पतंजली मुनींनी अष्टांगयोगामध्ये वर्णिलेल्या पहिल्या अंगातील पाच यमांपैकी अहिंसा हा पहिला यम आहे (पातञ्जल योगसूत्र २.३०).‘हिंसेचा अभाव’ असा या संज्ञेचा शब्दश: अर्थ आहे. ‘अहिंसा सर्वथा सर्वदा सर्वभूतानाम् अनभिद्रोहः’ अर्थात कोणत्याही जीवाला कोणत्याही प्रकारे कधीही इजा न करणे अशी अहिंसेची व्याख्या भाष्यकार व्यासांनी केली आहे (व्यासभाष्य २.३०). मानसिक, वाचिक किंवा कायिक अर्थात विचार, शब्द किंवा कृती यातून कोणालाही दुखविणे किंवा इजा करणे म्हणजे हिंसा होय. तर आपले विचार, शब्द किंवा कृतीमधून कोणालाही त्रास होणार नाही याची  सर्वतोपरी  काळजी घेणे म्हणजे अहिंसा होय. प्रत्येक प्राणिमात्राच्या प्रति आचरलेली विचार, भाषा आणि वर्तनाची सकारात्मक पद्धत असे अहिंसेचे वर्णन करता येईल.

अहिंसेचे पालन करण्यासाठी साधकाने प्रथम हिंसा म्हणजे काय हे जाणून घेणे आवश्यक आहे व त्यानंतरच हिंसेचा त्याग करता येणे शक्य आहे. जर हिंसेचा अंतर्भाव असलेली कोणतीही कृती मनुष्याने स्वत: केली (कृत) किंवा इतर कोणाकडून करवून घेतली (कारित) किंवा हिंसेला अप्रत्यक्षपणे अनुमोदन दिले (अनुमोदित), तरी तीही हिंसाच ठरते (पातञ्जल योगसूत्र २.३४). यांपैकी कोणत्याही प्रकारे हिंसा घडली, तरी अनंत काळापर्यंत दु:ख व अज्ञानरूपी फळ प्राप्त होते, याची सर्वदा जाणीव ठेवून साधकाने सर्व प्रकारच्या हिंसेचा सर्वथा त्याग केला पाहिजे. योगाच्या दृष्टीने हिंसक किंवा अयोग्य विचार, भावना आणि कृती यांच्यामागील मूलभूत कारणे लोभ, क्रोध आणि मोह ही आहेत. बुद्धीवर अविवेकाचे आच्छादन घालणारी ही कारणे मनुष्याला अयोग्य वर्तनास प्रवृत्त करतात. त्यामुळे यांचा त्याग केला पाहिजे.

सर्वसामान्यपणे सर्वच जीव कमी-अधिक प्रमाणात अहिंसेचे पालन करीत असतात,परंतु ते ठराविक प्रकारच्या जीवांसाठी, ठराविक ठिकाणी, ठराविक काळासाठी आणि ठराविक प्रसंगी केले जाणारे अहिंसेचे पालन असते. ते अहिंसेचे संपूर्ण पालन नव्हे. उदाहरणार्थ, जर एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात कासव आले, तर तो त्याला सोडून देतो. त्याने कासवाप्रति दाखवलेली ही अहिंसेची भावना फक्त त्या ठराविक प्रजातीच्या जीवासाठी सीमित आहे (जाति-अवच्छिन्न अहिंसा). त्याच्या जाळ्यात जर मासे आले, तर तो अहिंसेचे पालन करीत नाही.जर कोळी एखाद्या तीर्थक्षेत्री गेला, तर तो त्या ठिकाणी मासे मारणार नाही. परंतु, ही त्या ठराविक ठिकाणी पालन केली जाणारी अहिंसा आहे (देश-अवच्छिन्न अहिंसा). जर कोळी एकादशी, चतुर्थी इत्यादी तिथींना मासे मारत नसेल, तर ती ठराविक काळात पालन केली जाणारी अहिंसा आहे (काल-अवच्छिन्न अहिंसा). जर मासे मारल्याने रोगराई, अपाय होण्याची शक्यता असेल, तर अशा वेळी कोळी मासे मारणार नाही. अशा प्रसंगी केले जाणारे अहिंसेचे पालन फक्त त्या ठराविक प्रसंगापुरतेच असते (निमित्त-अवच्छिन्न अहिंसा). परंतु, जर अहिंसा जाति, देश, काल आणि समय यांपुरती मर्यादित नसेल, तर त्या अहिंसेला महाव्रत असे म्हणतात (पातञ्जल योगसूत्र २.३१). हाच नियम अन्य यमांनाही लागू आहे. जो योगी अहिंसेचे संपूर्ण आचरण करतो, त्या योग्याच्या सहवासात येणाऱ्या सर्व प्राणिमात्रांचे आपसातील वैर नष्ट होते, हे अहिंसेचे फळ पतंजली मुनींनी सांगितले आहे (पातञ्जल योगसूत्र २.३५).

पतंजलींनी पाच यम आणि पाच नियमांमध्ये सर्वप्रथम अहिंसेचाच उल्लेख केला आहे यावरून या व्रताचे महत्त्व स्पष्ट होते. अहिंसेनंतर वर्णन केलेले सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे चार यम आणि शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान हे पाच नियम यांचे आचरण हे अहिंसेला अनुसरूनच असले पाहिजे त्याचप्रमाणे त्यांचे अनुष्ठान शुद्ध अहिंसेचे पालन करण्यासाठी सांगितले आहे, असे व्यासांनी स्पष्ट केले आहे. जर साधकाने अन्य यम-नियमांचे कुशलतापूर्वक पालन केले, परंतु अहिंसेचे आचरण केले नाही, तर अन्य यम-नियमांचे आचरणही निष्फळ ठरते.

व्यापक अर्थाने अहिंसा ही वैश्विक प्रेमाची सकारात्मक अभिव्यक्ती आहे. यात आपल्यामुळे इतर कोणाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे काही  इजा होऊ नये हा भाव अभिप्रेत आहेच, परंतु या तात्कालिक विचाराच्या पलिकडे जाऊन वैश्विक ऐकात्म्याची अनुभूती अहिंसेत अपेक्षित आहे. पातञ्जल योगाव्यतिरिक्त बौद्ध आणि जैन धर्माच्या तत्त्वज्ञानानेही अहिंसातत्त्वाचा पुरस्कार केलेला आहे. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसा या तत्त्वांवर आपल्या सत्याग्रहाची प्रतिष्ठापना केली.

अहिंसारूपी मानवधर्म केवळ माणसाने माणसाप्रति आचरणात आणावयाचा धर्म नसून संपूर्ण सृष्टीच्या बाबतीत अहिंसेचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे. म्हणून महाभारतात (अहिंसा परमो धर्म:| महाभारत १३.११६.३८) या वचनाचा पुरस्कार केला आहे.

संदर्भ :

• कर्णाटक विमला, पातञ्जलयोगदर्शनम्, काशीहिन्दु विश्वविद्यालय, वाराणसी, १९९२.

• जोशी ग. ना., भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद्इतिहास, मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ, पुणे, १९९४.

• Taimni, I. K., The Science of Yoga, The Theosophical Publishing House, Adyar, 2005.

समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर