एखादी व्यक्ती एखादा निर्णय (विशेषत꞉ आर्थिक स्वरूपाचा निर्णय) कसा घेतो आणि त्यामुळे मानवी मेंदूत कोणत्या क्रिया-प्रक्रिया घडत असतात, हे जाणून घेण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करणारी एक अभ्यासशाखा. अलीकडच्या काळात एखादी व्यक्ती एखाद्या विशिष्ट परिस्थितीत आर्थिक निर्णयाची निवड कशी करू शकेल, याचे पद्धतशीर ठोकताळे बांधण्यासाठी या शाखेचा उपयोग केला जात आहे. अर्थातच, ही शाखा परिपूर्ण अवस्थेला पोहोचलेली नसून अजूनही विकसित होत आहे. तज्ज्ञांच्या मते, ही शाखा प्रायोगिक तसेच वर्तनात्मक अर्थशास्त्राची उपशाखा आहे. ‘आर्थिक, मानवी मस्तिष्क आणि मानसशास्त्र यांच्या दृष्टीकोनातून मानवी निर्णय प्रक्रियेचा केलेला अभ्यास म्हणजे, चेता अर्थशास्त्र होय’. या अभ्यासामुळे वास्तवातील मानवी आर्थिक व्यवहाराचे स्पष्टीकरण करणारी नवीन आर्थिक प्रारूपे विकसित करण्यासाठी मार्गदर्शन होते. आधुनिक काळात मूळच्या मुख्य प्रवाहातील अर्थशास्त्रात आंतरविद्याशाखीय उपशाखांची भर पडत आहे. उदा., कायदा व अर्थशास्त्र, पर्यावरणीय अर्थशास्त्र इत्यादी. चेता अर्थशास्त्र हे अद्ययावत आणि महत्त्वाचे क्षेत्रसुद्धा अर्थशास्त्रात महत्त्वपूर्ण आंतरविद्याशाखीय उपशाखा आहे.
इतिहास ꞉ सुमारे तीनशे वर्षांपासून सामाजिकशास्त्रे आणि निसर्गशास्त्र या विषयांचे शास्त्रज्ञ मानवी निर्णय प्रक्रियेचा अभ्यास करत आहेत; परंतु त्यांचे मार्ग निरनिराळे होते. १९९० च्या दशकापासून नैसर्गिक आणि सामाजिक शास्त्रांचे मिश्रण करून आंतरविद्याशाखीय अभ्यास होण्यास सुरुवात झाली. पीटर शिझगल आणि केंट कोनोव्हार या अर्थतज्ज्ञांचा चेता अर्थशास्त्रावरील ‘ऑन दी न्युरल कॉम्प्युटेशन ऑफ युटिलिटी’ हा पहिला संशोधनपर लेख १९९६ मध्ये प्रकाशित झाला. मायकेल प्लॅट आणि पॉल ग्लीमशर यांनी १९९९ मध्ये लिहिलेल्या ‘न्युरल कॉरीलेट्स ऑफ डिसिजन व्हेरिबल्स इन पॅरिएटल कोर्टेक्स’ या लेखामुळे या शाखेत मोलाची भर पडली. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॅनियल काहनेमन आणि त्यांचे सहकारी यांनी २००१ मध्ये मानवावर प्रयोग करून याबाबतीतील पहिला लेख प्रसिद्ध केला. त्यामुळेच त्यांना २००२ मधील नोबेल पुरस्कार व्हर्नोन स्मिथ यांच्याबरोबर विभागून मिळाला. हा प्रयोग भवितव्य सिद्धांत (प्रॉस्पेक्ट थिअरी) या नावाने ओळखला जातो. वेगाने फिरणाऱ्या जुगाराच्या चक्रावरून ‘शून्य डॉलर कमाविणे’, हा तीनपैकी सर्वांत वाईट आणि सर्वांत चांगला पर्याय असताना निरनिराळ्या व्यक्ती त्यावर निरनिराळी प्रतिक्रिया देतात, या वर्तनावर आधारित हा प्रयोग होता. मायकेल कोस्फेल्ड, अर्न्स्ट फेर या अभ्यासकांनी २००५ मध्ये ‘ऑक्सिटोसीन’ हा लेख लिहून एक प्रयोग केला. मेंदूतील रसायनाचा आणि विश्वास या भावनेचा सहसंबंध या प्रयोगातून सिद्ध करण्यात आला होता. यानंतरच्या काळात या शाखेचा खऱ्या अर्थाने सातत्यपूर्ण विकास होत गेला. आजच्या काळात विशेषकरून अमेरिकेत अनेक संस्था या क्षेत्रात कार्यरत असून विविध प्रकल्प पार पाडत आहेत; तसेच याविषयीचे प्रशिक्षण देत आहेत.
