एक उपचार पद्धती. स्त्रियांमध्ये मूत्रमार्गाने व अपत्यमार्गाने, तर पुरुषांमध्ये मूत्रमार्गाने दिल्या जाणाऱ्या बस्तीस उत्तरबस्ती असे म्हणतात. आयुर्वेदामध्ये उत्तरबस्ती हा शब्दप्रयोग ‘उत्तरमार्गाने दिला जाणारा बस्ती’ तसेच ‘श्रेष्ठ बस्ती’ अशा दोन्ही अर्थाने आलेला आहे. उत्तरबस्ती हा अनुवासनाप्रमाणे स्नेह द्रव्य व निरुहाप्रमाणे काढ्याचा देता येतो.

उत्तरबस्ती

उत्तरबस्ती कोणास द्यावी ? : मूत्राशयगत व्याधी, मूत्रदाह, अश्मरी (Urine stone), मूत्रकृच्च (Dysuria), अष्ठीला (Obstruction) अशा व्याधींमध्ये उत्तरबस्तीचा उपयोग होतो. स्त्रियांमध्ये रजोविकार, योनिविकार, गर्भस्त्राव, वंध्यत्व, अनार्तव, योनीभ्रंश अशा विकारांत तर पुरुषांमध्ये शुक्रदोष, शुक्रोत्सेक, क्लैब्य, शुक्रदोष, शुक्राणूअल्पता, ध्वजभंग या विकारांमध्ये उत्तरबस्तीचा वापर करतात.

उत्तरबस्ती कोणास देऊ नये ? : पुरुषांमध्ये मूत्रमार्गात तीव्र शोथ, हर्षित मेढ्र अवस्था, मूत्रमार्गातील कर्करोग, अवरुद्ध अश्मरी अशा अवस्थेत उत्तरबस्ती देऊ नये. स्त्रियांमधील गर्भाशयग्रीवा पाक, गर्भाशय कर्करोग, गर्भाशय अर्बुद या विकारांमध्ये उत्तरबस्ती देऊ नये. तसेच कुमारिकांना उत्तरबस्ती देऊ नये.

साधने : (१) बस्तीनेत्र : सर्वसाधारणपणे पुरुषांमध्ये हे १२–१४ अंगुल दीर्घ, सोने किंवा चांदीचे बनलेले असावे. त्याचे छिद्र मोहोरी जाईल इतके असावे. त्याला एक मुलभागी, तर दुसरी मध्यभागी अशा दोन कर्णिका असाव्यात. नेत्रप्रवेश मधल्या कर्णिकेपर्यंत म्हणजेच ६–८ अंगुलेपर्यंत करावा. पुरुषांमध्ये बस्तीनेत्राचा आकार त्याच्या मेंढ्राच्या (शिश्नाच्या) आकारावर ठरवावा. बालकांमध्ये बस्तीनेत्र १ अंगुले इतकेच प्रविष्ट करावे. स्त्रियांमध्ये बस्तीनेत्र हे १० अंगुले लांब असावे. त्याचे छिद्र मुगडाळ जाईल एवढे असावे. अपत्यमार्गात ते ४ अंगुलेपर्यंत, तर मूत्रमार्गात २ अंगुलेपर्यंत प्रविष्ट करावे.

(२) बस्तीपुटक : उत्तरबस्तीची मात्रा कमी असल्याने बस्तीपुटक छोटे असावे.

(३) बस्तीद्रव्य : पुरुषांमध्ये एक वर्षाच्या मुलाला १/६ तोळा असा प्रत्येक वर्षी १/६ तोळा वाढवून २५ वर्षाच्या तरुणाला ४ तोळे असे बस्तीद्रव्याचे प्रमाण असावे. निरुह उत्तरबस्ती द्यायची असल्यास द्रव्य १ प्रसूत असावे. स्त्रियांमध्ये उत्तरबस्तीचे प्रमाण १ प्रसूत असावे; तर निरुह उत्तरबस्ती गर्भाशय शोधनासाठी २ प्रसूत असावे.

आधुनिक साधने : पुरुषांच्या उत्तरबस्तीसाठी ३ क्रमांकाची साधी रबरी नलिका/नळी (Simple rubber catheter), ५० मिली. व्ययक्षम प्लास्टिक पिचकारी (Disposable plastic syringe) वापरतात. तर स्त्रियांमध्ये कृत्रिम रेतन नलिका (Artificial insemination cannula किंवा शिशु संभरण नलिका (Infant feeding tube) व ५ किंवा १० मिली. पिचकारी वापरतात.

स्त्री उत्तरबस्ती विधी : समुचित काल : आर्तव प्रवृत्तीनंतर म्हणजेच ऋतुकाळात उत्तरबस्ती द्यावा. मासिक पाळीच्या चवथ्या ते सोळाव्या दिवसापर्यंतच्या या कालावधीत गर्भाशयाचे मुख बस्तीद्रव्य ग्रहण करण्यास योग्य असते.

