परिचर्या क्षेत्रात आवश्यक कौशल्यांपैकी एक महत्त्वाचे कौशल्य म्हणजे संभाषण होय. संभाषण म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस माहिती पुरविणे ज्यामध्ये काहीवेळा गुप्तता बाळगणे जरुरीचे असते, परंतु दिलेली माहिती त्या व्यक्तीस समजणे गरजेचे असते. संभाषण ही प्रक्रिया असून तिला भावनिकतेची जोड असते. ह्या संकल्पनेत विविध घटकांचा समावेश होतो. विचारातील स्पष्टता, अनुकुलता, हावभाव, व्यक्तीची बोलण्यातील अथवा लिहिण्यातील सकारात्मकता किंवा नकारात्मकता या सर्वांचा ‘संभाषण’ प्रक्रियेत समावेश केला जातो. परिचारिका रुग्णालयात रुग्णसेवा देताना किंवा सुदृढ व्यक्तीस सामजिक आरोग्यसेवा देताना आपल्या संवाद चातुर्याचा उपयोग करतात ज्यामुळे रुग्णाच्या मानसिकतेवर परिणाम होऊन त्याची रुग्णालयाविषयी आणि त्याचा आजार तसेच आजारातून बरे होण्याची सकारात्मकता वाढते.

संभाषणातून दिल्या जाणाऱ्या माहितीचा हेतू, त्यापासून निर्माण होणारी उत्कंठा व प्रश्न हे ज्याला निरोप दिला आहे त्या व्यक्तीस किंवा रुग्णास व्यवस्थितपणे समजावी व त्याविषयी नीट आकलन व्हावे हे प्रभावी संभाषणाचे प्रमुख ध्येय आहे.

प्रभावी संभाषणाची उद्दिष्टे : १.रुग्णांची शुश्रूषा करताना परिचारिका, रुग्ण आणि रुग्णांचे  नातेवाईक यांच्यातील परस्पर संबंध सकारात्मक आणि सलोख्याचा प्रस्थापित करणे. २) परिणामकारक संभाषणातून रुग्ण सेवा देणाऱ्या सर्व सहकारी संघाबरोबर सहकार्याचे संबंध  प्रस्थापित करून गुणात्मक रुग्ण सेवा देणे. ३) गुणात्मक रुग्ण सेवा देणाऱ्या सर्व टीम बरोबर प्रत्येक परिचारिकेला आपल्या कामाविषयीचे समाधान मिळविण्याची संधी प्राप्त करणे.

परिचारिका – रुग्ण संभाषण : रुग्णालयात येणारे विविध प्रकारचे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या दृष्टीकोनातून पाहता व त्यांच्या  मानसिकतेचा सर्वसाधारण विचार करता, अनावश्यक होणारे वादविवाद व तक्रारी टाळण्यासाठी परिचारिका खालील बाबी आपल्या वर्तणुकीत अवलंबितात.

  • देहबोली ओळखणे (Assess body language) : रुग्ण व त्याचे नातेवाईक यांच्या देहबोलीला ओळखून त्यांना समजेल अशाप्रकारे बोलणे, त्यांची समजण्याची पातळी समजून घेणे. (level of undrestanding ) शक्य असल्यास समोरा समोर बसून संवाद सांधणे, पाठमोरे किंवा पाठीमागे उभे असताना बोलणे टाळावे.
  • संवादातील सहजता (Essier interaction with client) : बोलताना छोटी छोटी वाक्ये उपयोगात आणावीत. सोपे व समजणारे प्रश्न रुग्णाच्या आजाराविषयी विचारावेत. एका वेळेस एकाच मुद्द्यावर बोलावे. क्लिष्ट व अवघड शब्द टाळावेत. आजाराविषयी समजवून सांगताना सोप्या व त्यांना समजेल अशाच भाषेत सांगावे.
  • आदर युक्त वागणूक व संभाषण (Communicate with proper & due respect) : रुग्ण व त्यांचे नातलग यांच्याशी बोलताना त्यांचे वय, त्यांचे घरातील किंवा समाजातील स्थान लक्षात घेऊन आदराने बोलावे. त्यांनी केलेल्या मागणीचा किंवा विनंतीचा जास्तीत जास्त पाठपुरावा करून त्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करावा. बोलताना हुकूम करण्याऐवजी (commanding) त्यांचे मत विचारात घेवून त्याला शक्य असल्यास महत्त्व द्यावे.
  • परिचारिकेच्या वागणुकीतील धीर गंभीरता ( Nurses to have a patience) : रुग्णाच्या आजारपणामुळे रुग्ण व त्यांचे नातलगांची परिस्थिती समजून घेण्याची मन:स्थिती नसते, याचा विचार करून परिचारिका बोलताना सावकाशपणे आणि सावधानता बाळगून संवाद करते. त्यांना सर्व बाबींवर विचार करण्यास वेळ दिला जातो. घाईगडबडीने केलेल्या संभाषणाचा विपरीत परिणाम होऊ शकतो, म्हणूनच सकारात्मक संवाद साधण्यासाठी परिचारिकेच्या वागणुकीत धीरगंभीरता आवश्यक असते.
  • बोलण्यातील सुसूत्रता व पद्धत (Monitor speech mechanics) : बोलण्यातील स्पष्टता व हळूवारपणा कायम ठेऊन, शांत व समंजसपणे समजावून सांगावे. आजाराविषयी व त्यातील विविध रोग निदान चाचण्या आणि आजारावरील उपाय योजना संदर्भात असलेल्या क्लिष्ट संज्ञा त्यांचा अर्थ समजेल आणि उमजेल अशा भाषेत रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना समजवावे.
  • लेखी सूचनांचा उपयोग (Written instrctutions to the patient ) : काही वेळेस रुग्ण त्यांना दिलेल्या सूचना विसरतात (उदा., शस्त्रक्रिया किंवा अपघात झाल्यानंतर त्यातून बरे होणारे रुग्ण), अशावेळी त्यांच्या रोजच्या औषधोपचाराविषयी, व्यायाम, जेवण, जेवणातील पथ्ये इत्यादी सूचना सोप्या आणि त्यांना समजणाऱ्या भाषेत लिहून दिल्यास सर्व नियोजन पद्धतशीरपणे सांभाळून रुग्ण बरा होण्यास मदत होते.
  • रुग्णास पुरेसा वेळ देणे ( Give patient ample time to respond ) : रुग्णास विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्याला घाई न करता आवश्यक तेवढा वेळ घेऊ द्यावा असे केल्याने रुग्णास त्याच्या आजारासाठी त्याचा मतांचा आदर केल्याचे समाधान मिळते.

सारांश : सकारात्मक संभाषण हे रुग्ण सेवेतील महत्त्वाचा घटक आहे. ज्याचा रुग्णाच्या आरोग्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे परिणाम होतो. तसेच रुग्ण सेवा देणाऱ्या परिचारिकेला देखील एक सुखद अनुभव मिळतो.

संदर्भ :

  • Menon, Usha, Essence of communication for Nurses in India, 2018.

समीक्षक : कविता मातेरे