चेता अर्थशास्त्रात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहेत, त्याची प्रमुख चार कारणे सांगता येतील ꞉
- (१) काही तज्ज्ञ केवळ चेताशास्त्राच्या दृष्टीनेच प्रयोग करतात.
- (२) काही तज्ज्ञ मानतात की, हे प्रयोग म्हणजे मानवी कल्याण मापनाचा एक अपूर्ण, परंतु नवा मार्ग असू शकतो.
- (३) कल्याणकारी अर्थशास्त्रात पायाभूत योगदान देणाऱ्या एजवर्थ यांनी उपयोगितेचे प्रत्यक्ष मापन करू शकणाऱ्या सुखमापकाची कल्पना मांडली होती; तर रामसे या तज्ज्ञांनी मनोधक्का मापकाचे स्वप्न पाहिले होते.
- (४) आयर्विंग फिशर यांनीही उपयोगितेच्या थेट मापनाबाबत सविस्तर लेखन केले होते. यातूनच चेता अर्थशास्त्राची बीजे रोवली गेली, असे तज्ज्ञांचे मत आहे.
अन्न आणि पैसा हे दोन घटक मानवी समाजासाठी आवश्यक पुरस्कारात्मक घटक आहेत, असे मानले जाते. मानवाला आनंद किंवा सुखाचे अनुभव निरपेक्षपणे किंवा वस्तुनिष्ठतेने घेता येत नाहीत. अर्थशास्त्रात याला ‘उपयोगिता’ किंवा ‘मूल्य’ अशी संज्ञा आहे. मेंदूच्या वर्तनावरील शास्त्रीय प्रयोगातून असे आढळून आले की, पुरस्कार मिळण्याचा कालावधी आणि पुरस्काराचे आकारमान या बाबींचा लोकांच्या आर्थिक निर्णयप्रक्रियेवर प्रभाव पडत असतो. अजून तज्ज्ञांनी कल्पिलेला सुखमापक तयार झालेला नाही; मात्र त्या दिशेने बरीच प्रगती झालेली आहे. उघड पसंतीपेक्षा चेता मापके अधिक उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.
स्वरूप आणि व्याप्ती ꞉ चेता अर्थशास्त्र ही शाखा जैविक अर्थशास्त्रापेक्षा पूर्णपणे निराळी आहे. चेता अर्थशास्त्राच्या अभ्यासाची उद्दिष्टे मानवापुढील बहुविध पर्यायांची निवड प्रक्रिया जाणून घेणे आणि तदनुषंगाने घडून येणारी कृती अभ्यासणे ही आहे. यात आर्थिक वर्तनामुळे आपल्या मेंदूच्या आकलनावर कसा परिणाम होतो आणि चेताशास्त्रीय शोधामुळे अर्थशास्त्रातील प्रारूपांची रचना कशी मांडता येऊ शकेल, यावर भर दिला गेला आहे.
बहुतांश चेता अर्थशास्त्र मूलभूत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय तत्त्वावर आधारित आहे. यासाठी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ पॉल अँटनी सॅम्युएल्सन यांचा उघड पसंती सिद्धांत, अपेक्षित उपयोगिता सिद्धांत यांचा आधार घेतला जातो. म्हणजेच, यात उपयोगिता तत्त्व आणि सिद्धांताचा सर्वाधिक वापर केला जातो. या शाखेच्या अभ्यासासाठी निर्णयप्रक्रियेतील आवश्यक मेंदूजैविक आणि संगणकीय बाबींचा आधार ए. रंजेल, सी. कामेरर आणि पी. आर. माँटेग्यू या तज्ज्ञांनी पुरविलेला आहे. या अभ्यासात एखादी निर्णयप्रक्रिया पाच टप्प्यांत विभागली जाते ꞉
- (१) विशिष्ट समस्येचे सादरीकरण निश्चित केले जाते. यात अंतर्गत व बाह्य परिस्थिती आणि संभाव्य कृतीक्रमाचे विश्लेषण केले जाते.
