महर्षि पतंजलींनी वर्णिलेल्या पाच क्लेशांपैकी अस्मिता हा एक क्लेश आहे. अस्मिता या शब्दाचा व्युत्पत्तीद्वारे होणारा अर्थ – ‘मी आहे अशी भावना’ असा होतो. पातंजल योगसूत्रानुसार दृक्-शक्ती (पुरुष) आणि दर्शन-शक्ती (बुद्धी) या दोन वेगवेगळ्या तत्त्वांना एक समजणे हे अस्मितेचे लक्षण आहे (दृग्दर्शनशक्त्योरेकात्मतेव अस्मिता | योगसूत्र २.६). अविद्या हे अस्मितेचे मूळ कारण आहे.

सांख्य आणि योग दर्शनांनी मानलेल्या तत्त्वांमध्ये पुरुष हे एकमेव चेतनतत्त्व आहे. दृक्-शक्ती या शब्दाचा लौकिक अर्थ ‘पाहण्याची शक्ती’ असा असला तरी ही दर्शनांच्या परिभाषेत त्याचा अर्थ ‘ज्ञान होण्याची शक्ती/योग्यता’ असा होतो. ज्ञान होण्याची योग्यता = पुरुष असे असल्यामुळे त्याला दृक्-शक्ती असे म्हटले आहे. ‘ज्याद्वारे दर्शन/ज्ञान होते, ते ज्ञानाचे साधन म्हणजे दर्शन’ होय (दृश्यते अनेन इति दर्शनम्). ज्ञानाचे साधन बुद्धी असल्यामुळे बुद्धीला दर्शन-शक्ती असे म्हटले आहे. ज्ञान होण्याची योग्यता = पुरुष आणि ज्ञानाचे साधन = बुद्धी या दोन वेगवेगळ्या तत्त्वांना एक समजणे म्हणजेच अस्मिता होय.

वस्तुत: कोणत्याही वस्तूचे ज्ञान होण्यासाठी पुरुष आणि बुद्धी या दोन तत्त्वांचा संयोग होणे आवश्यक असते. त्यांचा संयोग झाल्याने पुरुष स्वत:ला बुद्धिद्वारे होणाऱ्या सर्व क्रियांचा कर्ता समजू लागतो व त्यामुळे बंधन उत्पन्न होते. पुरुष आणि बुद्धी यांमध्ये होणारा संयोग हा परस्पर योग्यतेमुळे होतो. संयोग हा तीन प्रकारचा असू शकतो – दोन वस्तू एकाच ठिकाणी एकत्र आल्यामुळे होणारा संयोग हा दैशिक संयोग होय. दोन वस्तू एकाच काळात अस्तित्त्वात असतील तर त्यांचा एकाच काळाशी संबंध आल्यामुळे होणारा संयोग हा कालिक संयोग होय. जर दोन वस्तूंना विशिष्ट प्रयोजनासाठी परस्परांची आकांक्षा असेल, तर त्यांचा होणारा संयोग हा योग्यतेमुळे होणारा संयोग होय. पुरुषाचा बुद्धीशी होणारा संयोग हा या प्रकारचा आहे. पुरुष म्हणजे ज्ञान होण्याची योग्यता होय. परंतु, केवळ योग्यता असल्याने ज्ञान होत नाही, तर त्यासाठी ज्ञानाचे साधन असणेही आवश्यक आहे. ते साधन म्हणजे बुद्धी होय. बुद्धी हे ज्ञानाचे साधन असले तरी ती अचेतन असल्यामुळे तिला ज्ञान होऊ शकत नाही. ज्याला ज्ञान होऊ शकते असे कोणतेतरी चेतनतत्त्व असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे ज्ञान होण्यासाठी पुरुष आणि बुद्धी यांना परस्परांची अपेक्षा असते, त्यामुळे त्यांचा संयोग होतो.

सांख्यदर्शनामध्ये अस्मितेलाच अहंकार असे संबोधिले आहे. ‘अहम्’ म्हणजे मीपणाची भावना होय. ‘अस्मि’ या शब्दाचा अर्थही ‘मी आहे अशी भावना’ होय. इतरांपासून स्वत:ला वेगळे करण्याची भावना म्हणजे ‘मी’ ही बुद्धिमुळे उत्पन्न होते व ‘आहे’ अशी अस्तित्वाची भावना पुरुषामुळे उत्पन्न होते. पुरुषाचे अस्तित्व निरंतर असल्यामुळे त्याला नित्य तत्त्व मानले जाते. त्या नित्य पुरुषाचे अस्तित्व अस्मितेमध्ये ‘आहे’ या रूपाने प्रतिबिंबित होते. पुरुष हा सर्वव्यापी असल्यामुळे अन्य तत्त्वांपासून स्वत:ला पृथक् करण्याची मीपणाची भावना पुरुषामुळे नाही, तर बुद्धिमुळे उत्पन्न होते.

अष्टांगयोगाचे क्रमश: आचरण करीत असताना योगी जेव्हा साधनेच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचतो, तेव्हा समाधी स्थितीमध्ये विविध विषयांवर त्याच्या चित्ताची एकाग्रता साधते. प्रथम स्थूल विषयावर, मग सूक्ष्म विषयावर, मग इंद्रियांवर चित्त एकाग्र होत होत अंतिमत: ‘मी कोण आहे’ हे जाणण्याच्या हेतूने योगी ‘अहम्’ म्हणजे अस्मिता तत्त्वाला ध्यानाचा विषय बनवितो. त्यावर चित्त एकाग्र होऊन जेव्हा ध्यान समाधिरूपात परिणत होते, तेव्हा चित्ताच्या त्या एकाग्र, सत्त्वगुणाचा उत्कर्ष असलेल्या स्थितीला अस्मिता समापत्ति असे म्हणतात. पुरुष आणि बुद्धी यांना एक समजणे हा अस्मिता क्लेश होय, परंतु त्याच एकात्म रूपावर चित्त एकाग्र झाले असता ती अस्मिता समापत्ति होय. या समापत्तीमध्ये ती दोन तत्त्वे एक नसून वेगवेगळी आहेत असे विवेकज्ञान योग्याला प्राप्त होते. बुद्धी हे आपले खरे स्वरूप नसून ज्ञान होण्याची योग्यता असलेला चैतन्यस्वरूप पुरुष हेच आपले खरे स्वरूप आहे याचे ज्ञान योग्याला होते. या विशेष ज्ञानामुळे ‘आत्म-भाव-भावना’ अर्थात ‘मीपणाची अस्मिता’ ही भावना नष्ट होते. (विशेषदर्शिन: आत्मभावभावनानिवृत्ति: ।  योगसूत्र ४.२५) व योग्याला कैवल्य प्राप्त होते.

                                                                                                                                                                     समीक्षक : कला आचार्य