मुळगांवकर, अरविंद : (१८ नोव्हेंबर १९३७ – १७ फेब्रुवारी २०१८). महाराष्ट्रातील ख्यातनाम तबलावादक व तबला क्षेत्रातील चिकित्सक व अभ्यासक. ते तबलावादनातील फरूखाबाद घराण्याचे प्रतिनिधी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म मुंबई येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षणही मुंबईतच झाले. दादर येथील श्रीकृष्ण संगीत विद्यालयात देशपांडेबुवा यांच्याकडे तबल्याचे सुरुवातीचे शिक्षण झाल्यावर उ. बाबालाल इस्लामपूरकर यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन मिळाले. फरूखाबाद घराण्याचे अध्वर्यू तबलावादक उ. अमीर हुसेनखाँ यांचे ते गंडाबंद शिष्य होत. सलग १६ वर्षे त्यांची तालीम मुळगांवकरांना मिळाली.

उ. अमीर हुसेनखाँ यांच्यामुळे मुळगांवकर यांना बनारस वगळता इतर बहुतेक सर्व घराण्यांची तालीम प्राप्त झाली. त्यांतून त्यांना योग्य निकास, नादसौंदर्य, शब्दसौंदर्य, स्वतंत्र तबलावादनातील पेराकारपासून लग्गीपर्यंतच्या नानाविध संकल्पना, त्यांचे व्याकरण इत्यादींची सखोल माहिती मिळाली. हुसेनखाँ यांनी स्वत:च्या रचनांबरोबरच पूर्वजांच्या हजारो रचना पं. मुळगांवकरांना दिल्या.  हुसेनखाँच्या निधनानंतर अहमदजान थिरकवाँ, अता हुसेन या दिग्गजांची तालीम व पं. भोला श्रेष्ठ व पं. सामताप्रसाद यांच्याकडून बनारस घराण्याची शास्त्रशुध्द तालीमही त्यांना मिळाली. याशिवाय त्यांनी जुन्या कलावंतांचे ध्वनिमुद्रण व ध्वनिमुद्रिका मिळवून त्यांच्या वेचक रचना कलाकारांकडून मिळविल्या. त्यांनी नोकरी सोडून तबलावादनाची प्रात्यक्षिके, कार्यशाळा, शिबिरे व भारतभर भ्रमंती याला वाहून घेतले.

दायाँ बायाँचे (उजव्या हाताने वाजवितात तो तबला म्हणजेच दायाँ व डाव्या हाताने वाजवितात तो डग्गा म्हणजेच बायाँ यास जोडीस एकत्रितपणे तबला असे म्हणतात.) संतुलन, विविध घराण्यांच्या रचनांची पखरण, स्वतंत्र तबलावादनातील रचनांच्या निर्मितीमागील व्याकरण लक्षात घेऊन त्या रचनांची केलेली पढंत (वादन करताना ती रचना तोंडाने म्हणणे) व वादन, प्रत्येक घराण्याशी प्रामाणिक राहून ज्या-त्या घराण्याच्या निकासाप्रमाणे त्या घराण्याच्या विचारांचे प्रकटीकरण ही मुळगांवकर यांच्या तबलावादनाची वैशिष्ट्ये होत.

मुळगांवकर यांनी अनेक गायक-वादकांनाही साथसंगत केली आहे. त्यांनी भारतात तसेच परदेशांत अनेक शिष्य तयार केले. एकावेळी एकाच विद्यार्थ्याला ते विद्यादान करीत आणि गरजू विद्यार्थ्यांना तबला व अन्य तालवाद्ये विनामूल्य शिकवित असत. त्यांनी उस्ताद अमीर हुसेनखाँ यांच्या जन्मशताब्दी वर्षात २५ विद्यार्थ्यांना खाँसाहेबांच्या १०५ बंदिशी शिकविल्या व त्या विद्यार्थ्यांसमवेत सहभागी होऊन त्या बंदिशींचे कार्यक्रम सादर करून गुरूंना आदरांजली अर्पण केली. त्यांनी गुरूंच्या स्मरणार्थ ‘बंदिश’ (१९९३) या संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारे ते संगीत कार्यक्रमाचे आयोजन करीत असत. वेगवेगळ्या संगीत घराण्यांतील प्रथितयश आणि उदयोन्मुख अशा दोन्ही तबलावादकांचे एकल तबलावादन ते या कार्यक्रमातून रसिकांपुढे सादर करीत. याद्वारे त्यांनी तबल्याचा प्रचार व प्रसार केला.

मुळगांवकरांची ग्रंथसंपदा मर्यादित पण साक्षेपी आहे. त्यांचा तबला (१९७५, सुधारित आवृत्ती १९९९ ) हा मराठीमधील महत्त्वपूर्ण ग्रंथ होय. या ग्रंथाचे हिंदी रूपांतरही प्रकाशित झालेले आहे. यात तबला या तालवाद्याचा इतिहास दिला असून तबल्याच्या घराण्यातील तबलावादकांची लहानलहान चरित्रे व त्यांच्या दुर्मीळ रचना, तबलावादनाच्या जुन्या व नव्या शिक्षणपद्धती इत्यादी दिलेले आहेत. आठवणींचा डोह (२००६) या दुसऱ्या ग्रंथात अमीर हुसेनखाँ यांच्यासह अन्य मान्यवरांच्या बंदिशी दिल्या असून या बंदिशींमधील विराम व प्रत्यक्ष कृती यांचा संगम कसा साधलेला आहे, हे सोदाहरण स्पष्ट केलेले आहे. इजाजतगुस्ताखी मुऑफ  या दोन पुस्तकांमध्ये त्यांनी रचलेल्या सौंदर्यपूर्ण रचना दिलेल्या आहेत.

संवाद फाउंडेशनतर्फे होणाऱ्या दृक-श्राव्य-ध्वनिमुद्रणांसाठी तज्ञ वक्ता म्हणून मुळगांवकर यांनी काम पाहिले आहे. भारताशिवाय अमेरिका, स्वित्झर्लंड, मॉरिशस येथेही त्यांचे स्वतंत्र तबलावादनाचे व सप्रयोग व्याख्यानाचे कार्यक्रम झालेले आहेत. ‘खजाना-ए-बंदिश’ या प्रकल्पावर अखेरपर्यंत त्यांचे संशोधन चालू होते. अठराव्या किंवा त्या आधीच्या शतकापासून उपलब्ध असणाऱ्या सर्व बंदिशी एकत्र करून त्याद्वारे शास्त्रीय संगीताचा इतिहास उलगडावा, हा त्यामागचा हेतू होता. आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता त्यांनी एक अभिनव तालाची निर्मिती करून त्यास ‘अमीर ताल’ असे नाव दिले.

अरविंद मुळगांवकरांचा विवाह मृणालिनी यांच्याशी झाला. या दांपत्यास एक कन्या आहे.

मुळगांवकरांना अनेक मानसन्मान लाभले. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘वाद्यसंगीत’ पुरस्कार, भारत सरकारची अधिछात्रवृत्ती व ‘स्वर साधना रत्न’,  आयटीसी संगीत रिसर्च अकादमीकडून तसेच अय्यर प्रतिष्ठानतर्फे ‘जीवनगौरव पुरस्कार’, ‘वसुंधरा पंडित’ स्मृती पुरस्कार तसेच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार यांचा समावेश आहे. त्यांच्या शिष्य समुदायात पं. ओंकार गुलवाडी, विवेक जोशी, हेमकांत नावडीकर, आमोद दंडगे, कृष्णा घोटकर, सूर्याक्ष देशपांडे, प्रसाद पाध्ये इत्यादी नावे उल्लेखनीय होत. एक प्रतिभावंत रचनाकार म्हणून तबल्याच्या प्रांतात मुळगांवकरांनी भरीव कामगिरी केली. गुरूजनांकडून मिळालेल्या ज्ञानाचा संग्रह त्यांनी अत्यंत चिकाटीने केला.

त्यांचे वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले.

समीक्षक : सु. र. देशपांडे