- (२) संभाव्य कृतींना मूल्ये दिली जातात.
- (३) मूल्यांकनावर आधारित एक विशिष्ट कृती निवडली जाते.
- (४) प्रयोगातील भाकीत परिणामांच्या लाभप्रदतेचे मूल्यांकन करते.
- (५) शेवटच्या टप्प्यात एकूण प्रक्रियेचे अध्ययन केले जाते. यात वरील सर्व प्रक्रियांच्या भविष्यकालीन निर्णयांत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने अद्ययावतीकरण केले जाते.
अभ्यास पद्धती ꞉ चेता अर्थशास्त्र या अभ्यासशाखेत प्रामुख्याने मेंदूक्रियाशास्त्र, प्रयोगात्मक व वर्तनात्मक अर्थशास्त्र, सामाजिक आणि आकलन मानसशास्त्र या विषयांचे मिश्रण आहे. या व्यतिरिक्त सैद्धांतिक जीवशास्त्र, संगणकशास्त्र आणि गणितामधील नवीन दृष्टीकोनाचाही वापर यात केला जातो. अशा विविध शास्त्रीय साधनांच्या वापराद्वारे केवळ एकाच दृष्टीकोनाच्या वापरातून निर्माण होणारे दोष टाळण्याचा प्रयत्न चेता अर्थशास्त्रात केला जातो; कारण मुख्य प्रवाहातील अर्थशास्त्रातील अपेक्षित उपयोगिता आणि तार्किक अभिकर्ते यांसारख्या संकल्पना अजूनही वापरात आहेत; परंतु अशा प्रारूपांद्वारे प्रत्यक्षातील अनेक व्यावहारिक किंवा चौकटबद्ध मानवी वर्तनांचे परिपूर्ण स्पष्टीकरण मिळत नाही.
कोणत्याही आर्थिक निर्णयात सर्वाधिक एकूण उपयोगितेची तुलना करून निर्णय घेतले जातात; पण काही वेळा यात पर्याप्तता पाळली जाईलच, असे नाही. या विरोधाभासातून चेता अर्थशास्त्र उदयाला आले. कोणत्या प्रकारच्या निर्णयप्रक्रियेत मेंदूचा कोणता भाग उद्दीपित किंवा सक्रीय असतो, हे निश्चित करून तज्ज्ञ कमी पर्याप्त आणि अतार्किक निर्णयांमागचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करतात. बहुतेक वेळा या प्रयोगात संशोधनासाठी मानवाचाच वापर केला जातो. काही तज्ज्ञ मात्र विविध प्रकारच्या प्राण्यांवर प्रयोग करून अधिक नियंत्रित स्थिती आणि गृहीतकांच्या आधारे आर्थिक प्रारूपांची चाचणी थेटपणे घेतात.
वर्तनात्मक अर्थशास्त्रात सामाजिक, आकलनात्मक आणि भावनिक घटकांद्वारे आर्थिक निर्णयांचा अभ्यास केला जातो. चेता अर्थशास्त्रामुळे मेंदूशास्त्रीय पद्धतींची भर या अभ्यासात पडली आहे. काही तज्ज्ञांचा असा दावा आहे की, यामुळे आर्थिक निर्णय प्रक्रियांचे आकलन अधिक एकात्मपद्धतीने होऊ शकेल. वर्तनात्मक अर्थशास्त्रात प्रयोगार्थीच्या अनुभवांची नोंद ठेवून त्या माहितीच्या आधारे कामगिरीच्या परिणामांचे भाकीत करणारी औपचारिक प्रारूपे तयार केली जातात. चेता अर्थशास्त्रात हा दृष्टीकोन विस्तारला जातो. त्यात मेंदूच्या कृतींचे निरीक्षण चलांच्या संचात मांडले जाते. याच्या लक्ष्य माहितीचा आणखी एक संच प्रारूपाच्या परीक्षणीय गृहितांशी जोडला जातो. यातील संशोधन पारंपरिक आर्थिक प्रारूपांशी मिळतेजुळते नसते. यापूर्वी हे वर्तन अर्थतज्ज्ञांकडून अतार्किक स्वरूपाचे समजले जात असे; परंतु चेता अर्थशास्त्रात तज्ज्ञ या वर्तनाची जैविक कारणे देण्याचा प्रयत्न करतात. यामुळे आपल्याला अपर्याप्त वर्तनाची योग्य कारणमीमांसा मिळू शकते.
