टन पदावरील लष्करी अधिकारी होते. युद्धभूमीवर रात्री किंवा पुरेसा उजेड नसलेल्या जागी असताना सैनिक लिहिण्यावाचण्याची गरज म्हणून बारीक दिवा लावत. वरीष्ठांकडून आलेले हुकूम वाचणे, नकाशे पाहणे, घरच्या मंडळींसाठी चिठ्ठ्या लिहिणे यासाठी थोडातरी उजेड हवा असे. अशावेळी शत्रूसैनिक प्रकाशाच्या रोखाने गोळीबार करून अशा सैनिकाना टिपून ठार करत. हे पाहून व्यथित झालेल्या कॅप्टन बार्बिय यांनी सैनिकाना गुप्त संदेश पाठवण्यास थोडीफार उपयोगी पडेल अशी पद्धत शोधून काढली. ‘नाईट रायटिंग’ हे या स्पर्शलिपीचे नाव होते. ती वापरणारा जाड कागदावर बोटाना उठाव जाणवेल अशा प्रकारे ठिपके आणि रेषा उमटवीत असे. काळोखातही सैनिक तो सांकेतिक भाषेतील मजकूर स्पर्शाने वाचू शकत. बोलणे आणि दिवा लावणे याची गरज नसे.

हीच युध्द-सांकेतिक पद्धती बार्बिय यांनी अंध मुलांसाठी वापरण्याचे ठरवले. अंध मुलाने संदेश वाचण्यासाठी बोटाची टोके त्या ठिपक्यांवरून अलगद फिरवायची. स्पर्शाने अक्षरे आणि शब्द जाणून घ्यायचे ही अपेक्षा होती. थोडे प्रशिक्षण आणि सराव मिळताच सैनिकांसारखीच अंध मुलानाही ती अक्षरे वाचता येऊ लागली.

ब्रेल यांनी या पद्धतीत सुधारणा करून नवी पद्धत शोधून काढली. चार्ल्स बार्बिय यांची पद्धत ते झपाट्याने शिकले. ही पद्धत आणखी उपयुक्त कशी करता येईल याचा ते सतत विचार करू लागले. ब्रेल केवळ पंधरा वर्षाचे असताना त्यांनी एक छोटेखानी, अंधानाही सहज वापरता येईल असे उपकरण तयार केले. अशा उपकरणाच्या सहाय्याने एक विशिष्ट प्रकारची मांडणी म्हणजे एक नवे अक्षर ठरवणे, ओळखणे त्यांना जमले. या ब्रेल लिपीतील सर्व म्हणजे एकंदर त्रेसष्ट अक्षरे, अंक, विरामचिन्हे – सहा उठावदार बिंदूरूप ठिपक्यांच्या आकृतीबंधात त्यांनी  बसवली. या प्रकल्पात त्यांना त्यांच्या वर्गमित्रांनी नवलिपी वाचण्याच्या प्रयोगात सहभागी होऊन सतत सूचना करून, लिपी घडवण्यात, सक्रीय मदत केली. ब्रेल यांनी बार्बिय यांच्या सैनिकी लिपीतील बारा ठिपक्यांची संख्या सहा एवढी घटवली. ब्रेल यांच्या वर्गमित्रांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना बार्बिय यांच्या पद्धतीपेक्षा ब्रेल लिपी सरस असल्याचे पटवून दिले.

पुढे ब्रेल यांनी त्याच शाळेत अंध मुलांचा शिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली. स्वतःच्या पद्धतीचा वापर आणि पद्धतीत परिपूर्णता कशी आणता येईल याचा विचार आणि प्रयत्न त्यांनी चालू ठेवले. ब्रेल यांनी या पद्धतीचे वर्णन करणारे एक पुस्तक लिहून प्रकाशित  केले. नंतर ब्रेल यांनी या पद्धतीने टंकलेखन केलेले शालेय अभ्यासक्रमातील इतिहास विषयाचे एक पुस्तक तीन खंडांत प्रकाशित केले. ब्रेल यांनी विकसित केलेली पद्धती त्यांच्या बरोबर शिकणाऱ्या अंध मुलांना समजायला आणि वापरायला सोपी वाटली. त्यामुळे हे सारे विद्यार्थी ब्रेल यांची पद्धत वापरू लागले. परंतु ब्रेल पद्धतीला सरकारी अधिकृत मान्यता मिळायला खूपच विलंब झाला. ब्रेल यांच्या निधनानंतर दोन वर्षानी पॅरिसमधील शाळांनी ही पद्धत स्वीकारली. पिअर फुकॉल्ट या यंत्रस्नेही मित्राने ब्रेल यांना त्यांच्या टंकलेखन पद्धतीत अचूकता आणि सुलभता आणण्यात आणि ब्रेल टंकलेखक साकार करण्यात मदत केली. फ्रेंच सरकारने ब्रेल यांच्या शाळेला दिलेल्या अर्थ सहाय्यातून पुढे शाळेची नवी इमारत उभी राहिली. तिच्या उद्घाटन समारंभांला आलेल्या लोकांसमोर अंधमुले ब्रेल यांच्या पद्धतीने खरोखरच लिहू वाचू शकतात याचे नमुनेदार प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. एका प्रेक्षकाने त्याने त्याक्षणी निवडलेली एक छोटी कविता म्हणून दाखव अशी विनंती एका लहान अंध मुलीला केली. त्या अंध मुलीने ती ब्रेल पद्धतीने लिहिली. तेथे हजर नसलेल्या अन्य एका अंध मुलीला पहिल्या अंध मुलीने ब्रेल लिपीमध्ये लिहिलेली कविता बोटांच्या स्पर्शाने वाचून दाखव असे सांगितले. तिने ती कविता अचूक वाचली. यानंतर प्रेक्षकांची पूर्ण खात्री पटली की अंधांसाठी ब्रेल पद्धती उपयोगाची आहे.

