सेवाक्षेत्र व उच्चतम तंत्रज्ञानावर आधारलेली एक उत्पादन व्यवस्था म्हणजे उत्तर-औद्योगिक अर्थव्यवस्था होय. डॅनियल बेल यांनी १९७० च्या दशकाच्या पूर्वार्धात ‘उत्तर-उद्योगवाद’ (पोस्ट-इंडस्ट्रिॲलिजम) ही संकल्पना मांडली. या संकल्पनेचा अर्थ ‘संगणकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने उभी राहिलेली माहिती आधारित अर्थव्यवस्था’ असा होता. औद्योगिक समाजातील उत्पादन जसे कारखान्यांमधील वस्तूंच्या निर्मितीवर भर देते, तसे उत्तर-औद्योगिक समाजातील उत्पादन संगणक आणि इतर विद्युतीय तंत्रांच्या माध्यमांतून निर्माण होणाऱ्या माहितीवर भर देते. हा समाज माहितीजन्य समाज, आंतरजालीय समाज, सायबर समाज आणि उत्तर-आधुनिक समाज म्हणूनही ओळखला जातो. याचे मुख्य कारण उत्तर-आधुनिकता, उत्तर-औद्योगिकता, आंतरजालीय समाज, माहितीजन्य समाज, जागतिकीकरण या सर्व सामाजिक अवस्थांमध्ये एक कार्यकारणभाव दिसून येतो.

औद्योगिक कामांपासून ते सेवा कामापर्यंतचे परिवर्तन हे उत्तर-औद्योगिक समाजाचे वैशिष्ट्य आहे. उत्तर-औद्योगिक समाजात प्रामुख्याने सेवाक्षेत्रांवरच अर्थव्यवस्था अवलंबून असते. आज अमेरिकेतील जवळ जवळ ७५% कामगार सेवाक्षेत्रांत कार्यरत आहेत. वाहतूक, आतिथ्य, पर्यटन, वित्त, आरोग्य, जाहिरात, शिक्षण, माहिती उद्योग, तसेच किरकोळ विक्री उद्योग इत्यादी महत्त्वाची सेवाक्षेत्रे आहेत. उत्तर-औद्योगिक समाजात माहिती उद्योगांचे प्रभुत्व असल्यामुळे व्यवसायांचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेलेले दिसते. अधिकाधिक श्रमिक माहितीवर किंवा माहिती संबंधित प्रक्रिया करणारे कारकून, व्यवस्थापक, अभियंते म्हणून काम करताना दिसतात. औद्योगिक समाजात व्यक्ती यांत्रिक कौशल्ये शिकण्यावर भर देते, तर उत्तर-औद्योगिक समाजात संगणकीय आणि संप्रेषण आधारित कौशल्ये शिकण्यावर असतो. कारखान्यात काम करणाऱ्या कामगार वर्गाला शारीरिक पातळ्यांवरची कौशल्ये अधिक उपयुक्त होती; परंतु उत्तर-औद्योगिक समाजामध्ये मानसिक, बौद्धिक, भाषिक व कलात्मक प्रकारची कौशल्ये असलेला कामगार अपेक्षित आहे. परिणामी, उत्तर-औद्योगिक समाजातील कामगार वर्गाचे रूपांतर शहरी-व्यावसायिक मध्यम वर्गात झालेले दिसते. उत्तर-औद्योगिक समाजामध्ये सामाजिक परिवर्तनासाठी ज्ञान/माहितीची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे ज्ञानी अभिजनांना (नॉलेज इलायटस) या समाजात अत्यंत उच्च स्थान असते.

