अधिक स्थिरता किंवा भांडवलावरील वाढीव उच्च परतावा या मुख्य उद्देशाने भांडवलाच्या एका गुंतवणुकीतून दुसऱ्या गुंतवणुकीची चळवळ म्हणजे भांडवलाचे संचारण होय. काही वेळा विशेषत: उच्च चलनवाढ किंवा राजकीय अस्थिरता या जोखीम टाळण्यासाठी भांडवलाचे संचारण होते. हे संचारण देशातील परकीय भांडवलाकडे उच्च परताव्याच्या आमिषाने आकर्षित होते. देशाच्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थेस प्रभावित करण्यासाठी बहिर्गत प्रवाह हा भांडवल संचारणासाठी कारणीभूत ठरतो. चलन अस्थिरता, कर प्रणाली, उच्च परतावा ही कारणेदेखील मुख्यत: भांडवलाच्या संचारणाला कारणीभूत असतात. मागील १० ते १५ वर्षांमध्ये देशामध्ये होणारी प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजेच एफ. डी. आय. हे विदेशी भांडवलाचे एक प्रकारचे संचारणाचे उदाहरणच होय.
आर्थिक परिणामांच्या घटनेमुळे जेव्हा संपत्ती किंवा पैसा वेगाने देशामधून बाहेर पडते, तेव्हा अर्थशास्त्रामध्ये भांडवलाचे संचारण किंवा उलाढाल उद्भवते. भांडवल संचारणामुळे देशातील कर्जामध्ये वाढ होऊ शकते किंवा देशामध्ये विदेशी भांडवलाची वाढ होऊ शकते. कर्जामध्ये वाढ झाल्यास गुंतवणूकदारांवर परिणाम होऊन आर्थिक शक्तीवरील विश्वासहार्यता कमीसुद्धा होऊ शकते. भांडवलाच्या संचारणामुळे विदेशी विनिमय दर बदलून चलनाची घसरण किंवा चलनवृद्धीदेखील होऊ शकते. देशातील पैसा बाहेर गेल्यास देशातील चलनाचे मूल्य घसरून सक्तीचे अवमूल्यनदेखील होते; कारण भांडवलाचे संचारण हे आंतरराष्ट्रीय उच्च परतावा किंवा देशातील परिस्थितीमुळेदेखील बाहेर जाते. परिणामत: अवमूल्यनाचा त्रास देशातील लोकांना व एकूणच अर्थव्यवस्थेला होतो. देशाचे चलन घसरल्यामुळे देशातील खरेदीशक्ती कमी होऊन परकीय वैद्यकीय सुविधा यासारख्या विदेशी वस्तू व सेवांची आयात महागते; मात्र निर्यात स्वस्त होऊन परकीय चलन कमी मिळू लागते.
भांडवल संचारणाबाबत कायदेशीरपणा : देशांतर्गत कायद्यानुसार भांडवल संचारण किंवा उड्डाण कायदेशीर असू शकते. भांडवलाचे संचारण हे देशातील कायद्यानुसार होत असल्यास त्याची कायदेशीर नोंद होत असते. कायद्यानुसार भांडवल संचारण झाल्यास म्हणजेच उच्च परतावे मिळावे म्हणून संचारण झाल्यास व्याज लाभांश रूपाने अशा प्रकारचे भांडवल देशातच परत येऊ शकतात; मात्र बेकायदेशीर भांडवल संचारण झाल्यास किंवा तसे असल्यास सरकारी प्राप्ती किंवा उत्पन्नामध्ये अशा भांडवलामुळे भर पडेलच किंवा भांडवल परत येईलच असे नाही.
देशांतर्गत भांडवलाचे संचारण : भांडवलाचे संचारण हे कधी कधी देशांतर्गत होताना दिसून येते. देशातील कोणत्याही राज्यातील किंवा शहरातील किंवा एखाद्या भागातील संपत्ती काढून घेण्यासाठी किंवा संपत्ती अंतरप्रवाहित करण्यासाठी भांडवलाचे संचारण होताना दिसून येते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मध्यवर्ती शहरांमधून ते उपनगरांना भांडवलाच्या उड्डाणाची राजधानी म्हणून ओळखले जात होते.
संसाधन : संसाधने आधारित अर्थव्यवस्था असलेले देश सर्वांत मोठे भांडवल संचारणाचा अनुभव अनुभवतात. आपल्या देशातील संपत्तीमध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने हे संचारण घडवून आणले जाते. वित्तीय बाजारांवर परिणाम घडवून आणण्यासाठी भांडवली संसाधनांचे संचारण विविध देशांतील अर्थव्यवस्था व रोखे बाजारामध्ये (शेअर मार्केट) केले जाते.
आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीने १९९५ मध्ये असा अंदाज वर्तविला होता की, भांडवलाचे संचारण हे देशातील विदेशी कर्जाच्या निम्म्या प्रमाणात आहे. १९९० च्या दशकात काही आशियाई आणि लॅटिन अमेरिकन बाजारांमध्ये भांडवलाचे संचारण दिसून आले. याचा परिणाम १९९७ ची आशियाई आर्थिक संकटाची सुरुवात थायलंडमध्ये झाली. पुढे हे संकट जागतिक मंदीला कारणीभूत ठरले. २००१ मध्ये अर्जेंटिनामध्ये आर्थिक संकटाने मोठ्या प्रमाणावर भांडवल संचारणाचा परिणाम दिसून आला. विदेशी कर्जामुळे आपली प्रतिमा कमी होईल, या भितीमुळे अर्जेंटिनातून भांडवलाचे संचारण होऊ लागले. विसाव्या शतकात उच्च व्याजदर मिळते, या उच्च परताव्याच्या आमिषामुळे विदेशामध्ये भांडवलाचे संचारण होऊन विदेशी गुंतवणूक वाढू लागली. २००९ मध्ये कर वाढीमुळे खाजगी उद्योजक व श्रीमंत उद्योगपती ब्रिटिश व्हर्जिन बेट या ठिकाणी कमी करांच्या कारणामुळे भांडवल ब्रिटनकडे आकर्षिले गेले. अलीकडे चीनमध्ये कमी उत्पादन व्ययामध्ये वस्तू निर्माण होत असल्याने तेथे आंतरराष्ट्रीय स्तरावरून भांडवल आकर्षिले जात असल्याचे दिसून येत आहे.
संदर्भ :
- Boyse, James; Ndikumana, Leonce, Capital Flight from Africa, Oxford, 2015.
- Epstein, Gerald A., Capital Flight and Capital Controls in Developing Countries, UK, 2017.
समीक्षक : सुहास सहस्त्रबुद्धे