मुद्रा ह्या शब्दाचे सामान्य अर्थ चिह्नांकित खूण, नाव कोरलेली अंगठी, मोहरबंद करण्यासाठी वापरण्यात येणारा शिक्का वा तत्सम वस्तू असे बरेच होत असले तरी योगशास्त्रात हठयोगाशी संबंधित विशिष्ट शारीरिक आकृतिबंध या अर्थाने मुद्रा हा शब्द आलेला आहे. संस्कृत धातु ‘मुद्’ म्हणजे ‘आनंदित होणे’ यापासून मुद्रा हा शब्द तयार झाला आहे. ‘मुदमानन्दं ददाति इति मुद्रा’ असे शारदातिलक या ग्रंथात म्हटले आहे. अर्थातच मुद्रांच्याद्वारे स्वास्थ्याचा, शरीर-मनाच्या तसेच आत्मा व परमात्मा या तत्त्वांच्या संयोगाचा आनंद घेणे अभिप्रेत आहे.

मुद्राविषयक उल्लेख किंवा वर्णन प्राचीन वैदिक ग्रंथ, उपनिषदे, पुराणे, आयुर्वेदिक ग्रंथ, तांत्रिक ग्रंथ इत्यादींमध्ये कमी-अधिक प्रमाणात आढळते. हठयोगावरील हठप्रदीपिका तसेच घेरंडसंहिता ह्यासारख्या ग्रंथांमध्ये त्यांचे योगशास्त्रीय दृष्टिकोनातून विस्तृत वर्णन आले आहे. मुद्रा हा विषय केवळ सिद्धांताचा नसून साधनेचा असल्यामुळे त्यासाठी गुरूचे प्रत्यक्ष मार्गदर्शन व प्रशिक्षण आवश्यक आहे.

हठयोगात आसन, बंध व मुद्रा ह्या तीन संज्ञांनी काही विशिष्ट शारीरिक आकृतिबंधांचा निर्देश होतो. आसने व बंध हे संपूर्ण शरीराशी वा शरीराच्या काही भागांशी निगडित असतात, तर बहुतांशी मुद्रा ह्या प्रामुख्याने हातांची बोटे व चेहेरा यांच्या विशिष्ट हालचालींशी किंवा आकृतिबंधांशी संबंधित असतात. मात्र काही ग्रंथांमधून मुद्रांमध्येच बंधांचा समावेश केलेला आढळतो. आसनांमध्ये इंद्रियप्रधानता असते, तर मुद्रा ह्या प्राण प्रधान असतात. मुद्रांमध्ये हातांच्या बोटांची टोके एकमेकांशी अथवा तळहाताच्या विविध भागांजवळ दाबून धरणे, दृष्टी भुवयांच्या मध्यभागी वा नासाग्रावर केंद्रित करणे, जीभ वरच्या दिशेने उलटी वळवून टाळूला चिकटवणे इत्यादी अनेक प्रकारच्या कृती येतात.

शरीरांतर्गत ऊर्जा ही शरीराच्या सर्वांत टोकाकडील भागांतून जसे मस्तक, हातांची व पायांची बोटे, गुदद्वाराकडील भाग इत्यादींमधून सतत बाहेर पडत असते. बाहेर पडणाऱ्या ह्या प्राण ऊर्जेला अडवून शरीराच्या अंतर्भागाकडे वळविण्याचे व त्यायोगे शरीराच्या विविध भागांना शक्ती पुरवण्याचे कार्य मुद्रा करतात. मूलत: मुद्रा ह्या मनातील भावना व विचार व्यक्त करण्याचे साधन समजल्या जात असल्या तरी योगसाधनेत त्यांच्या सहाय्याने शरीर व मनावर अपेक्षित व योग्य परिणाम घडवून आणण्याचा शास्त्रशुद्ध प्रयत्न केला जातो. एवढेच नव्हे, तर हा परिणाम जीवात्म्याच्या अस्तित्वदर्शक अशा अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय या पाचही कोशांवर होतो. म्हणजेच मुद्रांचा परिणाम हा स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत घडतो.

शरीरांतर्गत बाधा दूर करणाऱ्या आसने, प्राणायाम, बंध अशा स्थूल स्वरूपाच्या योगांगांचा पुरेसा सराव झाल्यानंतरच सूक्ष्म स्वरूप असलेल्या मुद्रांचा अभ्यास केला जातो. मुद्रेमध्ये शारीरिक व मानसिक दोन्ही पातळ्यांवर क्रिया घडते म्हणूनच मुद्रा ही आसन व प्रत्याहार ह्या मधील सेतू मानली जाते. आसनांनी अन्नमय कोशाच्या पातळीवर म्हणजेच शारीरिक पातळीवर दृढता प्राप्त होते, तर मुद्रांच्या योगे प्राणमय व मनोमय कोशाच्या पातळीवर स्थिरता प्राप्त होते. योगसाधनेचा उद्देश शरीरात जास्तीत जास्त प्राणऊर्जा निर्माण करणे, साठविणे व योग्य ठिकाणी, योग्य  कार्याकडे वळविणे असा असल्यामुळे ऊर्जास्रोतांना शरीरांतर्गत रोखून ठेवणाऱ्या मुद्रा महत्त्वाच्या ठरतात. स्थूल स्वरूप असलेली आसने किंवा बंध ह्यांच्या तुलनेत मुद्रासाधना सूक्ष्म तरीही सोपी असून शरीरांतर्गत शक्तिकेंद्रांवर व मानसिक अवस्थांवर होणारा तिचा परिणाम मात्र खोलवर होतो. मुद्रांच्या याच प्रभावामुळे योगसाधनेच्या दरम्यान चित्ताला बाह्य जगापासून अंतर्गत अनुभूतीकडे वळविणे सोपे जाते, विचारप्रवाहांना योग्य दिशेने नेता येते व त्यायोगे साक्षीभाव प्राप्त होऊन अधिक सूक्ष्म व अधिक उच्च पातळीवरील अनुभव घेता येतात.

मुद्रांचे वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे केले जात असले तरी योगशास्त्रीय दृष्टिकोनातून मुद्रांच्या विशिष्ट फलप्राप्तिनुसार त्यांचे दोन भागात वर्गीकरण करता येईल : (१) शरीरांतर्गत पंचतत्त्वांचे नियमन करणाऱ्या मुद्रा (२) प्राणोत्थान व कुण्डलिनी-जागृती करणाऱ्या मुद्रा.

ब्रह्मांड हे जल, अग्नी, वायु, आकाश व पृथ्वी या पंचतत्त्वांनी युक्त असून आपला देहदेखील त्याच पंचतत्त्वांपासून बनलेला आहे. आपल्या हाताची पाचही बोटे त्या पाच तत्त्वांचे प्रतिनिधित्व करतात. अंगठा अग्नि तत्त्वाचे, तर्जनी वायु तत्त्वाचे, मध्यमा आकाश तत्त्वाचे, अनामिका पृथ्वी तत्त्वाचे तर कनिष्ठिका जल तत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. ह्या पंचतत्त्वांच्या समस्थितीमुळे देह निरोगी राहतो, तर विषम स्थितीमुळे रोगनिर्माण होतात. ह्या पाच तत्त्वांमध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी विविध मुद्रा म्हणजेच बोटांच्या विशिष्ट हालचाली वा आकृतिबंध ( उदा., वायुमुद्रा, पृथ्वीमुद्रा, शून्यमुद्रा इत्यादी) सांगण्यात आलेल्या आहेत. ज्या केल्या असता त्या त्या तत्त्वाशी निगडित शरीरांतर्गत विविध ग्रंथी, अवयव व त्यांचे कार्य ह्यांचे नियमन केले जाऊ शकते.

मुद्रासाधना ही इतर शारीरिक आसनांना पूरक ठरते. म्हणूनच काही मुद्रा विशिष्ट आसनांच्या वेळी (उदा., ज्ञानमुद्रा सिद्धासनाच्या वेळी) सांगितल्या जातात. त्याचप्रमाणे चित्ताला बाह्य जगापासून वळवून आत्मसंवेदनेकडे आणण्याचे महत्त्वाचे काम मुद्रांच्या नियमित सरावाने साधले जाते. ज्ञानमुद्रा, योगमुद्रा यासारख्या काही मुद्रा ध्यान, धारणा व समाधी साधण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच विशिष्ट मुद्रांचा उपयोग परंपरेने प्राणायामाच्या वेळीही केला जातो, तर महामुद्रेसारख्या मुद्रांमध्ये विशिष्ट शारीरिक आसन, जालंधर व मूलबंध तसेच प्राणायाम हे देखील अंतर्भूत केले जातात. यावरून अष्टांगयोगाच्या आसनादि अनेक अंगांना मुद्रा पूरक आहेत हे लक्षात येते.

