हा हठयोगावरील संस्कृत भाषेतील ग्रंथ असून तो पद्यात्मक आहे. त्याचा काळ १७ वे शतक मानला जातो. ग्रंथाचा कर्ता कोण आहे याविषयी माहिती उपलब्ध नाही. योगशास्त्र हे सर्व शास्त्रांमध्ये श्रेष्ठ असून (१.७) योगाचे ज्ञान झाल्यावर सर्व काही ज्ञात होते. त्यामुळे अन्य शास्त्रांचा अभ्यास करण्यापेक्षा योगाचा अभ्यास करणे नितांत आवश्यक आहे. तसेच आत्मसाक्षात्कार व मोक्षप्राप्ती यांसाठी देखील योगशास्त्र उपयुक्त आहे, असे प्रतिपादन या ग्रंथात केले आहे (१.३, ३२, ४५).

शिवसंहितेत हठयोगाचे विवेचन केले असले तरी प्रस्तुत ग्रंथाला अद्वैत तत्त्वज्ञानाची बैठक लाभली आहे. या ग्रंथाच्या प्रकरण किंवा विभागांना पटल असे नाव असून ग्रंथाची विभागणी पाच पटलांमध्ये  केली आहे. प्रत्येक पटलाच्या शेवटी ‘इति श्री शिवसंहितायां योगशास्त्रे ईश्वरपार्वती संवादे’ क्वचित ‘उमामहेश्वरसंवादे’ असे शब्द येतात. यावरून प्रस्तुत ग्रंथ शिवपार्वतीतील संवाद आहे असे स्पष्ट होते. मात्र पहिल्या पटलाच्या प्रारंभी संवाद सूचित करणारे कोणतेही शब्द नाहीत. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या पटलाच्या प्रारंभी ‘ईश्वर उवाच’ असे शब्द आहेत; तर पाचव्या पटलाच्या प्रारंभी ‘देवी उवाच’ असे शब्द आहेत. देवीने ‘परमार्थाच्या वाटेवरील साधकाच्या वाटेत येणारी विघ्ने कोणती?’ असे विचारल्यावर त्याचे उत्तर ‘ईश्वर उवाच’ अशा शब्दानंतर येते.

पहिले (प्रथम) पटल : याचे नाव ‘लय प्रकरण’ किंवा ‘जीवभूमिका’ असे असून त्यामध्ये शिवसंहितेची दार्शनिक भूमिका स्पष्ट केली आहे. सत्य एकमेव असून ते द्वैतरहित, स्वयंप्रकाशी चैतन्य आहे. आत्मा हेच ते सत्य होय. ज्ञान हे त्याचे रूप आहे. आत्मतत्त्व सत्, चित् आणि आनंद आहे; तसेच तो नित्य, निराकार, गुणातीत व पूर्ण आहे. त्याला ‘पुरुष’ असेही म्हणतात. (१.१, ५०, ५३, ५४, ९१)

ज्ञानकांड आणि कर्मकांड हे वेदाचे दोन भाग असून काही कर्मे आचरण करण्यास योग्य असतात, तर काही निषिद्ध असतात. कर्माचे फळ भोगण्यासाठी जीवाला जन्म घ्यावा लागतो. ‘मी (जीवात्मा) परमात्म्याशी एकरूप असून उभयतांमधील भेद हा आभासी आहे’ अशी जाणीव योग्याच्या मनात सातत्याने असावी. ज्याप्रमाणे दोरी म्हणजे साप भासतो पण वस्तुत: ती दोरी असते. अज्ञान नष्ट झाल्यावर तो साप नव्हे, दोरी आहे हे कळते. त्याप्रमाणे अज्ञान नष्ट झाल्यावर जीवात्म्याला ‘मी अविनाशी आत्मा आहे’ हे ज्ञान होते. परिणामी जीवाचा आत्म्यामध्ये लय होतो. हा लय होण्यासाठी भोगांचा क्षय होणे आवश्यक आहे. योगाभ्यासाने तो साध्य  होतो (१.७). अन्यथा पुण्यक्षय झाला असता पुनर्जन्म प्राप्त होतो.

