जरठकुमारी विवाहाची समस्या मांडणारा प्रसिद्ध मराठी सामाजिक चित्रपट. या चित्रपटाची निर्मिती ‘प्रभात फिल्म कंपनी’ या चित्रपटनिर्मिती संस्थेने केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता व्ही. शांताराम यांनी केले आहे. अयोध्येचा राजा, सैरंध्री, अमृतमंथन, संत तुकाराम या पौराणिक चित्रपटांनंतर १९३७ मध्ये ‘प्रभात’चा कुंकू हा चित्रपट पडद्यावर आला. एखाद्या ज्वलंत सामाजिक प्रश्नावरचा या संस्थेचा हा पहिलाच चित्रपट. प्रसिद्ध मराठी लेखक नारायण हरी आपटे यांच्या न पटणारी गोष्ट या कादंबरीवर तो आधारित होता. या चित्रपटाचे संवाद आणि पटकथालेखनही त्यांचेच आहे. तत्कालीन भारतीय समाजातील स्त्रियांविषयीच्या एका प्रश्नाचे, सामाजिक समस्येचे चित्रण यात केले आहे. नीरा (निर्मला) ही एक सुशिक्षित, सुंदर पण अनाथ तरुणी. पैशाच्या लोभाने तिला फसवून तिचा मामा तिचे लग्न केशव या विधुराशी करून देतो. तिचा हा वकील पती वयाने बराच मोठा असतो आणि त्याची मुले तिच्याच वयाची असतात. नीरा हे लग्न मान्य करायला आणि केशवची पत्नी म्हणून राहायला नकार देते. त्यासाठी सासूचा त्रास, सावत्र मुलाच्या लंपटपणालाही तोंड देते. कितीही त्रास झाला तरी अन्याय सहन करणार नाही या तिच्या भूमिकेवर ती अखेरपर्यंत ठाम राहते.
या चित्रपटामध्ये अनाथ तरुण नीरेची भूमिका शांता आपटे ह्या तत्कालीन प्रसिद्ध मराठी अभिनेत्री यांनी केली आहे. तर विधुर केशवची भूमिका मराठी रंगभूमीवरील प्रख्यात नट केशवराव दाते यांनी केली आहे. आपण अजून तरुण आहोत अशा समजातून केशवने(काकासाहेबाने) हे लग्न केलेले आहे. पण नीरेच्या निर्धारापुढे त्याचाही आत्मविश्वास डळमळू लागतो. अशा विवाहसंबंधी अतिशय प्रतिकूल मत असलेल्या त्याच्या मुलीचीही साथ नीरेला मिळते. शेवटी केशव आत्महत्येचा निर्णय घेऊन नीरेला मुक्त करतो.
कुंकू हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला आणि समीक्षकांनी त्याचे भरपूर कौतुकही केले. याचे कारण त्याचा सामाजिक पैलू. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात एक रीत बनलेला वृद्ध पुरुष आणि तरुण स्त्रीचा विवाह हा विषय या चित्रपटासाठी निवडणे ही गोष्ट धाडसाची होती. त्यातही हा चित्रपट नायिकाप्रधान होता आणि त्यातील नायिका झालेले लग्नही न मानण्याइतकी बंडखोर दाखवली होती, हे ही चाकोरीबाहेरचे चित्रण होते. यूरोपमध्ये या काळात स्त्री स्वातंत्र्याचे, बंडखोरीचे वारे वाहत असले, तरी ते भारतात तेवढे प्रखर नव्हते. अशावेळेस इब्सेनच्या अ डॉल्स हाऊस मधल्या नोराचे हे भारतीय विशेषत: महाराष्ट्रीय रूप यशस्वी ठरले हे विशेषच होते. याचे बरेचसे श्रेय व्ही. शांताराम यांच्या कल्पक दिग्दर्शनाला आहे. त्यांनी हा विषय कुठेही अवास्तव होऊ न देता वास्तववादी पद्धतीनेच मांडला. त्यांनी या चित्रपटातील मानसिक आंदोलनांवर भर दिला आणि ती ठसठशीतपणे मांडली. नीराची भूमिका आक्रस्ताळी न वाटता तिच्यावरचा अन्याय मात्र पोचतो. कुठेतरी आपली चूक जाणवलेला चित्रपटातील केशव रागाने आरसा फोडतो आणि त्याची प्रतिबिंबे त्याला वाकुल्या दाखवतात, हा प्रसंग प्रेक्षकांच्या लक्षात राहतो. तसेच रूपक म्हणून वापरलेले घरातले जुने घड्याळही. त्याची टिकटिक केशवच्या मनातील उलघाल दाखवते. शेवटी त्याचा लंबक तो काढतो आणि त्याचा आपल्या चिठ्ठीवर पेपरवेटसारखा उपयोग करतो. या कृतीतून त्याची आत्महत्या दर्शवली आहे.
चित्रपटाचे संगीत आणि अभिनय यामुळेही चित्रपट अधिक उंचीवर जाण्यास मदत झाली. केशवराव भोळे यांनी संगीत दिलेल्या या चित्रपटातील गाणी खूप गाजली. ‘मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वीमोलाची’ हे यातले एक गाजलेले गीत. या चित्रपटात नायिकेच्या तोंडी ‘In the world ‘s broad field of battle, be not like dumb driven cattle ‘ हे एच. डब्ल्यू. लॉंगफेलो यांचे पूर्ण इंग्रजी गाणे आहे. पार्श्वसंगीताऐवजी या चित्रपटात नैसर्गिक आवाजांचा वापर केला गेला आहे. तोही अचूक ठरला.
या चित्रपटातील शांता आपटे यांनी नीरेची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारली. आपण फसवले गेलो आहोत हे समजल्यानंतरची तिची तगमग आणि पेटून उठणे ही घटना प्रेक्षकांना साद घालते. आतापर्यंत भारतीय चित्रपटात ज्या उत्तम स्त्री व्यक्तिरेखा साकार झाल्या आहेत, त्यापैकी ही एक आहे. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे नीरेची सगळी गाणीही त्यांनीच गायली आहेत.
कुंकू या चित्रपटाची हिंदी आवृत्ती दुनिया ना माने या नावाने प्रदर्शित झाली. व्हेनिस चित्रपट महोत्सवातही तो दाखवण्यात आला. ‘प्रभात’ च्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी तो एक मानला जातो. १९३७ सालचा सर्वोत्तम चित्रपट म्हणून याला मानाचा ‘गौहर पुरस्कार’ देण्यात आला.
समीक्षण : संतोष पाठारे