काहनेमन, डॅनिएल : (५ मार्च १९३४). इझ्राएली-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ व अर्शास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. मानसशास्त्रीय निर्णयक्षमता व निर्णयप्रक्रिया, वर्तनवादी अर्थशास्त्र व सुखवादी मानसशास्त्र यांसंदर्भातील भावी सिद्धांताबद्दल (Prospect Theory) काहनेमन यांना २००२ मध्ये अर्थतज्ज्ञ व्हेर्नॉन लोमॅक्स स्मिथ (Vernon Lomax Smith) यांच्या बरोबरीने अर्थशास्त्र या विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झाला.

काहनेमन यांचा जन्म इझ्राएलमधील तेल अवीव्ह – जाफआ येथे झाला. नाझी-जर्मनी आक्रमणापर्यंत (१९४०) त्यांचे कुटुंब पॅरिस शहरात वास्तव्यास होते. इझ्राएल स्वतंत्र देश होईपर्यंत (१९४८) ब्रिटिश अंमलाखालील पॅलेस्टाइनकडे त्यांना कूच करावे लागले. काहनेमन यांनी १९५४ मध्ये मानसशास्त्र व गणित या विषयांत जेरुसलेम येथील हिब्रू विद्यापीठतून बी. एस. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर काही दिवस इझ्राएली संरक्षणदलाच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणवर्गात मानसशास्त्रीय कल व कसोट्या यांसंबंधी मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी केले. काहनेमन यांनी १९५८ मध्ये अमेरिकेला येऊन १९६१ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली येथून मानसशास्त्र या विषयात पीएच. डी. पदवी मिळविली.

काहनेमन यांनी १९६१ – १९७० या काळात हिब्रू विद्यापीठ, जेरुसलेम येथे मानसशास्त्र या विषयाचा व्याख्याता व १९७० – १९७८ या काळात प्राध्यापक म्हणून काम केले. १९७८ – १९८६ या काळात व्हँकूव्हर येथील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात आणि १९८६ – १९९३ या काळात कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली या ठिकाणच्या अध्यापन कार्यानंतर १९९४ मध्ये काहनेमन यांची प्रिन्स्टन विद्यापीठ येथे युगेन हिगिन्स प्राध्यापक या नावाने मानसशास्त्र या विषयासाठी नियुक्त झाली. त्याच वेळी त्यांनी विद्यापीठातील वुद्रो विल्स स्कूल ऑफ पब्लिक ॲण्ड इंटरनॅशनल अफेअर्स या संस्थेत सार्वजनिक धोरण या विषयाचे अध्यापन केले. तेथून २००७ मध्ये ते मानद प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले.

काहनेमन यांनी १९६० मध्ये प्राध्यापकपदी असतानाच अर्थशास्त्र व मानसशास्त्र विषयक नाविन्यपूर्ण संशोधनास प्रारंभ केला. आर्थिक निर्णय अगर निवडी करताना लोकांचे बोधनिक (Cognitive) वर्तन कसे होते व ते निर्णयाप्रत कसे येतात, हे समजावून घेण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले. सहकारी प्राध्यापक व गणिती मानसशास्त्रज्ञ अमोस टवेरस्की यांच्या सहकार्याने अनिश्चिततेच्या वातावरणात ग्राहकांकडून कसे निर्णय घेतले जातात, यासंबंधीची मांडणी करणारा भावी सिद्धांत व त्याची नवीन विचारप्रणाली त्यांने विकसित केली. १९७९ मध्ये जोखीम तसेच अनिश्चिततेच्या परिस्थितीतील निवड प्रक्रियेचे विश्लेषण करणारी त्यांची प्रॉस्पेक्ट थिअरी ‘प्रॉस्पेक्ट थिअरी : ॲन ॲनॅलिलिस ऑफ इसिजन्स अंडर रिस्कʼ ही शोधनिबंधाच्या रूपाने इकॉनॉमॅट्रिका या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. लोक आर्थिक निर्णय अगर निवडी करताना केवळ संभाव्य लाभ, भविष्यकालीन बदल व संभाव्यता (Probability) याच गोष्टींचा विचार करतात या तत्पूर्वीच्या मांडणीला त्यांनी छेद दिला. यांपैकी काही घटकांना जास्त महत्त्व दिल्याने निवडीबाबत अविवेकी निर्णय होणे शक्य असल्याची मांडणी त्यांनी केली. काहनेमन यांनी आपले व्यापक सर्वेक्षण व प्रयोग यांच्या आधारे असे दाखवून दिले की, किचकट निर्णय परिस्थिती तसेच संभाव्य परिणाम अनिश्चित असल्याने ग्राहकांच्या वर्तनाबद्दलचे विश्लेषण करणे सोपे नसते. त्यामुळे निर्णय व निवडीबद्दलचे त्यांचे अंदाज बरेचदा चुकण्याची शक्यता निर्माण होते. काहनेमन यांनी आपण मानसशास्त्र या क्षेत्रात का प्रवेश केला, याबाबतचे आपले अनुभव नाझी – ऑक्यूपाइड फ्रान्स या ग्रंथात मांडले आहे.

काहनेमन यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुढील ग्रंथ खूप गाजले. अटेन्शन ॲण्ड एफर्ट (१९७३), रेसिडेन्शियल टेनन्सीज (१९८४), मॅप्स ऑफ बाऊंडेड रॅशनॅलिटी (२००३), थिंकिंग फास्ट ॲण्ड स्लो (२०११). या शिवाय, काहनेमन यांचे जवळपास पंधरा पुस्तकांचे सहलेखन केले असून त्यांचे बावीस शोधनिबंधही प्रकाशित झालेले आहेत.

काहनेमन यांना अर्थशास्त्र व मानसशास्त्र या विषयांच्या अध्यापन व संशोधनकार्याबद्दल नोबेल स्मृती पुरस्काराबरोबर पुढील पुरस्कार-सन्मान लाभले. एपीएस डिस्टींग्यूश्ड सायंटिफिक काँट्रीब्युशन अवॉर्ड (१९८२), युनिव्हर्सिटी ऑफ लुईसव्हिले ग्रावेमेयेर अवॉर्ड फॉर सायकॉलॉजी (२००३), अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन्स अवॉर्ड (२००७), टफ्ट्स विद्यापीठ, लेऑनटिएफ प्राइझ (२०१०), ब्लूम्बर्ग फिफ्टी मोस्ट इफ्ल्यूएन्शियल पीपल इन ग्लोबल फायनान्स अवॉर्ड (२०११-१२), तालकॉट पार्सन्स प्राइझ-अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सेस (२०११), थिंकिंग फास्ट ॲण्ड स्लो या ग्रंथासाठी लॉस अँजेल्स टाईम्स बुक अवॉर्ड (२०११), नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचा कम्युनिकेशन अवॉर्ड (२०१२), अमेरिकन प्रेसिडेन्शियल मेडल फॉर फ्रीडम (२०१३). मानद डॉक्टरेट :इरॅस्मस युनिव्हर्सिटी ऑफ रॉटरहॅ, नेदर्लंड (२००९), मॅकगिल युनिव्हर्सिटी, माँट्रिऑल (२०१५).

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा