अत्यंत लहान सजीवांपासून ते मोठ्या सस्तन प्राण्यांपर्यंतच्या सजीवांची रचना गुंतागुंतीची असते. त्यांच्यामधील अंतर्गत कार्यांत जसे की, पोषक तत्त्वांचे शरीरातील वहन, बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद, निरूपयोगी द्रव्यांचा निचरा आणि शरीरात समस्थिती राखणे इत्यादी कार्यांत समन्वय साधण्यासाठी अनेक नियामक प्रणालींची आवश्यकता असते. उदा., श्वसन, पचन किंवा रक्ताभिसरण प्रणाली यांच्यासारख्या विविध अवयव प्रणाली विशिष्ट कार्ये करतात. या प्रणालींचे नियंत्रण ही एकपेशीय ते बहुपेशीय अशा सर्व सजीवांमधील एक महत्त्वाची जीवन प्रक्रिया (जैविक प्रणाली) आहे. नियंत्रण प्रक्रियेचे कार्य पेशी, अवयव व संपूर्ण सजीव अशा विविध स्तरांवर चालते. आदिम एकपेशीय सजीवांपासून उत्क्रांती होत होत गुंतागुंतीची जैविक नियंत्रण यंत्रणा विकसित झाली असल्याने या यंत्रणेच्या आवश्यक घटकांमध्ये विविध स्तरांवर समान वैशिष्ट्ये दिसतात.
एकपेशीय सजीवामध्ये पेशी नियंत्रण रासायनिक व विरूपणग्राही संवेदावर अवलंबून असते. बहुपेशीय सजीवांपैकी स्पंजवर्गीय प्राण्यांमध्ये नियंत्रण अगदी प्राथमिक स्वरूपाचे असते. उदा., स्पंजामधील छिद्रे उघडतात व बंद होतात. यामुळे स्पंजातील पाण्याचा प्रवाह नियंत्रित केला जातो. बहुपेशीय सजीवांतील प्राथमिक स्वरूपाचे नियंत्रण जलव्यालसारख्या (Hydra) सजीवांमध्ये आढळते. यांमध्ये चेतापेशी व संपर्क स्थाने (Synapses) असतात. त्याचबरोबर चेतापेशीस ध्रुवता (Polarity) असते. त्यामुळे संदेशवहन एका दिशेने होते. जलव्यालाप्रमाणेच इतर सर्व बहुपेशीय चेतासंस्थेमध्ये हीच वैशिष्ट्ये आढळतात. संवेदी व आज्ञा केंद्रे विकसित होण्याने नियंत्रणामध्ये सुसूत्रता येते. चेतापेशीमुळे नियंत्रण त्वरित होते. ज्या ठिकाणी नियंत्रण त्वरित आवश्यक असते, तेथे चेतानियंत्रण अधिक श्रेयस्कर असते. उदा., जीव वाचवण्यासाठी पळणे किंवा प्रतिकार करणे इत्यादी कामे ऐच्छिक स्नायू करतात.
रासायनिक नियंत्रण ही नियंत्रणाची आणखी एक पद्धत आहे. याला संप्रेरक नियंत्रण असेही म्हणतात. संप्रेरक नियंत्रण अधिक काळ व सावकाश होते. संप्रेरक नियंत्रणासाठी आवश्यक रसायने शरीरात विशिष्ट ठिकाणी स्रवतात. ज्या ठिकाणी संप्रेरकासाठी ग्राही पेशी असतात, त्या अवयवावर संप्रेरकाचा परिणाम होतो. उदा., प्रजनन, पचनसंस्थेतील आवश्यक स्राव संप्रेरकामुळे ज्या त्या वेळी आवश्यकतेनुसार स्रवतात. चेता नियंत्रण व रासायनिक नियंत्रण या दोन्हींमुळे शरीर एकसंधपणे व अधिक कार्यक्षम पद्धतीने कार्य करते.
पहा : संप्रेरके, सजीव आणि जीवनप्रक्रिया.
संदर्भ :
- https://training.seer.cancer.gov/anatomy/body/functions.html
- https://gtr.ukri.org/projects?ref=EP%2FG007446%2F1
- https://www.frontiersin.org/articles/10.3389/fbioe.2021.677976/full#:~:text=%E2%80%9CBiological%20Control%20Systems%2C%E2%80%9D%20the,carry%20out%20their%20functions%20effectively.
- https://ncert.nic.in/ncerts/l/jesc107.pdf
- https://www.nios.ac.in/media/documents/secscicour/English/Chapter-23.pdf
समीक्षक : प्रमोद जोगळेकर