उत्तर-औद्योगिक समाजात संप्रेषण तंत्रे, उत्पादनाची तंत्रे आणि व्यवस्थापनाची व्यवस्था यांच्यामध्ये प्रचंड प्रगती झाली आहे. ही प्रगती उत्पादन संकुले आणि बाजारपेठांशी संबंधित आहे. विविध कंपन्यांना जोडण्यासाठी अनेक आंतरजालांची निर्मिती व वाढ झाली आहे. याचा उपयोग विविध कारखान्यांना एकत्रितपणे उत्पादन विकसित करण्यासाठी किंवा एखाद्या विशिष्ट बाजारपेठेला सेवा पुरविण्यासाठी झाला. यातून बहुराष्ट्रीय कंपन्यांची महाकाय साम्राज्ये विकसित होण्यास मदत झाली. माहिती तंत्रज्ञानाचा जगभर झालेला विकास आणि प्रसार जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेला उत्तेजन देणारा ठरला. त्यामुळेच हा समाज माहितीजन्य समाज म्हणूनही ओळखला जातो. ज्या समाजामध्ये माहितीची निर्मिती, वितरण, वापर, एकत्रीकरण आणि हेरफेर करणे हे महत्त्वाचे आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्ये असतात, त्या समाजाला माहितीजन्य समाज म्हणतात. या समाजातील प्रमुख घटक अंकीय (डिजिटल) स्वरूपातील माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान हे असतात. उत्तर-औद्योगिक समाजाचे अतिशय महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या समाजातील सामाजिक विभाजन होय. या समाजात एका बाजूला तंत्रज्ञ, उद्योजक व शासकीय अधिकारी आणि दुसरीकडे कामगार, विद्यार्थी, उपभोक्त्यांचे असंख्य समूह आहेत. या समाजातील ही दुही खाजगी संपत्तीची मालकी किंवा नियंत्रण यांमुळे नसून माहितीच्या स्रोतांपर्यंत पोहोचण्याच्या संधींमधील विषमता यामुळे आहे. त्याच बरोबर ही दुफळी नव्या तंत्रांनी रोजगाराचे क्षेत्र पूर्ण बदलून टाकल्यामुळेही आहे. सुरक्षित, चांगल्या पगाराची नोकरी असणारे एकीकडे आणि असुरक्षित कामगार किंवा बेरोजगार दुसरीकडे अशी ही दरी आहे.

उत्तर-आधुनिक समाज ही उत्तर-औद्योगिक समाजाला पूरक अशी संज्ञा आहे. आधुनिकतेनंतर समाजाने जी आर्थिक व सांस्कृतिक अवस्था गाठली, तिला सर्वसाधारणपणे उत्तर-आधुनिकता म्हणून संबोधले जाते. जागतिकीकरण, समाज माध्यमांचे वाढते महत्त्व, खंडित जग, उपभोक्ता समाज, सांस्कृतिक वैविध्य आणि संकरित संस्कृती ही उत्तर-आधुनिकतेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. जागतिकीकरणामध्ये राष्ट्र-राज्याच्या सीमा ओलांडून माहिती आणि कल्पना, पैसा आणि मनुष्यबळाचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाहत आहे. जगातील विविध समाजांमधले, विविध पातळ्यांवरचे आंतरसंबंध वाढले आहेत. हे सर्व मोठ्या प्रमाणावरील माध्यम तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे शक्य झाले आहे. उत्तर-आधुनिक समाज एक खंडित समाज आहे, असे मत काही अभ्यासकांनी मांडले आहे. हा समाज अतिशय वेगवान बदल अनुभवतो आहे. कोणतीही स्थिर सामाजिक संरचना नसलेला, क्षणभंगुर, अनिश्चित, अधिक गुंतागुंतीचा आणि अत्यंत प्रवाही, विविध धोक्यांनी युक्त असा हा समाज आज अनेक देशांमध्ये दिसून येत आहे. उत्तर-आधुनिक समाजाचे वैशिष्ट्य त्याच्या सांस्कृतिक वैविध्यात आहे. नुसते वैविध्यच नाही, तर अनेक समाजाच्या विविध संस्कृतींची सरमिसळ झालेला हा समाज आहे. पोशाख, खाद्य पदार्थ, सणवार, भाषा या सर्वांची अनेक संकरित संमिश्र रूपे या नव्या प्रकारच्या समाजात दिसून येत आहेत. उत्तर-आधुनिक समाज हा उपभोक्ता समाज म्हणूनसुद्धा ओळखला जातो. येथे कामापेक्षा उपभोगामुळे व्यक्तीची ओळख बनते. या समाजात वस्तूंचा उपभोग आणि पुरसतीच्या वेळचे कार्यकलाप हे श्रमापेक्षा अधिक कळीचे मानले जातात.

