पैशांऐवजी संपूर्ण किंवा अंशतः इतर वस्तू किंवा सेवांचे विनिमय करणे. प्रति व्यापारामध्ये एखादी वस्तू खरेदी करतांना त्या वस्तूच्या मोबदल्यात पैसे न देता आपल्या जवळील दुसरी वस्तू दिली जाते. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान आधुनिक यूरोप, जर्मन आणि काही पूर्व यूरोपीय देशांनी त्यांच्या अर्थव्यवस्थेत मुद्रास्फिती आणि अपुरेपणाच्या दबावामुळे वस्तूविनिमयामध्ये व्यापार करण्यास सुरुवात केली. मध्यपूर्व युद्ध (१९७३-७४), ईरानी क्रांती (१९७९) आणि इरान-इराक युद्ध (१९८०), तसेच त्या काळातील शीतयुद्ध या ऐतिहासिक घडामोडींमुळे तेलाच्या किमती वाढल्या होत्या. त्यामुळे प्रति व्यापार द्रुतगतीने वाढला; परंतु १९८० च्या दशकाअखेरीस तेलाचे दर कमी झाल्यामुळे आणि आर्थिक हालचालीत सुधारणा झाल्यामुळे प्रति व्यापार कमी झाले. १९८० आणि १९९० च्या दशकांत सोव्हिएट युनियनच्या विघटनामुळे नवीन तयार झालेल्या देशांकडे असलेले चलन रूपांतरित केले जाऊ शकत नव्हते. या देशांकडे परकीय चलनांचा साठा खूपच कमी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी या देशांनी प्रति व्यापाराचा अत्यंत महत्त्वपूर्ण वापर केला.

जेव्हा देशांमध्ये पुरेसे परकीय चलन नसते किंवा कोणत्याही प्रकारचे व्यापार करणे अशक्य असते, तेव्हा प्रति व्यापार उद्भवत असते. उदा., संयुक्त राष्ट्रसंघाचा इराकवर घालण्यात आलेल्या आर्थिक प्रतीबंधामुळे २००१ मध्ये भारताने ‘तेलासाठी अन्न’ या कार्यक्रमांतर्गत १५ लाख टन इराकी क्रूड तेलाच्या बदल्यात तितक्याच मूल्यांचे गहू व तांदळाचे वस्तू विनिमय करण्यासाठी सहमती दर्शविली.

महत्त्व :

  • जेव्हा परकीय चलन साठ्याची कमतरता असते, तेव्हा आयातदार देशांकरिता प्रति व्यापार हा सर्वोत्तम पर्याय असतो.
  • नवीन, कठीण आणि आव्हानात्मक बाजारपेठांत प्रवेश करण्यासाठीही प्रति व्यापार हा एक पर्याय आहे.
  • प्रति व्यापार अतिरिक्त साठ्याच्या विक्रीसाठी किंवा साठविलेल्या वस्तूंच्या विक्रीमध्ये मदत करतो.
  • प्रति व्यापाराचा उपयोग बाजारात स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी केला जाऊ शकतो.
  • प्रगतीशील देशांत तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जुन्या किंवा अप्रचलित झालेल्या वस्तूंची प्रति व्यापाराचा उपयोग करून प्रगतीशील देशांत निर्यात केली जाऊ शकते.
  • जर कर्जावरील विक्रीमुळे कर्जाची परिस्थिती वाईट निर्माण होऊ शकते असे वाटत असेल, तर विक्रेत्याने या परिस्थितीला टाळण्यासाठी प्रति व्यापाराचा उपयोग करून ती टाळली पाहिजे.
  • प्रति व्यापाराचा उपयोग करून उत्पादक त्याच्या उत्पादनाची विक्री किंमत लपवू शकतात; कारण प्रति व्यापारामध्ये विनिमय केलेल्या वस्तूंची किंमत जाणून घेणे सोपे नसते.
  • रोजगार वाढ आणि उत्पादन क्षमतेचा उत्तम उपयोग हे प्रति व्यापाराचे इतर फायदे आहेत.

मुख्य प्रकार : वस्तूविनिमय : वस्तूविनिमय म्हणजे पैशांचा वापर न करता वस्तू किंवा सेवांची खरेदी किंवा देयकासाठी इतर थेट वस्तू किंवा सेवांचा केलेला विनिमय. वस्तूविनिमयामध्ये दोन पक्षांमधील एखाद्या व्यवहारातील वस्तूंचे थेट विनिमय होत असते. आयात निर्यात बाजारपेठेत पुरविल्या जाणाऱ्या वस्तू-सेवांची भरणी वस्तू-सेवांची निर्यात करून केली जाते. वस्तूविनिमय कराराच्या वाटाघाटी दरम्यान, विक्रेत्याला व्यापारातील वस्तूंच्या बाजाराची किंमत माहित असणे आवश्यक असते. वस्तूविनिमयामधील वस्तू सोने, लोह, खनिज, पाणी, फर्निचर किंवा ऑलिव्ह ऑईल यांसारख्या श्रेणीतील असू शकतात. उदा., मलेशियन सरकारने जनरल इलेक्ट्रिककडून एकूण २० डिझेल इलेक्ट्रिक एंजिनांच्या खरेदीबदली ३० महिन्यांच्या कालावधित सुमारे २ लक्ष मेट्रिक टन पामतेल पुरवठा करण्याचे मान्य केले होते.

बदली व्यापार : या प्रकारच्या व्यवहारात तृतीय पक्ष व त्याची भूमिका यांचा समावेश होतो. या प्रकारच्या व्यवहारात एखादा विक्रेता जर खरेदीदाराकडून देयकाच्या रूपात माल देऊ इच्छित नसेल, तर तो खरेदीदाराने देऊ केलेल्या विक्रीचा निपटारा करण्यासाठी तृतीय पक्ष मदतीला येऊ शकतो. उदा., पोलंडमधील एक निर्यातक ग्रीसला परिवहन साधने निर्यात करतो आणि परतावा देयकाप्रमाणे ग्रीसच्या आयातकाराकडून प्रक्रिया केलेले अन्न घेऊ इच्छित नाही; परंतु जर ग्रीसने एखाद्या जर्मन कंपनीला प्रक्रियाकृत अन्न विकला आणि पोलिश निर्यातकाला जर त्या जर्मन कंपनीने यूरोमध्ये पैसे दिले, तर हा व्यवहार शक्य होऊ शकतो.

प्रति खरेदी : प्रति खरेदीला ‘समांतर व्यापार’ किंवा ‘समांतर वस्तूविनिमय’ असेही म्हटले जाते. या करारामध्ये दुसऱ्या देशातल्या एका कंपनीला वस्तू आणि सेवांच्या विक्रीसाठी रोख रकमेची पूर्तता करण्यात येते; पण ती कंपनी आयात देशातल्या दुसऱ्या कंपनीकडून विशिष्ट ठराविक कालावधित उत्पादनाची त्या रकमेएवढी म्हणजेच समान रक्कम खर्च करण्यास सहमती देतो; परंतु असा व्यवहार एका कराराचा भाग होऊ शकत नाही; परंतु तो व्यवहार दोन वेगवेगळ्या करारांमध्ये केला जातो. उदा., पेप्सी कोलाने जेव्हा आपले उत्पादन सोव्हिएट युनियनला विकले, तेव्हा कंपनीला परतावा रूबल्समध्ये करण्यात आला; परंतु रशियाशी झालेल्या कराराच्या अनुसार त्या रुबल्सचा वापर राय या धान्यापासून तयार केलेले मद्य आणि मद्यासारखे रशियन उत्पादने खरेदीसाठी खर्च केले गेले.

परत खरेदी : या करारांतर्गत विक्रेते तंत्रज्ञान, उपकरणे, प्रशिक्षण किंवा अन्य सेवा पुरवितात. त्या साधनांमुळे उत्पादित वस्तूच्या उत्पादनांपैकी विशिष्ट टक्केवारी आंशिक किंवा पूर्ण देयक म्हणून विकत घेण्यास सहमत होतात आणि उर्वरित रक्कम रोख स्वरूपात स्वीकार करतात. हे सौदे खूप दीर्घ मुदतीचे आणि मोठ्या प्रमाणाचे असतात. उदा., भारतीय राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने सोव्हिएट युनियनकडून २०० अत्याधुनिक लूम खरेदी करण्यासाठी २०० मिलियन रूपयांचा एक करार केला होता, ज्यांतर्गत देयक म्हणून ७५% कापड आणि २५% उरलेली रोख रक्कम देण्यात आली होती.

भरपाई : हा एक प्रकारचा करार असतो, जो बहुतेक बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा मोठ्या उत्पादकांकडून पुरविल्या जाणाऱ्या उच्च तंत्रज्ञानाच्या भांडवली वस्तूंची निर्यात आणि माध्यमांच्या उच्च मूल्यांशी संबंधित आहे. हे सहउत्पादन, परवाना उत्पादन, तंत्रज्ञान हस्तांतरण, परदेशी गुंतवणूक, संशोधन व विकास, तांत्रिक साहाय्य आणि प्रशिक्षण किंवा एकस्व (एकाधिकार) या करारांसारख्या अनेक स्वरूपांत असू शकतात. अशा करारांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या दोन मुख्य श्रेण्यांमध्ये विभागता येतात.

(१) प्रत्यक्ष करार ꞉ भरपाई हे प्रत्यक्ष असल्याचे तेव्हा समजले जाते, जेव्हा वस्तूचे काही घटक खरेदीदाराच्या देशामध्ये तयार केली जातात आणि विक्रेता त्यांना त्या देशातच वापरण्यासाठी खरेदी करण्यास सहमत होतात. उदा., एक विमान निर्माता दुसऱ्या देशात खरेदीदारला प्रवासी विमान विकतो आणि खरेदीदाराशी सहमत होतो की, विमानातील काही भागांचे उत्पादन तो खरेदीदाराच्या देशात करून त्याचे उपयोग विमान तयार करताना करेल.

