परकीय कंपन्यांचे भांडवल-शेअर्स (समभाग) खरेदी करून खरेदीदाराच्या खात्यावर ते जमा केल्याबद्दलची ठेवीदार बँकेने दिलेली पावती, म्हणजे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय ठेव पावती. साधारणत: एक जागतिक ठेव पावती म्हणजे १० समभाग अशा गुणोत्तराने एक जी.डी.आर. निश्चित करण्यात येते. या समभागांची मालकी जी.डी.आर.द्वारे अप्रत्यक्षपणे गुंतवणूकदारांकडे येते. या समभागांच्या किमतींवर जागतिक ठेव पावतीची किंमत ठरत असते; परंतु या जागतिक ठेव पावतीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार तिच्याशी निगडित समभागांच्या व्यवहारांपेक्षा स्वतंत्र असतात आणि ते स्वतंत्रपणे चुकतेही केले जातात. जागतिक ठेव पावती हे विनिमयसाध्य किंवा परक्राम्य वित्तीय साधन (संलेख) असल्याने शेअरबाजार (Share Market)मधील व्यवहारांनुसार त्याचे मूल्य ठरते. जागतिक ठेव पावतीचे मूल्य एखाद्या पूर्णत: परिवर्तनीय चलनाच्या स्वरूपात मांडले जाते. बहुतांश जागतिक ठेव पावत्यांचे मूल्य डॉलर किंवा युरो या चलनांमध्ये मांडले जाते.

सर्वसाधारणपणे विकसित देशातील भांडवली गुंतवणूकदार विकसनशील किंवा उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. तसेच कंपन्यांना देशाबाहेरच्या भांडवलबाजारातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची संधी जागतिक ठेव पावतीच्या माध्यमातून मिळते. देशांतर्गत भांडवल गुंतवणुकीच्या कडक नियमांमुळेही काही देशांमध्ये जागतिक ठेव पावतीचा वापर सुरू झाला. १९९०च्या दशकात युरोपातील काही देशांमध्ये भविष्य निर्वाह निधींना (Pension Fund) केवळ देशांतर्गत सरकारी कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याची मुभा होती. त्यांचे भांडवल उपलब्ध न झाल्याने अनेक युरोपीय कंपन्यांना भांडवलउभारणीसाठी जागतिक ठेव पावतीचे साह्य घ्यावे लागले होते. जागतिक ठेव पावतीचा वापर करून भांडवल उभारणाऱ्या कंपन्यांचा बाजारातील हिस्सा तर वाढतोच; पण त्यांची गुंतवणूकदार असुरक्षितता वैविध्यपूर्ण, व्यापक व्हायला म्हणजेच गुंतवणुकीतील धोके कमी व्हायला मदत होते आणि त्यांच्याकडील भांडवलतरलताही वाढते. या कंपन्यांची देशाबाहेरील पत आणि प्रतिष्ठा त्यामुळे सुधारते. कंपन्यांच्या संपादनात आणि विलीनीकरणातही जागतिक ठेव पावत्या महत्त्वाचे माध्यम म्हणून कार्य करतात. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अनोळखी परकीय वातावरणात गुंतवणूक करण्यापेक्षा, जागतिक ठेव पावत्या हा अधिक पारदर्शी स्वरूपात गुंतवणूक करण्याचा मार्ग ठरतो; परंतु चलनविनिमयाचा खर्च, अविश्वासार्ह विश्वस्त सेवा, अपुरी माहिती, व्यवहारांची अपारदर्शी मार्गाने पूर्तता, भांडवलबाजारातील वित्तीय संस्थांचे अननुभवीपण, अनोळखी बाजारपद्धती आणि गोंधळात टाकणारी कररचना व पद्धती यांसारखे घटक हे जागतिक ठेव पावत्यांच्या वापराला आणि प्रसाराला मारक ठरू शकतात.

