सामाजिक निवडीसंदर्भातील एक सिद्धांत किंवा प्रमेय. हे प्रमेय प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ व नोबेल विजेते केनेथ ॲरो यांच्या नावाने ओळखले जाते. ॲरो यांनी आपल्या पीएच. डी.च्या प्रबंधाद्वारे हे प्रमेय सिद्ध करून १९५१ मध्ये आपल्या सोशल चॉईस अँड इंडिव्ह्युज्वल व्हॅल्यूज (सामाजिक निवड आणि व्यक्ती मूल्ये) या ग्रंथाद्वारे त्याचा प्रसार केला.
सामाजिक निवड सिद्धांताच्या संदर्भात ॲरोचे अशक्यता सिद्धांत हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. सामाजिक निवड सिद्धांताच्या संदर्भात असे गृहित धरले जाते की, व्यक्ती आणि समाजाकडून कशाचीही निवड करताना त्यांना पर्यायांचा अमर्याद परीघ उपलब्ध असून त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचा दबाव किंवा हुकुमत नसतो. त्यांना अनेक योग्य-अयोग्य पर्याय उपलब्ध असले, तरी त्या सर्वांचा त्यांच्यावर कोणताही प्रभाव पडत नाही. त्यांचे सर्व निर्णय हे पॅरेटोच्या सामाजिक निवडीच्या कार्यक्षमतेच्या निकषांनुसार घेतले जातात. या निकषांनुसार स्रोतांचे पुनर्वाटप करताना किमान एका व्यक्तीच्या कल्याणपातळीत घट केल्याशिवाय दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे अधिक कल्याण करता येऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर ॲरोचे अशक्यता प्रमेय असे मांडते की, निर्णय घेणारे किमान दोन सदस्य असतील आणि त्यांच्या समोर तीन पर्याय उपलब्ध असतील, तर वरील गृहीतकांची पूर्तता करणारे एकही सामाजिक कल्याण कार्यक्रम तयार करणे अशक्य आहे. म्हणजेच सामाजिक निवड करीत असताना मतदारांना तीन किंवा अधिक पर्यायांमधून श्रेणी पद्धतीने मतदानाची संधी असली, तरी मतदारांनी केलेली श्रेणीनुसारी निवड ही संपूर्ण समाजाने केलेली श्रेणीनुसारी निवड मानली जाऊ शकत नाही.
पसंतीक्रमाचे एकत्रीकरण करण्याची गरज अनेक विद्याशाखांमध्ये जाणवते. कल्याणाच्या अर्थशास्त्रात सर्वमान्य आणि आर्थिक दृष्ट्या स्थिर असा आर्थिक निर्णय अशा एकत्रित पसंतीक्रमाद्वारे घेतला जाऊ शकतो; तर निर्णयविषयक सिद्धांतामध्ये विविध निकषांवर आधारित तर्कशुद्ध निवड केली जाऊ शकते. निवडणूक पद्धतीत तर पसंतीक्रमांचे एकत्रीकरण करूनच मतदारांचे प्राधान्य कळते. उपलब्ध पर्यायांमधून एक ठोस पसंतीक्रम समोर यावा, असे ॲरोच्या प्रमेयाच्या रचनेत गृहीत असते. उपलब्ध पर्यायांमधून प्रत्येक व्यक्ती निर्णयाच्या प्रत्येक निकषानुसार एक ठराविक पसंतीक्रम ठरवत असते. त्यातून आपल्याला एक श्रेणी आधारित मतदान पद्धती विकसित करायची असते. तिला ‘पसंतीक्रम एकत्रीकरणाचा नियम’ किंवा ‘सामाजिक कल्याण कार्य’ असेही म्हणतात. ही पद्धती व्यक्तीनुसारी पसंतीक्रमातून एक सामाजिक पसंतीक्रम तयार करते. ॲरोच्या प्रमेयानुसार निर्णय घेणारे किमान दोन सदस्य असतील आणि त्यांच्या समोर तीन पर्याय उपलब्ध असतील, तर खालील निकषांची पूर्तता करणारे एकही सामाजिक कल्याण कार्य तयार करणे अशक्य आहे. ते निकष खालीलप्रमाणे सांगता येतील :
(१) जर गटातील प्रत्येक मतदाराने ‘क्ष’ या पर्यायाला ‘य’ या पर्यायाऐवजी पसंती दर्शवली असेल, तर याचा अर्थ संपूर्ण गटाची पसंती ‘क्ष’ या पर्यायाला आहे.
(२) ‘क्ष’ आणि ‘य’ या पर्यायांमधला प्रत्येक मतदाराचा पसंतीक्रम जर जसाच्या तसा किंवा स्थिर राहिला, तर ‘क्ष’ आणि ‘य’ या पर्यायांमधला संपूर्ण गटाचा पसंतीक्रमही जसाच्या तसा किंवा स्थिर राहतो. पर्यायांच्या जोड्या ‘क्ष’ आणि ‘झ’, ‘य’ आणि ‘झ’ किंवा ‘झ’ आणि ‘व’ अशा बदलल्या, तरी प्रत्येक मतदाराचा पसंतीक्रम आणि गटाचा पसंतीक्रम हा याच न्यायाने जसाच्या तसा किंवा स्थिर राहतो.
(३) कोणत्याही एका मतदाराकडे संपूर्ण गटाचा पसंतीक्रम कायम ठरविण्याची शक्ती नसते. म्हणजेच सामाजिक निवड करीत असताना मतदारांना तीन किंवा अधिक पर्यायांमधून श्रेणी पद्धतीने मतदानाची संधी असली, तरी मतदारांनी केलेली श्रेणीनुसारी निवड ही संपूर्ण समाजाने केलेली श्रेणीनुसारी निवड मानली जाऊ शकत नाही.
महत्त्व ꞉ ॲरोच्या प्रमेयांतर्गत संख्यावाचक किंवा गणनादर्शक मतदान पद्धती समाविष्ट होत नाही; कारण या पद्धतीमुळे श्रेणीक्रमांपेक्षा अधिक माहिती मिळते. सुरुवातीला ॲरोने संख्यावाचक किंवा गणनादर्शक मतदान पद्धतीचा विचार करायला पूर्णपणे नकार दिला होता; परंतु नंतर ‘केवळ तीन-चार वर्गांचा किंवा घटकांचा जेथे समावेश असेल, तेथे संख्यावाचक किंवा गणनादर्शक मतदान पद्धती सर्वोत्तम ठरते’, हे त्यांनी मान्य केले होते. ‘मतदारांचे पसंती दर्शविण्याचे स्वातंत्र्य’ या महत्त्वाच्या गृहीतकाला धक्का पोहोचला, तरी अॅरोचे प्रमेय निवड प्रक्रियेला लागू होत नाही. ॲरोने निवड केलेल्या गृहीतकांमुळे पसंती पद्धतीवर आधारित सर्व नियम-अधिनियम हे एका एकात्मिक रचनेचा भाग बनतात. त्यामुळे मतदानविषयक इतर सर्व सिद्धांतांपेक्षा ॲरोचे प्रमेय गुणात्मकरित्या श्रेष्ठ ठरते. किंबहुना सामाजिक निवडीच्या आधुनिक विचारांची किंवा सिद्धांताची सुरुवात या प्रमेयापासून झाली.
संदर्भ : Varian, Hal R., Intermediate Microeconomics : A Modern Approach, New York, 2010.
समीक्षक ꞉ राजस परचुरे