योगशास्त्रासंदर्भात काम करणारी एक संस्था. योगशास्त्राचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने १९६० मध्ये वैद्यराज बाळासाहेब लावगनकर यांनी नाशिकमध्ये योग विद्या धाम या संस्थेची स्थापना केली. सध्या ही संस्था १५९ शहरांतून विविध कार्यकर्त्यांच्याद्वारे योगशास्त्राचा प्रसार करीत आहे. ६ जून १९८५ रोजी योग विद्या धाम, महाराष्ट्र तसेच भारतीय योग विद्या धाम आणि योग विद्या गुरूकुल या केंद्रीय संस्थांची स्थापना करण्यात आली. सद्यस्थितीत निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या १७,००० योगशिक्षकांची फळी या संस्थांच्या मार्फत उभारली गेली आहे. योग विद्या गुरूकुल संस्थेने योगशिक्षणाची एक स्वतंत्र शैली निर्माण करताना श्रेणीबद्ध अभ्यासक्रम तयार केला. यामध्ये साधकाच्या व्यक्तिगत प्रगतीसाठी योगप्रवेश, योगपरिचय, योगप्रबोध, योगप्रवीण आणि योगपंडित या पाच वर्गांची रचना केली; तर समाजकार्यात रुची बाळगणाऱ्या साधकांकरिता योगशिक्षक, योगअध्यापक आणि योगप्राध्यापक अशा तीन अभ्यासक्रमांची रचना केली. असे श्रेणीबद्ध आठ प्रकारचे ‘अष्टवर्ग’ हे या संस्थेचे असाधारण वैशिष्ट्य आहे.
योग विद्या गुरूकुल संस्था योगशिक्षण आणि शिक्षक, शिक्षक-प्रशिक्षणयाव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार उपचारात्मक वर्ग किंवा शिबिरे संस्थेमार्फतघेतली जातात; उदा., उच्चरक्तदाब निवारण, मधुमेह निवारण, हृदयरोग निवारण, स्थूलता निवारण, पाठदुखी निवारण, व्यसनमुक्ती शिबिर, प्रसूतीपूर्व योगाभ्यास शिबीर, टॉन्सिलायटीस निवारण वर्ग इत्यादी. आसनांच्या वर्गांच्या बरोबरीने प्राणायाम वर्ग, ध्यान वर्ग, योगनिद्रा वर्ग, प्रणवजप वर्ग, उंचीसंवर्धन वर्ग इत्यादी वर्ग घेतले जातात. हे सर्व अभ्यासक्रम परिणामकारक व लोकप्रिय झालेले आहेत.
योग विद्या गुरूकुलाद्वारे निसर्गोपचार प्रमाणपत्र अभ्यासक्रम (N.C.) तसेच निसर्गोपचार पदविका (N.D.) हे अभ्यासक्रम दूरशिक्षण तंत्राच्या आधारे राबविले जातात. योगाचे महत्त्व लक्षात घेऊन संस्थेने २०१३ मध्ये योगमहाविद्यालयाची स्थापना केली. यामार्फत योगशास्त्र पदविका, योगशास्त्र पदवी व योगशास्त्र पदव्युत्तर पदवी हे अभ्यासक्रम घेतले जातात.
योग हा विकारमुक्तीतही परिणामकारक असल्याने त्याचा उपचार पद्धती म्हणून मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. अनेक आजार योग आणि निसर्गोपचाराच्या साहाय्याने बरे होऊ शकतात. याकरिता संस्थेतर्फे डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अहमदनगर, जळगाव, कोल्हापूर इत्यादी ठिकाणीयोग व निसर्गोपचार केंद्रे चालविली जातात. नाशिकमध्ये योगभवन आणि पंचवटी भागात अनिवासी स्वरूपात आणि नाशिक रोड येथे निवासी स्वरूपात ही केंद्रे चालविली जातात. तसेच महाराष्ट्राबाहेर आसाम प्रांतात गुवाहाटी, तीनसुकीया, धरम, दुबुडी, दिब्रुगड या ठिकाणी नाशिकमधून निसर्गोपचार आणि योगोपचार शिकून तयार झालेल्या योगशिक्षकांनी नियमित उपचार केंद्रे चालू केलेली आहेत. आंध्रप्रदेशात हैदराबादजवळच्या निझामाबाद शहरातही योग व निसर्गोपचार केंद्र चालविले जात आहे.