इतिहास आणि प्रत्यक्ष वापर : जागतिक ठेव पावत्यांची सुरुवात साधारणत: १९२०च्या दशकापासून झाली. लंडन येथील ‘सेल्फरीजेसʼ या डिपार्टमेंटल स्टोअरने भांडवलविस्तारासाठी अमेरिकी गुंतवणूकदारांना आकर्षित करायचे ठरविले. ब्रिटनमधील तत्कालीन नियमांनुसार कोणत्याही समभाग हस्तांतरणाला शेअर नोंदणी निबंधकाची मान्यता आवश्यक असे. या व्यवहारांना भौगोलिक मर्यादा नव्हत्या. ब्रिटनमधला एखादा शेअर न्यूयॉर्क शेअर बाजारात विकला जाई; मात्र समुद्रामार्गे टपाल पाठविण्याची सोय असल्यामुळे संपूर्ण व्यवहाराला अनेक दिवस लागत. ‘सेल्फरीजेसʼच्या आंतरराष्ट्रीय शेअर्सविक्रीच्या या समस्येला ब्रिटिश शेअर निबंधकाकडे नोंदणीकृत असलेल्या ‘जे. पी. मॉर्गनʼ नामक अमेरिकन बँकेने पर्याय सुचवला. तिच्या मते, ‘सेल्फरीजेसʼचे शेअर्स ‘जे. पी मॉर्गनʼच्या नावावर धारण करावेत आणि त्या शेअर्सच्या मूल्याच्या प्रमाणात न्यूयॉर्कमध्ये या शेअर्सची वचनपत्रे विकावीत. ‘सेल्फरीजेसʼने ते मान्य करून ‘जे. पी मॉर्गनʼला संमती दिली. त्यानुसार वचनपत्रांचे मूल्य अमेरिकी चलनात म्हणजे डॉलरमध्ये मांडले गेले आणि गुंतवणूकदारांबरोबर अमेरिकन कायद्यानुसार व्यवहार-करार झाला. त्यामुळे इतर कुठल्याही अमेरिकी रोख्यांप्रमाणे ही वचनपत्रेही न्यूयॉर्क शेअर बाजारात विकली जाऊ लागली. या वचनपत्रांची नोंदणी अमेरिकी शेअर नोंदणी निबंधकाकडे झाली. ही वचनपत्रे अमेरिकी ठेव पावती या नावाने ओळखली जाऊ लागली. या एका व्यवहारानंतर ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्राझील, कॅनडा, जर्मनी, भारत, जपान, कोरिया, नेदरलंड, रशिया, साऊथ आफ्रिका, स्वीडन, स्वित्झर्लंड, तैवान इत्यादी विकसित आणि विकसनशील देशांतील वित्तीय बाजारपेठांनी देशाबाहेर गुंतवणूक करण्यासाठी किंवा देशाबाहेरील भांडवल आकर्षित करण्यासाठी या वित्तीय साधनाचा पर्यायी वापर सुरू केला. समजा, एखाद्या भारतीय कंपनीने आधीच अमेरिकन ठेव पावती बाजारात आणली असेल आणि त्या कंपनीला जर या अमेरिकी ठेव पावत्या इतर विकसित देशांमध्ये विक्रीला आणायच्या असतील, तर त्यांना जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय ठेव पावती म्हणावे लागेल आणि विशेषकरून युरोपीय बाजारात विक्रीला येणाऱ्या या वचनपत्रांना युरोपीय ठेव पावती (European Depository Receipts-EDR) म्हणावे लागेल.