पूर्वकर्म : प्रथम रुग्णाचे सार्वदेहिक परीक्षण व योनिपरिक्षण करावे. नंतर नितंब, कटी, वक्षण येथे स्नेहन व स्वेदन करावे. नंतर योनिधावन करावे. उत्तरबस्ती करण्यापूर्वी मलमूत्र विसर्जन केलेले असावे. बस्तीसाठी वापरण्यात येणारी साधने जंतुविरहित केलेली असावी. बस्तीद्रव्य सुखोष्ण असावे.

प्रधानकर्म : साधारणपणे उत्तानासनातील स्थितीप्रमाणे पाय गुडघ्यात दुमडून टाचा नितंबाजावळ आणून किंचित पसरून उभ्या स्थितीत ठेवावे. नंतर बस्तीद्रव्य हळुवार गर्भाशयात प्रविष्ट करावे. नंतर अपत्यमार्गात पिचू ठेवावा.

पश्चातकर्म : नंतर अधिशिरस्कासन म्हणजेच डोके खाली व कंबरेचा भाग वर असे एक तास झोपून राहावे. नंतर तीन दिवस श्रमाची कामे तसेच समागम टाळावा. क्वाथबस्ती दिली असेल तर ५ ते ८ मिनिटांत बाहेर येणे हा सम्यक योग होय. इतक्या वेळेत बाहेर न आल्यास तसेच शूल, मूत्रावसाद अशी लक्षणे दिसल्यास अवगाह स्वेद, नाडीस्वेद, मात्राबस्ती, निरुहबस्ती यांचा युक्तिपूर्वक वापर करावा. १२ ते २४ तासांपर्यंत अल्पशूल स्वाभाविक आहे. स्नेहबस्ती दिली असेल तर त्या स्नेहामुळे शरीरांतर्गत अवयव स्नेहाने लिप्त होतात, तर स्नेहाचा काही अंश प्रत्यागामीत होतो. उत्तरबस्ती चिकित्सा चालू असताना लघु, स्निग्ध असा आहार घ्यावा. समागम टाळावा. बस्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुग्ध, मुगाचे कढण, मांसरस, भात, तूप असे भोजन द्यावे. स्त्रियांमध्ये उत्तरबस्ती ३–५ दिवस द्यावा.

पुरुष उत्तरबस्ती विधी : समुचित काल : सकाळी ६ ते ९ किंवा सायंकाळी ४ ते ६ मलमूत्र विसर्जनानंतर उत्तरबस्ती करावा.

पूर्वकर्म : प्रथम रोग्याचे सर्वादेहिक तसेच स्थानिक परीक्षण करावे. श्रोणी, पार्श्व, अधोदर प्रदेशी स्नेहन स्वेदन करावे. वृषण व मेंढ्र प्रदेशी सुखोष्ण जलाने प्रक्षालन करावे. त्या ठिकाणी स्नेहन करावे, स्वेदन टाळावे.

प्रधानकर्म : रोग्याने उत्तनसायनात म्हणजेच उताने झोपावे. वैद्याने डाव्या हाताने मेंढ्राचा भाग घट्ट पकडून उजव्या हाताने त्यामध्ये घृतलिप्त बस्तीनेत्र प्रविष्ट करावे व हळुवार द्रव आत प्रविष्ट करावे.

पश्चातकर्म : रोग्याने ३० ते ६० मिनिटे उताने पडून राहावे. सुमारे ६० मिनिटांत ६०–७०% द्रव्य बाहेर येते. हाच सम्यक योग होय. २ ते ३ तासाने रुग्णाला अल्पभोजन द्यावे. उत्तरबस्ती काळात समागम टाळावा. पुरुषांमध्ये ७ ते १४ उत्तरबस्ती सलग किंवा एक दिवसाआड द्यावेत.

पहा : बस्ति.

संदर्भ :

  • अम्बिकादत्तशास्त्री, आयुर्वेद तत्त्वसंदिपिका, सुश्रुतसंहिता, चिकित्सास्थान ३७, चौखम्बा संस्कृत संस्थान प्रकाशन, वाराणसी, २००२.
  • नचिकेत वाचासुंदर, आयुर्वेदीय पंचकर्म विज्ञान, योनिधावन, श्री वैद्यनाथ आयुर्वेद भवन लि., नागपूर, २०११.
  • ब्रह्मानंद त्रिपाठी, चरकसंहिता, सिद्धीस्थान ९, चौखम्बा संस्कृत संस्थान प्रकाशन, वाराणसी, २००२.

समीक्षक : कौस्तुभ चौंडे