सन १८५७ च्या सुमारास अमेरिकेत आणि कालांतराने संपूर्ण जगभर ही पद्धत थोड्याफार सुधारणांसह मान्यता पावली. परिणामी लाखो अंध लोकाना ब्रेल यांच्या बुद्धिमत्तेचा आणि अथक प्रयत्नांचा फायदा मिळाला. छापील शब्दांचे नवे विश्वच दृष्टिहीन लोकासाठी खुले झाले. ब्रेलमध्ये उपलब्ध होत असलेल्या ग्रंथसंपदेचा संग्रह हळूहळू किती विस्तारला याची कल्पना यावी म्हणून एक उदाहरण पहा. १९६१ साली प्रख्यात वर्ल्डबुक एन्सायक्लोपिडियाचे संच ब्रेलमध्ये प्रकाशित झाले. अशा एका ब्रेल संचात १४५ खंड होते आणि एवढ्या ग्रंथांचे वजन होते सुमारे ३२० किलो. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, तत्वज्ञान, संगीत, गणित, इतिहास, व्यापार, कायदा, गुन्हेशास्त्र, वैद्यक अशा विविध ज्ञानक्षेत्रांचा त्यात समावेश होता.

लवकरच अंधशिक्षण तज्ज्ञांच्या समन्वयाने जगातील सर्व महत्त्वाच्या भाषांसाठी ब्रेल लिपीचा वापर होऊ लागला. भारतातील चौदा मुख्य भाषांतील साहित्य ब्रेल लिपीत – देवनागरी ब्रेलमध्येही मिळू लागले.

जगभरच्या विद्वानांची, कलाकारांची, विचारवंतांची जी काही पुस्तके ब्रेल लिपीत उपलब्ध झाली आहेत ती वाचून अंधांचे जीवन समृद्ध झाले. त्यांच्या विचार आणि भावनाविश्वाचा विस्तार होत आहे. आताच्या डिजिटल युगातही लाखो अंध व्यक्ती दररोज ब्रेल लिपी वापरून पुस्तके, मासिके, पत्र वाचन करत आहेत. इमारतींच्या उद्वहनात (लिफ्ट) मध्ये योग्य मजल्याची निवड करणे, उपाहारगृहात यादीतील खाद्यपदार्थ ब्रेल लिपीच्या सहाय्याने निवडणे अशा लहानसहान कामात अशा व्यक्ती अधिकाधिक आत्मनिर्भर होत आहेत.

ब्रेल यांची प्रकृती शेवटची पाच वर्षे खालावत गेली. स्वतःच्या मूळ गावी जाऊन विश्रांती घेतली की त्यांना बरे वाटे. प्रकृती साथ देत नसल्याने त्यांनी निवृत्त होण्याची परवानगी संचालकांकडे मागितले. परंतु गरीब विद्यार्थ्याना वाचन लेखन साहित्य घेण्यासाठी आणि अन्य गरजांसाठी मदत करणाऱ्या ब्रेल यांची आर्थिक स्थितीही नाजूक होती. हे माहीत असलेल्या संचालकांनी त्यांना निवृत्त होण्याची परवानगी नाकारली. ब्रेल यांना अध्यापकपदी कायम ठेवले आणि जमेल तेव्हा पियानोवादन शिकवत राहण्याची गळ घातली.

अंधांना ज्ञानदृष्टी देणाऱ्या ब्रेल यांचे क्षयरोगामुळे पॅरिस येथे वयाच्या अवघ्या त्रेचाळीसाव्या निधन झाले. त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांनी बालपण व्यतीत केले होते त्या घराचे रुपांतर एका वस्तुसंग्रहालयात केले गेले. ब्रेल यांच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनी ते वस्तुसंग्रहालय पॅरिसमधील लुई ब्रेल स्ट्रीटवर आणखी मोठ्या वास्तूत नेऊन त्यांच्या स्मृतीशी निगडीत सर्व वस्तू तेथे जपून ठेवल्या आहेत. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जागतिक पातळीवर लुई ब्रेल यांचा जन्मदिवस दरवर्षी चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस साजरा करावा असे आवाहन करण्यात आले. भारत सरकारनेही ब्रेल यांच्या सन्मानार्थ त्यांच्या जन्मशताब्दी वर्षी म्हणजे दोन रुपयांचे नाणे वापरात आणले. वॉशिग्टन डी सी येथील रूझवेल्ट मेमोरियलच्या भित्तिचित्रावर ब्रेल लिपीतील अक्षरे ब्राँझ शीटवर उमटवली आहेत. अंध व्यक्तीना रूझवेल्टची माहिती केवळ बोटांच्या सहाय्याने समजते.

संदर्भ :  

समीक्षक : मोहन मद्वाण्णा