जागतिक ठेव पावत्या अनेक भांडवल बाजारपेठांमध्ये विकल्या-विकत घेतल्या जातात. या व्यवहारांचा खर्च इतर अनेक दीर्घकालीन परकीय कर्जरोख्यांच्या व्यवहारखर्चापेक्षा कमी असतो. साधारणत: एक जागतिक ठेव पावती म्हणजे १० समभाग अशा गुणोत्तराने एका जागतिक ठेव पावतीचे मूल्य निश्चित करण्यात येते. अर्थात हे गुणोत्तर एक शेअर ते अनेक शेअर्स असे काहीही असू शकते. ठेव पावतीवरचे मूल्य एका समभागाच्या किमतीपेक्षा जास्त असले की, हे गुणोत्तर स्पष्ट होते. या समभागांची खरेदी-विक्री आंतरराष्ट्रीय पातळीवर होते; पण प्रत्यक्षात मात्र ते एखाद्या आंतरराष्ट्रीय बँकेकडे ठेवीच्या स्वरूपात असतात. गुंतवणूकदाराच्या देशातील शेअर दलाल, जागतिक ठेव पावत्यांच्या विक्रेत्या कंपनीचा दलाल, जागतिक ठेव पावत्याधारक बँक आणि गुंतवणूकदाराची बँक यांच्यात हा खरेदी-विक्रीचा व्यवहार होतो. गुंतवणूकदाराची इच्छा असल्यास त्याचा दलाल या जागतिक ठेव पावत्या विकू शकतो; शेअर बाजारात त्यांची विक्री केली जाऊ शकते किंवा या जागतिक ठेव पावत्यांचे रूपांतर पुन्हा समभागांमध्ये होऊ शकते. तसेच जागतिक ठेव पावत्या विक्रेत्या कंपनीला ते परतही केले जाऊ शकतात. जागतिक ठेव पावत्याधारक गुंतवणूकदाराला सर्व प्रकारचा लाभांश आणि भांडवली फायदा मिळतो. जागतिक ठेव पावत्यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेत जर तरतूद केलेली असेल, तर जागतिक ठेव पावत्याधारक बँकेला समभागधारक म्हणून कंपनीच्या निर्णयप्रक्रियेत मतदानाचा अधिकारही मिळतो. २०१७ च्या उपलब्ध माहितीनुसार, जगात ८० देशांतील २१०० कंपन्यांनी विक्रीला काढलेल्या ९०० जागतिक ठेव पावत्या बाजारात आहेत.

भारत व जागतिक ठेव पावत्या : भारताच्या संदर्भात विचार करायचा, तर एखादी भारतीय कंपनी जागतिक ठेव पावत्या आणि समभाग असे गुणोत्तर निश्चित करून त्या विक्रीला काढते. हे समभाग कोणत्या तरी शेअर बाजारात सूचिबद्ध (listed) असावे लागतात. एखादी स्थानिक विश्वस्त बँक एखाद्या परदेशी रोखे ठेव-संस्थेची (Securities Depository/Share Depository) प्रतिनिधी म्हणून हे समभाग धारण करते. संबंधित रोखे ठेव-संस्था या समभागांचे जागतिक ठेव पावत्यांमध्ये रूपांतर करते. या  जागतिक ठेव पावत्या नंतर परकीय शेअर बाजारात सूचिबद्ध होतात आणि या शेअर बाजारांमध्ये त्यांची खरेदी-विक्री केली जाते. कंपनी या जागतिक ठेव पावत्या थेट प्राथमिक शेअर बाजारात पब्लिक इश्यू म्हणून विकू शकते किंवा काही ठरावीक व्यक्तींच्या छोट्या गटाला या जागतिक ठेव पावत्या खाजगी रीत्याही विकल्या जाऊ शकतात.

जागतिक ठेव पावत्यांचे दोन प्रकार आहेत : (१) प्रायोजित जागतिक ठेव पावत्या : एखादी कंपनी पावत्यांच्या निर्मितीसाठी जेव्हा एखाद्या परदेशी रोखे ठेव-संस्थेशी औपचारिक रीत्या करार करते, तेव्हा निर्माण झालेल्या पावत्यांना प्रायोजित जागतिक ठेव पावत्या म्हणतात. या प्रायोजित जागतिक ठेव पावत्यांचे दोन उपप्रकार आहेत. (अ) भांडवलनिर्मिक जागतिक ठेव पावत्या : एखादी कंपनी जेव्हा नवीन समभाग विक्रीला काढून स्थानिक विश्वस्त बँकेकडे ठेवते आणि परदेशी रोखे ठेव-संस्था त्यावर जागतिक ठेव पावत्यांची निर्मिती करते, त्या वेळी त्या कंपनीसाठी नवीन भांडवल गोळा होते. या जागतिक ठेव पावत्यांना भांडवल निर्मिक जागतिक ठेव पावत्या म्हणतात. (ब) भांडवल ननिर्मिक जागतिक ठेव पावत्या : ज्या जागतिक ठेव पावत्यांच्या निर्मितीत नवीन समभाग विक्रीला काढले जात नाहीत आणि अस्तित्वात असलेले समभाग स्थानिक विश्वस्त बँकेकडे ठेव म्हणून ठेवले जातात, त्यांना भांडवल ननिर्मिक जागतिक ठेव पावत्या म्हणतात.