प्रमुख संशोधन क्षेत्र ꞉ चेता अर्थशास्त्र या शाखेच्या संशोधनात प्रामुख्याने पुढील क्षेत्रांचा समावेश होतो.
(१) धोका आणि अनिश्चिततेतील निर्णय प्रक्रिया ꞉ या क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी संगणकशास्त्राची मदत घेतली जाते. आपले बहुतांश निर्णय कोणत्या ना कोणत्या धोक्याच्या परिस्थितीत घेतले जातात. ‘प्रत्येक परिणामाची संभाव्यता ठाऊक असणाऱ्या अनेक शक्य परिणामांतील अनिश्चितता‘ अशी धोक्याची व्याख्या करतात. सर्वप्रथम डॅनिएल बर्नोली यांनी इ. स. १७३८ मध्ये धोक्यातील निर्णय प्रक्रियेचे स्पष्टीकरण देण्यासाठी मांडलेल्या ‘महत्तम उपयोगिता’ संकल्पनेचा वापर केला जातो. यात मानव तार्किक आहे, असे गृहीत धरले जाते आणि त्याच्या प्रत्येक निर्णयातून मिळणाऱ्या अपेक्षित उपयोगितेचे सर्व पर्याय तपासले जातात. संशोधनातून आणि अनुभवांद्वारे महत्तम उपयोगिता तत्त्वाशी विसंगत असणारे अनेक सर्वसाधारण आकृतिबंध स्पष्ट केले जातात. उदा., लहान संभाव्यतांना अधिक महत्त्व आणि मोठ्या प्रमाणातील संभाव्यतांना कमी महत्त्व देण्याची प्रवृत्ती असते.
धोक्याच्या किंवा जुगारी निर्णय स्थितीत मेंदूचा उजवा भाग कार्यरत असतो. धोक्याचा नकारात्मक परिणाम जाणून घेण्याचे मुख्य कार्य हा भाग करतो. याशिवाय डोपामाईन नावाचे मेंदूतील रसायन मेंदूभर अनिश्चिततेचे वहन करत असते. डोपामाईनयुक्त न्युरॉन्स अनपेक्षित लाभ मिळाल्यावर अतिशय सक्रीय होतात. माकडे आणि उंदीर यांच्यावरील प्रयोगांतून असे दिसून आले की, धोकादायक वर्तनात डोपामाईन हा महत्त्वाचा मध्यस्थी घटक आहे. व्यक्तीमधील धोका टाळण्याची प्रवृत्ती टेस्टोस्टेरॉन या रसायनावर अवलंबून असते. उदा., धोकादायक व्यवसायाची निवड आणि या रसायनाची पातळी यांच्यातील सहसंबंधांवर संशोधन केले गेले आहे. यातून असे दिसून आले की, स्त्रियांची अधिक धोका टाळण्याची प्रवृत्ती असते; परंतु हा फरक लहान वयात कमी असतो. म्हणजेच सामाजिक वातावरणामुळे स्त्री-पुरुष धोका निवडीत तफावत पडण्याची शक्यता आहे.
अनिश्चिततेमध्ये मेंदूचे अनेक भाग गुंतलेले असल्याचे आढळून येते. जेव्हा परिणामांबाबत अनिश्चितता असते, तेव्हा मेंदूच्या पुढील भागातील काही भाग आणि त्यामागील भाग सक्रीय होतो, असे दिसून आले आहे. साधारणत:, मेंदूचा पुढील भाग तार्किकता आणि आकलन प्रक्रियेत सक्रिय असतो. म्हणजेच, जेव्हा सर्व संदर्भ उपलब्ध नसतात, तेव्हा मेंदूचा पुढचा आणि मधला भाग कार्यरत असतो, हे प्रत्यक्ष प्रयोगांत दिसून आले आहे.
(२) वर्तनशास्त्रातील क्रमवार आणि कार्यात्मक स्थानिक प्रारूप विरुद्ध वितरणात्मक उतरंडीचे प्रारूप ꞉ मेंदू होणाऱ्या लाभापेक्षा हानीबाबत अधिक सतर्क असतो आणि त्यामुळे व्यक्तीचे वर्तन अतार्किक होऊ शकते, याची मीमांसा यात केली जाते.