योगाचा प्रसार व प्रचार समाजात प्रभावीपणे व्हावा आणि नागरिकांमध्ये योगाची आवड निर्माण व्हावी यासाठी एकदिवसीय निरनिराळ्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा याकरिता आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यशाळा लोकप्रिय होत आहेत. उदा., (१) अमृतयोग साधना, (२) निसर्गधारा, (३) तणावमुक्ती कार्यशाळा, (४) योग निसर्गदर्शन व्याख्यानमाला, (५) मन करारे प्रसन्न (६) आरोग्यं धनसंपदा (७) चैतन्य योगसाधना, (८) दिव्यत्वाची जेथे प्रचिती, (९) सुखी जीवनाची सप्तपदी, (१०) बहुरंगी योगदर्शन, (११) चैतन्याचा झरा इत्यादी. यांशिवाय योगप्रचारासाठी पुढील प्रकारचे (काहीसे मनोरंजनात्मक) कार्यक्रमही प्रस्तुत केले जातात — (१) योगकीर्तन, (२) जाहीर योगासन प्रात्यक्षिके, (३) योगगीतातून योगदर्शन, (४) योगनाट्य, (५) योगनृत्य.
या संस्थेने योगविषयक एकूण ६० पुस्तके प्रकाशित केली आहेत. याशिवाय योगासने सराव, योगनिद्रा, प्रणवोपासना, अनेक ध्वनिमंजूषा तसेच योगासन तक्ते इत्यादी निरनिराळ्या प्रकारचे साहित्य संस्थेने प्रकाशित केलेले आहे.
या संस्थेतर्फे १९७९ सालापासून सलग २२ वर्षे योग सुगंध (पूर्वी योगचिंतन) या मासिक मुखपत्राचे यशस्वी संपादन आणि प्रकाशन केले जाते. यातून अनेक प्रकारच्या योगविषयक लेखमाला प्रकाशित झालेल्या आहेत. याद्वारे नवनवीन साधकांना लेखनासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
सन २००२ मध्ये योग विद्या धाम या संस्थेने नाशिकपासून २८ किमी. अंतरावर त्र्यंबकेश्वर येथे ‘विश्वयोग दर्शन’ हा योग आश्रम बांधला. या ठिकाणी गुरूकुल पद्धतीने निवासी स्वरूपातील योग अभ्यासक्रम शिकविले जातात. या आश्रमात दरमहा विदेशी साधकांकरिता एक योगशिक्षकवर्ग चालविला जातो. साधारणत: ३० ते ४० साधक प्रत्येक वर्गात असतात. हा वर्ग पूर्ण केलेल्या साधकांकरिता प्रगत योगवर्ग व योगोपचार प्रशिक्षण वर्गही चालविला जातो. आश्रमाकडून आजूबाजूच्या आदिवासी भागांत गरजेच्या वस्तूंचे वाटप केले जाते. त्याशिवाय खेड्यांतून विहीर बांधून देणे, मंदिराचा जीर्णोद्धार, शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, कपडे यांचे वाटप, सूर्यनमस्कार स्पर्धा अशी अनेक अशी अनेक सेवाकार्ये आणि योगप्रचारकार्ये सतत सुरू असतात.
या संस्थेच्या वतीने २००७ सालापासून दरवर्षी डिसेंबर महिन्यात तीन दिवसांचे ‘राष्ट्रीय योग व संशोधन संमेलन’ आयोजित केले जाते. तसेच या संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय योग संमेलन देखील आयोजित केले जाते. याशिवाय गुरुकुलाच्या ४० शाखांमध्ये प्रतिवर्षी योगदिन साजरा केला जातो. यात योगासने, प्रात्यक्षिके, व्याख्याने, विनामूल्य योगवर्ग, प्राणायाम तसेच योगविषयक जनजागृती यासंबंधी कार्यक्रम आयोजित केले जातात.
संदर्भ :
- http://www.yogavidyagurukul.org/yog-vidya-gurukul/
समीक्षक : प्राची पाठक