मर्यादित दायित्व म्हणजे व्यावसायिक व्यक्तींचे असे आर्थिक दायित्व की, जे त्यांनी व्यवसायात गुंतविलेल्या रकमेइतके मर्यादित असते. मर्यादित दायित्व ही संकल्पना व्यावसायिक संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. ही संकल्पना एक व्यक्तिभूत किंवा मालकीच्या व्यवसायात लागू होत नसून ती इतर प्रकारच्या व्यवसायांमध्ये लागू पडते. या संकल्पनेला व्यावसायिक अधिकाधिक प्राधान्य देतात. मर्यादित दायित्व ही गुंतवणूकदार किंवा मालक यांची आर्थिक धोक्यातील मर्यादित असुरक्षितता असते. त्यांनी व्यवसायात गुंतवणूक केलेल्या रकमेपलिकडे त्यांचे आर्थिक दायित्व अपेक्षित नसते. कंपनीतील भागधारक सभासदांचे दायित्त्व हे त्यांनी धारण केलेल्या भागाच्या रकमेइतके मर्यादित असते. अशा प्रकारच्या कंपनीस ‘भागानुसार मर्यादित दायित्व कंपनी’ असे म्हटले जाते. अशा प्रकारची कंपनी आर्थिक नुकसान सोसत असल्यास आणि दिवाळखोर होत असल्यास कंपनीच्या भागधारक सभासदांचे आर्थिक दायित्वापोटी त्यांच्या खाजगी मालमत्तेवर टाच आणली जात नाही. त्यामुळे खासगी संपत्ती सुरक्षित असते. जोखीम फक्त त्यांनी उद्योग व्यवसायात गुंतविलेल्या रकमेपुरतीच मर्यादित असते. मर्यादित दायित्व असलेल्या भागीदारी कंपनीत मालक व्यक्तीश: कंपनीची देणी भागविण्यासाठी जबाबदार नसतात; परंतु भागीदारी व्यवसायात त्यांचे अस्तित्व गुंतवणुकीसंदर्भात संमिश्र स्वरूपाचे असते. मर्यादित दायित्व कंपनी सुरू करण्यामागे गुंतवणूकदारांना संरक्षण प्रदान करणे आणि भागीदारीचा कर दर्जा राखणे हे एक कारण असते. मर्यादित दायित्व कंपनी स्थापन करण्याचे नियमन राज्याच्या कायद्यान्वये केले जाते. भागधारकांचा अधिकतम नफा ही व्यवस्थापनाची वैधानिक जबाबदारी असते, हे मर्यादित दायित्वाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

भागीदारी व्यवसायाच्या बाबतीत हा चिरंतन वारसा आहे. भागीदारांमधील बदल गृहीत न धरता मर्यादित दायित्व भागीदारीचे अस्तित्व चालू राहू शकते. अशा भागीदारीत व्यवसाय नवीन करारानुसार नवीन नावाने मालमत्ता धारण करू शकतो. यापुढे इतर भागीदारांच्या स्वतंत्र किंवा अनधिकृत कार्यास कोणताही भागीदार जबाबदार नसतो. करारातील तरतुदींनुसारच मर्यादित दायित्व भागीदारीचे परिचलन केले जाते.

वैधानिक जबाबदाऱ्यांमुळे मर्यादित दायित्व कंपनीस योग्य गुंतवणूकदार शोधणे कठीण जाते. भागीदारी व्यवसायाच्या तुलनेत मर्यादित दायित्व कंपनीत देयकाचे शुल्क (रक्कम) अधिक असते. राज्यानुसार बदलणाऱ्या कायद्यान्वये ही अडचण असते.

संदर्भ ꞉

  • Journal of Evolutionary studies in Business, vol. 2, Barcelona.
  • Nagarkar, Lata, Business Law Business Regulatory Framework, Mumbai, 2018

भाषांतरकार ꞉ हितेश देशपांडे

समीक्षक ꞉ विनायक गोविलकर