(३) धोका प्रतिरोध ꞉ धोक्याविरुद्ध निर्णय घेणे, ही मानवी प्रवृत्ती आहे. विशिष्ट रक्कम मिळविण्याच्या मूल्यापेक्षा ती रक्कम गमाविण्याची हानी अधिक वाटते. ही प्रक्रिया मेंदूच्या एकाच प्रभागाकडून चालवली जाते की नाही, याबाबत विरोधी मतमतांतरे आहेत. एका भागाकडून तार्किक जबाबदार पर्याय आणि दुसऱ्या भागाकडून उत्स्फूर्त अतार्किक भावनिक पर्यायांचे परीक्षण करण्याची व्यवस्था आहे; मात्र यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे.
(४) आंतरकालिक निवड ꞉ धोक्यामधील निवडीप्रमाणेच अर्थशास्त्रात आंतरकालिक निवड ही केंद्रीय कल्पना आहे. म्हणजे, दीर्घ काळात विस्तारले जाऊ शकणाऱ्या एखाद्या निर्णयाचे लाभ आणि तोटे यातील निवड करण्यासंदर्भातील प्रभावी प्रारूप म्हणजे काळ – कसर उपयोगिता होय. यात असे गृहीत धरले जाते की, मानवाला सातत्यपूर्ण काळ – पसंती करायची असते. तो प्रत्येक घटनेच्या काळाचा विचार न करता त्याचे मूल्यांकन करत असतो. उदा., काळ – कसर उपयोगिता दृष्टीकोनात असे गृहीत आहे की, लोक उद्या मिळणाऱ्या दोन चॉकलेट्सपेक्षा आजच्या एका चॉकलेटला अधिक महत्त्व देतात; कारण यात छोट्या छोट्या कालावधीच्या अंतराने मूल्यांकन वेगाने घटते. तत्कालिक आणि विलंबित उपलब्धीची निवड करण्याचे काम मेंदूचे दोन निराळे विभाग करतात. याबाबत मनुष्य आणि प्राणी या दोहोंच्या वर्तनात विरोधी निरीक्षणे मिळतात.
(५) सामाजिक निर्णय प्रक्रिया ꞉ व्यक्तींच्या निर्णयप्रक्रियेप्रमाणेच गटांच्या किंवा इतर व्यक्तींच्या निर्णयाचाही अभ्यास महत्त्वाचा असतो. व्यक्ती आपल्या भागीदाराशी सहकार्य करेल किंवा फसवेल हे जाणून घेण्यासाठी ही शाखा उपयुक्त ठरते. दुसऱ्याला फसवल्यामुळे अधिक लाभ होणार असला, तरी व्यक्तींत परस्परांना सहकार्य करण्याची प्रवृत्ती असते. यातून असे सूचित होते की, व्यक्तींना केवळ आर्थिक लाभच अपेक्षित असतात असे नाही, तर सहकार्याद्वारे मिळणारे सामाजिक लाभही हवे असतात. याबाबत सर्वाधिक वापरले जाणारे उदाहरण म्हणजे दोन ‘कैद्यांचा पेच’ होय.
या उदाहरणातील लाभ केवळ त्या विशिष्ट व्यक्तीच्याच निर्णयावर अवलंबून नसून दुसऱ्याही व्यक्तीच्या निर्णयावर अवलंबून असतो. सामान्यत:, यात व्यक्ती सहकार्य करतात; पण हीच खेळी व्यक्तीऐवजी संगणकावरील खेळात ते करत नाहीत, असे दिसून आले आहे. यातील मिळणाऱ्या पैशाच्या वाढीबरोबर मेंदूचे उद्दिपनही वाढते. सहकार्य आणि परस्पर विश्वासाची भावना ऑक्सिटोसीन या संप्रेरकावर अवलंबून असते. यातील सहसंबंध सम स्वरूपाचा असतो.
(६) खेळ सिद्धांत ꞉ चेता अर्थशास्त्राचा आणखी एक पैलू म्हणजे प्रायोगिक अतार्किक खेळ सिद्धांत होय. यात खेळातील एकाला पैसे मिळतात आणि तो दुसऱ्याला किती द्यायचे हे ठरवतो. दुसरा खेळाडू ते स्वीकारतो किंवा नाकारतो. जर त्याने ते स्वीकारले, तर दोघांनाही पहिल्याने ठरविल्याप्रमाणे रक्कम मिळेल आणि जर त्याने नाकारले, तर कोणालाही काहीही मिळणार नाही. तार्किक दृष्ट्या दुसऱ्याने कोणताही प्रस्ताव स्वीकारावा; कारण त्याचे मूल्य शून्यापेक्षा जास्तच असेल; मात्र संशोधनात असे आढळले की, व्यक्ती अन्यायकारक वाटणारा प्रस्ताव नाकारते. मेंदूतील वारंवार होणाऱ्या चुंबकीय प्रेरकांमुळे व्यक्ती अन्यायकारक प्रस्तावही स्वीकारण्याची शक्यता असते.
सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्याची भूमिका निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची असते, हेही चेता अर्थशास्त्राने दाखवून दिले आहे. सामाजिक विनिमय सिद्धांत असे प्रतिपादन करतो की, सामाजिक लाभ महत्तम आणि सामाजिक हानी किमान करण्याच्या वृत्तीतून समाजाभिमुखी वर्तन केले जाते. इतरांकडून मान्यता मिळविणे हा यात महत्त्वपूर्ण सकारात्मक प्रेरक घटक असतो. या व्यतिरिक्त सामाजिक निवड सिद्धांत आणि वर्तनात्मक वित्त या क्षेत्रांतही चेता अर्थशास्त्रीय अभ्यास आणि प्रयोग महत्त्वपूर्ण ठरतात. वित्तीय आपत्ती घडण्यामागची परंपरा शोधून काढण्यासाठी या प्रयोगांचा उपयोग झाला आहे. यावरून असे लक्षात येऊ शकेल की, या शाखेची व्याप्ती आणि आवाका अतिशय मोठा आहे.
प्रत्यक्ष प्रयोग ꞉ विशिष्ट कृती किंवा निर्णय घेत असताना मेंदूचा कोणता भाग सर्वाधिक सक्रिय असतो, हे ठरविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने मेंदूची तपशीलवार चित्रे मिळू शकतात आणि त्यामुळे कृतीमधील संबधित मेंदूच्या विशिष्ट संरचनेची माहिती मिळते. मेंदूबरोबरच मेंदूमधील विविध रसायने आणि विशिष्ट वर्तन यांच्यातील संबंधही शोधला जातो. यामध्ये दोन प्रकारचे संशोधन केले जाते. सध्याची रसायनपातळी आणि विविध वर्तनांचा संबंध किंवा रसायनपातळीत बदल करून त्यामुळे होणाऱ्या वर्तनातील बदलांची नोंद घेणे, असे हे दोन प्रकार असतात.
चेता अर्थशास्त्रात प्रयोगार्थीला विविध आर्थिक निर्णय घ्यायला सांगितले जातात. उदा., एखादी व्यक्ती ताबडतोब मिळणारे ४५ सेंट किंवा ५०% संभाव्यता असणारा एक डॉलर मिळू शकणारा जुगार यात काय पसंत करेल, ते विचारले जाते. नंतर हे निर्णय घेताना त्याच्या मेंदूमध्ये काय आणि कशा स्वरूपाच्या घडामोडी चालल्या आहेत, ते शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यासले जाते.
उपयुक्तता ꞉ चेता अर्थशास्त्र या अभ्यासशाखेमुळे मानवाच्या दुभंग व्यक्तिमत्त्व, स्वमग्नता, नैराश्य, व्यसनाधीनता आणि अशाच इतर वर्तन असाधारणतेचा अभ्यास यापूर्वीच केला गेला आहे. तसेच प्राण्यांमध्ये अतिनियंत्रित प्रयोग करून मानवाच्या आर्थिक वर्तनातील मेंदूच्या भूमिकेची आणि विविध भागांच्या सहभागाची महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते. व्यसने किंवा भास होणे अशा मानसिक रोगांच्या लक्षणे आणि उपचार निश्चितीसाठीही हे प्रयोग उपयुक्त ठरतात, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अगदी अलीकडील काळात चेता विपणन ही चेता अर्थशास्त्राची नव्याने विकसित होणारी उपशाखा ठरली आहे. चेता अर्थशास्त्राचे उद्दिष्ट निर्णय प्रक्रियेचे मूलभूत स्वरूप समजून घेणे, हे असल्याने चेता विपणन या उपयोजित क्षेत्रात मेंदू प्रतिमांचा वापर विपणन संशोधनातील साधने म्हणून केला जात असतो.
