प्रजनन ही सर्व सजीवांमधील एक मूलभूत जीवनप्रक्रिया आहे. बहुतेक सजीवांमध्ये प्रजनन आणि प्रजोत्पादन हे दोन्ही शब्द समानार्थी वापरले आहेत. प्रजनन हे मुख्यत्वे अलैंगिक व लैंगिक पद्धतीने घडून येते. दोन्ही प्रजनन क्रियेमध्ये सजीवांना आपला वंश वाढवण्याची संधी असते. प्रजनन क्रियेत जनुकीय घटक विभाजन व पुन्हा एकत्र येऊन नव्या पिढीची निर्मिती हा या जीवनप्रक्रियेचा उद्देश असतो. ही क्रिया यादृच्छिक (Random) पद्धतीने घडून येते.
यादृच्छिक प्रजननामध्ये दोन भिन्न लिंगी सजातीय नर व मादी उपजत प्रेरणेनुसार प्रजनन करतात. आपल्या अपत्यांना जगण्याची संधी देतात. जेव्हा प्रजननक्षम सजीवांची संख्या मोठी असेल तर हे सहज शक्य होते. परंतु, संकुचित क्षेत्रामध्ये जेव्हा एकाच समुदायाचे सजीव एकत्र असतात, तेव्हा प्रजननक्षम जोड्यांना परस्परांत प्रजनन करणे अनिवार्य होते. त्यांचा जनुक संकोष (Gene pool) मर्यादित होतो. हाच प्रकार अंत:प्रजननामध्ये होतो. अंत:प्रजननामध्ये एकाच वाणाच्या सजीवामध्ये प्रजनन मुद्दाम घडवून आणलेले असते.
अंत:प्रजनन (अंतर्जनन) याचा अर्थ एखाद्या समूहातील सरासरी जनुकीय संबंधापेक्षा अधिक जनुकीय नातेसंबंध असलेल्या प्राण्यांमधील प्रजनन असा आहे. बाह्यप्रजननाची (Outbreeding) संकल्पना याच्या उलट आहे. समूहातील सरासरी जनुकीय संबंधापेक्षा एकमेकांशी कमी जनुकीय संबंध असलेल्या प्राण्यांमधील प्रजनन या अर्थी बाह्यप्रजनन (बहिर्जनन) ही संज्ञा वापरतात. या दोन्ही प्रजनन पद्धती पाळीव प्राण्यांची कृत्रिम पैदास करताना वापरल्या जातात.
प्रजननाची अंत:प्रजनन ही पद्धत यादृच्छिक प्रजननाच्या (Random mating) उलट आहे. यादृच्छिक प्रजननामध्ये नर व मादी यांचा पुनरूत्पादनात पूर्णपणे यादृच्छिक सहभाग असतो. आनुवंशविज्ञानातील प्रसिद्ध हार्डी-वाईनबर्ग सूत्रानुसार (Hardy-Weinberg equation) एखाद्या समूहात यादृच्छिक प्रजनन अनेक पिढ्या होत असल्यास जनुकाच्या वैकल्पिक रूपांची वारंवारता (Allele frequency) स्थिर राहते. परंतु, अंत:प्रजननात मात्र असे होत नाही. अंत:प्रजननामध्ये पुनरूत्पादनात भाग घेणारे नर व मादी हे परस्परांशी जनुकीय दृष्टीने संबंधित असल्याने त्यांच्यातील जनुकांमध्ये तुलनेने अधिक साम्य असते. त्यामुळे जनुकाच्या वैकल्पिक रूपांमधील (Allelomorphs) ठराविक रूपांची वारंवारता वाढते. समूहातील प्राण्यांमध्ये समजातीय युग्मविकल्पी रूपे असणाऱ्यांची संख्या जास्त होते. यालाच जनुकीय समजातीयपणा (Genetic homozygosity) असे म्हणतात. समूहात अनेक पिढ्या अंत:प्रजनन चालू राहिल्यास जनुकीय समजातीयपणा वाढत जातो.
अंत:प्रजननामुळे पाळीव प्राण्यांमध्ये विविध नकारात्मक परिणाम दिसून येतात. तसेच यामुळे सामान्यत: कार्यक्षमतेत एकूण घट होते. ही घट अनेक प्रकारे दिसते. अंत:प्रजननाचे सर्वांत स्पष्ट परिणाम पुनरुत्पादन क्षमतेवर होतात. तसेच उच्च मृत्यु दर, प्राण्यांच्या वाढीचा वेग मंदावणे आणि आनुवंशिक विकृतींची वाढलेली वारंवारता यांद्वारेही अंत:प्रजननाचे परिणाम दिसून येतात. हे परिणाम गुरे, घोडे, मेंढ्या, डुक्कर आणि प्रयोगशाळेत मुद्दाम वाढवले जाणारे उंदीर अशा प्राण्यांमध्ये दिसतात. या परिणामांची तीव्रता व व्याप्ती सर्वसाधारणपणे अंत:प्रजननाच्या प्रमाणावर अवलंबून असते. अंत:प्रजननामुळे समूहांवर होणाऱ्या नकारात्मक परिणामांना ‘अंत:प्रजनन घट’ (Inbreeding depression) असे म्हणतात.
अंत:प्रजनन घटीचे परिणाम प्राणीसंग्रहालयात बंदिस्त करून ठेवलेल्या वन्य प्राण्यांमध्ये दिसतात. अत्यंत कमी संख्येने उपलब्ध असलेल्या अशा प्राण्यांमध्ये प्रजनन करणे भाग असल्याने अंत:प्रजननामुळे जन्मजात शारीरिक व्यंग, जनुकीय दोष व विकृती, आरोग्याच्या समस्या, जननक्षमतेचा ऱ्हास व अकाली मृत्यू हे घडते. जगभरातल्या प्राणीसंग्रहालयांना ही समस्या भेडसावते. या समस्येचा सामना करण्यासाठी अनेकदा प्राणीसंग्रहालयांमधील पशुवैद्यकीय तज्ञ प्रजननासाठी दुसऱ्या प्राणीसंग्रहालयातील नर अथवा मादी आणून बाह्यप्रजनन घडवून आणतात. अमेरिकेतील प्राणिसंग्रहालयात अंतप्रजननाद्वारेच पांढऱ्या वाघांची निर्मिती केली जाते. तेथील पांढरे वाघ हे एकाच नर पांढऱ्या वाघापासून तयार झाले आहेत. अमेरिकेतील टर्पेंटाइन क्रीक वन्यजीव आश्रयस्थान (Turpentine Creek Wildlife Refuge) येथील अंत:प्रजननाद्वारे जन्माला आलेल्या वाघीणीमध्ये शारीरिक विकृती दिसून येते. हीचे आई-वडील हे भाऊ-बहिण होते. या वाघीणीचे नाव केनी (Kenny) असून ही जगातील सर्वांत कुरूप वाघीण म्हणून ओळखली जाते.
अंत:प्रजननाचे असे अनेक नकारात्मक परिणाम होत असले तरी जनुकीय समजातीयपणा (Homozygosity) वाढवता येत असल्याने त्याचा फायदाही घेता येतो. म्हणूनच पाळीव प्राण्यांमध्ये आपल्याला हवे ते गुणधर्म असलेल्या प्राण्यांची जात (Breed) तयार करण्यासाठी अंत:प्रजनन ही महत्त्वाची पद्धत ठरते. उदा., अधिक दूध देणाऱ्या जनावरांची निर्मिती करणे. अंत:प्रजननामुळे जनुकांच्या वारंवारततेत बदल होत असताना जनुकांमधील अप्रभावी वैकल्पिक रूपे (Recessive alleles) एकाच प्राण्यात असण्याची शक्यता वाढते. अशी वैकल्पिक रूपे जर हानीकारक असली अथवा विकारांची असली तर सुप्त असलेले जनुकीय विकार अंत:प्रजननामुळे मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. कारण सर्वसाधारणपणे हानीकारक जनुकांची जी अप्रभावी वैकल्पिक रूपे प्रभावी रूपांमुळे (Dominant alleles) व्यक्त होत नव्हती त्यांचे प्रकटीकरण झालेले असते. याचा त्या समूहावर विपरीत परिणाम होतो. उदा., कुत्र्यांच्या अनेक जातींमध्ये कमरेच्या सांध्यांच्या समस्या, कवटी आणि जबड्यांच्या विकृती आणि अती चिंताग्रस्त अथवा अती आक्रमक स्वभाव अशा विविध आनुवंशिक समस्या अंत:प्रजननामुळे उद्भवतात.
मानवामध्ये वन्य प्राण्यांप्रमाणे यादृच्छिक प्रजननाची पद्धत नाही. प्राण्यांमध्ये मानव हा यादृच्छिक प्रजननाला एकमेव अपवाद आहे. मानवांमध्ये सांस्कृतिक कारणांमुळे निकटच्या नातेवाईकांमध्ये (आई-मुलगा, वडील-मुलगी, भाऊ-बहीण) लैंगिक संबंध ठेवले जात नाहीत. निकटच्या नातेवाईकांमधील विवाहांना गोत्रज विवाह (Consanguinous marriage) म्हणतात. रक्तसंबंधातील असे विवाह सांस्कृतिकदृष्टीने व कायद्यानेही प्रतिबंधित आहेत. अंत:प्रजननामुळे होणाऱ्या समस्या अशा सांस्कृतिक परंपरामुळे आपोआपच काही प्रमाणात टळल्या आहेत. तथापि ज्या समाजांमध्ये चुलत भावंडांमध्ये अथवा मामा-भाची यांच्यातील विवाहांना मान्यता असते अशा समाजांमध्ये अंत:प्रजननाचे जनुकीय दुष्परिणाम होतात. जगभरात अनेक समाजांमध्ये अंतर्विवाहाची (Endogamy) पद्धत अवलंबली जाते. या पद्धतीत टोळी, कुल, धर्म, पंथ, वर्ग (जातपात) अथवा विशिष्ट समूह यांच्यातच विवाह केले जातात. अशा समूहांमध्ये अंत:प्रजनन होत असल्याने त्यांच्यात जनुकीय विकारांचे आणि जननासंबंधी समस्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. जगात अनेक आदिवासी जमातींमधील लोकांची संख्या फार कमी झाल्याने त्या जमातीत अंत:प्रजननामुळे जनुकीय भार (Genetic load) वाढतो. दीर्घकाळ अंत:प्रजनन होत असल्याने विपरीत जनुकीय परिणाम झालेल्या जमाती विनाशाकडे वाटचाल करताना दिसतात.
पहा : अंत:प्रजनन (पू.प्र.), कृत्रिम पैदास व पाळीव प्राण्यांमधील जनुकीय बदल, जीवन प्रक्रिया : प्रजनन, पशुप्रजनन (पू.प्र.), हार्डी-वाईनबर्ग सूत्र.
संदर्भ :
- https://extension.missouri.edu/publications/g2911
- https://www.turpentinecreek.org/the-rest-of-the-story/
- http://messybeast.com/genetics/tigers-inbreeding.htm
- https://tigers.panda.org/news_and_stories/stories/the_truth_about_white_tigers/
- Ness, Brian D. and J.A. Knight Encyclopedia of Genetics, Pasadena: California: Salem Press, 2004.
समीक्षक : मोहन मद्वाण्णा