तरुण, आश्वासक तसेच प्रथितयश आणि उच्च कोटींच्या कलाकारांसाठी संगीत क्षेत्रामध्ये कार्य करून प्रसिद्धीस आलेली भारतातील एक संस्था. आपल्या निरनिराळ्या उपक्रमाद्वारे गेली सुमारे पंच्याहत्तर वर्षे संगीत प्रसाराचे काम करीत असलेल्या या संस्थेची स्थापना १९४७ मध्ये व्यावसायिक ब्रिजनारायण यांनी आपल्या घरातच केली. लौकिकदृष्ट्या त्यांचे संगीत शिक्षण झालेले नसले तरी संगीतकलेच्या प्रेमाखातर तरुणांना प्रोत्साहन, ज्येष्ठ कलाकारांना सन्मान आणि सर्व प्रकारचे संगीत रसिकांना ऐकवून त्यांना समृद्ध करण्याच्या हेतूने या संस्थेची स्थापना झाली. त्यांच्या या उपक्रमाला जनतेने तसेच रसिक वृत्तीच्या सर्व राजकारण्यांनी मदत केली. हास्यकवी लक्ष्मीनारायण गर्ग संस्थेचे प्रमुख सल्लागार होते. संस्थेचे कार्य सुरू ठेवून ९ जून १९५४ रोजी हिची नोंदणी झाली. ब्रिजनारायण यांच्याशिवाय स. का. पाटील, शंकरलाल बजाज, डी. एस. मुडबिद्री, जयानंद खिरे आदी थोर मंडळी पहिल्या संचालक वर्गात होती. १९५४ साली सुमारे १८ दिवस चाललेला संगीत महोत्सव हा संस्थेने राबविलेला एक महत्त्वपूर्ण उपक्रम होता. भारतातील सर्व प्रसिद्ध कलाकारांनी उपस्थिती लावून हे संमेलन मोठ्या प्रमाणात यशस्वी केले.

सध्या सूर सिंगार संसद या संस्थेचे कार्य मंदावले असले तरी विविध उपक्रम संस्थेकडून राबविले जात असत आणि त्यांना रसिक श्रोते व भारतातील थोर कलाकारांची उपस्थिती आवर्जून असे. या संस्थेचे मुख्य उपक्रम पुढीलप्रमाणे : प्रख्यात कवी, कृष्णभक्त आणि संगीत रचनाकार स्वामी हरिदास यांच्या स्मरणार्थ ‘स्वामी हरिदास संमेलना’ची सुरुवात मुंबई येथे संस्थेकडून करण्यात आली. हा उपक्रम १९५२ पासून सुरू झाला. रागदारी संगीत ऐकण्यासाठी हे संमेलन एक पर्वणी मानली जात असे आणि देशभरातील ज्येष्ठ गायक, वादक आणि नर्तक कलाकार येथे सादरीकरणासाठी आवर्जून येत. ‘कल के कलाकार’ या संमेलनात नवीन प्रकाशात येणाऱ्या पण दर्जेदार कलाकारांचे अविष्कार यामध्ये ऐकायला, पहायला मिळत. प्रभावशाली कलाकारांना यामध्ये सूरमणी (गायन), तालमणी (वादन) आणि सिंगारमणी (नृत्य) अशा पदव्यांनी सन्मानित केले जाई. आज प्रसिद्ध पावलेले अनेक कलाकार त्यांच्या उमेदीच्या काळात या पदव्यांनी सन्मानित झाले आहेत. ‘रस गंगा संमेलन’ याची सुरुवात १९६६ पासून झाली. यामध्ये रसिकांना विविध प्रकारच्या लोककलांचा आस्वाद घेता येत असे. सूर सिंगार अकादमीमध्ये संगीताचे शिक्षणही दिले जात असे.

समीक्षक : श्रीकांत डिग्रजकर