चेता अर्थशास्त्र या शाखेची उपयुक्तता केवळ आर्थिक निर्णयांचे विश्लेषण करण्यासाठीच नव्हे, तर मानसशास्त्र आणि चेता विज्ञानातील सिद्धांतांना गणिती साधनांच्या साह्याने शास्त्रीय रूप देण्याची संधी मिळण्याच्या दृष्टीनेही अतिशय आहे. तसेच पारंपरिक विश्लेषणातील त्रुटी किंवा तफावत भरून काढणेही यामुळे शक्य होऊ शकते. अर्थातच, यामुळे मुख्य प्रवाहातील अर्थशास्त्राला फारशी हानी पोहोचत नाही किंवा पर्यायही निर्माण होत नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.
चेता अर्थशास्त्र हे विकासाच्या प्रारूपातील मध्यस्थ म्हणून कामगिरी करू शकते. या शाखेमुळे अनेक नवीन आर्थिक प्रारूपे विकसित झाली आहेत. यामुळे आर्थिक प्रारूपांची चाचणी घेण्याचा एक नवा समर्थ मार्ग निर्माण झाला आहे. अल्डो रस्टीचीनी या तज्ज्ञाने तर असे मत व्यक्त केले आहे की, जर सध्याच्या काळात ॲडम स्मिथ असते, तर ते खात्रीने चेता अर्थतज्ज्ञ झाले असते.
चेता अर्थशास्त्र ही नवोदित शाखा पारंपरिक अर्थशास्त्रापासून दूर जाणारी असलीच पाहिजे, असे नाही. किंबहुना, दोन्ही प्रवाहात साहचर्य असणे अपेक्षित आहे. अर्थशास्त्राने आपली पारंपरिक अभ्यासपद्धतीची झापड दूर करून या नव्या अभ्यासशाखेकडे पाहिल्यास दोन्ही बाजूंचा फायदा होऊ शकेल. सध्या चेता अर्थशास्त्र बाल्यावस्थेत असल्याने त्याला टाळता येऊ शकेल; परंतु वेगाने प्रगत होऊ पाहाणारी ही शाखा फार काळ वंचित ठेवता येणार नाही. तिच्या उपेक्षेने अर्थशास्त्राचेच नुकसान होऊ शकते, ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे.
टीका ꞉ वेगाने विकसित होणाऱ्या आणि उपयुक्त ठरू शकणाऱ्या या उदयोन्मुख क्षेत्रावर ग्लेन हॅरीस आणि इमॅन्युएल डाँचीन यांनी टीका केली आहे. त्यांच्या मते, हे क्षेत्र ’स्वतःचे स्तोम स्वतःच माजवणारे क्षेत्र’ आहे किंवा ‘पारंपरिक प्रारूपांना कमी आणि चुकीचे महत्त्व देणारे क्षेत्र’ आहे. पारंपरिक अर्थतज्ज्ञांची सर्वसाधारण टीका अशी आहे की, निर्णयप्रक्रियेतील न निवडलेल्या माहितीचा (उदा., प्रतिक्रिया देण्याचा वेळ), दृष्टीचा मागोवा आणि मेंदूतील संकेत यांचा वापर कोणत्याही आर्थिक विश्लेषणात वगळला गेला पाहिजे.
चेता अर्थशास्त्र या नव्याने विकसित होऊ पाहाणाऱ्या अभ्यासशाखेचे या अभ्यासाला अनेक पातळ्यांवर विरोध होत असल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञांचे कार्य अधिकच आव्हान देणारे ठरले आहे. अर्थातच, इंग्रजीव्यतिरिक्त भारतीय भाषांमधील या विषयाचे लेखन जवळजवळ नाहीच.
चेता अर्थशास्त्र ही शाखा पारंपरिक आणि जैविक अर्थशास्त्रापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. सद्यकालीन गुंतागुंतीच्या मानवी आर्थिक वर्तनामागचे गुपीत उलगडून दाखविण्यासाठी पारंपरिक आणि आधुनिक चेता अर्थशास्त्र या दोन्ही शाखा परस्परपूरक ठराव्यात अशी अपेक्षा आहे. एकविसाव्या शतकातील पूर्वार्ध या शाखेच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मूळच्या अर्थशास्त्रीय शाखांमध्ये भर घातली गेली, तर चेता अर्थशास्त्र अधिक वेगाने विकसित होऊ शकेल आणि तिला सर्वामान्यताही मिळू शकेल.
समीक्षक ꞉ एन. भालेराव