प्राथमिक शिक्षणाला पूरक आणि पायाभूत असलेले शिक्षण. शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जन्मापासून किंबहुना जन्मास येण्यापूर्वीपासून या शिक्षणास सुरुवात होते. बालकाच्या जीवनाच्या तयारीची खरी सुरुवात औपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक शिक्षणाने होते. शाळेला जाण्याची विहित वेळ, विहित अभ्यासक्रम आणि विहित पद्धतीने ज्ञान व कौशल्ये प्राप्त करण्याचे धडेसुद्धा पूर्व प्राथमिक शिक्षणातून दिले जाते.
पूर्व प्राथमिक शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शासनाने स्वीकारलेली नसली, तरी आपल्या घटनेने सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. प्राथमिक शिक्षणात इयत्ता पहिलीत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांचे वय सुमारे ६ वर्षे असावे. या वयापेक्षा कमी वयाच्या मुलामुलींना शाळेची गोडी लागावी म्हणून भारतात इतर देशांप्रमाणे पूर्व प्राथमिक शिक्षण पद्धत सुरू झाली. हे शिक्षण सक्तीचे नसून ऐच्छिक असते. पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या शाळा काही खाजगी शिक्षण संस्थांनी अनुदान घेऊन किंवा अनुदान न घेता सुरू केल्या. अशा शाळा बालवाडी, अंगणवाडी, शिशुविहार, माँटेसरी, किंडर गार्डन (के. जी.), बालक मंदिर इत्यादी नावांनी ओळखल्या जातात. या शाळांतील मुले सामान्यतः ३ ते ६ वयाची असतात. या शाळांत खेळ, गाणी, गप्पागोष्टी यांद्वारे शिक्षण दिले जाते. ही शिक्षण योजना प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ मारिया माँटेसरी आणि फ्रीड्रिख फ्रबेल या शिक्षणतज्ज्ञांनी प्रथम परदेशांत सुरू केली. मुलांना बालवयात शाळेची गोडी लागावी म्हणून इतर देशांतील पद्धतीप्रमाणे, भारतातही पूर्व प्राथमिक शिक्षण पद्धती अस्तित्वात आली. अमेरिकेत व ऑस्ट्रेलियात हीच योजना प्रि-स्कूल योजना म्हणून ओळखली जाते.
पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या प्रमुख संस्था ꞉
किंडर गार्डन ꞉ फ्रबेल यांनी प्रस्तुत केलेली ही शिक्षण पद्धत भारतात मोठ्या शहरांत कॉन्व्हेंट म्हणून आढळतात. येथील शिक्षण खर्चिक असून त्याचे माध्यम इंग्रजी आहे. येथील शिक्षणाचा दर्जा चांगला असतो.
नर्सरी ꞉ मार्गरेट मॅक्सिलन यांच्या योजनेनुसार या शाळा पूर्व प्राथमिक शिक्षण देतात. बहुसंख्य शाळांतून शिक्षणाचे माध्यम इंग्रजी भाषा असली, तरी काही शाळांतून प्रादेशिक भाषेचाही वापर केला जातो. या शाळांतून शिस्त आणि वक्तशीरपणा यांना प्राधान्य असते. खेळ, सामूहिक जीवन, संगीत-नृत्य, गोष्टी, मुक्त संभाषण, हस्तकला इत्यादी शिक्षणाचीही तयारी या शाळांत करून घेतली जाते.
माँटेसरी ꞉ या शाळेतील शिक्षणाचे माध्यम इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषा असते. माँटेसरी शाळा असोसिएशन माँटेसरी इंटरनॅशनल या संस्थेला संलग्न केलेल्या असतात.
एक शिक्षकी खाजगी पूर्व प्राथमिक शाळा ꞉ भारतातल्या अनेक शहरांतून एक शिक्षकी पूर्व प्राथमिक शाळा आहेत. या शाळा दुपारी १२ ते ३ या वेळेत भारतात. या शाळेत विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाची तयारी करून घेतली जाते. खोली एकच असल्याने शाळेचे कार्य, यश आणि लोकप्रियता शिक्षकांच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. सुमारे ८५ टक्के पूर्व प्राथमिक शाळा खाजगी संस्था, मिशन्स किंवा वैयक्तिकरित्या चालविल्या जातात. सुमारे ५ टक्के शाळा स्थानिक संस्थांनी आणि सुमारे १० टक्के शाळा शासन चालवतांना आढळते. भारतीय शिक्षणतज्ज्ञ गिजुभाई बधेका, ताराबाई मोडक यांच्या व काही संस्थांच्या प्रयत्नांनी भारतात पूर्व प्राथमिक शिक्षणाचा प्रारंभ झाला. अगदी अलीकडच्या काळात सरकार पातळीवर दि सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, दिल्ली; भारतीय शिशुकल्याण परिषद आणि केंद्रीय समाज कल्याण मंडळ या संस्थांनी पूर्व प्राथमिक शिक्षणास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार लावलेला आढळतो. शासनाच्या समाज कल्याण विभागातर्फे शहरातील झोपडपट्टी, तसेच ग्रामीण भागांतून बालवाड्या व अंगणवाड्या चालविल्या जातात. काही खाजगी समाज सेवा संस्थाही पूर्व प्राथमिक शाळा चालवितात. अलिकडे अनेक मोठी गावे व शहरांमधील शिक्षण संस्थांनी पूर्व प्राथमिक शिक्षण विभाग सुरू केल्याचे आढळते.
विद्यार्थ्यांना तणावमुक्त आणि कल्पक शिक्षण मिळावे, या उद्देशाने नवीन शिक्षण धोरणात (२०२०) देशाच्या शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. यातील सर्वांत महत्त्वाचा बदल हा पूर्व प्राथमिक शिक्षणात करण्यात आला आहे. पूर्वी आपल्या शिक्षणाच्या आकृतीबंधात पूर्व प्राथमिक शिक्षणाची सुरुवात मुलांच्या वयाच्या २ वर्षांपासून सुरू होऊन ५ वर्षांपर्यंत चालू राहावी, अशी योजना होती; मात्र शासनाच्या २९ जुलै २०२० च्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पूर्व प्राथमिक शिक्षणाची सुरुवात मुलांच्या वयाच्या ३ वर्षांपासून ते ६ वर्षांपर्यंत करण्यात आली आहे. हे धोरण जून २०२३-२४ या सत्रापासून संपूर्ण देशात लागू होत आहे. या नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय शिक्षणाची पूर्वीची रचना १०+२+३ बदलून ती ५+३+३+४ अशी करण्यात आली आहे. यामध्ये पूर्व प्राथमिक ३ वर्षे असणार आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणातील ३ ते ६ वर्ष वयोगटात असलेले मुलं आतापर्यंत शालेय अभ्यासक्रमांतर्गत येत नव्हती; परंतु नवीन शैक्षणिक धोरणामुळे त्यांचा शालेय अभ्यासक्रमांतर्गत समावेश करण्यात आला आहे.
पूर्वी पूर्व प्राथमिकसाठी शिकविण्याऱ्या शिक्षकांना बालवाडी अभ्यासक्रम पूर्ण करण्याची अट होती; मात्र आता या वर्गामध्ये शिक्षण देणारे शिक्षक बी. एड. पदवीधरक असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळू शकणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात त्यांचा पाया भक्कम करण्यासाठी त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, हा उद्देश यामागे आहे. यात अंगणवाडी व शाळांमार्फत ईसीसीई (अर्ली चाइल्ड केअर अंड एज्युकेशन) अंतर्गत पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यात येईल. तसेच शिक्षक व पालक या दोघांच्याही दृष्टीने विचार करून प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षणासाठी अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र यांचा आराखडा विकसित करण्यात येईल. या आराखड्यामध्ये ०-३ वयोगटातील मुलांना योग्य व आकलनात्मक उत्तेजन देण्यासाठी पूरक मार्गदर्शक सूचना करण्यात आलेल्या आहेत. ३ ते ६ वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीचे दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार आहे.
संदर्भ ꞉
- नागतोडे, किरण, शालेय व्यवस्थापन शैक्षणिक संरचना आणि आधुनिक विचार प्रवाह, १९९७.
- पाटील, लिला, आजचे शिक्षण : आजच्या समस्या, १९७१.
समीक्षक ꞉ कविता साळुंके