दुसरे (द्वितीय) पटल :  याचे नाव ‘तत्त्वज्ञानम्’ असे असून त्यामध्ये मानवी देहाचे वर्णन आढळते. मानवी देह  म्हणजे ब्रह्माण्डाची प्रतिकृती (२.१-५),   पुण्यस्थान, तपोवन किंवा देवालय होय. शरीरामध्ये इडा, सुषुम्ना, पिंगला या नाड्यांमधून अमृतधारा  निरंतर  प्रवाहित होत असते व शरीराचे पोषण करते. या पटलामध्ये प्रमुख नाड्यांचे स्थान व कार्य निर्दिष्ट केले आहे.  हठयोगावरील अन्य ग्रंथ १४ नाड्या मानतात, तर या ग्रंथात चित्रा नाडी अधिक मानली असल्याने  एकूण १५ नाड्यांचा निर्देश आढळतो. त्या पुढीलप्रमाणे — सुषुम्ना, इडा, पिंगला, गांधारी, हस्तिजिह्विका, कुहू, सरस्वती, पूषा, शंखिनी, पयस्विनी, वारुणी, अलम्बुसा, विश्वोदरी, यशस्विनी (२.१४-१५) आणि चित्रा (२.१८). कुंडलिनी देवता मेरुदंडाच्या मुळाशी मूलाधार चक्राच्या ठिकाणी वास करते (२.२१-२४). मानवी शरीरात सूर्यमंडल देखील आहे. त्यातील    वैश्वानर अग्नी अन्नाचे पाचन करतो, शरीरपुष्टीचे कार्य करतो व रोग दूर करतो (२.३३-३८). योगाभ्यासाद्वारे त्याला जागृत करावे असे ह्या पटलामध्ये सांगितले आहे. वासनांमुळे  केवळ दु:ख आणि क्लेश प्राप्त होतात. त्यामुळे वासना तसेच कामक्रोधादी विकारांचा त्याग करावा. परिणामी आत्मज्ञान आणि आत्मज्ञानाद्वारे जीवन्मुक्ताची अवस्था प्राप्त होईल.

तिसरे (तृतीय) पटल : याचे नाव ‘योगाभ्यासतत्त्वकथनम्’ असे असून त्यामध्ये योगसाधनेचे विविध आयाम स्पष्ट केले आहेत. हृदयरूपी कमळ हे प्राणाचे वसतिस्थान आहे. दहा प्राण (वायू), त्यांचे स्थान व कार्य यांचे वर्णन या पटलामध्ये आढळते. प्राणवायू हृदयात, अपानवायू गुदास्थानामध्ये, समानवायू नाभिमंडळात, उदानवायू कंठामध्ये, व्यानवायू सर्व शरीरभर संचार करतो. हे पाच मुख्य प्राण आहेत. उपप्राणांची कार्ये पुढीलप्रमाणे आहेत.  नागवायूचे कार्य – ढेकर, बोलणे, उचकी; कूर्मवायूचे कार्य- जांभई; कृकलवायूचे कार्य – डोळे उघडणे, मिटणे; देवदत्तवायूचे कार्य – तहान लागणे; धनंजयवायूचे  कार्य – भूक लागणे होय (३.१-९). प्रस्तुत पटलामध्ये नाडीशुद्धीच्या प्रक्रियेचे सविस्तर विवेचन आढळते.

प्राणायामामुळे व प्रणवजपामुळे  कर्माचा नाश होतो. योगामध्ये सफलता प्राप्त करण्याचा मार्ग, योगसाधनेतील विघ्ने आणि त्यासाठी गुरूच्या मार्गदर्शनाची आवश्यकता याचे विवेचनही यात केले आहे. योगाच्या ‘आरंभ, घट, परिचय, निष्पत्ती’ या चार अवस्था येथे संक्षेपाने सांगितल्या आहेत. मूलाधार, लिंगस्थान, नाभी, हृदय, भ्रूमध्य या पाच प्रदेशांवरील धारणा तसेच पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश या पाच भूतांवरील धारणा यांचे वर्णन येथे आले आहे. सिद्धासन, पद्मासन,  पश्चिमोत्तानासन, स्वस्तिकासन या चार आसनांचे विधि व फळ याविषयी देखील विवेचन केलेले दिसते.

चौथे (चतुर्थ) पटल : याचे नाव ‘मुद्रिकाकथनम्’ असे असून या पटलामध्ये दहा मुद्रांचे विवेचन केले आहे. प्रारंभी योनिमुद्राबंधाचे विस्तृत वर्णन आढळते. महामुद्रा, महाबंध, महावेध, खेचरी, जालंधरबंध, मूलबंध, विपरीतकरणीबंध, उड्डीयानबंध, वज्रोली आणि शक्तिचालन या दहा मुद्रांचे विवेचन या पटलामध्ये आले आहे. सहजोली व अमरोली यांची गणना वज्रोलीच्या प्रकारांमध्ये केली आहे. या सर्व मुद्रांचे विधि व फळ देखील या पटलामध्ये आले आहे. शक्तिचालन मुद्रेमध्ये कुंडलिनी जागृत होते आणि त्यामुळे योग्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. योगाचे हे ज्ञान गोपनीय आहे. त्यामुळे ते भक्त अथवा अधिकारी साधकाशिवाय अन्य कोणाला देऊ नये (१.१९, ४.९९).

