स्पर्धाक्षम बाजार हा पूर्ण स्पर्धेच्या जवळ जाणारा आणि मक्तेदारी व इतर बाजार प्रकारांपेक्षा भिन्न आहे. या बाजारात प्रवेश व निर्गमनासाठी कोणतीही अट नाही. स्पर्धाक्षम बाजार हा सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्राच्या दृष्टीने विल्यम बाउमोल यांच्या १९८२ मध्ये केलेल्या विश्लेषणाशी निगडित आहे. बाउमोल यांच्या मते, स्पर्धाक्षम बाजार म्हणजे अशी बाजारपेठ, जेथे विक्रेत्या स्पर्धकांची संख्या कमी असूनही संतुलनाची स्थिती व संभाव्य स्पर्धात्मक परिणाम हे पूर्ण स्पर्धेच्या बाजाराप्रमाणेच असतात. अशा प्रकारचा स्पर्धाक्षम बाजार प्रत्यक्षात अस्तित्वात असणे कठीण आहे; परंतु अशा बाजाराच्या स्पर्धेची तीव्रता मात्र तपासता येते. कोणताही बाजार हा जास्त प्रमाणावर स्पर्धाक्षम असेल, तर तो पूर्ण स्पर्धेच्या जवळ जाणारा असतो.

वैशिष्ट्ये : स्पर्धाक्षम बाजाराचे मुख्यत: तीन वैशिष्ट्ये आहेत :

  • (१) मुक्त प्रवेश व बाजार निर्गमन : बाजार विश्लेषणाच्या नवीन सिद्धांतानुसार कोणत्याही बाजारात किमतीचे व उत्पादनाचे निर्धारण हे बाजाराच्या वैशिष्ट्यांवर किंवा बाजाराच्या प्रकारांवर (पूर्ण स्पर्धा किंवा मक्तेदारी) अवलंबून नसून स्पर्धेच्या शक्यतेवर अवलंबून असते. स्पर्धाक्षम बाजारात कोणत्याही नवीन विक्रेत्यास मुक्त प्रवेश आणि बाजार निर्गमनाची संधी असते. म्हणूनच स्पर्धेची पातळी अधिक तीव्र होत जाते. समजा, एखाद्या मक्तेदारी बाजारात मक्तेदाराने नवीन विक्रेत्यांना प्रवेशासाठी अडथळे निर्माण करून अवाजवी नफा मिळविला; परंतु त्याच वेळी त्या मक्तेदाराचे उत्पादनासाठी लागणाऱ्या मुख्य संसाधनांवर नियंत्रण नसेल, तर नवीन विक्रेत्यांना सहज बाजार प्रवेश करता येईल आणि तो मक्तेदारीचा बाजार स्पर्धाक्षम बनत जाईल.
  • (२) बुडीत खर्चाचा अभाव : स्पर्धाक्षम बाजारात बुडीत खर्च नसतो. हा बुडीत खर्च म्हणजे असा खर्च की, जो उत्पादन बंद झाल्यावर भरून काढता येऊ शकत नाही. उदा., एखाद्या विक्रेत्याने लोह-पोलाद क्षेत्रात प्रवेश करून उत्पादनासाठी यंत्रसामग्री खरेदी केली आणि कालांतराने या क्षेत्रात वाढलेल्या स्पर्धेमुळे उत्पादक बाजारातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असेल, तर अशा वेळी या यंत्रसाग्रीवर झालेला खर्च भरून निघत नाही अथवा इतरत्र वळवता येत नसल्याने त्यास बुडीत खर्च असे म्हणतात. बुडीत खर्चामुळे बाजार निर्गमनात अडथळे निर्माण होतात, जे स्पर्धाक्षम बाजाराच्या सिद्धांताशी विसंगत आहेत. स्पर्धाक्षम बाजार हा उचित प्रमाणात लवचिक असतो; जेणेकरून उद्योजकाला बुडीत खर्च सोसावा लागत नाही.
  • (३) प्रस्थापित व नव उद्योजकांसाठी समान तंत्रज्ञान : स्पर्धाक्षम बाजाराला लागू पडणारे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे, समान दर्जाचे तंत्रज्ञान सर्वांसाठी उपलब्ध असणे होय. ज्यामुळे उत्पादनाचा सरासरी खर्च हा सर्वांना सारखा येतो. जर बाजारातील प्रस्थापित विक्रेत्यांकडे अद्ययावत तंत्रज्ञान असेल, तर त्यांची आर्थिक बचत वाढेल, त्यांचा सरासरी उत्पादन खर्च कमी होईल आणि जेणेकरून नवीन उत्पादकांना बाजार प्रवेशासाठी अडथळा निर्माण होईल. म्हणूनच स्पर्धाक्षम बाजारात तंत्रज्ञानाची उपलब्धता सर्वांसाठी सारखी असते. या संदर्भात स्पर्धाक्षम बाजारात सरकारी हस्तक्षेपाला वाव असल्याने ते मान्य करून तंत्रज्ञानाची उपलब्धता समान असल्याचे मान्य करतो. यातून पूर्ण स्पर्धा व स्पर्धाक्षम बाजार यांतील फरक अधोरेखित होतो. तसेच या बाजारात मुक्त प्रवेश असल्याने कोणत्याही विक्रेत्याकडे मक्तेदारी अधिकार नसतात. मक्तेदारालादेखील संभाव्य स्पर्धेच्या भीतीने किंमतनिर्धारण ही स्पर्धाक्षम बाजाराप्रमाणेच करावी लागते.

स्पर्धाक्षम बाजाराची वरील तीन मुख्य वैशिष्टांव्यतिरिक्त (१) या बाजारात कधीही अवाजवी नफा मिळत नाही. (२) बाजार संतुलनाच्या सर्व अटी पूर्ण स्पर्धेप्रमाणेच असतात. (३) या बाजारात किंमत व सीमांत खर्च समान असल्यामुळे केवळ सरासरी नफा मिळतो. तसे नसल्यास सरकारी नियंत्रण व धोरणांचा अवलंब करण्याची मुभा असते इत्यादी वैशिष्ट्ये आहेत.

स्पर्धाक्षम बाजार हा बाजार विश्लेषणाचा आधुनिक सिद्धांत असून असा बाजार प्रत्यक्षात शक्य नसला, तरी एक आदर्श बाजारसंरचना म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. म्हणूनच पूर्ण स्पर्धेचा बाजार हा स्पर्धाक्षम बाजार असतो; पण स्पर्धाक्षम बाजार हा पूर्ण स्पर्धेचा बाजार असेलच असे नाही.

स्पर्धाक्षम प्रकारचा बाजार प्रत्यक्षात असणे शक्य नसले, तरी जोपर्यंत बाजारात संभाव्य स्पर्धक असतात, तोपर्यंत स्पर्धेची तीव्रता टिकून राहते. बाजाराची स्पर्धात्मक तीव्रता ही अंतिमतः उपभोक्त्यांच्या व अर्थव्यवस्थेच्या हिताचीच असते.

समीक्षक : राजस परचुरे