म्युझिक अकादमी या नावानेही प्रसिद्ध. ललितकलेच्या इतिहासातील प्रामुख्याने दक्षिण भारतातील आणि देशातील एक नामवंत संगीत संस्था. ही संस्था तमिळनाडू राज्यातील चेन्नईमध्ये (मद्रास) असून ती म्युझिक अकादमी या नावाने जास्त प्रसिद्ध आहे. १९२७ साली अखिल भारतीय संगीत परिषद, चेन्नई येथे घेण्यात आली. त्यावेळी संगीतासाठी, विशेषतः भरतनाट्यम् या नृत्यप्रकाराच्या संवर्धनासाठी, एक संस्था स्थापन करण्याबाबत ठरविण्यात आले आणि १८ ऑगस्ट १९२८ रोजी त्रावणकोर संस्थानचे दिवाण सी. पी. रामास्वामी अय्यर यांच्या हस्ते या संस्थेची स्थापना करण्यात आली. भरतनाट्यम् या नृत्यप्रकारास नवसंजीवनी देणारे कर्नाटक संगीतातील थोर कलाकार व स्वातंत्र्यसेनानी ई. कृष्णा अय्यर यांनी या संस्थेच्या स्थापनेकरिता पुढाकार घेतला आणि त्यांनी अनेक वर्षे संस्थेचा सचिव म्हणून कार्यभार सांभाळला. राजकीय नेते रामा राव हे संगीत अकादमीचे पहिले अध्यक्ष होते.

संगीताच्या सर्वांगीण उन्नतीसाठी या संस्थेचे कार्य सातत्याने सुरू आहे. संस्थेच्या स्थापनेपासून दरवर्षी डिसेंबरमध्ये होणारा संगीत महोत्सव म्हणजे रसिक आणि अभ्यासूंना मोठी पर्वणी असते. प्रारंभी या संस्थेचे कार्यालय चेन्नईमधील एक ठिकाण जॉर्ज टाऊन येथे होते. त्यानंतर ते सध्या असलेल्या टीटीके रोड अरील इमारतीमध्ये स्थलांतरित झाले. या संस्थेची दोन सभागृहे आहेत. टी. टी. कृष्णम्माचारी हे सभागृह १६०० आसन क्षमता असलेले असून ते १९५५ मध्ये बांधण्यात आले. दुसऱ्या कस्तुरी श्रीनिवासन सभागृहात किंवा कार्यालयात (१९८८) संगीताच्या कार्यक्रमाकरिता कलाकारांच्या सादरीकरणासाठी दालन, ग्रंथालय, ध्वनिमुद्रण कक्ष इत्यादी सोयी आहेत. येथील ग्रंथालयात संगीतावरची दुर्मीळ पुस्तके आणि ध्वनिमुद्रणे, हस्तलिखीत प्राचीन ग्रंथ यांचा संग्रह आहे.

मद्रास संगीत अकादमी या संस्थेतर्फे दरवर्षी निरनिराळे पुरस्कार देऊन कलाकारांना सन्मानित केले जाते. या संस्थेने ‘संगीत कलानिधी’ हा कर्नाटक संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध पुरस्कार १९२९ साली सुरू केला. याशिवाय संगीत कला आचार्य, टीटीके पुरस्कार, संगीतज्ञ पुरस्कार, नृत्य कलानिधी,नाट्य कलानिधी इत्यादी पुरस्कारांनी कर्नाटक संगीतातील मान्यवरांना गौरविण्यात येते. प्रसिद्ध गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी या पहिल्या महिला कलाकार होत, ज्यांना या पुरस्कराने गौरविण्यात आले (१९६८). संस्थेकडून विविध शिष्यवृत्तीही देण्यात येतात.

संस्थेचे एक संगीत विद्यालय असून त्यामार्फत गायन, व्हायोलीन वादन, मृदंगम् वादन यांचे शिक्षण दिले जाते. तसेच संस्थेत संगीत संशोधन आणि विविध ग्रंथांचे प्रकाशन असे उपक्रम देखील मोठ्या प्रमाणावर राबविले जातात.