जनार्दनस्वामी : (१८ नोव्हेंबर १८९२ — २ जून १९७८). जनार्दनस्वामी यांचे पूर्वाश्रमीचे नाव जनार्दन गोडसे असे होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवठी ह्या गावी झाला. जनार्दनस्वामी यांनी वेद, वेदान्त, स्मृति, व्याकरण, ज्योतिषविद्या व आयुर्वेद यांचे प्रगाढ अध्ययन केले होते. नर्मदा-परिक्रमा करताना गुजरातमध्ये सिद्धपुरा येथे त्यांची एका अनामिक योग्याशी भेट झाली. त्यांनी जनार्दन यांना योगाची दीक्षा देऊन त्यांचे जनार्दनस्वामी असे नामकरण केले. गुरूंच्या उपदेशानंतर योगाचा उपयोग समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी करण्याच्या हेतूने जनार्दन स्वामी घराबाहेर पडले आणि संन्यस्त वृत्तीने योगाचा प्रसार करणे हेच त्यांनी आपले जीवनकार्य निश्चित केले. त्यांची योगविषयक धारणा श्री. भा. वर्णेकर यांनी पुढील श्लोकात शब्दबद्ध केली आहे — समाधानाय सौख्याय नीरोगत्वाय जीवने | योगमेवाभ्यसेत् प्राज्ञ: यथाशक्ति निरन्तरम् || (अर्थ – बुद्धिमान माणसाने जीवनात समाधान, सौख्य आणि निरामय जीवनाच्या प्राप्तीसाठी योगाचाच निरंतर व यथाशक्ती अवलंब करावा.)

जनार्दनस्वामी

जनार्दनस्वामींनी १९४२ पासून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि बिहार या भागांत योगाचा प्रसार केला. १९४९ मध्ये ते नागपुरात आले व यानंतर नागपूर हीच त्यांची कर्मभूमी झाली. जातपात व धर्म न पाहता सर्व स्तरातील लोकांना त्यांनी घरोघरी जाऊन योगाचे शिक्षण दिले. योगप्रचारात त्यांचा भर प्रामुख्याने आसने व प्राणायाम यांवर होता. “आसनांच्या विचारांची बैठक मुळात ही शरीराच्या ज्ञानप्रवाहाचा मुख्य मार्ग असा पाठीचा कणा लवचिक ठेवणे, सांधे मोकळे ठेवणे, ज्ञानेंद्रियांची शक्ती वाढवणे, अंत:स्रावी ग्रंथींची कार्यक्षमता वाढवणे, स्त्रियांचे आरोग्यरक्षण करून उत्तम प्रजा निर्माण करणे, विविध प्रकारच्या रोगांचा नाश करणे व आध्यात्मिक उन्नतीला बाधक असणारे रज-तम गुण कमी करून सत्त्व गुणांची वाढ करणे अशी आहे व अशा उच्च भावनांनी प्रेरित होऊनच योगासनांची रचना शास्त्रकारांनी केली आहे,” अशा शब्दांत जनार्दनस्वामींनी आसनांचे महत्त्व विशद केले आहे. शरीरावरील आसने व प्राणायाम यांच्या परिणामांबाबत त्यांनी वैज्ञानिक तथ्यांवर आधारित विचार केला.

स्वामीजींनी सांगितलेल्या योगसाधनेमुळे अनेक लोक शारीरिक व मानसिक विकारांतून मुक्त झाले. मात्र स्वामीजींच्या मते विकारांपासून मुक्ती एवढेच योगसाधनेचे मर्यादित ध्येय नव्हते. “योगासने आणि फार तर प्राणायाम एवढ्यावरच आपण लोकांना समाधान मानावयास का लावता? अंतरंग योगसाधनेचा सामाजिक प्रकल्प आपण का हाती घेत नाही?,” या श्री. भा.वर्णेकर यांच्या प्रश्नावर स्वामीजींचे म्हणणे होते की, “इथे येणाऱ्यांचे तेवढ्यावरच समाधान होते. त्यांच्या जिज्ञासेचे बोट धरून नेता येईल तेवढेच पुढे नेता येते. शिवाय शरीर-मन-बुद्धी परस्पर गुंतलेली असतात. त्यातील एक सावरा, निरोगी करा, दृढ करा, मग दुसरे अन्य त्यामागोमाग येतील. मनाद्वारे राजयोग आणि शरीराद्वारे हठयोग, या दोन्हींचे लक्ष्य एकच आहे. केवळ रोगमुक्तीसाठी योगाकडे लोकांची धाव असते. त्यामुळे आध्यात्मिक अनुभूती दूर राहिली आहे”. (योगप्रकाश दीपावली विशेषांक २०१७ पृ.१४७).