हठप्रदीपिका  (३.६-७) ह्या ग्रंथानुसार महामुद्रा, महाबंध, महावेध, खेचरी, उड्डीयान, मूलबंध, जालंधर, विपरीतकरणी, वज्रोली व शक्तिचालनी ह्या कुंडलिनी जागृती करणाऱ्या दहा मुद्रा आदिनाथांनी सांगितल्या आहेत. त्यांच्या सरावाने वार्धक्य व मृत्यू दूर ठेवता येतात व आठ प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होऊ शकते. सिद्धी देणाऱ्या ह्या दहा मुद्रांसह एकूण पंचवीस मुद्रा त्यांच्या फलांसह घेरंडसंहितेत वर्णिल्या आहेत. ह्या मुद्रांचे ज्ञान कोणाही अपात्र व्यक्तीला देवू नये, तर ते गुप्त ठेवावे व योग्य साधकालाच द्यावे असे ग्रंथकर्त्याने आवर्जून सांगितलेले आहे.

मुद्रांच्या नियमित अभ्यासाने शारीरिक स्वास्थ्याखेरिज मनाची एकाग्रता तसेच बुद्धीची धारणा शक्ती व स्मरणशक्ती वाढणे, नकारात्मक विचार, ताण-तणाव दूर होणे, क्रोधादि षड्रिपुंवर नियंत्रण मिळवणे, चेहेऱ्यावरील तेज वाढणे, निद्रा, भूक व तहान यावर नियंत्रण प्राप्त होणे इत्यादी अनेक लाभ होतात. मुद्रा हे सर्वश्रेष्ठ सिद्धिदायक साधन होय असे घेरंडसंहितेत (३.१००) म्हटले आहे.

थोडक्यात देहाच्या माध्यमातून शुद्ध, निरंजन अशा स्व-रूप प्राप्तीचा मोद मिळवून देतात त्या मुद्रा होत, ही तंत्रालोक (३२.३) ग्रंथात दिलेली व्याख्या समर्पक ठरते. मुद्रासाधना ही योगसाधनेची स्वतंत्र व संपूर्ण शाखा ठरते.

योगशास्त्राखेरीज नाट्यशास्त्र (मुख्यत: नृत्य) व तांत्रिक-साधनेमध्येही मुद्रा ही संकल्पना आढळते. नाट्यशास्त्रानुसार मुद्रा म्हणजे मनातील विशिष्ट भाव-भावना, संवेग, चित्तवृत्ती इत्यादी व्यक्त करण्यासाठी केलेला शारीरिक — विशेषत: मौखिक व हस्त — अभिनय होय. देव-देवतांच्या तसेच गौतम बुद्धादी अनेक योगी व मुनींच्या प्रतिमांमध्ये अभय-मुद्रा, ज्ञान-मुद्रा इत्यादी मुद्रा ठळकपणे दिसून येतात.

तांत्रिक साधनेमध्ये मुद्रा ह्या संज्ञेचे अनेक अर्थ आढळतात. साधनेदरम्यान देवतेशी संवाद साधण्यासाठी, मनातील भाव प्रकट करण्यासाठी केलेली हातांची वा बोटांची विशिष्ट हालचाल म्हणजे मुद्रा असून तिचा उपयोग मन एकाग्र करण्यासाठी, तसेच देवतेशी एकरूपत्व साधण्यासाठी व दैवी शक्ती स्वत:कडे आकर्षित करून घेण्यासाठी होतो. देवतार्चन करताना आवाहनी, स्थापनी इत्यादी मुद्रा दाखवाव्यात असे पुराणांमध्ये (गरुडपुराण ३२.२०) म्हटलेले आहे.

पहा : नृत्यमुद्रा, हस्तमुद्रा.

संदर्भ :

  • स्वामी दिगम्बरजी, डा. पिताम्बर झा, हठप्रदीपिका, श्रीमन्माधव योगमन्दिर, कैवल्यधाम समिती, लोनावला, पुणे, १९८०.
  • Rai Bahadur Srisa Chandra Vasu, The GherandaSamhita, Chaukhamba Sanskrit Pratishthan, Varanasi, 2011.
  • Swami Satyananda Saraswati : Asana Pranayama Mudra Bandha, Bihar School of Yoga, Munger, Bihar, 1993.
  • Swami Satyananda Saraswati & Swami Niranjanananda Saraswati : Mudra Vigyan : Philosophy and Practice of Yogic Gestures, Bihar School of Yoga, Yoga Publication Trust, Munger, Bihar, 2013.

समीक्षक :  कला आचार्य