वर्णहीनता म्हणजे कोड होय. यास विवर्णता किंवा धवलता असेही म्हणतात. प्रामुख्याने अप्रभावी जनुकांमुळे (रिसेसिव्ह जिन्स) वर्णहीनता उद्भवते. मानवी त्वचेमध्ये कृष्णरंजक अथवा कालिकण (मेलॅनिन) हे द्रव्य असते, जे त्वचेला रंग प्राप्त करून देते. गडद म्हणजे सावळ्या, काळ्या त्वचेमध्ये कृष्णरंजक द्रव्याचे प्रमाण जास्त असते. या कृष्णरंजक द्रव्याच्या उपस्थितीमुळे शरीराचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होते. कृष्णरंजक द्रव्याची निर्मिती ही प्रामुख्याने अनुवांशिक घटकांद्वारे नियंत्रित केली जाते. माता व पिता हे दोघेही कोडाच्या व्याधीने ग्रस्त असतील, तर ही अवस्था पुढील पिढीत संक्रमित होण्याची शक्यता असते; मात्र कोड असलेल्या व्यक्तींचा संपर्क इतर व्यक्तींशी आला, तरी त्याची लागण दुसऱ्याला होत नाही. म्हणजेच ही बिमारी संसर्गजन्य नाही. अनुवांशिकता आणि शरीरस्वरूपीय अभ्यास या दृष्टीने वर्णहीनतेला मानवशास्त्रीय महत्त्व आहे. वर्णहीन व्यक्तिंची त्वचा, केस पांढरट असतात. काही वेळेस डोळ्यांची बुबुळे गुलाबी अथवा रंगहीन असतात. कृष्णरंजक द्रव्याची निर्मिती अनेक जनुकांद्वारे नियंत्रित होत असते.

संदर्भ : Winchester, A. M., Genetics, New Delhi, 1990.

समीक्षक : शौनक कुलकर्णी