विरेचन हे आयुर्वेदात वर्णन केलेल्या पंचकर्मांपैकी एक कर्म होय. विरेचन म्हणजे विशेष प्रकारचे रेचन अर्थात शौचाच्या मार्गाने शरीराची शुद्धी करणे होय. शास्त्रोक्त पद्धतीने घडवून आणलेले जुलाब असे याचे स्वरूप असते. परंतु, येथे शौचमार्गाने केवळ विष्ठा बाहेर काढणे अभिप्रेत नसून जुलाबांद्वारे शरीरातील वाढलेले दोष बाहेर काढणे अपेक्षित असते. त्यासाठी काही विशिष्ट औषधांचा वापर केला जातो. त्वचारोग, कावीळ, प्लीहारोग, नागीण, जलोदर, हातापायांची आग होणे अशा अनेक व्याधीत विरेचन दिले जाते.
विरेचनाचे कार्य शरीरातील वात, पित्त व कफ या दोषांपैकी प्रामुख्याने पित्त ह्या दोषावर होते. विरेचन ही पित्ताने होत असलेल्या रोगांवरील श्रेष्ठ चिकित्सा सांगितली आहे. पित्त हे प्रामुख्याने शरीरातील जठर, आतडे ह्या पचनसंस्थेतील अवयवांत असते. जेव्हा पित्तामुळे विविध रोग होतात, तेव्हा ह्या वाढलेल्या पित्ताला सर्वात जवळच्या मार्गाने म्हणजे आतड्यातून शौचावाटे बाहेर काढणे हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यासाठी दिली जाणारी औषधे अधोगामी म्हणजे खालच्या दिशेला येण्याच्या स्वभावाची असतात. त्यामुळे ही औषधे सेवन केल्यावर सर्व शरीरातील पित्तदोष खालच्या दिशेला पोटात आणून शौचावाटे बाहेर काढतात.
विरेचन करण्यापूर्वी शरीरात विविध ठिकाणी पसरलेल्या पित्तादि दोषांना पातळ करून पोटात आणणे आवश्यक असते. त्यासाठी प्रकृतीनुसार तीन, पाच किंवा सात दिवस साधे किंवा औषधी तूप वाढत्या प्रमाणात पिण्यास दिले जाते. तसेच सर्व अंगास तेलाचे मालीश करून वाफेने शेक दिला जातो. आदल्या दिवशी रात्री पित्त वाढविणारा आहार देऊन दुसरे दिवशी सकाळी जुलाबाचे औषध दिले जाते. यानंतर काही काळात रूग्णास शौचाचे वेग येऊ लागतात. हे वेग नैसर्गिकरित्या थांबून शरीरशुद्धीची लक्षणे दिसल्यावर रूग्णास त्या दिवशी संपूर्ण आराम दिला जातो. दुसऱ्या दिवसापासून पातळ पेज, दाट पेज, मुगाचे कढण, मऊ भात, खिचडी अशा क्रमाने हळूहळू आहार सात दिवसांपर्यंत वाढविला जातो व सातव्या दिवसानंतर नेहमीचे जेवण सुरू केले जाते.
पहा : नस्य, पंचकर्म, बस्ति, रक्तमोक्षण, वमन, रेचके.
संदर्भ :
- चरक संहिता — कल्पस्थान अध्याय १ श्लोक ४, १४.
- चरक संहिता — सिद्धिस्थान अध्याय १ श्लोक ११; अध्याय २ श्लोक १३.
- चरक संहिता — सूत्रस्थान अध्याय १५ श्लोक १७; अध्याय २५ श्लोक ४०.
समीक्षक – जयंत देवपुजारी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.