समाजातील वर्गसंघर्षाचे आणि पर्यायाने प्रतिकाराचे बदललेले स्वरूप हेसुद्धा उत्तर-औद्योगिक समाजाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट समजले जाते. उत्तर-औद्योगिक समाजांमध्ये लोकांचे राहणीमान काही प्रमाणात उंचावल्यामुळे लोकांच्या मागण्या आता निव्वळ अन्न-वस्त्र-निवारा यांपुरत्या मर्यादित न राहता त्यांना व्यापक परिमाण लाभले आहे. उदा., एकूण आयुष्याची गुणवत्ता उंचाविणे, पर्यावरणाच्या प्रश्नांचा विचार करणे किंवा विकासाविषयी राजकीय धोरणे तपासून पाहणे. उत्तर-औद्योगिक समाजात ‘नवीन सामाजिक चळवळी’ नव्या वैशिष्ट्यांसह उदयाला आल्या आहेत. या चळवळी पारंपरिक कामगार संघटनांपेक्षा अधिक सहभागी पद्धतीचे संघटनिक प्रकार निवडत आहेत. तसेच वेगळ्या प्रकारचे राजकीय मार्ग चोखाळत आहेत. या चळवळीमध्ये मध्यम वर्गाचे सहभागित्व किंवा प्रतिनिधित्व अधिक दिसून येते. बदलत्या सामाजिक प्रश्नांबरोबर एकोणिसाव्या शतकातील आणि विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील प्रतिकारांच्या स्वरूपात अशा प्रकारचे बदल झाले आहेत.

उत्तर-औद्योगिक समाज हा तंत्रज्ञानात्मक क्रांतीतून अस्तित्वात आलेला समाज आहे. त्यामागे अमेरिकेतील वैज्ञानिक संशोधन व उद्योग जगत यांच्या हितसंबंधांची प्रेरणा होती. या बदलामुळे बाजारपेठीय विस्तार व औद्योगिक आस्थापनांचा नफा यांच्यात लक्षणीय वृद्धी झाली. या घडामोडीचे पडसाद जागतिक स्तरावर १९८० च्या दशकापासून उमटू लागले. १९७० च्या दशकात खनिज तेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने जागतिक अर्थव्यवस्था अरिष्टात आली होती. त्यातून मार्ग काढण्यात माहिती तंत्रज्ञानावर बेतलेल्या औद्योगिक-वित्तीय अर्थव्यवस्थेचा उपयोग झाला. वाढत्या सरकारी राजकोषीय त्रुटीला आळा बसण्यात झाला; परंतु या स्थित्यंतरासाठी औद्योगिक क्षेत्रावरील सरकारी वज्रमूठ सैल होणे आवश्यक होते. विविध देशांतील शिथिलीकरणाने ते साध्य झाले. १९७९ पासून कम्युनिस्ट चीननेदेखील बाजारपेठेला अनुकूल आर्थिक धोरणांचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली; परंतु व्यक्तिस्वातंत्र्यकेंद्री उदारमतवादी लोकशाहीला विरोध असल्याने तेथील सर्वसत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने धोरणात्मक बदलातून बाजारपेठीय समाजवाद अस्तित्वात आणून उत्तर-औद्योगिक समाजाचे आस्थापकीय व बाजारपेठीय लाभ आपल्या जनतेस मिळवून दिले.

संदर्भ :

  • Allan, Touraine, The Post-Industrial Society, New York, 1971.
  • Bell, Daniel, The Coming of the Post-Industrial Society, New York, 1976.
  • Gershuny, Jonathan, Changing Times : Work and Leisure in Post-Industrial Society, New York, 2003.
  • Harvey, David, The Condition of Postmodernity, An Enquiry into the Origins of Cultural Change, USA, 1989.

समीक्षक : महेश गावस्कर