वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (Vasantrao Naik Marathwada Agriculture University, Parbhani) : महाराष्ट्र राज्यातील चार कृषी विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ. हे विद्यापीठ महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील परभणी येथे आहे. मराठवाडा विभागातील कृषी क्षेत्राच्‍या विशेष गरजा व लोकभावना लक्षात घेऊन महाराष्ट्र विधिमंडळाच्या कायदा ६९ अ अन्वये १८ मे १९७२ रोजी मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्‍थापना करण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यू. जी. सी.) कायदा कलम १२/ब अन्वये विद्यापीठास मान्यता मिळाली आहे. परभणी, औरंगाबाद, नांदेड, बीड, उस्मानाबाद, जालना व लातूर या जिल्ह्यांतील कृषी शिक्षणासंदर्भातील संस्था व महाविद्यालये या विद्यापीठांतर्गत येतात. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांच्‍या जन्‍मशताब्दी वर्षानिमित्त त्‍यांच्‍या राज्‍यातील कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल १ जुलै २०१३ रोजी विद्यापीठाचा नामविस्‍तार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असा करण्‍यात आला. हे विद्यापीठ भारतीय कृषी संशोधन समितीद्वारा (आयसीएआर) मान्यता प्राप्त असून राष्ट्रीय कृषी शिक्षण मान्यता मंडळद्वारा (एनएएएबी) अधिकृत आहे. विद्यापीठाकडे एकूण ३,५५५.४० हेक्टर जमीन असून त्‍यांपैकी ५६९.४६ हे. शिक्षणाकरिता, २,९२४.९४ हे. संशोधनासाठी व ६० हे. विस्‍तार शिक्षणासाठी उपयोग केला जातो. विद्यापीठात शिक्षण कार्यासाठी ३३४, संशोधनासाठी १५६, विस्‍तार शिक्षणासाठी २९ व इतर प्रवर्गांमध्‍ये २,२७५ असे एकूण २,७९४ मंजूर मनुष्‍यबळ आहे. सध्या डॉ. इंद्र मणी हे विद्यापीठाचे कुलगुरू असून डॉ. धिरजकुमार कदम हे कुलसचिव आहेत (२०२३).

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत परभणी, लातूर, बदनापूर, अंबेजोगाई, उस्‍मानाबाद, गोळेगाव येथे प्रत्‍येकी एक याप्रमाणे सहा कृषी व कृषी संलग्‍न महाविद्यालये आहेत. त्यामध्ये बी. एस्‍सी. (कृषी), बी. एस्‍सी. (उद्यानविद्या), बी. एस्‍सी. (कृ‍षी जैव तंत्रज्ञान), बी. टेक. (अन्‍नतंत्र), बी. टेक. (कृषी अभियांत्रिकी), बी. एस्‍सी. (गृहविज्ञान), बी. बी. ए. (कृषी) इत्यादी पदवी अभ्‍यासक्रम; कृषी, उद्यानविद्या, कृषी व्‍यवसाय व व्‍यवस्‍थापन, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, अन्‍न-तंत्रज्ञान इत्यादी विषयांत पदव्‍युत्तर अभ्यासक्रम आणि कृषी शाखेच्‍या नऊ विषयांत, अन्‍न-तंत्रज्ञान शाखेत पाच विषयांत, कृषी अभियांत्रिकी शाखेतील चार विषयांत आणि गृहविज्ञान शाखेत एका विषयात पी. एचडी. (आचार्य) पदवी अभ्यासक्रम विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे. विद्यापीठाद्वारे कृषी पदवीधरांमध्ये उद्योजगतेचे बीज रुजविण्‍यासाठी संपूर्ण एक सत्र अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात येतो. तसेच एक सत्र शेतकऱ्‍यांच्‍या शेतावरील प्रत्‍यक्ष अनुभवासाठी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम राबविण्‍यात येतो. ग्रामसेवकांसाठी एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम व साहाय्यक ग्रामसेवकांसाठी सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठात उपलब्ध आहे. विद्यापीठाने कृषिपदवीधरांसाठी ‘स्वयं रोजगार योजना’ सुरू केली आहे. तसेच विद्यार्थ्‍यांना दहावीनंतर दोन वर्षांचा कृषी पदविका अभ्‍यासक्रम कृषी विद्यालयांतून दिला जातो. त्याच बरोबर माळी प्रशिक्षण हा प्रमाणपत्र अभ्‍यासक्रमाची सुविधा विद्यापीठात उपलब्ध आहे.