पाचवे (पंचम) पटल : या पटलामध्ये भगवान शंकर पार्वतीला योग साधनेमध्ये येणारी विघ्ने आणि त्यांच्या निवारणाचे उपाय सांगतात. योगाच्या उपासनेमध्ये भोगरूपी, धर्मरूपी आणि ज्ञानरूपी असे विघ्नांचे प्रकार सांगितले आहेत. इंद्रियांच्या भोगांमध्ये रमणे, कर्मकांडामध्ये रमणे, ब्रह्माविषयी भ्रामक कल्पना बाळगणे अशी ही विघ्ने होत. साधकाचेही मृदुसाधक, मध्यसाधक, अधिमात्रक साधक, अधिमात्रतम साधक असे चार प्रकार त्याच्या साधनेच्या तीव्रतेनुसार सांगितलेले आहेत. हे चार प्रकारचे साधक अनुक्रमे मंत्रयोग, हठयोग, लययोग व राजयोग यांच्या साधनेचे अधिकारी होत. हठयोगाशिवाय राजयोग आणि राजयोगाशिवाय हठयोगाची परिपूर्ती होत नाही, म्हणून योग्याने आधी हठयोगाचा आणि नंतर राजयोगाचा अभ्यास करावा (५.२२२).

या पटलामध्ये प्रतीकोपासना, षट्चक्र तसेच नादश्रवण व लय यामुळे योग्याच्या शरीर व मनावर होणारा परिणाम यांचे विवेचन आले आहे. प्रतीक या संज्ञेचा अर्थ येथे रूढार्थापेक्षा सर्वस्वी निराळा आहे. स्वत:चे प्रतिबिंब आकाशात बघणे असा त्याचा येथे अर्थ आहे. तसेच कंठकूप, कूर्मनाडी, शिरकपालप्रदेश, नासाग्र यावरील ध्यान, विधि व त्या त्या ध्यानाचे फळ येथे वर्णिले आहे.

या ग्रंथाची आणखी काही वैशिष्ट्ये अशी आहेत.

१. ‘यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह |’ ही तैत्तिरीय  उपनिषदातील ओळ या ग्रंथात शब्दश: आली आहे (५.२२१).

२. बृहदारण्यक उपनिषदातील ‘आत्मा वाऽरे द्रष्टव्य: |’ (२.४.५)  या पंक्तीचे शिवसंहितेतील  १.३२ या पद्याशी साम्य आहे.

३. जगत् – ‘अरि, मित्र, उदासीन’ या सर्व रूपात  भासते (१.६७). या ठिकाणी कौटिल्य अर्थशास्त्राचा प्रभाव जाणवतो.

४. पृथ्वी शीर्णा जले मग्ना जलं  मग्नञ्च तेजसि | लीनं वायौ तथा तेजो व्योम्नि वातो लयं ययौ || (१.८१) या पंक्ती काव्याचा नितांत सुंदर नमुना आहे. (पृथ्वीतत्त्व विघटित झाल्यानंतर जलतत्त्वात विलीन होते, जलतत्त्व विघटित झाल्यावर अग्नीतत्त्वात विलीन होते, तसेच वायुतत्त्व आकाशतत्त्वात विलीन होते.)

५. या ग्रंथामध्ये अध्यारोप, अपवाद, अपरोक्ष, माया यासारख्या वेदान्तातील संज्ञा आढळतात (५.२१५-२१६).

६. या ग्रंथामध्ये मानवी देहाला ब्रह्माण्ड ही संज्ञा योजली आहे (१.९५, २.५,३७).

७. या ग्रंथावर अनेक ठिकाणी गीतेचा प्रभाव जाणवतो. उदाहरणार्थ – वैश्वानराग्निरेषो वै मम तेजोंऽशसम्भव: | (२.३४) (माझ्या तेजाच्या अंशातून निर्माण झालेला हा वैश्वानर अग्नी…), आत्मानमात्मना पश्यन् | (२.५६) (आपल्या आत्म्याद्वारे आत्म्याला पाहताना…)

८. या ग्रंथात हठयोग आणि राजयोगाचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला आहे.

हठं विना राजयोगो राजयोगं विना हठ: | तस्मात् प्रवर्तते योगी हठे सद्गुरुमार्गत: || (५.२१७) हठयोगाशिवाय राजयोग आणि राजयोगाशिवाय हठयोग साध्य होत नाही, म्हणून योग्याने सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली हठयोग शिकावा.

संदर्भ : शिवसंहिता, कैवल्यधाम, लोनावला, १९९९ .

                                                                                                                                                समीक्षक : प्राची पाठक