२) अप्रायोजित जागतिक ठेव पावत्या : परदेशी रोखे ठेव-संस्थेशी औपचारिक रीत्या करार न करता निर्माण झालेल्या जागतिक ठेव पावत्यांना अप्रायोजित जागतिक ठेव पावत्या म्हणतात. हा भांडवल उभारणीचा मार्ग नसून नफा कमावण्याचा मार्ग आहे; कारण कोणताही समभागधारक स्थानिक विश्वस्त बँकेकडे आपल्याकडील समभाग ठेव ठेवू शकतो आणि एखादी परदेशी रोखे ठेव- संस्था या समभागांचे जागतिक ठेव पावत्यांमध्ये रूपांतर करते. त्यामुळे या जागतिक ठेव पावत्यांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न हे मूळ कंपनीकडे जात नाही; ते समभागधारकाकडे जाते.

जागतिक ठेव पावत्याधारक जोपर्यंत ठेव पावत्या परत विकत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी निगडित समभाग स्थानिक विश्वस्त बँकेकडे शिल्लक राहतात. या समभागांची भारतीय शेअर बाजारात खरेदी-विक्री करता येत नाही. १९९९च्या परकीय चलन व्यवस्थापन कायद्यानुसार (Foreign Exchange Management Act, 1999) जागतिक ठेव पावत्याधारक ठेव पावत्या परत विकून बदल्यात निश्चित केलेल्या गुणोत्तराने समभाग ताब्यात घेऊ शकतो; परंतु हा पुनर्विक्री व्यवहार जागतिक ठेव पावत्याधारक गुंतवणूकदार, जागतिक ठेव पावत्याविक्रेती कंपनी, बँक आणि समभागांचे जागतिक ठेव पावत्यांमध्ये रूपांतर करणारी रोखे ठेव-संस्था यांच्यातील सुरुवातीच्या ठेव करारानुसारच होऊ शकतो. जागतिक ठेव पावत्यांचे व्यवहार सुरळीत पार पडावेत यासाठी भारत सरकारच्या कंपनी व्यवहार मंत्रालयाने २०१४ मध्ये जागतिक ठेव पावत्या नियमावली (Companies–Issue of Global Depository Receipts–Rules, 2014) तयार केली आहे. वित्त मंत्रालयाच्या १९९३च्या मूळ (Issue of Foreign Currency Convertible Bonds and Ordinary Shares – Through Depository Receipt Mechanism–Scheme, 1993) योजनेनुसार जागतिक ठेव पावत्यांचे व्यवहार पूर्ण केले पाहिजेत, असेही २०१४ची नियमावली सांगते. २०१४ च्या IDR (Indian Depository Receipts) नियमावलीनुसार आता भारतीय ठेव पावत्याही वापरात आहेत. एखाद्या परदेशी कंपनीचे समभाग तेथील स्थानिक विश्वस्त बँकेकडे ठेव म्हणून ठेवले जातात. त्यांचे IDRमध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी एखाद्या भारतीय रोखे ठेव-संस्थेकडे येते. ही भारतीय रोखे ठेव-संस्था या समभागांचे IDRमध्ये रूपांतर करते. त्याचे रूपांतर नंतर भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध होते आणि या शेअर बाजारांमध्ये त्यांची खरेदी-विक्री केली जाते. गेल्या काही वर्षांत जागतिक ठेव पावत्यांच्या व्यवहारांमध्ये प्रतिवर्षी ३० ते ४०% दराने वाढ होताना दिसत आहे. भारतात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने सर्वप्रथम जागतिक ठेव पावत्यांच्या माध्यमातून भांडवलउभारणीला सुरुवात केली. त्यानंतर विप्रो इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि आयसीआयसीआय सारख्या कंपन्या आणि वितीय संस्थांनीही जागतिक ठेव पावत्यांच्या माध्यमातून भांडवल उभारले.

संदर्भ :

  • Apte, P. G., International Financial Management, 2006.

समीक्षक – अनिल पडोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा