आपले विचार, भावना अथवा इतर माहिती अन्य व्यक्तींपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे एक कौशल्य किंवा प्रक्रिया. जागतिक आरोग्य संघटनेने मानवी जीवन सुकर होण्यासाठी व बालकाच्या जीवनाला योग्य वळण लावण्यासाठी दहा दिशादर्शक मूलभूत जीवन कौशल्ये सांगितली. त्या दहा जीवन कौशल्यांपैकी परिणामकारक संप्रेषण हे एक जीवन कौशल्य आहे. आपण आपले विचार दुसऱ्याजवळ किती परिणामकारकपणे व्यक्त करतो, ही बाब आपल्या जीवनाचे यश निश्चित करते. ज्या वेळी पाठविणाऱ्याचा संदेश अपेक्षित असलेल्या पद्धतीने स्वीकारणारा स्वीकारतो, त्या वेळी प्रभावी संप्रेषण घडत असते.

परिणामकारक संप्रेषण ही कला आहे; ज्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाची छाप इतरांवर पडू शकते. शाळेत शिकणारी बरीच मुले स्वःचे मत मांडण्यास आणि दिलेली माहिती अचूकपणे सांगण्यास सक्षम आढळत नाहीत. इतरांचे विचार समजून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात गैरसमज, अपसमज, संघर्ष निर्माण होतात. म्हणून संप्रेषण प्रभावी होण्यासाठी योग्यरित्या श्रवण झाले पाहिजे. अर्थात, त्यासाठी समोरच्या व्यक्तीचे बोलणेही अर्थपूर्ण असावे.

व्याख्या ꞉ ‘सप्रेषण ही एक अशी प्रक्रिया आहे की, जिच्यामध्ये येणारे अनुभव दोघांनाही आपलेच वाटतात’.

‘दैनंदिन व्यवहारात आपण आपले विचार, कल्पना, इतरांना सांगतो; त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकतो; विचारांच्या, भावनांच्या, कल्पनांच्या देवाणघेवाणाला तंत्रविज्ञानाच्या भाषेत संप्रेषण असे म्हणतात’.

संप्रेषण ही केवळ एकतर्फी प्रकिया नसून त्यामध्ये विचारांची देवाण-घेवाण अपेक्षित आहे. ती शाब्दिक किंवा अशाब्दिक ही असू शकते. तसेच व्यक्तीचे ज्ञान, प्रेरणा, दृष्टिकोण यांनुसार त्यात बदल होतात.

संप्रेषणात विचार, कल्पना, माहिती, भावना इत्यादी बाबींची देवाण-घेवाण होते. बोलण्यातून किंवा हावभावातून, देहबोलीतून, लिखाणातून, संगीतातून, चित्रातून किंवा आणखी काही सर्जनशील विचारांतून एखादी व्यक्ती इतरांशी संप्रेषण साधू शकतो. संप्रेषण ही नेहमी द्विमार्गी असते. बोलणारा असला की, ऐकणारा निश्चितच असतो.

मुलभूत घटक ꞉

  • प्रेषक ꞉ एखादी व्यक्ती जेव्हा माहिती स्रोत असते, तेव्हा त्याला प्रेषक म्हटले जाते.
  • संदेश ꞉ प्रेषकाने चिन्हांकित केलेली माहिती म्हणजे संदेश. संदेश सुसूत्र, अर्थपूर्ण असावा.
  • माध्यम ꞉ संदेश पाठविण्यासाठी ज्या साधनाचा वापर केला जातो, ते साधन म्हणजे माध्यम. माध्यमाची निवड करतांना संदेशाचे स्वरूप, आशय, ग्राहकाची क्षमता यांचा विचार करणे आवश्यक असते.
  • ग्रहणकर्ता ꞉ संप्रेषण प्रक्रियेतील पहिला ध्रुव प्रेषक, तर दुसरा ग्रहणकर्ता असतो. संदेश ग्रहण करणाऱ्या व्यक्तीला ग्रहणकर्ता म्हटले जाते.
  • प्रत्याभरण ꞉ ग्राहकाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया म्हणजे प्रत्याभरण. तसेच वर्गात शिक्षकांच्या अध्यापनाला विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रत्याभरण.

पायऱ्या ꞉

  • माहितीचे संकलन ꞉ कल्पना निर्मिती करणे किंवा माहितीचे संकलन करणे ही संप्रेषणाची पहिली पायरी प्रेषकाशी संबंधित असते.
  • माहितीचे सुसूत्रीकरण ꞉ संकलित केलेली माहिती व्यवस्थितरित्या मांडणे म्हणजे माहितीचे सुसूत्रीकरण होय.
  • माध्यमाची निवड व संकेतिकीकरण ꞉ माहिती संप्रेषण करण्यासाठी कोणते माध्यम वापरावे, हे प्रेषकाने ठरवायचे असते. माध्यम ठरविल्यानंतर मिळविलेल्या माहितीचे संकेतांमध्ये रूपांतर केले जाते. सुरुवातीला सुचलेली किंवा संकलित केलेली माहिती कल्पनेच्या रूपात असेल, तर त्यास शब्द, हावभाव यांमध्ये रूपांतरित करावे लागते; याला माहिती संकेतिकीकरण म्हटले जाते.
  • प्रक्षेपण ꞉ निवडलेल्या माध्यमाद्वारे प्रेषक संदेशाचे प्रक्षेपण करतो. वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांसमोर नियोजित सूत्रबद्ध केलेला पाठ्यांश सादर करतात; हे त्या संदेशाचे प्रक्षेपण होय.
  • ग्रहण ꞉ प्रक्षेपित झालेला संदेश ग्राहकापर्यंत पोहोचतो आणि संबंधित ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने ग्रहणकर्त्याद्वारा तो स्वीकारला जातो.
  • निसांकेतिकीकरण व अन्वय ꞉ वर्ग अध्यापनात विद्यार्थी ग्राहकाची भूमिका बजावितात. शिक्षकाने प्रश्न, स्पष्टीकरण, दृकश्राव्य साधनांच्या साहाय्याने प्रसारित केलेल्या संदेशाचे विचारांच्या साह्याने निसंकेतिकीकरण करतात आणि पाठ्यांशाचा अर्थ त्यांना समजतो. विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तनबदल झाला म्हणजे संप्रेषण यशस्वी झाले, असे म्हणता येते.
  • प्रत्याभरण ꞉ प्रेषकाने दिलेला संदेश ग्राहकाला व्यवस्थितपणे समजला किंवा नाही, याचे प्रमाण म्हणून प्रतिक्रियेच्या स्वरूपात प्रत्याभरण दिले जाते.
  • गोंगाट ꞉ ज्यामुळे मूळ संदेशात बदल होतो किंवा संदेशाचे विकृतीकरण होते, त्या सर्व बाबी म्हणजे गोंगाट होय. गोंगाटविरहित संप्रेषण म्हणजे आदर्श संप्रेषण होय.

अडथळे ꞉

  • शारीरिक व भौतिक अडथळे ꞉ आजारपण, अस्वस्थपणा, वातावरणातील गोंगाट, साधन-सामुग्रीच्या उपलब्धतेमधील अडचणी, साधनांमधील दोष हे सर्व संप्रेषण प्रक्रियेतील अडथळे होत.
  • भाषिक अडथळे ꞉ चुकीच्या चिन्हाचा वापर, संपर्क अभाव, क्लिष्ट भाषेचा वापर, अस्पष्ट आलेख, आकृत्या इत्यादी संप्रेषण प्रक्रियेतील भाषिक अडथळे होत.
  • मानसशास्त्रीय अडथळे ꞉ पूर्वग्रहदुषित दृष्टिकोण, अभिरुची नसणे, अनावधान, मर्यादित अवधान क्षमता, चिंता, काळजी, मानसिक स्थिती इत्यादी संप्रेषण प्रक्रियेतील मानसशास्त्रीय अडथळे होत.
  • विद्यार्थ्यांच्या पाश्वर्भूमीतील अडथळे ꞉ विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान, असमान संस्कृती, शारीरिक व मानसिक वय इत्यादी संप्रेषण प्रक्रियेतील अडथळे आहेत.

प्रकार ꞉

  • अशाब्दिक संप्रेषण ꞉ शब्दांशिवायसुद्धा संप्रेषण घडू शकते. हसणे, रडणे, हुदंका देणे, ओरडणे, विशिष्ट आवाजात ओरडणे इत्यादी मौखिक संप्रषण असून स्पर्श करणे, गंधज्ञान, हावभाव, अभिनय इत्यादी अमौखिक किंवा अशाब्दिक संप्रेषण होय.
  • शाब्दिक संप्रेषण ꞉ शाब्दिक संप्रेषण हे भाषिक असते. यात प्रेषक व ग्राहक या दोघांचीही भाषा सारखी असणे आवश्यक असते. मौखिक भाषण, संवाद, काव्य इत्यादी मौखिक किंवा शाब्दिक संप्रषणाचे प्रकार आहेत; तर लिखित साहित्य, सांकेतिक संदेश, तक्ते, लिखित फलक इत्यादी अमौखिक संप्रेषणात येतात.

मार्ग ꞉

  • बोलणे–ऐकणे ꞉ दोन व्यक्ती किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती किंवा समूहामध्ये होणारे संप्रेषण बोलणे-ऐकणे या मर्गाने होते. दैनंदिक व्यवहारात सर्वांत जास्त या संप्रेषणमार्गाचा अवलंब केला जातो.
  • दाखविणे–पाहणे ꞉ चित्र, शिल्प, हावभाव, नृत्य यांतून कलाकार आपल्या भावना दाखवितात किंवा व्यक्त करीत असतात. त्यावरून ग्रहणकर्ता त्याचा अर्थ लावतो. शिक्षक वर्गात विविध दृकश्राव्य साधने वापरतात, विद्यार्थी त्यांचा अर्थ लावतात.
  • लिहीणे–वाचणे ꞉ वृत्तपत्रे, पुस्तके, मासिके, नियतकालिके या माध्यमांतून ग्राहकापर्यंत संदेश  पाहोचतो.

पद्धती ꞉

  • व्यक्ती व्यक्तींमधील संप्रेषण ꞉ वर्ग अध्यापनात शिक्षक जेव्हा एखाद्या विशिष्ट विद्यार्थ्याला प्रश्न विचारतात आणि विद्यार्थी त्या प्रश्नाचे उत्तर देतो, तेव्हा या पद्धतीचा उपयोग होतो. तसेच विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन करतांनाही या पद्धतीचा वापर केला जातो.
  • व्यक्ती–समूहामधील संप्रेषण ꞉ यामध्ये प्रेषक एकच असतो आणि ग्राहक अनेक असतात. एक व्यक्ती अनेक व्यक्तींना संदेश देतो. उदा., वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवितात.
  • समूहांतर्गत संप्रेषण ꞉ दूरदर्शन, नभोवाणी, चित्रपट या दृकश्राव्य साधनांद्वारे दिला जाणारा संदेश एकाच वेळी अनेक व्यक्तींना दिला जातो आणि त्यावर एका वेळी अनेक व्यक्तींच्या प्रतिक्रिया घडत असतात.

उपाय योजना ꞉ (अ) भाषिक अडथळ्यांवरील उपाययोजना ꞉

  • संदेशात आवश्यक तेवढीच माहिती द्यावी.
  • अध्यापनातून दृकश्राव्य साधनांचा यथायोग्य वापर करावा.
  • संदर्भ ग्रंथ, अध्यापन साहित्य, शिक्षक हस्तपुस्तिका यांचा उपयोग करावा.
  • साधी, सोपी, सरळ व विद्यार्थ्यांना समजेल अशी भाषा वापरावी.
  • आपण शिकविलेले विद्यार्थ्यांना समजले किंवा नाही, हे लगेच प्रश्नाच्या किंवा इतर माध्यमांच्या साह्याने जाणून घ्यावे.

(आ) मानसशास्त्रीय अडथळ्यांवरील उपाययोजना ꞉

  • विद्यार्थ्यांशी प्रेमाने व सहानुभूतीने वागावे.
  • विद्यार्थ्यांना शिकण्यात गोडी वाटावी, विषयात अभिरुची निर्माण व्हावी म्हणून अध्यापन सूत्रे, दृकश्राव्य साधने, अध्यापनाची तत्त्वे यांची सखोल माहिती मिळवून अध्यापनासाठी त्यांचा उपयोग करावा.
  • अध्यापनाकडे विद्यार्थ्यांचे अवधान केंद्रित करण्यासाठी आवश्यक त्या क्लृप्त्यांचा वापर करावा.
  • विद्यार्थी अध्ययनप्रवृत्त व्हावे म्हणून बाह्यप्रेरकांच्या साहाय्याने प्रेरणा जागृत करावी.

(इ) विद्यार्थ्याच्या पार्श्वभूमीतील अडथळ्यांवरील उपाययोजना ꞉

  • काही वेळा विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाबद्दल शिक्षक चुकीचा अंदाज बांधतात. त्यामुळे अध्यापनाचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान जागृत करावे, चाचणी द्यावी व नंतर अध्यापनास सुरुवात करावी.
  • विविध संस्कृतीमधील विद्यार्थी वर्गात असतात. त्या प्रत्येकाची दखल घ्यावी.
  • अध्यापनाचे किंवा संदेशाचे महत्त्व समाजावून सांगावे इत्यादी.

संदर्भ ꞉

  • उपासनी, ना. के., अध्यापन साधना, पुणे, १९६२.
  • गाजरे, चिटणीस; पाटील, नलिनी, शिक्षणाचे अधिष्ठान, पुणे, २००६.
  • पारसनीस, हेमलता; दुनाखे, अरविंद, शैक्षणिक व्यवस्थापन व प्रशासन, पुणे, ११९५.

समीक्षक : के. एम. भांडारकर