हुबळीकर, शांता : (१४ एप्रिल १९१४–१७ जुलै १९९२). मराठी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात आपल्या अभिनयाने व गायनाने विख्यात झालेल्या अभिनेत्री. त्यांचा जन्म कर्नाटकातील हुबळीजवळच्या अदरगुंची या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव राजम्मा होते. त्यांच्या वडिलांचे नाव दोड्डप्पा होय. शांताबाईंच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांच्या आई-वडिलांचे लागोपाठ निधन झाले, तेव्हा त्यांची मोठी बहीण नीला (नीलम्मा) लग्न होऊन सासरी गेली होती, तर धाकटी बहीण शारदा फक्त अकरा दिवसांची होती. या दोनही मुलींना मग त्यांच्या आजोळी नेण्यात आले. याच काळात मोठा दुष्काळ पडला होता. अशा काळात मुलींचे संगोपन शक्य नसल्याने त्यांच्या आजीने त्यांना हुबळीला आपल्या श्रीमंत विधवा शेतमालकिणीकडे – सावित्राक्काकडे – पाठविले. त्यांनीच मग या दोघी बहिणींचे ममतेने संगोपन केले. त्यांनी राजम्माचे नाव ‘शांता’ असे ठेवले. तेथे शांता यांना शालेय शिक्षण, स्वयंपाकादी गृहकृत्यांचे शिक्षण व अब्दुल करीमखाँ साहेबांकडून चार वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षणही मिळाले.
वयाच्या सोळाव्या वर्षी शांताबाईंचे लग्न एका पंच्याहत्तर वर्षांच्या वृद्धाशी लावून देण्याचे ठरले. अंबू या जिवलग शालेय मैत्रिणीकडून ही बातमी कळताच शांताबाई अंबूच्या पतींच्या साहाय्याने घरातून निसटल्या आणि त्यांच्याच शिफारशीने गदग येथे ‘गुब्बी’ या नाटक कंपनीत काम करू लागल्या (१९३०). त्यामुळे त्यांचे राहणे, जेवण व पगार यांची तेथे सोय झाली. पुढे त्यांना १९३० नंतर नाटकात थोड्याफार महत्त्वपूर्ण भूमिका मिळू लागल्या. कंपनीचा मुक्काम हुबळी, बेळगाव येथे असताना शांताबाईंचा आवाज ऐकून त्यांची शिफारस त्यांच्या सहाध्यायींनी कोल्हापूर सिनेटोनच्या व्यवस्थापकांकडे केली, तेव्हा त्यांना कोल्हापूर सिनेटोनमध्ये नोकरी मिळाली (१९३५) आणि त्यांची चित्रपटातील कारकीर्द सुरू झाली. उंच, शेलाटा बांधा, सुस्वरूप अंगकांती व चेहरा आणि त्याच्या जोडीला रसपूर्ण आवाज आणि लालित्यपूर्ण पदन्यास ही गुणवैशिष्ट्ये असलेल्या शांताबाईंना भालजी पेंढारकर या ख्यातनाम दिग्दर्शकांच्या हाताखाली अभिनयाचे धडे गिरवण्याची संधी मिळाली. भालजींच्या साध्या राहणीचा व वक्तशीरपणाचा शांताबाईंनी अंगीकार केला. याशिवाय मराठी, हिंदी व कन्नड या तीनही भाषांवर हळूहळू प्रभुत्व मिळवायला सुरुवात केली. कान्होपात्रा या चित्रपटात त्यांनी कान्होपात्रेच्या आईची श्यामाबाईंची भूमिका केली. इथे दिनकर कामण्णा, चिंतामणराव कोल्हटकर आदींकडून त्यांना अभिनयाच्या दृष्टीने अनेक गोष्टी शिकावयास मिळाल्या. १९३७ मध्ये त्या प्रभात फिल्म कंपनीमध्ये रुजू झाल्या. इथून त्यांना अमाप लोकप्रियता व वैभव मिळण्यास सुरुवात झाली. माझा मुलगा (हिंदी – मेरा लडका) हा चित्रपट दिग्दर्शित करणारे के. नारायण काळे यांनी त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यांना नायिकेची भूमिका दिली. त्यांनी हिंदी-मराठी शब्दोच्चार सुधारत ती भूमिका साकारली. नंतर व्ही. शांताराम दिग्दर्शित माणूस (हिंदी – आदमी) या सामाजिक चित्रपटाने त्यांना कीर्ती, पैसा व लोकप्रियता मिळवून दिली. शांताबाईंनी या चित्रपटात वेश्याव्यसाय करणाऱ्या मैना नावाच्या स्त्रीची ह्रदयस्पर्शी अशी भूमिका केली. त्यातील त्यांचा अभिनय व गाणी अतिशय गाजली. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीतही त्यांनी नायिकेचे काम केले. त्यांनी साभिनय गायिलेले ‘आता कशाला उद्याची बात’ हे बहुभाषी गीत खूपच प्रसिद्ध झाले. पुढे व्ही. शांताराम यांच्याशी मतभेद झाल्यावर त्यांना प्रभात फिल्म कंपनी सोडावी लागली.
