वस्तू, चलने किंवा जीवन विमा पॉलिसी यांच्या किमतीतील चढ-उतारांमुळे होणाऱ्या नुकसानाची संभाव्यता मर्यादित किंवा कमी करण्यासाठी वापरलेली एक व्यवस्थापन रणनीती. विमा पॉलिसी खरेदी न करता जोखीमचे हस्तांतरण करणे म्हणजे जोखीम बचाव होय, असेही म्हणता येते. जोखीम बचावामध्ये विविध तंत्रे वापरली जातात; परंतु मुळात दोन भिन्न बाजारांमध्ये (उदा., रोख आणि भविष्यकालीन बाजार) समान आणि विरुद्ध स्थान घेणे समाविष्ट असते. जास्त उत्पन्न देणारी वित्तीय साधने (रोखे, शेअर्स इत्यादी), स्थावर मालमत्ता किंवा मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करून चलनवाढीच्या परिणामापासून एखाद्याच्या भांडवलाचे संरक्षण करण्यासाठी जोखीम बचावाचा उपयोग केला जातो. सामान्यत: जेव्हा लोक जोखीम बचावाची योजना आखतात, तेव्हा ते स्वतःला एखाद्या नकारात्मक घटनेपासून बचाव करण्याचा प्रयत्न करतात.

जोखीम बचाव तंत्राचा वापर केवळ वैयक्तिक गुंतवणूकदारच नाही, तर पोर्टफोलिओ व्यवस्थापक आणि मोठ्या कंपन्यादेखील करतात. ज्यामुळे विविध प्रकारचे जोखीम कमी होऊन त्यावरील नकारात्मक प्रभाव कमी होतो. एखादी व्यक्ती आपल्या नावाने जीवन विमा पॉलिसी खरेदी केली आणि भविष्यामध्ये त्याचा मृत्यू झाला किंवा काही दुर्घटना घडून त्यास गंभीर दुखापत झाली, तर जीवन विमा पॉलिसी काढली असल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबाचे भवितव्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित होऊ शकते. म्हणून जेव्हा ‘’ गुंतवणुकीचे नुकसान ‘’ गुंतवणुकीच्या नफ्याने सुरक्षित केली जाते, तेव्हा त्यास जोखीम बचाव म्हणून ओळखले जाते.

जोखीम बचाव क्षेत्रे : विविध व्यवसायांमध्ये पुढील भागात जोखीम बचाव तंत्र लागू होऊ शकतो :

  • वस्तू बाजार : कृषी, उर्जा, धातू, विद्युत साधने इत्यादी वस्तूंशी संबंधित जोखमीला वस्तू बाजार म्हणून ओळखले जाते. या वस्तू बाजाराला जोखीम बचाव तंत्र लागू होतो.
  • प्रतिभूती : जोखीम बचावामध्ये रोखे, इक्विटीज, निर्देशांक इत्यादींमधील गुंतवणुकींचा समावेश असतो. या जोखीम बचावाशी संबंधित जोखमीला प्रतिभूती म्हणून ओळखले जाते. यालाही जोखीम बचाव तंत्र लागू होतो.
  • चलन : चलनात विदेशी चलनांचा समावेश आहे. त्याच्याशी संबंधित अनेक प्रकारचे जोखीम आहेत. उदा., चलन जोखीम किंवा विदेशी विनिमय, अस्थिरता जोखीम इत्यादी. या चलनालासुद्धा जोखीम बचाव तंत्र लागू होतो.
  • व्याज दर : व्याज दरांमध्ये कर्ज आणि कर्ज दर समाविष्ट आहे. या दरांशी संबंधित जोखीम व्याज दर जोखीम म्हणून ओळखले जाते. यास जोखीम बचाव तंत्र लागू होतो.
  • हवामान : हवामान या क्षेत्रातदेखील जोखीम बचाव शक्य आहे. उदा., जागतिक हवामान जोखीम निर्देशांक.

प्रकार :

(१) अग्रेषित करार : दोन स्वतंत्र पक्षांनी मान्य केलेल्या तारखेला निश्चित केलेल्या किमतीवर निर्दिष्ट मालमत्ता खरेदी करण्याचा अग्रेषित करार हा एक प्रमाणित करार आहे. अग्रेषित करार वस्तू, चलने इत्यादी प्रकारच्या मालमत्तांसाठी काढला जातो.

(२) भविष्य करार : हा दोन स्वतंत्र पक्षांनी मान्य केलेल्या तारखेला निर्दिष्ट किमतीवर विशिष्ट मालमत्ता खरेदी करण्याचा मानकीकृत करार आहे. भविष्य करार वस्तू, चलने इत्यादी विविध प्रकारच्या मालमत्तांसाठी काढला जातो.

(३) पैसा बाजार : पैसा बाजारामध्ये चलनाच्या अनेक प्रकारच्या आर्थिक घडामोडी, व्याजदरासाठी पैसा बाजार ऑपरेशन्स, एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या मुदतीनंतर अल्पमुदतीची कर्जे घेणे, कर्जे देणे व विक्री करणे हे नि:पक्षपातीपणे केले जाते.

जोखीम बचाव व्यूहरचना : गुंतवणूक ही सामान्यत: जोखीम कमी करण्याचे तंत्र दर्शविते. अग्रेषित करार, पर्याय, अदलाबदल किंवा समभाग अशा विविध वित्तीय साधनांचा बचाव करण्यासाठी कोणतेही मानक धोरण असू शकत नाही; कारण या धोरणांमध्ये बाजारपेठ आणि गुंतवणुकीच्या प्रकारानुसार सतत बदल करणे आवश्यक असते; ज्यासाठी जोखीम बचाव आवश्यक आहे. अशा परिस्थितींचा सामना करण्यासाठी व्यवसायांद्वारे पुढील प्रमाणे काही धोरणे राबविली जाऊ शकतात :

  • मालमत्ता गट : एकापेक्षा जास्त प्रकारच्या मालमत्तेसह आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणून संतुलित पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी ७०% इक्विटीमध्ये आणि उर्वरित ३०% इतर स्थिर स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते.
  • रचना किंवा आराखडा : या पोर्टफोलिओचा एक भाग कर्जासाठी आणि दुसरा उत्पन्नासाठी गुंतविता येतो. जेथे कर्जाचा भाग पोर्टफोलिओमध्ये स्थिरता आणतो, तेथे तो उत्पन्न कमी न होणाऱ्या जोखमीपासून त्याचे संरक्षण करण्यास मदत करतो.
  • पर्याय : रोख बाजाराच्या पोर्टफोलिओच्या संरक्षणासाठी पर्यायी वस्तू किंवा जोखीम खरेदी करून जोखीम बचाव करता येते.
  • रोख रक्कम : ही गुंतवणूक नसून धोरण असल्यामुळे येथे गुंतवणूकदार कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक न करता त्यांची रोख रक्कम हातात ठेवतात.

तोट्याचा धोका कमी करून पोर्टफोलिओची अप्रत्याशित प्रकृती कमी करण्यासाठी जोखीम बचाव हे एक उत्तम माध्यम आहे. जोखीम बचावाद्वारे बाजाराला सुव्यवस्थित आणि कार्यक्षमपणे काम करण्यास मदत होते.

समीक्षक : विनायक गोविलकर