सुख-दु:खातून सुटण्यासाठी ईश्वरोपासना, योगसाधना व अध्यात्मचिंतन या तीन  उपायांनी साधकाने साधना करावी; आत्मसाक्षात्कार प्राप्त करावा, त्याद्वारे मुक्ती मिळविली तरच मानवीजीवन सफल होते असा स्वामीजींचा विश्वास होता.

जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर.

जनार्दनस्वामींनी ‘बृहन्महाराष्ट्र योग परिषद’ स्थापन केली. या परिषदेमार्फत ते महाराष्ट्र योग संमेलन भरवीत व त्याला स्वत: आवर्जून उपस्थित राहत असत. १९५३ साली त्यांनी महाराष्ट्र मंडळात योगावर प्रात्यक्षिकांसह व्याख्यान दिले. त्यांना योगाचार्य काशीनाथ सहस्रबुद्धे, श्रीकृष्ण व्यवहारे यांसारखे शिष्य लाभले. जनार्दनस्वामींनी १९५१ मध्ये नागपूर येथे ‘योगाभ्यासी मंडळ’ स्थापन केले आणि योगाभ्यासासाठी मंडळाची बहुकक्षीय सुसज्ज इमारत उभारली. तेथे त्यांनी ‘आसनप्रवेश’ व ‘आसनप्रवीण’ हे योगाचे अभ्यासक्रम सुरू केले. स्वामीजींच्या पश्चात सदर मंडळ ‘जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ’ म्हणून ओळखले जाते. स्त्रियांनी योगासने शिकावीत, करावीत आणि शिकवावीत अशी जनार्दनस्वामींची धारणा होती. त्या काळात स्त्रियांनी योगासने करण्याची प्रथा नव्हती. या संदर्भात धाडसी पाऊल उचलून स्वामीजींनी १९६६ मध्ये ‘योगाभ्यासी महिला मंडळा’ची स्थापना केली. हे त्यांचे योगक्षेत्रातील अपूर्व योगदान आहे. याशिवाय सांघिक आसनांची संकल्पना सर्वप्रथम स्वामीजींनीच जनमानसात रुजविली व अमलात आणली. १९६७ मध्ये त्यांनी योगप्रकाश हे योगविषयक नियतकालिक सुरू केले.

जनार्दनस्वामींमुळे अनेकांना योगाभ्यासाची प्रेरणा मिळाली. रामदास परांजपे, वि. भि. कोलते, गोळवलकर गुरूजी, लोकनायक अणे, वसंत साठे, वसंतराव नाईक इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींनी त्यांच्या योगोपासनेचा लाभ घेतला. जनार्दनस्वामींनी सुलभ सांघिक आसन (भाग १-२), प्राणायाम, शीर्षासन, मोटापा, योगस्वरूप इत्यादी योगविषयक पुस्तके लिहिली आहेत. महाराष्ट्र शासनाने शिक्षणातील योगाचे स्थान निश्चित करण्यासाठी १९७५ साली नेमलेल्या समितीत जनार्दन स्वामींचा समावेश केला होता.

मेंदूतील रक्तस्रावाच्या विकारामुळे १९७८ मध्ये स्वामीजी अनंत चैतन्यात विलीन झाले.

संदर्भ :

  • मोंडकर, सुधीर योगधुरंधर, ठाणे, उद्वेली बुक्स, २०१५.
  • योगप्रकाश, दीपावली विशेषांक, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, रामनगर, नागपूर, २०१७.
  •  वर्णेकर, श्री. भा. योगमूर्ति,  जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर, २०१५.
  • https://jsyog.org/

                                                                    समीक्षक : अ. ना. ठाकूर