योगाच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था. दी लोणावळा योग इन्स्टिट्यूट (इंडिया) ही संस्था डॉ. मनोहर लक्ष्मण घरोटे यांनी १ जून १९९१ रोजी स्थापन केली. या संस्थेला परमहंस माधवदास महाराज आणि स्वामी कुवलयानंद यांच्या ज्ञानाचा वारसा आणि परंपरा लाभलेली असून आधुनिक काळात योग सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य स्वामी कुवलयानंद आणि डॉ. मनोहर लक्ष्मण घरोटे या गुरु-शिष्य जोडीने केले. स्वामी कुवलयानंदांकडून व्यक्तिश: घेतलेल्या योगविषयक प्राचीन हस्तलिखितांमधील ज्ञानाचा स्वामीजींच्या देहावसानानंतरही अव्याहत प्रसार आणि प्रचार करण्यासाठी डॉ. मनोहर लक्ष्मण घरोटे यांनी दी लोणावळा योग इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली.

संस्था

प्राचीन आणि परंपरागत योग आधुनिक काळात जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय अनेक संप्रदाय आणि परंपरांना जाते. परंतु, प्राचीन ग्रंथसंपदा आणि त्यातील गूढ अर्थाचे ज्ञान नसल्यामुळे आधुनिक काळामधे योगविषयाबद्दल अनेक गैरसमज प्रचलित आहेत. हे गैरसमज दूर करावयाचे असतील, तर योगविषयक प्राचीन आणि पारंपरिक ग्रंथांचे ज्ञान मिळविणे क्रमप्राप्त आहे. आधुनिक काळाची गरज ओळखून आणि प्राचीन ग्रंथांचे ज्ञान समाजाच्या समोर आणण्याच्या हेतूने दी लोणावळा योग इन्स्टिट्यूट या संस्थेने ‘योगविषयक प्राचीन ज्ञानाचे पुनरुत्थान’ या संकल्पनेला सुरुवात केली. अल्पावधीतच संस्थेमध्ये होणाऱ्या योगविषयक हस्तलिखितांवरील मूलभूत संशोधनाच्या कार्यामुळे ही संस्था नावारूपाला आली. या संस्थेमध्ये योगशास्त्राविषयी ७०० पेक्षा जास्त प्राचीन हस्तलिखिते असून संस्थेमार्फत योगविषयक अप्रकाशित अशा अनेक प्राचीन ग्रंथांचे प्रकाशन प्रथमच करण्यात आले. त्याद्वारे गुप्त आणि बंदिस्त असलेल्या ज्ञानाची कवाडे सर्वांना खुली झाली.  या संस्थेची अनेक प्रकाशने देशात आणि परदेशात योगअभ्यासक्रमासाठी प्रमाणभूत ग्रंथ म्हणून वापरण्यात येतात. या ग्रंथांचा जर्मन, पोर्तुगीज, स्पॅनिश, कोरियन व जपानी यांसारख्या अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. यामुळे जगभरातील योगसाधक आणि योगशिक्षक यांना योगाच्या वास्तविक, दार्शनिक आणि व्यावहारिक स्वरूपाची जाणीव होत आहे.

या संस्थेने प्रकाशित केलेले जुन्या हस्तलिखितांवर आधारित आणि अन्य ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत – (१) हठप्रदीपिका  (दहा प्रकरणे), (२) हठरत्नावली, (३) हठतत्त्वकौमुदी, (४) हठप्रदीपिकावृत्ती, (५) आसनांचा विश्वकोश, (६) यौगिक प्रक्रिया, (७) यौगिक प्रक्रियांचे मार्गदर्शन, (८) प्राणायाम- श्वासाचे शास्त्र, (९) सिद्धान्त आणि मार्गदर्शक तत्त्वे, (१०) ॲन इन्ट्रोडक्शन टू युक्तभवदेव ऑफ भवदेव मिश्रा, (११) युक्तभवदेव ऑफ भवदेव मिश्रा, (१२) स्वामी कुवलयानंद – अ पायोनिअर ऑफ सायंटिफिक योगा अँड फिजिकल एज्युकेशन, (१३) प्राणायाम – द सायन्स ऑफ ब्रीथ-थिअरी अँड गाइडन्स फॉर प्रॅक्टिस, (१४) कुंभक पद्धती ऑर सायन्स ऑफ प्राणायाम, (१५) ट्रॅडिशनल थिअरी ऑफ इव्होल्युशन अँड इट्स ॲप्लिकेशन इन योगा, (१६) सिद्ध-सिद्धांतपद्धति ऑफ गोरक्षनाथ, (१७) एन्सायक्लोपिडिया ऑफ ट्रॅडिशनल आसनाज्, (१८) गाइड्लाइन फॉर योगिक प्रॅक्टिस, (१९) क्रिटिकल एज्युकेशन ऑफ योगोपनिषद, (२०) थेरॉटिक रेफरेन्सेस इन ट्रॅडिशनल योगा टेक्स्ट, (२१) अमनास्कयोगा (Amanaskayoga), (२२) मिरॅक्युलस व्हिजडम ऑफ सद्गुरु श्री साटम महाराज – इसेन्स ऑफ स्पिरीच्युॲलिटी, (२३) अमृतवाक्यम्, (२४) दत्तात्रेययोगशास्त्रम, (२५) क्रिटिकल एज्युकेशन ऑफ योगोपनिषद-मंडलब्राह्मणोपनिषद अँड नादबिंदुपनिषद, (२६) ग्लॉसरी ऑफ योगा टेक्स्ट इत्यादी.

या संस्थेच्या अर्जेंटिना, ब्राझील, क्रोएशिया, जर्मनी, स्वित्झर्लंड, पोर्तुगाल, इटली आणि थायलंड इत्यादी देशांमध्ये शाखा असून त्याद्वारे तेथील विद्यार्थ्यांना प्राचीन योगविषयक ग्रंथांचे सखोल ज्ञान त्यांच्या अभ्यासक्रमामार्फत देण्यात येते. डॉ. मनोहर लक्ष्मण घरोटे यांच्या देहावसानानंतर त्यांचे सुपुत्र डॉ. मन्मथ मनोहर घरोटे हे अध्यक्ष या नात्याने या संस्थेची धुरा वाहत आहेत. या संस्थेमार्फत योगाचे ज्ञान जागतिक स्तरावर नेण्यासाठीते चर्चासत्र आणि संमेलनांचे आयोजन केले जाते. सध्या या संस्थेमध्ये अनेक हस्तलिखितांवर कार्य सुरू आहे आणि पुढील काळात अप्रकाशित आणि दुर्मिळ ग्रंथसंपदेचे प्रकाशन करण्याचा संस्थेचा मनोदय आहे.

समीक्षक  : कला आचार्य