भारतीय बँकिंग प्रणालीत वापरण्यात आलेले सर्वांत पहिले तंत्रज्ञान म्हणजे कोअर बँकिंग यंत्रणा होय. कोअर बँकिंगमुळे ग्राहकाला कोणत्याही बँकेच्या शाखेमधून व्यवहार करता येतो आणि त्या व्यवहाराची माहिती केंद्रीय बँकेत जमा होते. भारतात १९९० च्या दशकातील जागतिकीकरणामुळे झालेल्या बदलांमध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाचा विकास विस्ताराने झाला. संगणकाद्वारे होणारे व्यवहार ही काळाची गरज बनू लागली. व्यवहारांमधील गतिमानता, अचुकता, विस्तार हे फायदे ओळखून भारतात बँकांनी आपल्या व्यवहारांत माहिती व तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम सुरू केला. एम. नरसिंहम समितीच्या अहवालानंतर भारतीय बँकांची कार्यक्षमता व स्पर्धात्मकता वाढीस लावणे, तसेच बँकांच्या नफा क्षमतेत वृद्धी करणे या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करण्यात आले. यासाठी १९८४ मध्ये बँकांचे संगणकीकरण करण्याची शिफारस एम. नरसिंहम समितीने केली. त्यामुळे बँकिंगक्षेत्रात संगणकांचा वापर सुरू होऊन बहुतेक बँका मागील ३० ते ३५ वर्षांत कोअर बँकिंग प्रणालीने जोडल्या गेल्या. आज सर्व बँकांमधील सर्व कार्ये जवळपास संगणीकृत झाल्याचे दिसते. संगणकीकरणामुळे आज सर्वत्र बँकिंग (एनीव्हेअर बँकिंग), सर्वकाळ बँकिंग (एनीटाईम बँकिंग), एटीएम (ऑटोमेटेड टेलर मशीन), भ्रमणध्वनीय बँकिंग (मोबाईल बँकिंग), आंतरजालीय बँकिंग (इंटरनेट बँकिंग), आरटीजीएस (रिअल टाईम ग्रास सेटलमेंट योजना) अशा अनेक बँकिंग सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यांतीलच एक सुविधा म्हणजे कोअर बँकिंग होय.
कोअर बँकिंग यंत्रणा ही बँकेच्या तंत्रज्ञातील सर्वांत पहिली आवृत्ती आहे. १९८० मध्ये शहरी बँकांचे संगणकीकरण सुरू झाले आणि दीर्घकालावधीपर्यंत ते विकसित होत गेले. १९८८ मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सी रंगराजन यांनी लॅन/युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या शाखांमध्ये स्वयंचलन यंत्रणेच्या (ऑटोमेशन पॅकेज) मदतीने कोअर बँकेची संकल्पना राबविली. १९७० पूर्वी केलेल व्यवहार खात्यात प्रतिबिंबीत होण्यासाठी एक दिवस लागत होता; कारण प्रत्येक शाखेत असलेला स्थानिक सर्व्हर केंद्राकडे दिवसाच्या शेवटी माहिती पाठवित होता.
भारताच्या बँकिंग क्षेत्राच्या परिप्रेक्षामधील कोअर बँकिंगमध्ये दिलेल्या ‘कोर’ या शब्दाचा अर्थ सेंट्रलाइज्ड ऑनलाईन रिअल – टाईम इन्वॉर्नमेंट ऑर एक्सचेंज असा दिला आहे. ही केंद्रीय बँकेची प्रणाली असून या प्रणालीला जोडलेल्या सर्व बँका केंद्रीयकृत माहिती केंद्रांचा (डाटा सेंटर्स) उपयोग हा बँकेच्या देवाण-घेवाणीच्या व्यवहारांसाठी करतात. कोअर बँकिंगमध्ये करण्यात येणारी कामे ही रिअल टाईमवर आधारित असतात. तसेच कोणत्याही बँकेत झालेले व्यवहार हे केंद्रीय सर्व्हरद्वारे पूर्ण बँक प्रणालीमध्ये उमटले जाते. थोडक्यात, कोअर बँकिंग प्रणालीला एका सुत्रात बांधले जाते. तसेच बँकेच्या देवाण-घेवाणीतील व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणली जाते.
वैशिष्ट्ये :
- कोअर बँकिंगमध्ये जोखीम विश्लेषण, नफा विश्लेषण, भांडवल राखीव वाटप आणि दुय्यम व्यवस्थापनासाठी तरतुदींसह बँकिंग विश्लेषण केले जाते.
- बँकिंग वित्तमध्ये सामान्य खातेदार आणि अहवाल समाविष्ट असतात.
- सामग्री व्यवस्थापनाची सुविधा असते.
- सुरक्षा नियंत्रण आणि जमाखर्च क्षमता असते.
फायदे :
- कोअर बँकिंगमुळे ग्राहक कोठेही, केव्हाही बँकेची सुविधा उपभोगू शकतात आणि सहज, कार्यक्षम बँकिंग करू शकतात.
- ग्राहकांना वित्तीय संस्थांकडून इ-विनिमय उपलब्ध होतो.
- ऑपरेशन शुल्काची शाश्वत सवलत मिळते.
- ऑनलाईन सेवा उपलब्ध असल्याने शाखेतील मनुष्यबळामध्ये कपात करता येते.
- मर्यादित व्यावसायिक मनुष्यबळाचा वापर अधिक प्रभावीपणे करता येते.
- बँकेतील व्यवहारांमधील विपणन, पुनर्प्राप्ती आणि वैयक्तिक बँकिंगसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होईल.
- कोणत्याही बँकेत झालेले व्यवहार हे केंद्रीय सर्व्हरद्वारे पूर्ण बँक प्रणालीमध्ये उमटले जात असल्याने बँकेसंबंधित निर्णय घेण्यासाठी तत्काळ माहिती उपलब्ध होते.
- एखाद्या धोरणाची जलद आणि अचूक अंमलबजावणी करता येते.
- शाखांमध्ये केंद्रीय मुद्रण, बॅकअप साधन आणि माध्यम यांवर होणाऱ्या भांडवली व महसुली खर्चात घट होते.
- नाविण्यपूर्ण, पुनर्निर्धारित किंवा सुधारित कार्यपद्धतीमुळे आंतरशाखांचे सशक्तीकरण होते.
- व्यवस्थापनात आर्थिक दृष्ट्या माहिती प्रणाली अधिक मजबूत होते.
- कामकाजातील गती वाढल्याने व्यवसाय संधीमध्ये वाढ झाली आणि दंड व कायदेशीर खर्चात घट होण्यास मदत झाली.
मर्यादा :
- संगणकावर जास्त अवलंबून राहावे लागते.
- संगणकात कोणताही बिघाड झाला, तर बँकांचे कार्ये बंद पडतात.
- नोंद व्यवस्थित समाविष्ट केली नाही आणि काळजी घेतली नाही, तर हॅकर्स याचा फायदा घेऊन माहिती मिळवू शकतात.
- संगणकीय बँकिंग प्रणालीमुळे अशिक्षित व वयस्क व्यक्तींना स्वत: बँकांचे व्यवहार करता येत नाही इत्यादी.
कोअर बँकिंगमुळे काही प्रमाणात मर्यादा असल्या, तरी आज बँकिंग क्षेत्रात या प्रणालीचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. तसेच या प्रणालीमुळे बँकिंग व्यवहार करणे सर्वसाधारण व्यक्तिला सहज व सोपे झाले आहे.
समीक्षक : अविनाश कुलकर्णी