पुण्यातील डेक्कन एम्पोरियमचे मालक बापूसाहेब गीते यांच्याशी शांताबाईंचा परिचय झाला. पूर्वविवाहित व वयाने मोठे असलेल्या गीते यांच्याशी शांताबाईंनी विवाह केला (१९३९). गीते यांचे व्यवसायात फारसे लक्ष नव्हते आणि कर्जाचा बोजाही त्यांच्यावर होता; मात्र शांताबाई आपली प्रतिष्ठा जपत आपल्या परीने चित्रपटांतून कामे करीत असत. एम्. व्ही. व्यास यांनी शांताबाईंना मुंबईला बोलावून प्रभात या चित्रपटात भूमिका दिली. हा चित्रपट प्रदर्शित झाला (१९४०), त्याच सुमारास शांताबाईंच्या पहिल्या चार महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. दुःख आवरून त्यांनी घरगृहस्थी, जीवननाटक, मालन, विश्राम बेडेकर दिग्दर्शित पहिला पाळणा, घर संसार (१९४२) इ. मराठी चित्रपटांमधून उत्तम भूमिका साकारल्या. तसेच एका कानडी चित्रपटातही काम केले. शांताबाईंना दुसरा मुलगा झाला (१९४२), त्याचे नाव प्रदीप. कौटुंबिक जीवनाबरोबरच त्यांची चित्रपटीय कारकीर्दही सुरुच होती. १९४५ मध्ये शांताबाईंनी कुलकलंक हा चित्रपट केला. तो त्यांचा नायिका म्हणून अखेरचा मराठी चित्रपट होय. पुण्यात त्यांनी ‘प्रदीप’ हा भव्य बंगला बांधला; पण पतीचा कर्जबाजारीपणा व मुलाची जबाबदारी यांमुळे बंगला, गाडी इत्यादी त्यांना विकावे लागले. त्यानंतर चरितार्थासाठी शांताबाईंनी १९४५–५७ दरम्यान हैदराबाद, निजामाबाद, दिल्ली, आग्रा, कानपूर, इंदूर, ग्वाल्हेर इ. शहरांतून जलसे केले, नाटकांत कामे केली, गाण्याचे कार्यक्रमही केले. अनुक्रमे १९५७ – १९५८ मध्ये फिल्मिस्तान कंपनीचे सौभाग्यवती भव व घरगृहस्थी असे दोन हिंदी चित्रपट त्यांनी केले; पण या चित्रपटांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. चरितार्थासाठी शांताबाईंनी नंतर शिकवण्या केल्या आणि मुलाचा संसार थाटायला मदत केली; पण कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी स्वतःचे घर सोडले व त्या वसईच्या श्रद्धानंद वृद्धाश्रमात राहू लागल्या (१९७४). त्या वृद्धाश्रमात असतानाच बापूसाहेब गीते यांचे निधन झाले (१९७७).
महाराष्ट्रातील एका प्रतिष्ठित दैनिकाचे तत्कालीन संपादक माधवराव गडकरी यांच्या लेखाने विस्मृतीत गेलेल्या शांताबाईंचे लोकांना स्मरण झाले. सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे त्यांना निवृत्तिवेतन मिळू लागले आणि लोकांनी त्यांना देणग्याही दिल्या. त्यांचा अमृतमहोत्सव संपन्न झाला (१९८९). जागतिक मराठी परिषदेत त्यांचा सत्कार करण्यात आला, तेथे त्यांना त्यांचे अनेक जुने सहकलाकार भेटले. यानंतर पुणे महिला मंडळाच्या वृद्धाश्रमात शांताबाई राहू लागल्या (१९८९). तेथेच अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी कशाला उद्याची बात हे आत्मचरित्र लिहिले (१९९०). त्यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी माणूस चित्रपटातील अभिनयासाठीचा बंगाल फिल्म असोसिएशनचा पुरस्कार (१९३९) महत्त्वाचा होय.