(२) अप्रत्यक्ष करार ꞉ भरपाईला अप्रत्यक्ष समजले जाते, जेव्हा करारानुसार विक्रेत्याला खरेदीदाराच्या देशात दीर्घकालीन औद्योगिक किंवा इतर सहकार आणि गुंतवणुकीमध्ये प्रवेश करण्याची आवश्यकता असते; परंतु हे सहकार किंवा गुंतवणूक विक्रेत्याने पुरविलेल्या वस्तूंशी संबंधित नाही. उदा., वरच्या प्रत्यक्ष भरपाईच्या उदाहरणामध्ये एखादा विमान निर्माता दुसऱ्या देशात खरेदीदाराला प्रवासी विमान विकतो; परंतु येथे खरेदीदाराच्या देशातून प्रवासी विमानाचे भाग त्या देशात बनवून खरेदी करण्याऐवजी विक्रेता, एक चिपरबोर्ड कारखान्यात गुंतवणूक करण्यास सहमत होतो. खरेदीदाराच्या देशात उत्पन्न होणारे चिपरबोर्ड प्रवासी विमानाशी संबंधित नाही. याला अप्रत्यक्ष भरपाई म्हणतात.

नुकसानभरपाई व्यापार : नुकसानभरपाई व्यापार हा एक वस्तूविनिमय स्वरूपात असून तो काही प्रमाणात वस्तूंमध्ये, तर अंशतः चलन स्वरूपात करण्यात येतो. उदा., जनरल मोटर्स कॉर्पोरेशनने युगोस्लाव्हियाला १२ दशलक्ष अमेरिकन डॉलरची लोकोमोटिव्ह व डिझेल एंजीने विकली. ज्यांपैकी ८ दशलक्ष रक्कम रोख स्वरूपात आणि ४ दशलक्ष किमतीचे युगोस्लाव्हियन कटिंग साधने खरेदी केल्या.

टॉलिंग : यामध्ये विक्रेता कच्चा माल पुरवितो आणि देयक या कच्च्या मालापासून बनविलेली तयार वस्तू प्राप्त करतो; परंतु हे देयक अंशतः तयार वस्तू आणि अंशतः रोख स्वरूपात असू शकते. उदा., क्रूड ऑइलचे पेट्रोलियम पदार्थांमधे रूपांतरण करून त्यांची विक्री क्रूड ऑइल पुरविणाऱ्या विक्रेत्याला विकणे.

समाशोधन व्यवस्था : अशा प्रकारचा व्यापार करारनाम्यात दोन किंवा त्यांहून अधिक देशांचा समावेश असतो. या कराराद्वारे विशिष्ट कालावधीत परदेशी चलन न देता मालची आयात आणि निर्यात केली जाऊ शकते. मान्य कालावधीच्या शेवटी शिल्लक रक्कम एक मान्य परकीय चलनाच्या रोख रकमेद्वारे केली जाते. उदा., यूएसए डॉलर. आशियाई क्लिअरिंग युनियन (एसीयू) ही संघटना डिसेंबर १९७४ मध्ये स्थापन झाली असून सध्या बांगलादेश, भूतान, भारत, ईरान, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या नऊ देशांचे केंद्रीय बँका त्यांचे सदस्य आहेत (२०२३).

दोष :

  • कधी कधी ग्राहकाद्वारे विनिमयास दिलेल्या वस्तूंचा विक्रेत्याला काहीही उपयोग नसतो. प्रति व्यापाराचे करार त्रिपक्षीय ठरविला जातो, ज्यामुळे अधिक खर्च व वेळ लागू शकतो.
  • पुरविलेल्या वस्तूंच्या बदल्यात काय घ्यावे, हे शोधून काढण्यासाठी भरपूर वेळ लागतो. म्हणून प्रत्येक १० ते २० सौदे ज्याबद्दल बोलले जाते, त्यांपैकी कदाचित एक सौदा पार पाडला जातो.
  • जेव्हा सौदा हा दीर्घकालीन असतो, तेव्हा प्रति व्यापाराच्या व्यवहारांमध्ये जोखीम आणि अनिश्चितता खूप मोठ्या प्रमाणात आढळते. भविष्यातील वर्षांमध्ये वितरित करण्याच्या वस्तूंची उपलब्धता आणि गुणवत्ता समानच असेल, हे समजून घेणेसुद्धा धोकादायक आहे.
  • याशिवाय विनिमयात देय म्हणून प्राप्त झालेली उत्पादनांची पुनर्विक्रीचे जोखीम, दीर्घकाळात होणारी किंमतपातळीबद्दलचे जोखिम, ठरविलेल्या कराराप्रमाणे कामगिरी पार न पडण्याचे जोखीम, देयक जोखीम इत्यादी जोखीम आढळून येतात.

समीक्षक ꞉ श्रीनिवास खांदेवाले