उद्दिष्टे : या विद्यापीठाचे मूळ उद्दिष्ट म्हणजे कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार असे आहे.

  • कृषी विद्यापीठाच्या विविध शाखांमध्ये समन्वय साधून कृषी आणि आनुषंगिक क्षेत्रांत शिक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे आणि पदविका-पदवी प्रमाणपत्र प्रदान करणे.
  • मराठवाड्यातील जनतेच्या आर्थिक स्वावलंबनासाठी कृषी, पशुसंवर्धन व आनुषंगिक क्षेत्राची उत्पादकता वाढविण्यासाठी समस्याभिमुख, पायाभूत संशोधन करणे.
  • नैसर्गिक संसाधनांची जपवणूक आणि शाश्वत वापर यांसाठी आराखडा विकसित करणे.
  • विस्तार शिक्षण उपक्रमाचे आयोजन करणे. प्रथम दर्शनीय तंत्रज्ञान प्रसार, प्रशिक्षण देणे, प्रात्यक्षिक आयोजन व संपर्क यंत्रणा विकसित करणे.
  • मराठवाडा शेतकरी, महिला शेतकरी व शेतमजूर यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शेती आणि आनुषंगिक क्षेत्रांत, जसे पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय इत्यादी, लागवड तंत्रज्ञान, पिक सरंक्षण, काढणी, विपणन, काढणी पश्चात वापर यांवर तंत्रज्ञान विकसित करणे.
  • विभागातील प्रमुख पिकांचे न्युकलियस, ब्रिडर, फाउंडेशन बिजोत्पादन करणे; तसेच शेती उत्पादनातून अर्थार्जन करणे इत्यादी.

शेतकरी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदू असून शेती केवळ उपजीविकेचे साधन न राहता ती सर्वांगीण विकासाचे साधन व्हावे, यासाठी विद्यापीठाने कार्य केले आहे. पावसाचे अनियमित प्रमाण, जागतिक तापमान वाढ, शेतजमिनीत होणारी घट, जमिनीची नापिकी या समस्यांवर मात करण्याच्या दृष्टीने विद्यापीठीय स्तरावर संशोधन सुरू आहे. विद्यापीठाने शेतीशास्त्रात झालेल्या बदलांच्या अनुषंगाने ९ संशोधन केंद्र, ८ उपकेंद्र व २९ योजनांमार्फत विविध विषयांवर विविध प्रकारचे संशोधनकार्य हाती घेतले आहे. राज्‍य शासन अनुदानित सुमारे ३४ संशोधन योजना, सुमारे २४ अखिल भारतीय समन्‍वयक संशोधन प्रकल्‍प कार्यरत असून आजपर्यंत शंभराहून अधिक विविध पिकांचे वाण, ३५ पेक्षा जास्त कृषी औजारे व यंत्रे विकसित केले आहेत. विद्यापीठाद्वारे मृदा व जलसंधारण, विविध पिके व पीक लागवड पद्धती, खते व पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत पद्धती, कीड, रोग व तणाचे एकात्मिक व्यवस्थापन, सुधारित अवजारे, हरितगृहातील शेती प्रक्रिया व विपणन इत्यादींविषयी संशोधन करून सुमारे ५८१ शिफारशी प्रसारित केल्या आहेत. विविध तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य, कापूस तसेच भाजीपाला, फळे, फुले व चारा इत्यादी पीकांचे अनेक वाण विकसित केले आहेत. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन यांवरही संशोधन झालेले आहे. देवणी आणि होलस्टीन फ्रीजन यांच्या संकरातून होलदेव या गायीची जात तयार करण्यात आली आहे. या गायीपासून प्रतिदिन सुमारे २९ लिटर एवढे अधिकतम दूध उत्पादन मिळाले आहे. विद्यापीठातील संशोधन कार्यास २ आंतरराष्ट्रीय, २३ राष्ट्रीय व २० राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

विद्यापीठाद्वारे विद्यार्थीकेंद्री अनुदेशन पद्धतीचा वापर केला जातो. विद्यापीठाने सत्र (सेमिस्टर) परीक्षा पद्धतीचा अवलंब आहे. त्यानुसार ‘चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम’ (सीबीसीएस) पद्धतीनुसार घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी ‘सिक्युअर्ड रिमोट पेपर डिलिव्हरी’ (एसआरपीडी) या ई-मोड प्रणालीचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांच्या परीक्षा परिस्थितीनुसार ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही प्रणालींद्वारे घेतली जाते. विद्यार्थ्यांचा हजेरी अहवाल पर्यवेक्षकांकडून ऑनलाईन भरून घेतला जातो. विद्यापीठाची वेळेत निकाल लावण्याची परंपरा आहे.

