लक्झेम्बर्ग, रोझा (Luxemburg, Rosa) : (५ मार्च १८७१ – १५ जानेवारी १९१९). प्रसिद्ध पोलिश अर्थतज्ज्ञ, तत्त्वज्ञानी. रोझा यांचा जन्म पोलंडमधील एका ज्यू कुटुंबात झाला. त्या वेळी पोलंड हा देश रशियन साम्राज्याचा भाग होता. लहानपणापासूनच क्रांतीकारी विचारांच्या असलेल्या रोझा यांना वयाच्या केवळ अठराव्या वर्षी तुरुंगवासापासून वाचण्यासाठी झुरीच, स्वित्झर्लंड येथे पलायन करावे लागले. देशाबाहेर राहूनदेखील त्यांनी झुरीच येथून आपले क्रांतीकार्य सुरूच ठेवले. हे करत असतानाच राजकीय अर्थशास्त्र, कायदा या विषयांचे शिक्षण घेऊन इ. स. १८९८ मध्ये त्यांनी डॉक्टरेट ही पदवी मिळविली. रोझा यांना जर्मनीचे नागरीकत्व होते. याच काळात पोलंड येथील समाजवादी पक्षाचे काम करत असताना त्यांची भेट लिओ जोगीशे यांच्याशी झाली. पुढे त्या दोघांनी विवाह केला आणि कौटुंबिक व सामाजिक स्तरावर कार्याचा आदर्श निर्माण केला.

रोझा यांचे रशियन पक्षाच्या विचारांशी सैद्धांतिक मतभेद होते. तसेच पोलंडमधील स्वनिश्चिततावादाशी त्यांनी फारकत घेतली होती. या दोन्ही विचारधारांशी वैचारिक मतभेद झाल्याने रोझा यांनी इ. स. १८९८ मध्ये बर्लिन येथे स्थलांतर केल्यानंतर जर्मनीतील लोकशाही समाजवादी कामगार पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. या पक्षाचे काम करत असतानाच त्यांनी इ. स. १९०० मध्ये रिफॉर्म ऑर रिव्होल्यूशन हे पुस्तक लिहिले. रोझा या सुधारणांच्या पुरस्कर्त्या असल्या, तरी त्यांच्या मते सुधारणांचे अंतिम उद्दिष्ट क्रांती हेच असायला हवे. रशियातील बोल्शेविक पक्षाला मदत करून मार्क्सवादी विचारांचा पुरस्कार केल्याबद्दल रोझा यांना तुरुंगवास भोगावा लागला. इ. स. १९०६ मध्ये प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढण्याचे प्रभावी शस्त्र म्हणून रोझा यांनी ‘सार्वत्रिक संप’ या प्रक्रियेचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. भांडवलवादाचा साम्राज्यावादाकडे होणारा प्रवास विशद करणारे दी ॲक्युम्युलेशन ऑफ कॅपिटल हे पुस्तक इ. स. १९१३ मध्ये त्यांनी लिहिले.

रोझा यांनी मार्क्स यांच्या विरोधविकासवादी तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला. कामगार आणि ‘नाही रे’ वर्गाच्या कल्याणासाठी त्या ‘आहे रे’ वर्गाशी आयुष्यभर झगडत राहिल्या. ‘भांडवलवादाचा परमोच्च बिंदू गाठला गेल्यावर वर्गसंघर्षाची जाणीव तीव्र होईल आणि तीच क्रांतीची सुरुवात असेल, अशा सर्वंकष क्रांतीची वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे’, असा आशावाद त्या नेहमी व्यक्त करत.

रोझा यांना पहिल्या महायुद्धाच्या काळात रशिया व जर्मनी या सरकारांविरोधी व क्रांतीकारी कार्याबद्दल अनेक वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले. इ. स. १९१८ मध्ये जर्मन सरकारने त्यांची तुरुंगातून मुक्तता केली; पण महिन्याभरातच जर्मन सरकारने विल्यम पिक, लायब्नेट व रोझा या जर्मन कमुनिस्ट पक्षाच्या संस्थापक नेत्यांना १५ जानेवारी १९१९ रोजी चौकशीच्या कारणास्तव अटक केली. या तिघांनाही देश सोडून जाण्याचा आदेश दिला गेला. रोझा आणि लायब्नेट यांना देशाबाहेर घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या जीपमधून त्यांचा मृतदेह बर्लिन येथील नदीत फेकून दिला गेला, असे म्हणतात. त्यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे. या जहाल नेत्यांच्या मृत्यूने जर्मनीमध्ये साम्यवादी विचारांचा क्रूरपणे गळा घोटला गेला आणि फासिस्ट विचारसरणीचा उदय झाला.

रोझा या कर्त्या विचारवंताच्या भूमिकेत आजन्म शोषित, वंचित लोकांच्या उदयासाठी कणखरपणे उभ्या असत आणि झुंजार वृत्तीने लढा देत. त्यांनी दी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑफ पोलंड (१८९८); दी मास्क स्ट्राईक (१९०६); दी क्रायसिस इन दी जर्मन सोशल-डेमॉक्रसी (१९१६); लेनीनीझम ऑफ मार्क्सिझम; सोशलिझम ऑर बार्बरीझम; कॉम्रेड अँड लव्हर; दी नॅशनल क्वेशन्स; लेटर्स फ्रॉम प्रिझन इत्यादी पुस्तके लिहिली.

समीक्षक : अनिल पडोशी