विद्यापीठातील ऊती संवर्धन प्रयोगशाळेत केळी या पिकाच्या ऊती संवर्धित रोपांची निर्मिती केली जाते. गाजरगवत खाणाऱ्या मेक्सिकन भुंग्याचे उत्पादन व विक्री करण्यात येते. यामुळे गाजरगवताचे जैविक नियंत्रण करण्यात यश मिळाले आहे. औरंगाबादला उच्च तंत्रज्ञानावर आधारित पुष्पसंवर्धन केंद्राची उभारणी करण्यात आली असून दूरवरच्या बाजारपेठांत फुलांची निर्यात केली जाते. कृषी अन्नतंत्र महाविद्यालयात करडईच्या  फुलांच्या पाकळ्यांपासून आयुर्वेद चहा, तसेच विविध फळांवर प्रक्रिया करून रस निर्मिती करण्याचे तंत्र विकसित  केले आहे. विद्यापीठाने सुधारित वाण व पूरक तंत्रज्ञान देऊन अन्नधान्य उत्पादन वाढीच्या कार्यात मौलिक योगदान दिले आहे.

विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्‍यांपर्यंत पोहोचविण्‍याचे कार्य एक विस्‍तार शिक्षण गट, एक कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, चार विभागीय कृषी विस्‍तार केंद्र, ३ घटक व ८ अशासकीय कृषी विज्ञान केंद्रांद्वारे संपूर्ण मराठवाड्यात केली जाते. तसेच शेतकऱ्यांमध्‍ये नवचैतन्‍य निर्माण करण्‍यासाठी ‘विद्यापीठ आपल्‍या दारी तंत्रज्ञान शेतावरी’ हा नाविन्‍यपूर्ण विस्‍तार शिक्षण उपक्रम विद्यापीठाद्वारे राबविण्‍यात येतो. यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमांचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. कृषी विकासासंबंधित विभाग, जिल्हा परिषद आणि इतर सेवाभावी संस्था यांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत पार पाडली जाते.

विद्यापीठाद्वारे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कार्यरत आहे. या योजनेंतर्गत श्रमसंस्कार शिबिर, रक्तदान शिबिर, एड्स जनजागृती अभियान, आपत्ती व्यवस्थापन शिबीर, वृक्षारोपण, बेटी बचाओ अभियान, साक्षरता अभियान, वन्यजीव सप्ताह इत्यादी उपक्रमांबरोबर विविध शासकीय कार्यक्रमांत विद्यार्थी सहभागी होतात. महाराष्ट्र शासनाच्या निर्मलग्राम, जलयुक्त शिवार, पाणी अडवा पाणी जिरवा, जल साक्षरता इत्यादी उपक्रमांतही विद्यापीठाचा सहभाग आहे. क्रिडा विभागामार्फत विविध वैयक्तिक व सांघिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. टेबल टेनिस, क्रिकेट, खो-खो, मल्लखांब, कुस्ती, कराटे इत्यादी खेळांचे प्रशिक्षण विद्यापीठात दिले जाते. एन. सी. सी. विभागामार्फत सैन्यभरती प्रशिक्षणाबरोबरच स्वयंशिस्त, देशभक्ती, जीवनमूल्ये व जीवनकौशल्यांचे शिक्षण दिले जाते. एन. सी. सी. साठी विद्यापीठ परिसरातच विभागीय कार्यालय आहे.

विद्यापीठाने जागतिकीकरण, खासगीकरण व उदारीकरण या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सांमजस्य करार केले आहेत. त्यामुळे संशोधन, ज्ञानप्रसारण व रोजगारवाढ यांस चालना मिळून विद्यापीठ जागतिक स्तरावर नावारूपास येत आहे. विद्यापीठातील प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून विद्यापीठाद्वारे जॉबफेअर व अनेक कंपन्यांसाठी परिक्षेत्र मुलाखतीचे (कॅम्पस इंटरव्ह्यू) आयोजन केले जाऊन या कार्यक्रमात विद्यार्थी व प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये परिक्षेत्र मुलाखतीद्वारे विद्यार्थी निवडले जातात.

विद्यापीठामध्ये सुसज्ज ग्रंथालय आहे. ग्रंथालयात सुमारे ८८,९९९ छापील ग्रंथ; सुमारे १,१७४ ई-ग्रंथ; सुमारे १८० छापील शोधपत्रिका (जर्नल्स); सुमारे २,७२२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय     ई-शोधपत्रिका; सुमारे ७,८०६ कृषीकोश प्रबंध आणि सुमारे १७,१४२ नियतकालिका आहेत. तसेच महत्त्वाची हस्तलिखित व छापील कागदपत्रेही आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या युजीसी/इन्फोनेट/इनफिल्बनेट या अंकीय (डिजिटल) ग्रंथालयाशी विद्यापीठाचे ग्रंथालय जोडले आहे. इनफिल्बनेट केंद्रामध्ये इलेक्ट्रानिक्स जर्नल्स व माहिती उपलब्ध आहेत. ग्रंथालयात ऑनलाईल पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग (ओपॅक) प्रणाली उपलब्ध असून आंतरजालीय प्रयोगशाळेद्वारे (इंटरनेट लॅब), नोंदणीकृत प्रबंध, दुर्मीळ ग्रंथ व दस्तऐवज उपलब्ध आहेत. विद्यापीठ ग्रंथालयाला २०१९ मध्ये आयसीएआरचा उत्कृष्ट जी-गेट सीईआरए युझर प्रोफाईल रजिस्ट्रेशन पुरस्कार मिळाला आहे. विद्यापीठाद्वारे दरवर्षी कृषी दैनंदिनी, शेतीभाती मासिक, कृषी दिनदर्शिका, विविध विषयांवरील पुस्‍तिका, घडीपत्रिका यांचे प्रकाशन करण्‍यात येते.

मराठवाड्यातील दुष्‍काळ परिस्थितीस शेतकऱ्‍यांना धैर्याने तोंड देण्‍यासाठी व त्‍यांना आत्‍महत्‍यापासून परावृत्त करण्‍यासाठी विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने ‘उमेद’ उपक्रम राबविण्‍यात येतो. विद्यापीठाद्वारे दरवर्षी १८ मे रोजी खरीप पिक मेळावा (विद्यापीठ वर्धापनदिन), १७ सप्‍टेंबर रोजी रब्बी पिक मेळावा (मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिन) घेण्‍यात येऊन शेतकऱ्‍यांना खरीप व रब्बी हंगामांबाबत मार्गदर्शन केले जाते. त्याच प्रमाणे या वेळी विद्यापीठाने तयार केलेल्‍या बियाणांचे वाटप केले जाते. क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ३ जानेवारी रोजी महिला शेतकरी मेळावा विद्यापीठाद्वारे आयोजित केला जातो. याचा लाभ राज्‍यातील लाखो शेतकरी बांधव घेतात.

विद्यापीठ परिसरात कुलगुरू, अधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी यांची निवासस्थाने आहेत. विद्यार्थ्‍यांसाठी आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे वसतीगृह, व्‍यायामशाळा, प्रयोगशाळा, व्‍याख्‍यानगृह अशा सुविधा उपलब्‍ध आहेत. विद्यार्थ्‍यांसाठी ६.६८ क्षेत्रावर भव्‍य क्रीडा संकूल उभारण्‍यात आले आहे. तसेच २०० शेतकऱ्यांच्‍या निवास सोयीसाठी शेतकरी भवन व शेतकरी निवास बांधण्‍यात आले आहे.

विद्यापीठाद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, व्याख्याने, चर्चासत्रे, कार्यशाळा इत्यादींचे आयोजन केले जाते. तसेच जिल्हास्तरीय व विद्यापीठस्तरीय युवामहोत्सव, अश्वमेध, अविष्कार संशोधन स्पर्धा, इंद्रधनुष्य, क्रिडामहोत्सव इत्यादी उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

ंदर्भ : सारंग, रा., मराठवाडा कृषी विद्यापीठाची वाटचाल, २०११.

समीक्षक : एच. एन. जगताप